सिनिक पंथ : सॉक्रेटीसचा अनुयायी अँटिस्थिनीझ (इ. स. पू. सु. ४४४— ३६८) ह्याने स्थापन केलेला आणि वैराग्याची शिकवण देणारा पंथ. अँटिस्थिनीझ हा प्रथम गॉर्जिअस ह्या सॉफिस्ट पंथीयाचा शिष्य होता परंतु नंतर तो सॉक्रेटीसच्या जीवनाने प्रभावित झाला. ऐहिक सुखोपभोगांबद्दल अनासक्त असलेले सॉक्रेटीसचे जीवन त्याच्यासमोर होते. सद्गुणी होणे हे जीवनाचे साध्य होय, अशी शिकवण अँटिस्थिनीझची होती. अँटिस्थिनीझचा शिष्य सीनोपीचा डायोजीनीझ (इ. स. पू. सु. ४१२— ३२३) याने ह्या पंथाची प्रतिष्ठा वृद्घिंगत केली.

आत्मकल्याणासाठी माणसाने आपल्या इच्छा-वासनांचे निर्मूलन करुन आपले जीवन सदाचारसंपन्न आणि स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खोट्या पांडित्याच्या अथवा सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या कृत्रिमतेच्या नादी न लागता मनुष्याने सुगम स्वाभाविकतेकडे वळले पाहिजे. सामाजिक रुढीचे आणि संकेतांचे स्तोम न माजवता साधे, निसर्गसुलभ जीवन जगले पाहिजे, असे सिनिक पंथीयांचे म्हणणे होते. माणसांचे परस्परांशी बंधुत्वाचे नाते असते, म्हणून ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही वृत्ती धारण केली पाहिजे, असेही त्यांचे प्रतिपादन होते.

सीनोपीचा डायोजीनीझ हा अँटिस्थिनीझच्या शिकवणीने प्रभावित झालेला सर्वांत प्रसिद्घ तत्त्ववेत्ता. त्याच्याविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. आपल्या पंथाच्या शिकवणीप्रमाणे जगण्यासाठी सभ्यतेचे रुढ संकेत डावलून तो जगला असे म्हटले जाते तथापि त्याचे आचरण अत्यंत साधे व निरीच्छतेचे होते असे दिसते.

ह्या पंथाला त्याचे नाव कसे पडले ह्याविषयी निरनिराळी स्पष्टीकरणे देण्यात येतात, ती अशी : आपल्या पंथाची शिकवण अँटिस्थिनीझ अथेन्स नगराच्या पूर्वेस असलेल्या सायनोसार्गेस नावाच्या मैदानात देत असे. त्यावरुन ह्या पंथास ‘सिनिक’ हे नाव प्राप्त झाले, हे एक स्पष्टीकरण. Cyno (Kuon) ह्या शब्दाचा अर्थ, ग्रीक भाषेत कुत्रा असा होतो. रुढ सामाजिक संकेतांना धक्का देऊन अँटिस्थिनीझचे अनुयायी कुत्र्यासारखे जीवन जगत असल्यामुळे त्यांना ‘सिनिक’ म्हटले जाऊ लागले, असेही म्हणतात. [→ ग्रीक तत्त्वज्ञान].

सिनिक पंथीयांच्या विचारांत आणि वर्तनात पुढे उथळपणा येऊन ते अतिरेकी आचरण करु लागले, तसेच आपल्या विचारांचे प्रतिपादन तर्कशुद्घ रीतीने करण्याऐवजी इतरांच्या मतांचा उपहास करण्यातच ते आपली बुद्घिमत्ता खर्च करु लागले. त्यामुळे हा पंथ यथावकाश ऱ्हासाला लागला तथापि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात सिनिक पंथीयांनी काही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ज्या वेळी ग्रीक लोकांच्या जीवनात नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत होता, त्या वेळी त्यांनी सद्गुणसंपन्नतेचे कणखर नीतिशास्त्र पुरस्कारिले आणि उद्घाराचा मार्ग दाखविला. पुढे ⇨ स्टोइक पंथाच्या तत्त्वज्ञानालाही सिनिकांकडून प्रेरणा मिळाली.

संदर्भ : 1. Dudley, D. R. A History of Cynicism, London, 1937.

2. Hoistad, R. Cynic Hero and Cynic King, Uppsala, Sweden, 1949.

3. Sayre, F. The Greek Cynics, Baltimore, 1948.

केळशीकर, शं. हि.