विल्किन्झ, मॉरिस ह्यू फ्रेडरिक : (१५ डिसेंबर १९१६- ). न्यूझीलंडमध्ये जन्मलेले ब्रिटिश जीवभौतिकीविद. त्यांनी विकसित केलेले क्ष-किरण विवर्तन तंत्र (अपारदर्शक पदार्थाच्या कडेवरून किरणांचा मार्ग बदलण्याच्या गुणधर्माचा उपयोग करणारे तंत्र) हे ⇨आनुवंशिकतेचा आधार असलेल्या डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल) या ⇨न्यूक्लिइक अम्लाची त्रिमितीय संरचना शोधून काढण्यासाठी ⇨फ्रॅन्सिस हॅरी कॉम्पटन क्रिक व ⇨जेम्स ड्यूई वॉटसन यांना फार उपयुक्त ठरले. या संशोधन कार्याबदद्दल या तिघांना मिळून १९६२ सालचे वैद्यकाचे अथवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
विल्किन्झ यांचा जन्म न्यूझीलंडमधील पोंगारोआ येथे झाला. मात्र सहाव्या वर्षीच शिक्षणासाठी इंग्लंनला आले. त्यांचे शिक्षण किंग एडवर्डस स्कूल (बर्मिगहॅम, इंग्लंड) आणि सेंट जॉन्स कॉलेज (केंब्रिज) येथे झाले. १९३८ साली पदवी मिळविल्यावर त्यांनी बर्मिंगहॅम विद्यापीठात अध्ययन केले. तेथे त्यांनी घन पदार्थाच्या दीप्तीविषयी [सर्वसाधारण तापमानाला होणाऱ्या रासायनिक विक्रिया, इलेक्ट्रॉनांचा भडियार, विद्युत्चुं बकीय प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) व विद्युत्क्षेत्रे या कारणांमुळे होणाऱ्या प्रकाश उत्सर्जनाविषयी] संशोधन केले व १९४० साली त्यांनी भौतिकीमधील पीएच. डी. पदवी बर्मिंगहॅम विद्यापीठातून संपादन केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी दोन वर्षे अमेरिकेत बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात मॅनहॅटन प्रकल्पामध्ये काम केले. तेथे त्यांनी अणुबाँबमध्ये वापरण्यासाठी लागणाऱ्या समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) अलगीकरण करण्याचे काम केले. या अलगीकरणासाठी त्यांनी द्रव्यमान वर्णपटलेखक तंत्राचा उपयोग केला होता [⟶ द्रव्यमान वर्णपटविज्ञान].
अमेरिकेहून १९४५ साली परतल्यावर त्यांनी स्कॉटलंडमधील सेंट अँड्रयूज विद्यापाठात व्याख्याने म्हणून काम केले. १९४६ साली ते लंडन येथील किंग्ज कॉलेजातील मेडिकल रिसर्च कौन्सिलच्या जीवभौतिकी विभागात दाखल झाले. तेथे ते १९५५ साली उपसंचालक व १९७०-८० दरम्यान संचालक होते. तेथे त्यांनी अनुसंधानाची एक मालिकाच राबविली. याची अंतिम परिणिती डीएनएच्या क्ष-किरण विवर्तन अध्ययनात झाली. १९५१ साली त्यांची वॉटसन यांच्याशी ओळख झाली. विल्किन्झ यांनी क्ष-किरण विवर्तन तंत्राद्वारे मिळविलेली स्फटिकरूप डीएनएची प्रतिकृती वॉटसन यांना दाखविली होती. या तंत्रावर भर देऊन वॉटसन यांनी मग डीएनए रेणूच्या संरचनेचा अभ्यास करण्यावर भर दिला आणि क्रिक यांनी डीएनएच्या संरचनेविषयीच्या गणितीय व सैध्दांतिक बाजूंवर लक्ष केंद्रित केले. यातून डीएनएच्या रेणूची त्रिमितीय संरचना उघड झाली.
किंग्ज कॉलेजात ते रेणवीय जीवविज्ञान (१९६३-७०) व जीवभौतिकी (१९७०-८१) या विषयांचे प्राध्यापक होते. नंतर त्यांनी तेथे गुणश्री प्राध्यापक म्हणूनही काम केले. तेथे असताना त्यांनी कोशिकारसायनसास्त्रामध्ये (कोशिका-पेशी-व तिचे घटक व मुख्यतः रासायनिक घटकांचे व एंझाइमांचे कोशिकेतील स्थान यांच्या रसायनशास्त्राच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या अभ्यासामध्ये) वापरण्यात येणाऱ्या प्रकाश सूक्ष्मदर्शिकी तंत्रांवर महत्त्वाचे लेखन केले व ते प्रसिद्ध केले. त्यांनी नंतर आरएनएच्या (रिबोन्यूक्लिइक अम्लाशच्या) संरचनेच्या विश्लेषणाचे कामही हाती घेतले होते.
यदाकदाचित वैज्ञानिक प्रगती व वापर माणसाच्या हाताबाहेर जाईल याविषयी त्यांना चिंता वाटत होती. यामुळेच त्यांनी ब्रिटिश सोसायटी फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इन सायन्स या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले (१९६९) आणि १९८१ साली ते रसेल कमिटी अगेन्स्ट केमिकल वेपन्स व १९८४ साली फूड अँड डिसआर्ममेंट इंटरनॅशनल या संस्थांचे सदस्य झाले. अमेरिकन पब्लिक हेल्थ ॲसोसिएशनने त्यांना १९६० साली ॲल्बर्ट लास्कर पुरस्कार दिला होता. याशिवाय अमेरिकन सोसायटी ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्स् (१९८४) व अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस (१९७०) या संस्थांचे सन्माननीय सदस्यत्व आणि सन्माननीय एल्एल्. डी. ही पदवी हे मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. दीप्ती, न्यूक्लिइक अम्लांणची रेणवीय संरचना, तंत्रिका कला (मज्जा पटले) इ. विषयांवर त्यांनी लिहिलेले लेख निरनिराळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.
भालेराव, य. त्र्यं. ठाकूर, अ. ना.