विनिमयात्मक विश्लेषण: (ट्रँझॅक्शनल ॲनॅलिसिस टीए). ही एक मानसोपचाराची पद्धती आहे तशीच ती व्यक्तिमत्त्व आणि मनोविकृती यांबतची एक सिद्धांतप्रणालीही आहे. हिचा उगम आणि जास्त प्रसार अमेरिकेत झाला परंतु गेल्या दशकापासून या विशिष्ट मानसोपचारपद्धतीच्या लोकप्रियतेला आणि मान्यतेला काहीशी ओहोटी लागली आहे. विनिमयात्मक विश्लेषणाचा सिद्धांत एरिक बर्न (१९१०-१९७०) या अमेरिकन मनेविश्लेषण-तज्ज्ञांनी ट्रॅझॅक्शनल ॲनॅलिसिस इन सायकोथेरपी या पुस्तकातून १९६१ साली प्रथम मांडला. तेच ह्या पद्धतीचे जनक होत. या सिद्वांताचा सार्वत्रिक प्रसार त्यांच्या गेम्स पीपल प्ले (१९६४) या जगप्रसिद्ध पुस्तकाने झाला. हे पुस्तक इतके लोकप्रिय झाले, की त्यात नवीन अर्थाने वापरले गेलेले जुने शब्दप्रयोग अमेरिकेच्या बोलीभाषेत सामावले गेले. उदा., स्ट्रोक्स, स्विच, गेम्स, पे ऑफ इत्यादी.

एरिक बर्न हे प्रथम फ्रॉइडप्रणीत मनोविश्लेषण (सायकोॲनॅलिसिस) शिकले होते. अमेरिकेतील सॅन फ्रँन्सिस्को येथे ते व्यवसाय करीत. ‘सॅन फ्रॅन्सिस्को सायकोॲनॅलिटिक् इन्स्टिट्यूट’चेते सदस्यही होते. परंतु मनोविश्लेषणाच्या पद्धतीत उपचारास बरीच वर्षे लागतात आणि त्यात मानवी अंतर्मनावर जो भर दिलेला असतो त्यापेक्षा मानवातील परस्परसंबंध जाणून घेणे अधिक आवश्यक आहे, असे वाटल्याने ते पुढे मनोविश्लेषणाच्या पद्धतीपासून दूर गेले. १९५० ते १९७० या काळात त्यांनी विनिमयात्मक विश्लेषण या पद्धतीचा विकास व प्रसार केला.

‘कुरवाळ्या’ (स्ट्रोक्स) ह्या मानवी वर्तानामागील प्रमुख प्रेरणा आहेत. अर्भकांना जवळ घेऊन वा कुरवाळून उत्तेजित न केल्यास त्यांची वाढ खुंटते व प्रकृतीही ढासळू शकते. अर्भकावस्थेत कुरवाळ्या स्पर्शाने केल्या जातात पण मोठेपणी त्यांचे प्रतीकात्मक रूप दिसते. उदा., अर्थपूर्ण वा सूचक दृष्टिक्षेप, हावभाव वा एखादा सूचक शब्द! बहुधा कुरवाळ्या उत्तेजक किंवा आधारदायी असतात परंतु काही वेळा त्या नकारार्थी (झिडकारणाऱ्या) असतात. बर्नच्या कल्पनेप्रमाणे भावनिक वाढ होण्यासाठी कुरवाळ्या-नकारार्थी असल्या तरी आवश्यक असतात. त्यांची उणीव भासल्यास लोकांची खेळ (गेम्स)खेळण्यची प्रवृत्ती बळावते अथवा वर्तनविकृती जडते (‘खेळ’ ही संकल्पना पुढे स्पष्ट केली आहेच).

आ. १. व्यक्तिमत्वाचे तीन घटक

दैनंदिन मानवी वर्तनाचे निरीक्षण करीत असताना बर्न ह्यांना असे आढळून आले, की कुठलीही एक व्यक्ती विविध परंतु परस्परविरोधी वृत्ती व त्याचप्रमाणे वर्तणूक दाखविते. मात्र एका वेळी दाखविलेली वृत्ती व त्यामुळे घडलेली वर्तणुक ह्यांत सुसंगती असते. ह्या निष्कर्षावरूनच बर्न ह्यांनी निरनिराळ्या अहं-अवस्थांची संकल्पना मांडली. प्रत्येक माणसामध्ये बालक (चाइल्ड), पालक (पेरेंट) व प्रौढ (अँडल्ट) अशा तीन प्रकारच्या अहं-अवस्था असतात. एरिक बर्न ह्यांनी ह्या अवस्था वर्तुळांच्या साहाय्याने दाखविल्या (आ. १). लहानपणी आपणास आलेल्या अनुभवांतून या अवस्था तयार होतात आणि त्या जन्मभर कार्यरत असतात. या अवस्थांमध्ये योग्य संतूलन व समन्वय असणे मानसिक आरोग्यासाठी जरूर असते. या तीनही अहंअवस्था जाणिवेच्या पातळीवर कार्य करीत असतात. त्यांचा आपण अनुभव घेऊ शकतो. आणि त्यांचे विश्लेषणही करू शकतो. या अवस्थांचा विचार करताना बर्न यांनी अबोध मनाला फारसे महत्त्व दिलेले नाही, हा विनिमयात्मक विश्लेषणपद्धती आणि मनोविश्लेषणपद्धती यांतील महत्त्वाचा फरक आहे. वेगवेगळ्या अहं-अवस्थांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे (विनिमयात्मक विश्लेषणावरील लिखाणात दर वेळी बालक अहं-अवस्था पालक अहं-अवस्था व प्रौढ अहं-अवस्था असे उल्लेख न करता बालक, पालक, प्रौढ असा सुटसुटीत उल्लेख केलेला आढळतो) :

बालक : (चाइल्ड). एखाद्या बालकाप्रमाणे अनुभव घेणे आणि वर्तणूक करणे हे या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे. उत्साह, उत्स्फूर्तता, बालकाची संवेदनशीलता हा या अवस्थेचा एक भाग आज्ञाधाररकपणा आणि सहकार्य हा दुसरा भाग तर बंडखोरी, वर्चस्वाला आव्हान देणे, पारंपारिक कल्पनांबाबत वाद घालणे हा तिसरा भाग. प्रत्येकाच्या बालक-अवस्थेची नेमकी वाढ व विकास कशा प्रकारे होईल, हे लहानपणी आलेल्या अनुभवांवर आधारित असते. एकदा तयार झालेले ‘बालक’ व्यक्तीमध्ये जन्मभर कार्यरत असते. उदा., लहानपणीच्या कटू अनुभवांमुळे एखाद्या व्यक्तीचा उत्साह, उत्स्फूर्तता व संवेदनशीलता यांना हानी पोहोचली, तर मोठेपणी जीवनातील आनंद उपभोगण्याची त्या व्यक्तीची क्षमता कमी होईल. बालक घडत असताना मोठी माणसे (मुख्यः आई-वडील) उघडपणे काय बोलतात, यापेक्षा त्यांच्या वागण्यातून काय सुचविले जाते याला महत्त्व आहे. प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा जे सुचविले गेलेले असते त्यानुसार बालक आकार घेते. उदा., एखादे वडील वरवर मुलाची हुशारी मानत असतील पण वागण्यातून ‘तूला हे जमणार नाही, तुझे हे चुकले’ असे दर्शवीत असतील, तर त्या माणसातील बालकात न्यूनगंडची भावना प्रकर्षाने आढळून येईल.

पालक : (पेरेंट). आपल्याला लहानपणी-पहिल्या पाच वर्षात-प्रत्यक्ष पालकांचे आणि पालकसुदृश्य व्यक्तींचे आलेले अनुभव, त्यांचे हुकुम, उपदेश, त्यांनी घातलेली बंधने यांतील ज्या गोष्टी आपण आत्मसात केल्या असतील, यांतून आपल्यातील ‘पालक’ तयार होतो. पहिल्या दोन वर्षांत अशा अनुभवांच्या स्मरणातील नोंदी शाब्दिक नसून, पालकांच्या बोलण्याचा सूर, चेहऱ्यावरचा भाव, त्यांनी केलेला स्पर्श ह्या स्वरूपात असतात. मूल बोलायला लागल्यावर मात्र या नोंदी शाब्दिक होतात. पालकांच्या प्रेमाचा जो अनुभव आपल्याला आलेला असतो त्याने आपल्यातील पालकाचा पोषणात्मक भाग बनतो,तर पालकांच्या सूचना, नैतिक आणि अन्य नियम, बंधने, टीका यांच्यापासून आपल्यातील पालकाचा नियमन करणारा भाग बनतो.


आ. २. प्रौढ अहंचा उगम

प्रौढ : (ॲडल्ट). मूल वयाच्या दहा महिन्यानंतर कुतूहलाने परिसरातील वस्तू हाताळते, त्यांचे ज्ञान करून घेते. पुढे ते चालू लागल्यावर बाह्य जगताचा स्वतः अनुभव घेते आणि त्याविषयी स्वतःची कल्पना (पालकांनी दिलेली नव्हे) बनविते. ह्या परिसराच्या समन्वेषणी (एक्सप्लोअरिंग) धडपडीला आत्मविद्यमानीकरण (सेल्फॲक्च्युअलायझेशन) असे संबोधिले जाते. इथे ‘प्रौढ’ अहंला सुरूवात होते (आ.२). विचार करणे, माहिती जमविणे व तिचे वर्गीकरण करणे, शक्यतांचा विचार करणे आणि निर्णय घेणे ही ‘प्रौढा’ची लक्षणे आहेत. पालक व बालक यांतील नोंदी प्रौढ तपासून घेऊ शकतो आणि आपल्या वर्तणुकीत त्यांना योग्य स्थान देऊ शकतो. ‘पालका’तील योग्य वाटणारा भाग पक्का केला जातो, अयोग्य वाटणारा भाग बदलला जाऊ शकतो. ‘बालका’तील नकारात्मक नोंदी पुसल्या जात नाहीत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.

प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वात पालक, बालक व प्रौढ ह्या ज्या तीन अहं-अवस्था असतात, त्या एकमेकांवर कुरघोडी करीत नसल्या आणि आपण कसे वागावे हे ठरवायला त्या सहजतेने आणि लवचीकपणे उपलब्ध असल्या, म्हणजे मन निरोगी राहते. या तीन अहं-अवस्था स्वतंत्र परंतु परस्परपूरक न राहता एकमेकांना बाधित करतात, तेव्हा मानसिक अवस्थता निर्माण होते.

विनिमय: एका व्यक्तीच्या कोणत्याही एका अहं-अवस्थेपासून निघालेल्या चेतकाला वा उत्तेजकाला (स्टिम्युलस) जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या कोणत्याही एका अहं-अवस्थेपासून प्रतिसाद मिळतो, तेव्हा दोघांमध्ये ‘विनिमय’ होतो. बर्न ह्यांच्या मते विनिमय हा सामाजिक देवाणघेवाणीचा मूलभूत घटक आहे. विनिमयामुळे त्यातील सर्व व्यक्तींना कुरवाळ्या मिळतात.

विनिमयाचे मुख्य प्रकार तीन आहेत: (१) पूरक (कॉंप्लिमेंटरी) विनिमय, (२) विपरित (क्रॉस्ड) विनिमय व (३) मतलबी (अल्टीरिअर) विनिमय. हे  प्रकार स्पष्ट करण्यासाठी आकृती काढून तीत बाणांचा (सदिश) उपयोग करण्यात येतो. एका व्यक्तीच्या विशिष्ट अहं-अवस्थेने निर्माण केलेला चेतक आणि दुसऱ्या व्यक्तीच्या विशिष्ट अहं-अवस्थेने त्याला दिलेला प्रतिसाद हे सदिशांच्या साहाय्याने दाखवितात.

आ. ३. पूरक विनिमयाचे दोन प्रकार (१) पूरक विनिमय: यामध्ये दोन्ही सदिश एकमेकांवर समांतर असतात. पालक ⟶बालक हा चेतक असल्यास बालक ⟶ पालक हाप्रतिसाद असतो. या प्रकारात संवाद दीर्घ काळ राहू शकतो. साधारणपणे हे विनिमय प्रौढ ⇄ प्रौढ असे असतात (आ. ३ अ). बालक ⇄ पालक विनिमयाचे उदाहरण असे:तापाने मलूल झालेला नवरा पत्नीकडून आईच्या मायेची (कुरवाळ्या) अपेक्षा करतो आणि पत्नी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला कुरवाळते (आ. ३. आ).

 पती : ‘‘माझ्या चाव्या कुठे आहेत?’’ 

पत्नी : ‘‘टेलिफोनजवळ आहेत.’’ 

आ. ४. विपरीत विनिमयाचा प्रकार

(२) विपरीत विनिमय: या प्रकारामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या अहं-अवस्थांतून निघालेले सदिश एकमेकांना छेद देतात आणि त्यामुळे तो संवाद संपतो. यामधून पुढे भांडणही सुरू होऊ शकते. 

पती : ‘‘माझ्या चाव्या कुठे आहेत?’’ 

पती : ‘‘काल तुम्ही टाकल्या असतील तेथे.’’

उदा., नवरा कामावर जायच्या घाईत पत्नीला ‘‘माझ्या चाव्या कुठे आहेत ?’’ असे विचारतो (प्रौढ ⟶ प्रौढ) पण पत्नीचे उत्तर येते, ‘‘काल तुम्ही टाकल्या असतील तेथे’’ (पालक ⟶ बालक) (आ. ४) येथे संवाद तुटतो. याऐवजी पत्नीने ‘‘टेलिफोनजवळ आहेत’’ असे उत्तर दिले असते, तर तो विनिमय प्रौढ ⟶ प्रौढ असा झाला असता व संवाद चालू राहू शकला असता (आ. ३अ).

(३) मतलबी विनिमय: यामध्ये वरवर सामाजिक स्तरावर एक विनिमय होत असतो. मानसिक स्तरावर होणाऱ्या  विनिमयाला बर्न अधिक महत्त्व देतात. ते समजून घेतल्याशिवाय मानवी वर्तनाचा अंदाज वर्तविता येत नाही. उदा., हा एक संवाद : मित्र १ विचारतो, ‘‘किती वाजले?’’ असे विचारतो, तेव्हा सामजिक स्तरावर तो प्रौढ ⟶ प्रौढ असा चेतक आहे. ‘‘सहा वाजले’’ हे उत्तरही ह्या चेतकाला पूरक असा प्रतिसाद आहे. परंतु मानसिक स्तरावर तो ‘‘चल फिरायला जाऊ’’ असा बालक ⟶ बालक असू शकेल. मित्र २ ‘‘सहा वाजले’’ असे उत्तर देतो, तेव्हा सामाजिक स्तरावर प्रौढ असा प्रतिसाद आहे परंतु मानसिक स्तरावर तो ‘‘मी नाही जा’’ असा बालक ⟶बालक असू शकेल (आ. ५). लोक खेळत असलेल्या खेळांसाठी (गेम्स पीपल प्ले) अशा प्रकारचे मतलबी विनिमय आवश्यक असतात (आकृतीत दाखविताना मानसिक स्तरावर होणारा विनिमय तुटक रेषांनी दाखवितात).

आ. ५. मतलबी विनिमयाचा प्रकार

कुरवाळ्या मिळविणे ही जशी माणसाची गरज आहे तशीच वेळ नीट, सुव्यवस्थितपणे घालविणे ही देखील महत्त्वाची गरज आहे. तिला ‘स्ट्रक्चर हंगर’ म्हणतात. आपला मोकळा वेळ घालविण्याच्या किंवा दिनचर्या आखण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्यांना वेळेची आखणी (स्ट्रक्चरिंग ऑफ टाइम) असे संबोधिले जाते. याच्या तीन पद्धती आहेत : भौतिक, सामाजिक व वैयक्तिक. आपापल्या परिसरात वावरताना जी कामे केली जातात (उदा., बागकाम) त्याचा कार्यक्रम भौतिक समजला जातो. सामाजिक पद्धतीत पारंपारिक वर्तन व सोपस्कर (सणवार, शिष्टाचार इ.) यांचा समावेश होतो. ज्या वर्तनपद्धती वैयक्तिक मानसिक गरजेप्रमाणे आणि निवडीने आचरणात येतात, त्यांना बर्न यांनी ‘खेळ’ (गेम्स) असे संबोधिले आहे.


 खेळ: काही प्रकारच्या मानवी वर्तणुकीचा आपल्याला अंदाज बांधता येतो, तिच्यात पुनरावृत्ती दिसून येते, तिच्यामागे सुप्त इच्छा असतात आणि ती बहुधा घातक असते. अशा प्रकारच्या वर्तणुकीला बर्न ‘खेळ’ (मानसिक) असे संबोधतात. खेळ ही दोन किंवा अधिक जणांमध्ये चाललेल्या मतलबी (अल्टीरिअर) विनिमयांची साखळी असते आणि त्याशेवट एक अपेक्षित व स्पष्ट निष्पत्ती असते. असे खेळ अनेकांच्या जीवनाची एक शैली बनून जाते व हे खेळ विभिन्न स्वरूपात पुन्हा पुन्हा दिसून येतात. खेळ सुरू करणाऱ्याचा खेळामागे एक सुप्त हेतू (कॉन) असतो. काही काळ विनिमय झाल्यावर खेळ सुरू करणारा अचानक आपली भूमिका बदलतो (स्विच) आणि खेळ संपतो. खेळ खेळणाऱ्या सर्वांना त्यातून खेळाचे फळ (पे ऑफ) मिळते. अनेक प्रकारच्या व कमीअधिक गुंतागुंत असलेल्या खेळांची हूबेहूब वर्णने बर्न ह्यांनी केलेली आहेत.

दैनंदिन जीवनातील अशा खेळांचे एक उदाहरण पुढीलप्रमाणे:एक फिरता विक्रेता एका गृहिणीला एकाच प्रकारची दोन उपकरणे दाखवितो. त्यांतील महाग उपकरण खपवायचा त्याचा मतलब (कॉन) असतो. पण प्रत्यक्षात बोलताना मात्र तो, ‘‘ते तुम्हाला परवडणार नाही दुसरे घ्या’’ असे सांगतो. परंतु त्याच्या खोचक बोलण्याचा त्याच्या अपेक्षेप्रमाणे परिणाम होऊन त्या गृहीणीचा न्यूनगंड जागा होतो आणि आपल्यातील कमीपणा नाकारण्याच्या सुप्त भावनेपोटी ती हट्टाने महान उपकरणच घेते. ह्या अपेक्षित शेवटामुळे दोघांचेही समाधान (पे ऑफ) होते. त्याला महाग वस्तू विकल्याचे, तर तिला मोठेपणा अनुभवल्याचे.

अशा प्रकारच्या अनेक खेळांची उदाहरणे बर्न ह्यांनी दिली आहेत. त्यांतील काही खेळ खूप गुंतागुंताचे असतात. अनेक माणसे त्यांत भाग घेऊ शकतात आणि काही खेळांचा परिणाम हा हिंसकही होऊ शकतो. या खेळांच्या पद्धती माणसे लहानपणीच शिकतात आणि आयुष्यभर माणसे ते खेळ वेगवेगळ्या प्रकारे खेळत राहतात. प्रत्येक माणूस काही विशिष्ट खेळच खेळू शकतो. समाजात वावरताना आपला खेळ खेळू शकेल, असा साथीदार ती माणसे निवडतात.

याचे प्रसिद्ध उदाहरण ‘‘तू मला अडवले नसतेस तर’’ (‘‘इफ इट वेअरन्ट फॉर यू’’) ह्या बर्न ह्यांनी लिहिलेल्या खेळाचे. हा खेळ बऱ्याच वैवाहिक समस्यांत खेळलेला आढळतो. एका गृहिणीला लहानपणापासून शास्त्रोक्त नाच शिकायची फार हौस होती परंतु चारचौघांच्या व अपयशाच्या वाटणाऱ्याभीतीमुळे ती नाचायला शिकतच नाही. पुढे ती आपला नवरा असा निवडते, की जो तिला मुठीत ठेवेल व कसलीच आकांक्षा, हौस पुरी करू देणार नाही आणि तसे घडते देखील. त्यामुळे तिला पुढे ‘‘तू मला अडवले नसतेच तर मी एक उत्तम नर्तिका बनले असते’’ असा दावा वारंवार करून आपल्या कुचंबणेसाठी सर्वांची सहानुभूती मिळवायला भरपूर वाव मिळतो. विशेषतः मैत्रिणींत. शिवाय नवर्या ला ह्यामुळे अपराधी वाटून तो तिला खूप भेटवस्तू आणतो व इतर सवलती देतो. थोडक्यात, ती स्वतःचा सुप्त हेतू साध्य करण्यासाठी विशिष्ट स्वभावाचा नवरा करते. आणि त्या आधारे नंतर इतरांकडून कुरवाळ्या मिळविते.

जीवनगाथा: (लाइफ स्क्रिप्ट). आपला वेळ घालवायची आखणी ही साधारणपणे थोडया काळापुरती मर्यादित असते. आपल्या जीवनयात्रेतील दीर्घ काळाची रचना मात्र लहानपणीच आखली जाते. पुढे आपल्याला काय हवे, आपण काय करावे, कशा तऱ्हेने जीवन जगावे, धीराने का पडखाऊपणाने ह्याचा विचार वा निर्णय (पॉलिसी) आधीच घेतले जातात. त्याला ‘जीवनगाथा’ असे बर्न ह्यांनी म्हटले आहे. परंतु अशी जीवनगाथा वा जीवनकालरचना आचरणात आणली जातेच असे नाही ती मनात मात्र असते. काही वेळा जीवन त्या रचनेच्या उलटदेखील होऊ शकते. ही प्रतिरचना (काउंटर स्क्रिप्ट). जीवनगाथा बालपणातील अनुभवांवर आधारित असते. त्यासाठी योग्य तो व्यक्तिविकास व्हावा लागतो, तसेच यशापयशाची एक विशिष्ट पद्धत आत्मसात करावी लागते.

ही जीवनगाथा लहानपणीच ‘लिहिली’ जाते परंतु पुढील अनुभवाप्रमाणे तीत बदल होतात. मूळचा आराखडा बदलत नाही. बहुधा त्या जीवनगाथेत नायक व खलनायक तसेच जिंकणारे व हरणारेही आधीच ठरवलेले असतात. प्रत्यक्ष जीवनात ह्या भूमिका त्यांच्या आप्तेष्टांना व इतर संबंधितांना दिल्या जातात. तशी अपेक्षा ती व्यक्ती मनात बाळगते. त्याप्रमाणे वागते आणि त्यांच्या जीवनगाथेत ठरल्याप्रमाणे इतरांची प्रतिक्रिया होते (नायकाची अथवा खलनायकाची).

जीवनगाथेच्या मुळाशी एक जीवनस्थिती (लाइफ पोझिशन) असते. उपलब्ध चार जीवनस्थितींपैकी एक जीवनस्थिती आपण अजाणता, किंवा काही थोडया माणसांच्या बाबत म्हणायचे, तर जाणीवपूर्वक, निवडलेली असते. विनिमयात आपण स्वतःकडे कोणती भूमिका घेणार व दुसऱ्याकडे कोणती भूमिका देणार, हे आपण स्वीकारलेल्या जीवनस्थितीवरून ठरते. अशा प्रकारे बाल्यावस्थेनंतरचे आपले वर्तन ह्या जीवनस्थितीनुसार ठरते.

बर्नप्रणीत विनिमयात्मक विश्लेषणात अशा चार जीवनस्थिती मांडलेल्या आहेत:(१) ‘‘मी ठीक नाही-तुम्ही ठीक आहात’’ (आय ॲम नॉट ओके-यू आर ओक). (२) ‘‘मी ठीक नाही-तुम्ही-पण ठीक नाही’’ (आय ॲम नॉट ओके-यू आर नॉट ओके). (३) ‘‘मी ठीक आहे-पण तुम्ही ठीक नाही’’ (आय ॲम ओके-यू आर नॉट ओके). (४) ‘‘मी ठीक आहे-तुम्ही ठीक आहात’’ (आय ॲम ओके-यू आर ओके). ह्यांतील पहिल्या तीन स्थिती या वयाच्या तिसऱ्यावर्षापर्यंत निश्चित होतात. या पहिल्या तीन स्थिती मनाच्या अबोध पातळीत पहिल्या तीन वर्षात आलेल्या अनुभवांमुळे, अजाणता  ठरलेल्या असतात, तर चौथी स्थिती आपण आयुष्यात मोठे झाल्यावर जाणीवपूर्वक व विचार करून स्वीकारतो.

पहिली स्थिती सर्वमान्य आहे कारण अर्भकावस्थेत असहायता, परावलंबन व सुखासाठी पालकांकडून संगोपन (सकारात्मक कुरवाळ्या) अपरिहार्य असते. त्यामुळे आपले ठीक नाही आणि तुमचे (पालकांचे) ठीक आहे, असा सुप्त भावनिक दृष्टिकोन निर्माण होतो. ह्याचा पगडा मनात इतका खोलवर बसतो, की मोठेपणीसुद्धा ह्याच स्थितीकडे ती व्यक्ती नकळत वळते व त्याप्रमाणे वागते. पडखाऊपणा, न्यूनता व उदासीनता ह्याच वृत्तीतून निर्माण होतात. समाजातील बहुसंख्य व्यक्तींत ही पहिली जीवनस्थिती आढळून येते. ही पहिली जीवनस्थिती वयाच्या पहिल्या वर्षाअखेर तयार होते. वयाच्या पुढील दोन वर्षांत आलेल्या अनुभवांवरून तिचे दुसऱ्यार वा तिसर्यान जीवनस्थितीमध्ये रूपातंर होऊ शकते.


 वयाच्या दुसऱ्यात वर्षी मूल चालते, धडपडते, पडते, मार लागतो, रडते देखील परंतु काही पालक सहानुभूती व सकारात्मक कुरवाळ्याऐवजी त्यांना मस्ती केल्याबद्दल शिक्षाच करतात किंवा दुर्लक्ष करतात ज्यामुळे पालकांच्या उबदार आणि प्रेमळ सान्निध्याला म्हणजेच सकारात्मक कुरवाळ्यांना ती मुले मुकतात. त्यामुळे पालकांबद्दलची ते ‘ठीक’ असल्याची भावना बदलून ते ‘ठीक नाहीत’ अशी होते. त्यातून ‘‘मी ठीक नाही-तुम्हीपण ठीक नाही’’ ही स्थिती निर्माण होते. पुढील जीवनात ह्या स्थितीच्या अंमलामुळे नैराश्य, असहायता व जीवनाची अर्थहीनता जाणवली जाऊन बाह्य वर्तन बदलते. व्यक्ती एकाकी बनते.

काही मुलांचे पालक क्रूर असतात. मुलाला अतिकठोर शिक्षा, मारहाण वयाच्या लहीनपणीच (तीन वर्षांपर्यंत) केली जाते. अशी मुले ‘‘मी ठीक नाही-तुम्हीपण ठीक नाही’’ ही स्थिती सोडून ‘‘मी ठीक आहे-तुम्ही ठीक नाही’’ या स्थितीत जातात. हा बदल कसा होतो? पालकांकडून सतत तीव्र नकारात्मक कुरवाळ्या मिळाल्याने कुरवाळ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी ते मूल स्वतःचे सांत्वन करायला शिकते (सेल्फ स्ट्रोकिंग). यातून ‘माझा मी बघू शकतो, मला कोणाची गरज नाही’ ही भावना बळावते आणि ‘‘मी ठीक आहे-तुम्ही ठीक नाही’’ ही जीवनस्थिती पक्की होते. ह्या स्थितीतून समाजविरोधी वृत्ती निर्माण होते व ती व्यक्ती गुन्हेगारही बनू शकते.

मोठेपणी शिक्षणातून, ज्ञानातून आलेल्या दृष्टीने आत्मनिरीक्षण केल्यामुळे आणि विचारपूर्वक व्यवहारी व वास्तववादी दृष्टीकोन जोपासल्यामुळे विचार करून सामाजिक परिसराकडे समतोलपणे पाहायची वृत्ती होते. ही बांधिलकी यशाच्या प्राप्तीसाठी कष्ट करायची वृत्ती निर्माण करते. प्रौढ अहंच्या प्रभावामुळे इतरांकडे पहायचा दृष्टीकोन विचारी व परिपक्व होतो, आत्मनिश्वास वाढतो आणि ‘‘मी ठीक आहे-तुम्हीपण ठीक आहात’’ अशी जीवनस्थिती तयार होते. समाजातील यशस्वी लोकांच्या मनोवृत्ती ह्या स्थितीवरच आधारलेली असते.

‘‘मी ठीक नाही-तुम्ही ठीक आहात’’ ह्या स्थितीतून आलेल्या नाराजीवर मात करण्यासाठी लहान मुले ‘माझेच छान आहे’ (माइन इज बेटर) हा खेळ खेळतात. म्हणजेच आत्मप्रतारणा करून स्वतःचे सांत्वन करतात. लहान भांवडांच्या खोड्या काढणे, त्यांना मारणे, त्यांची खेलणी हिसकावून घेणे, मोठ्या भावंडांना चिडवणे, त्यांचे न ऐकणे अशा वागण्यातून तात्पुरते का होईना, ‘मी ठीक नाही’ ही अप्रिय जाणीव कमी होते. परंतु शेवटी वरील खेळातून निराशाच पदरी पडते आणि पुन्हा तीच जाणीव बळावते. मोठेपणीदेखील अशी व्यक्ती स्वतःची दिलासा देण्यासाठी ‘खेळ’ खेळते. नातलग, शेजारी वा सहकारी यांच्यापेक्षा ‘मी वरचढ आहे’ ही खोटी भावना टिकविण्यासाठी व्यर्थ धडपड करणे, मोठेपणाचा आव आणण्यासाठी फाजील खर्च करणे, तो परवडण्यासाठी कमीलीचे कष्ट वा गैरव्यवहार करून प्राप्ती वाढवणे किंवा कर्जबाजारी होणे आणि त्यातून पुढे तो तोंडघशी पडणे हाच निराशाजनक अनुभव अशा व्यक्ती घेत असतात.

विनिमयात्मक विश्लेषणाच्या पद्धतीने उपचार करताना मानसोपचारतज्ज्ञ रूग्णांच्या तक्रारी व त्यांची पार्श्वभूमी समजून घेतात. त्यांना विनिमयात्मक विश्लेषण ऊर्फ ‘विधी’ (टीए) या उपचारपद्धतीची कल्पना देतात. नंतर विविची परिभाषा शिकवतात. त्यात विनिमय, अहंचे तीन प्रकार, जीवनस्थिती, जीवनगाथा वा जीवनरचना व शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘खेळ’ यांची विशेष कल्पना देतात. त्यानंतर रूग्णाला दुसऱ्यांच्या अहंचे तीन प्रकार ओळखायला शिकवतात. स्वतःचेही तीन अहं कसे वागतात हे उदाहरणे देऊन समजावले जाते.

बहुधा समान समस्या असलेल्या व्यक्तींना एका समूहात नोंदवून एकत्र बोलावले जाते. त्यांच्या एकत्र भेटी आठवड्यातून दोन वेळा तरी योजल्या जातात. त्या समूहासमोर प्रत्येक व्यक्ती प्रथम आपली ओळख करून देऊन, नेतर आपली समस्या व त्यामागील व्यथा सांगते. मानवी संबंधीत बिघाड ही समस्या असल्यास ती व्यक्ती आपली कैफियत व बाजू मांडते. इतरजण त्या व्यक्तीस प्रश्न विचारून तिची समस्या समजावून गेतात. उपचारतज्ज्ञ त्या व्यक्तीच्या वर्तनाचे विनिमयात्मक विश्लेषण करून त्याची कल्पना उपचारार्थ आलेल्या समूहास देतो. त्यानंतर प्रत्येकाला त्या व्यक्तीच्या विनिमयात्मक विश्लेषणाचा प्रयत्न करायला सांगितले जाते. असे दुसऱ्यांनी विश्लेषण करून घ्यायची पाळी समूहातील प्रत्येक व्यक्तीवर येते. त्यानंतर प्रत्येकाला स्वतःच्या वर्तनाचे विनिमयात्मक विश्लेषण करायला प्रवृत्त केले जाते. पुढे जरूर पडल्यास प्रत्येकाला स्वतंत्रपणे मार्गदर्शन केले जाते. अशा तऱ्हेने व्यक्तीचा प्रौढ अहं हा आपल्या पालक व बालक अहंवर नियंत्रण मिलवतो आणि आपल्या वृत्तीत व वर्तनात समाजमान्य आणि वास्तवतेला अनुसरून बदल करण्यास व्यक्ती शिकते. भूतकाळातील घटनांवर भर न देता (उदा., न्यूनता, कुरवाळ्यांची कमतरता) वर्तमानकाळातील गरजांवर जास्त लक्ष दिले जाते. असे घ़डल्यास कालांतराने त्या व्यक्तीचे मानसिक ताण कमी करण्याच्या प्रयत्नांना यश येते.

ह्या उपचारांचा वापर सामाजिक समस्या-उदा., वैवाहिक समस्या, विवाहपूर्व संबंध, नोकरीतल्या समस्या (मालक-नोकर संबंध), बालवर्तन समस्या, किशोरवर्तन समस्या तसेच काही मानसिक विकार (भयगंड, उदासीनता, भावातिरेकी विकार, व्यक्तित्व विकार, व्यसनाधीनता) आणि मनोशारिरीक विकार ह्या समस्यांसाठी केला जातो.

संदर्भ:1. Berne, Eic, Games People Play, London, 1968.

         2. Berne, Eric, Transactional Analysis in Psychotherapy, New York, 1961.

         3. Berne, Eric, What Do You Say After You Say Hello? London, 1975.

         4. Harris, T. A. I,am O. K. You’re O. K., London, 1973.

        5. Kaplan, H. L. Saddock, B. J. Ed. Comprehensive Text Book of Psychiatry, Fifth Edition, Baltimore, 1989.

शिरवैकर, र. वै.