विल्सन, चार्ल्स टॉमसन रीस: (१४ फेब्रुवारी १८६९–१५ नोव्हेंबर १९५९). स्कॉटिश भौतिकीविज्ञ. ‘विल्सन बाष्प (किंवा मेघ) कोठी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व जलबाष्प संघननाने (पाण्याच्या वाफेचे द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेद्वारे) विद्युत् भारित कणांचे मार्ग दृश्य स्वरूपात दाखविणाऱ्या उपकरणाच्या [⟶ कण अभिज्ञातक] शोधाबद्दल त्यांना १९२७ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक ⇨आर्थर हॉली क्रॉम्पटन यांच्याबरोबर विभागून मिळाले. किरणोत्सर्ग, क्ष-किरण, विश्वकिरण (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणारे अतिशय भेदक किरण) आणि इतर अणुकेंद्रीय आविष्कार यांच्या अध्ययनाकरिता या उपकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. 

विल्सन यांचा जन्म ग्लेनकोर्स (मिडलोथिअन) येथे झाला. त्यांचे शिक्षण ओवेन्स कॉलेज (मँचेस्टर) आणि सिडनी ससेक्स कॉलेज (केंब्रिज) येथे झाले. कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत क्लार्क मॅक्सवेल विद्यार्थी म्हणून त्यांची निवड झाली. ते कॅव्हेंडिश प्रयोगशाळेमध्ये प्रायोगिक भौतिकी विषयाचे व्याख्याते होते (१९९–१८). १९१८ मध्ये सौर भौतिकी वेधशाळेत त्यांची विद्युत् वातावरणविज्ञानाचे प्रपाठक म्हणून नेमणूक झाली. ते केंब्रिज विद्यापीठात प्रकृतिविज्ञानाचे जॅक्सोनियन प्राध्यापक होते (१९२५–३४).

विल्सन यांनी मेघ व धुके यांची निर्मिती, तसेच वातावरणीय विद्युत् यांसंबंधी अनेक वर्ष अभ्यास केला. पर्वतशिखरांवरील विशिष्ट मेघांचे परिणाम समजून घेण्याकरिता त्यांनी बंदिस्त डब्यातील आर्द्र हवेचे प्रसरण करता येईल, अशी योजना तयार केली. प्रसरणामुळे हवा थंड झाली आणि ती अतिसंपृक्त (संपृक्त अवस्थेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणापेक्षा अघिक प्रमाणात बाष्प असणारी अवस्था) झाली आणि आर्द्रतेचे धूलिकणांवर संघनन झाले.

इ. स. १८९५ ते १९११ या काळात त्यांनी ‘बाष्प कोठी’ हे उपकरण तयार करण्यासाठी जलबाष्प संघननासंबंधीच्या आपल्या ज्ञानाचा उपयोग केला. धूलिकणयुक्त आर्द्र हवेचे काही विशिष्ट मर्यादेपलिकडे एकदम प्रसरण केले म्हणजेच त्या हवेची अतिसंपृक्तता काही विशिष्ट अवस्थेपर्यंत नेली, तर हवेत धुलिकण नसतानाही तिच्यातील जलबाष्पाचे पाण्याच्या थेंबामध्ये संघनन होते व मेघ तयार होतात, असे विल्सन यांना आढळून आले. धूलिकण नसताना हवेतील आयनांवर (विद्युत् भारित अणू किंवा रेणू यांवर) संघनन होऊन मेघ तयार होतात असा त्यांनी निष्कर्ष काढला. क्ष-किरणांसारख्या प्रारणामुळे (तरंगरूपी ऊर्जेमुळे) तयार झालेले आयन अधिक तीव्रपणे मेघ निर्मिती करू शकतील असा त्यांनी अंदाज केला. प्रयोग केल्यानंतर बाष्प कोठीमध्ये संघनित जलबिंदूंचा मार्ग प्रारणामुळे (क्ष-किरणांनी उत्सर्जित झालेल्या इलेक्ट्रॉनांमुळे) तयार झाल्याचे त्यांना आढळून आले. या पद्धतीचा आयनीकारक कणांचे मार्ग छायाचित्रित करण्यासाठी उपयोग होईल, असे त्यांच्या लक्षात आले. १९११ मध्ये त्यांनी एकेकट्या आल्फा व बीटा कणांचे तसेच इलेक्ट्रॉनांचे मार्ग छायाचित्रित केले. या उपकरणाच्या साह्याने सी. डी. अँडरसन यांनी पॉझिट्रॉन या मूलकणाचा शोध लावला. १९१२ पावेतो विल्सन यांनी आपले बाष्प कोठी उपकरण परिपूर्ण केले व ते अणुकेंद्रीय भौतिकीच्या अभ्यासात अत्यावश्यक बनले. पुढे याची परिणती १९५२ मध्ये डॉनल्ड ए. ग्लेसर यांनी बुद्‌बुद्‌ कोठीचा शोध लावण्यात झाली. [⟶ कण अभिज्ञातक].

गडगडाटी वादळावरील आपल्या अध्ययनाचा उपयोग करून विल्सन यांनी ब्रिटिशांच्या युद्धकालीन अटकाव बलुनांचे (लष्करी क्षेत्राच्या भोवती बांधून ठेवलेल्या व ज्यांवर लोंबत्या ठेवलेल्या तारांनी व जाळ्यांनी कमी उंचीवरून उडणाऱ्या विमानांना अटकाव करणाऱ्या बलुनांचे) तडितेपासून संरक्षण करण्याकरिता एका पद्धतीची योजना तयार केली. १९५६ मध्ये त्यांनी गडगडाटी वादळ विद्युत् सिद्धांत प्रसिद्ध केला.

इ. स. १९०० मध्ये त्यांची लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड झाली. त्यांना रॉयल सोसायटीची ह्यूज (१९११), रॉयल (१९२२) व कॉप्ली (१९३५) ही सन्मान पदके मिळाली.

विल्सन कार्‌लॉप्स (पीबलशर) येथे मृत्यू पावले.

सूर्यवंशी, वि. ल.