विशाखदत्त : (सहावे/सातवे शतक ?). संस्कृतातील ⇨मुद्राराक्षस ह्या नाटकाचा कर्ता. ह्या नाटकाच्या प्रस्तावनेत त्याने स्वतःविषयी काही माहिती दिली आहे. त्यानुसार तो महाराज भास्करदत्ताचा पुत्र आणि सामंत वटेश्वराचा नातू होता, असे दिसते. ह्या नाटकाच्या भरतवाक्यात राजा चंद्रगुप्ताचा निर्देश आहे (चिरमवतु महीं पार्थिवश्चंद्रगुप्त: ७.१९ ). राजा चंद्रगुप्त मौर्याचे राज्यशासन स्थिर करण्यासाठी नंदराजाचा अमात्य राक्षस ह्याच्यावर चाणक्याने आपल्या राजकारणी डावपेचांनी केलेली मात हा ह्या नाटकाचाच विषय असल्यामुळे भरतवाक्यात येणारा निर्देश चंद्रगुप्त मौर्याचा नसून तो नाटकाची रचना झाली, त्या काळात प्रत्यक्ष सत्तेवर असणारा गुप्त घराण्यातील समुद्रगुप्ताचा मुलगा चंद्रगुप्त असावा व त्याची स्तुती करण्यासाठी तो निर्देश असावा. हा चंद्रगुप्त म्हणजे गुप्त घराण्यातील चंद्रगुप्त दुसरा(कार. सु. ३७६-सु. ४१४) हा असावा, असे मानण्याकडे काही अभ्यासकांचा कल आहे. विशाखदत्ताच्या अलीकडेच सापडलेल्या देवी-चंद्रगुप्त या नाटकाचा आधार याबाबतीत घेतला जातो. पण त्याबाबतही ऐकमत्य नाही कारण ‘पार्थिवोऽवंतिवर्मा’, ‘पार्थिवोऽरंतिवर्मा’ आणि ‘पार्थिवो दंतिवर्मा’ असे काही पाठभेदही ह्या ठिकाणी आढळतात. प्रा. तेलंग आणि प्रा. ध्रुव ह्यांच्या मते ‘पार्थिवोऽवंतिवर्मा’ हाच पाठ ग्राह्य असून ह्यात उल्लेखिलेला अवंतिवर्मा हा कनोजचा अवंतिवर्मा होय व तो विशाखदत्ताचा आश्रयदाता होता. कनोजचा अवंतिवर्मा हा इ. स. च्या सातव्या शतकात होऊन गेला. त्यामुळे विशाखदत्ताचा काळही इ. स. चे सातवे शतक (पूर्वार्ध) असा मानता येईल परंतु अवंतिवर्मा नावाचा एक राजा काश्मीरमध्येही होऊन गेला. नवव्या शतकाच्या मध्यावर त्याने काश्मीरवर राज्य केले. हे सर्व लक्षात घेता विशाखदत्त हा निश्चितपणे केव्हा होऊन गेला हे सांगता येत नाही. सहाव्या शतकाची अखेर किंवा सातव्या शतकाचा प्रारंभ हा त्याचा संभाव्य काल होय एवढेच सांगता येते.
कुलकर्णी, अ. र.