वायोमिंग : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील वायव्येकडील पर्वतीय राज्य. १०४० ०३’ ते ११०० ०३’ प. रेखांश आणि ४१० ते ४५० उ. अक्षांश यांदरम्यान विस्तारलेल्या या राज्याची लांबी उत्तर-दक्षिण ४४२ किमी. व पूर्व-पश्चिम ५८७ किमी. आहे. एकूण क्षेत्रफळ २,५३,३२६ चौ. किमी. असून त्यापैकी २,१२५ चौ. किमी. जलव्याप्त आहे. क्षेत्रफळानुसार राज्याचा देशात नववा क्रमांक लागतो. लोकसंख्या ४,८०,०१२ (१९८९ अंदाज). या राज्याच्या उत्तरेस माँटॅना, पूर्वेस साउथ डकोटा व नेब्रॅस्का दक्षिणेला कोलोरॅडो व उटा, तर पश्चिमेला उटा, आयडाहो व माँटॅना ही राज्ये असून याची राजधानी शायेन (लोकसंख्या ५१,०००-१९८९ अंदाज) आहे. ‘वायोमिंग’ हे नाव डेलावेअर इंडियन शब्द ‘मेशेवे-ॲमी  इंग’ (अर्थ-मोठ्या मैदानातील) यावरून आला आहे.

भूवर्णन : राज्याचा ३३%भाग पर्वतीय, तर उर्वरित ६७% भाग खोरी (द्रोण्या) व उंचीवरील मैदाने यांनी व्यापलेला आहे. प्राकृतिक रचनेनुसार  राज्याचे चार प्रमुख भाग पडतात : (१) मध्य रॉकी पर्वतरांग-राज्याचा वायव्य व पश्चिम भाग, (२) दक्षिण रॉकी पर्वतरांग-आग्नेय भाग, (३) वायोमिंग द्रोणी-मध्य व दक्षिणेकडील भाग आणि  (४) ग्रेट प्लेन्स (मैदानी प्रदेश) – राज्याचा पूर्व भाग.

(१) मध्य रॉकी पर्वतरांग :  या भागाला वायोमिंग रॉकीज” असेही संबोधतात. याच्या केंद्रस्थानी असलेली ॲबसारका रांग ही यलोस्टोन राष्ट्रीय उद्यानाच्या पूर्वेकडे आहे. हिचे पूर्वेकडे, आग्नेयीकडे व दक्षिणेकडे असे तीन फाटे  पसरत गेले आहेत. पूर्वेकडील पर्वतरांग सु. ४८० किमी. लांब व १६ ते ६४ किमी. रुंद असून तिच्यामध्ये शोशोन, आउलक्रीक, ब्रिजर, बिग्‌हॉर्न या पर्वतांचा समावेश होतो. आग्नेयीकडील पर्वतरांग सु. २०० किमी. लांब व २४ ते ४० किमी. रुंद असून ती वायोमिंग द्रोणीपर्यंत पसरली आहे. तीमध्ये ग्रॉस व्हेंटर व विंड रिव्हर हे पर्वत अंतर्भूत होतात. दक्षिणेकडील पर्वतश्रेणी सु. २४० किमी.  लांब असून ती आयडाहो व उटा राज्यांच्या सीमांपर्यंत पसरत गेली आहे. तिच्यामध्ये टीटॉन, स्‍नेक रिव्हर, होबॅक तसेच वायोमिंग व सॉल्ट रिव्हर इ. पर्वतश्रेण्या अंतर्भूत आहेत. या पर्वतरांगांदरम्यान पठारी प्रदेश (उदा., यलोस्टोन पठार), पर्वतीय द्रोणी प्रदेश (बिग्‌हॉर्न, ग्रॉस व्हेंटर द्रोण्या) तसेच खोरी (जॅक्सन होल, मॅमथ हॉलो) समाविष्ट झाली आहेत. मध्य रॉकी पर्वतश्रेणीतील विंड रिव्हर या पर्वतातील गॅनिट शिखर हे राज्यातील सर्वोच्च ठिकाण (४,२०२ मी.) असून, त्याखालोखाल बिग्‌हॉर्न पर्वतरांगेतील क्लाउड शिखर (४,०१३ मी.) आहे.

मिसूरी, कोलोरॅडो, कोलंबिया यांसारख्या मोठ्या नद्यांच्या प्रणालींचे वरच्या टप्प्यातील उपप्रवाह मध्य रॉकी पर्वतप्रदेशातच उगम पावलेले आहेत. यलोस्टोन, जॅक्सन यांसारखी मोठी सरोवरे याच भागात आहेत.

(२) दक्षिण रॉकी पर्वतरांग : राज्याच्या आग्नेय भागामध्ये कोलोरॅडो राज्यातील दक्षिण रॉकी पर्वताचे तीन फाटे घुसलेले आहेत. पूर्वेकडील फाटा सु. २२५ किमी. लांब व ४० किमी. रुंद असून तो लॅरमी पर्वतरांग या नावाने ओळखला जातो. मध्यस्थित फाटा ४० किमी. रुंदीचा असून त्यात ८० किमी. लांबीची मेडिसिन बो ही पर्वतरांग अंतर्भूत आहे. पश्चिमेकडील फाटा ४८ किमी. लांब व ३२ किमी. रुंद असून तो ‘सिएरा माद्रे’ या नावाने ओळखला जातो. दक्षिण रॉकी पर्वतभागातील रांगांची उंची साधारणतः २,४०० ते ३,७०० मी. यांदरम्यान असून प्लेट नदीच्या उपनद्या या भागात आढळतात.

(३) वायोमिंग द्रोणी : ही मध्य व दक्षिण रॉकी पर्वत या भागांदरम्यान पसरलेली असून तिचा विस्तार सु. १,०४,००० चौ. किमी. आहे. द्रोणीची कमाल लांबी व रुंदी प्रत्येकी सु. ४०० किमी. असून आकार अनियमित आहे. वायोमिंग द्रोणी म्हणजे पर्वत व टेकड्या यांनी विभक्त केलेल्या अनेक खोऱ्यांचा समुच्चय होय. या खोऱ्यांमध्ये बॅक्स्टर, ब्रिजर, कार्बन, ग्रेट डिव्हाइड, ग्रीन रिव्हर, लॅरमी, शर्ली, शोशोन, वाशकी, विंड रिव्हर इ. प्रमुख खोरी समाविष्ट होतात. या खोऱ्यांतील प्रमुख नद्यांमध्ये ग्रीन, बिग्‌हॉर्न, उत्तर प्लेट इ. उपनद्यांचा समावेश होतो.  ॲल्कोव्ह, बिग्‌सँडी, बॉयसेन, पाथफाइंडर, व्हीटलँड यांसारखे महत्त्वाचे जलाशय वरील नद्यांवर बाधण्यात आले आहेत.

(४) ग्रेट प्लेन्स : हा भाग वायोमिंग राज्याच्या पूर्व भागाचे सु. ७८,००० चौ. किमी. क्षेत्र व्यापतो. राज्याच्या उत्तर सीमेपासून दक्षिणेकडे मैदानांची  रुंदी सु. २६५ किमी. ते सु. ८९ किमी. एवढी संकुचित झाली आहे. याचा उत्तरेकडील भाग ‘मिसूरी पठार’ म्हणून ओळखला जातो. त्याला अनेक तुटलेले कडे असून पठारावरील डोंगरांची उंची सु. ९३० ते १,७०० मी. एवढी आहे. काही ठिकाणी ब्यूट आढळतात. वायोमिंग ब्‍लॅक हिल्स या पर्वतरांगेत इन्‌यन कारा मौंटन हे १,९४१ मी. उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. ग्रेट प्लेन्सचा दक्षिणेकडील भाग हा ‘हाय प्लेन्स’ म्हणून ओळखला जात असून हा प्रामुख्याने विस्तीर्ण सपाट प्रदेश आहे. येथील उंची सु. १,५०० मी. ते १,८५० मी. पर्यंत आढळते. ग्रेट प्लेन्समधून यलोस्टोन, मिसूरी व प्लट या नद्यांच्या उपनद्या वाहतात. बेल फूश, शायेन, उत्तर प्लेट, पॉवडर या येथील महत्त्वाच्या नद्या आहेत.

वायोमिंगच्या पर्वतराजीतून मिसूरी, कोलोरॅडो व कोलंबिया या तीन मोठ्या नद्यांचे उपप्रवाह उगम पावतात. यलोस्टोन, क्लर्क्सफोर्क, बिग्‌हॉर्न, टंग, पॉवडर या मिसूरीच्या उपनद्या उत्तरेकडे, तर शायेन, नायाब्रारा, उत्तर प्लेट या पूर्वेकडे वाहतात. ग्रीन रिव्हर ही कोलोरॅडो ची,  तर स्‍नेक व सॉल्ट या नद्या कोलंबियाच्या प्रमुख उपनद्या आहेत. अनेक नद्यांमुळे राज्यात प्रेक्षणीय निदऱ्या (कॅन्यन) व धबधबे तयार झाले आहेत. निदऱ्यामध्ये लॅरमी नदीची निदरी, स्‍नेक व यलोस्टोन या नद्यांच्या तसेच उत्तर प्लेट, शोशोन व विंड या नद्यांमुळे बनलेल्या निदऱ्या प्रसिद्ध असून यलोस्टोन नदीचे अपर व लोअर धबधबे प्रेक्षणीय आहेत. राज्यात पर्वतीय सरोवरांपैकी फ्रेमाँट, जॅक्सन, शोशोन, यलोस्टोन ही सरोवरे मोठी असून मानवनिर्मित जलाशयांमध्ये ॲल्कोव्ह, बॉयसेन, बफालो बिल, ग्‍लेंडो, कीहोल, पाथफाइंडर हे प्रसिद्ध आहेत. राज्याच्या कोरड्या भागातील व बिग्‌हॉर्न खोऱ्यातील मृदा करड्या तपकिरी रंगाच्या व मध्यम सुपीक, तर ग्रेट प्लेन्स भागातील मृदा अधिक सुपीक आहे.


हवामान: वायोमिंग हे कोरड्या हवामानाच्या राज्यांपैकी एक समजले जाते. राज्याच्या सु. ६६% भागात प्रतिवर्षी ४० सेंमी. पेक्षा कमी, तर पर्वतीय भागात सु. १०० सेंमी. वृष्टी होते. बरेचसे वृष्टिमान बर्फाच्या स्वरूपात असते. वायव्य वा योमिंगमधील पर्वतीय प्रदेशात प्रतिवर्षी ५१० सेंमी. हून अधिक वृष्टी होते. देशातील मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होणाऱ्या प्रदेशांपैकी एक म्हणून या भागाची गणना केली जाते. उन्हाळ्यात राज्यातील तापमान थंड ते सौम्य असून जूलैमध्ये पर्वतीय भागात सरासरी १० से. ते १५ से., तर खोऱ्यांत व मैदानी प्रदेशात ते १६ से. ते २३ से. असे असते. हिवाळ्यातील सरासरी तापमान जानेवारीमध्ये राज्याच्या बहुतेक भागांत -१२ से. ते -४ से. एवढे असते. या काळात थंड वारे वाहतात. पिकांच्या लागवडीवा काळ साधारणपणे १४० ते १५० दिवसांचा असतो पर्वतीय भागात तो सु. ३० दिवसांचा असतो.

वनस्पती व प्राणी : राज्यातील प्रदे शाच्या उंचीनुसार वनस्पतींमध्येही विविधता आढळते मात्र सेजब्रश ही वनस्पती राज्याच्या बहुतेक भागात आढळते. उंचीने लहान परंतु अतिशय चिवट असे गवत राज्याच्या पूर्व भागात, तसेच पर्वतीय दऱ्यांमध्ये विपुलतेने सापडते. मॅहॉगनी व इतर अनेक झुडुपे पर्वतपायथ्याशी दाटीवाटीने उगवलेली दिसून येतात. कॉटनवुड, बॉक्स एल्डर, विलो (वाळुंज) ही झाडे प्रवाहांच्या काठाने व कमी उंचीच्या प्रदेशांत, तर मध्यम उंचीच्या प्रदेशात कॉटनवुडबरोबरच ॲस्पेन, जूनिपर, यलो पाइन, सॉल्ट बुश, यूका यांसारख्या वनस्पती आढळतात अतिउंचावरील प्रदेशात स्प्रूस, फर, लॉजपोल पाइन यांसारखे वृक्ष आहेत. व्हाइटबार्क (पांढऱ्या सालीचा) पाइन वृक्ष राज्याच्या वायव्य भागात सापडतो. राज्याच्या १४%भागात राष्ट्रीय वने आहेत. लॉजपोल व यलो पाइन हीच काय ती प्रमुख व्यापारी वृक्षसंपदा येथील जंगलांत आढळते. राज्यात वनस्पतींप्रमाणे प्राणिसंपदेतही विविधता आढळते. सर्वाधिक प्रमाणात आढळणारे प्राणी म्हणजे हरिण, खेचर हरिण व एल्क हे होत. यांशिवाय उंदीर, काळे अस्वल, करड्या रंगाचे अस्वल, पर्वतीय मेंढ्या व कूगर (प्यूमा), कॉटनटेल ससे, प्रेअरी डॉग, गोफर, खारी, कॉयॉट, बीव्हर इ. अल्प प्रमाणात आढळतात. शिकारीच्या पक्ष्यांमध्ये कॅनडियन हंस, अनेक प्रकारची बदके, सेज ग्राउस, फेझंट, जंगली टर्की यांचा समावेश होतो. काही ठिकाणी (उदा., यलो स्टोन राष्ट्रीय उद्यान) राजहंस आहेत. ट्राउटच्या सहा जाती व इतर माशांचे प्रकार येथील जलाशयांत दिसून येतात.

खनिज संपत्ती : राज्यात खनिज तेल, नैसर्गिक वायू, बिट्युमिनी कोळसा, युरेनियम, लोह खनिज, ट्रोना (सोडा ॲश), बेंटोनाइट व तैलशेल यांचे प्रचंड साठे आहेत. इतर खनिजांत ॲल्युमिनियमचे खनिज, ॲस्बेस्टस, चुनखडी, लिथियम, फॉस्फेट, वाळू व अश्मरी, सिलीनिअम, गंधक, व्हर्मिक्युलाइट इत्यादींचा समावेश होतो.

इतिहास: सुमारे ११,००० वर्षांपूर्वीपासून वायोमिंग भागात अमेरिकन इंडियन शिकारी राहत होते. या क्षेत्रातील रानरेड्यांच्या शिकारीसाठी आरापाहो, शायेन (शायएन), क्रो, फ्लॅटहेड, नेझपर्स(नेझ-पर्से), शोशोन, सू, उटे यांसारख्या अनेक इंडियनांच्या टोळ्यांची येथे वसती होती. १७५० च्या सुमारास फ्रेंच फासेपारध्यांनी वायोमिंग प्रदेशात प्रवेश केला असावा. या भागाचे समन्वेषण मात्र १८०० पर्यंत झाले नव्हते, असे मानले जाते. ‘लुइझिॲना खरे दी’ करारानुसार अमेरिकन शासनाने फ्रान्सकडून या राज्याचा बहुतेक भाग १८०३ मध्ये विकत घेतला. त्यानंतरच्या काळात अमेरिकन फासेपारध्यांच्या अनेक टोळ्या फर मिळविण्याच्या अभिलाषेने या क्षेत्रात भटकत राहिल्या. १८०६ मध्ये या भागात आलेल्या जॉन कोल्टर या फासेपारध्याने यलोस्टोन क्षेत्रात गायझर व उष्णोदक झरे पहिल्यांदा पाहिल्याचे आढळून येते. त्यानंतर पाच वर्षानी रॉबर्ट स्ट्युअर्ट याच्या नेतृत्वाखालील ऑरेगनच्या फर व्यापाऱ्यांच्या पथकाने या क्षेत्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास केला. स्ट्युअर्टच्या पथकाने ‘साउथ पास’ या खिंडीतून पर्वतीय भागांमधून प्रवास करण्याचा सोपा मार्ग शोधून काढला. हा मार्ग पुढे ‘आरंभमार्ग’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर अल्पावधीतच झाक लॅरमी याने सध्याच्या लॅरमी नदीकाठी घर बांधले १९२० च्या सुमारास आरापाहो इंडियनांकडून तो मारला गेला, त्याच्या स्मरणार्थ राज्यातील मैदाने, पर्वत, गावे, शिखर, किल्ला, परगणा नदी यांना त्याचे नाव देण्यात आले. १८२०-३० व १८३०-४० या दोन दशकांच्या कालावधीत फर व्यापार बराच संघटित करण्यात आला.  जनरल ॲशलीच्या मार्गदर्शनाखाली फासेपारध्यांचे वार्षिक मेळावे भरविण्यात येऊ लागले. या निमित्ताने ॲशली कंपनीमार्फत दारूगोळा, अन्न व इतर माल यांचा फरच्या बदल्यात व्यापार केला जात असे. १८३२ मध्ये कॅप्टन बेंजामिन एल. ई. दे बॉनव्हिल याच्या नेतृत्वाखाली शंभरांहून अधिक फासेपारधी व व्यापारी यांचा एक जथा वायोमिंग भागात गेला. विंड नदीखोऱ्यात बॉनव्हिलच्या तुकडीला खनिज तेलाचा शोध लागला. १८३४ मध्ये विल्यम सबलेट व रॉर्बट कँबेल या व्यापाऱ्यानीं पूर्व वायोमिंग भागात ‘फोर्ट विल्यम'(फोर्ट लॅरमी) हा किल्ला, तर १८४३ मध्ये जिम ब्रिजर या फासेपारध्याने नैर्ऋत्य बायोमिंगमध्ये फोर्ट ब्रिजर हा किल्ला बांधला. हे किल्ले या भागातील स्थायी स्वरूपाची व्यापारठाणी बनल्याने वार्षिक मेळाव्यां चे महत्व आपाततः कमी झाले.

लेफ्टनंट जॉन फ्रेमाँटने १८४२ व १८४३ मध्ये विंड रिव्हर मौंटन्सचे समन्वेषण केले. फ्रेमाँटने कॉंग्रेसला आपला अहवा ल सादर केल्यावर, काँग्रेसने १८४६ मध्ये ‘ऑरेगन ट्रेल’ या मार्गावर पश्चिमगामी वसाहतकऱ्यानां संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने किल्ले बांधण्याची मंजूरी घेतली. १८४९ मध्ये अमेरिकन शासनाने फोर्ट विल्यम खरेदी केला. त्याचेच नाव पुढे ‘लॅरमी’ असे ठेवण्यात आले.

वायोमिंग प्रदेशातून पश्चिमेकडे जाणारे समन्वेषक १८५० च्या सुमारास ‘कॅलिफोर्निया ट्रेल’, ‘मॉर्मन ट्रेल’ व ‘ऑरेगन ट्रेल’ या तीन प्रसिद्ध मार्गांचा वापर करीत होते. वसाहतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या प्राण्यांच्या  शिकारी व त्यांचे निष्काळजी वर्तन यांमुळे जंगलांना आगी लागणे, रोगराई पसरणे इत्यादींमुळे अमेरिकन इंडियन जमाती हैराण झाल्या होत्या. परिणामी इंडियनांनी वसाहतकऱ्यांच्या काफिल्यावर हल्ले करण्यास व सैनिकांशी संघर्ष करण्यास सुरुवात केली. १८५४ मध्ये लॅरमी किल्ल्याजवळील एका चकमकीत लेफ्टनंट जॉन ग्रॅटन व त्याचे २९ सैनिक यांना ठार करण्यात आले. १८६० च्या दशकात माँटॅना  क्षेत्रात सोन्याचा शोध लागल्यामुळे वसाहतकऱ्यांचा लोंढा माँटॅनाकडे ‘बोझमन ट्रेल’ या मार्गावाटे जाऊ लागला. हा मार्ग सतत खुला राहण्याच्या उद्देशाने सैन्याने १८६६ मध्ये बिग्‌हॉर्न रांगेजवळच फिल कार्नी हा किल्ला बांधला. सू इंडियनांनी ह्याविरूद्ध उठाव केला आणि रेड क्लाउडच्या पुढाकाराने अमेरिकन सैनिकांवर हल्ला चढविला. १८६८ मध्ये रेड क्लाउड व इतर इंडियन पुढारी तसेच अमेरिकन सैनिक यांमध्ये झालेल्या तहान्वये  अमेरिकन सैन्याने फिल कार्नी व अन्य दोन किल्ले यांवरील ताबा सोडून द्यावा, तसेच ईशान्य वायोमिंग प्रदेश इंडियनांना देण्यात यावा आणि या बदल्यात इंडियनांनी यूनियन पॅसिफिक रेल्वेच्या दक्षिण वायोमिंग भागात चालू असलेल्या बांधकामात अडथळे आणू नयेत, असे ठरविण्यात आले. हा शांतता तह १८७४ पर्यंत टिकून राहीला कारण त्याच वर्षी ईशान्य भागातील ब्लॅक हिल्स प्रदेशात सोन्याचा शोध लागल्याने वसाहतकऱ्यांची त्या भागाकडे झुंबड लागली सू इंडियनांचे ब्लॅक हिल्स प्रदेश हे असीम श्रद्धास्थान असल्याने संघर्षाला तोंड फुटले परिणामी तहाचा भंग झाला. सू व शायेन इंडियनांनी सांप्रतच्या माँटॅना प्रदेशातील दोन कडव्या  लढा या जिंकल्या. परंतु नंतर इंडियनां च्यातच दुफळी माजून काही इंडियन टोळ्या कॅनडाकडे पळाल्या. अन्य काहीनी आरक्षित भूप्रदेशात वसती करण्याचे मान्य केले. १८७६ च्या मध्यास वायोमिंग वसाहतकऱ्यांना अखेरीस शांतता लाभली. वायोमिंगच्या पश्चिम भागात जसजशी लोहमार्ग टाकण्याची प्रक्रिया सुरु झाली, तसतसा या भागातील शायेन, लॅरमी, रॉलिन्झ, रॉक स्प्रिंग्ज, ग्रीन रिव्हर, एव्हन्स्टन या शहरां चा विकास होत गेला. १८६८ मध्ये अमेरिकन काँग्रेसने वायोमिंग हा ‘केंद्र शासित प्रदेश’म्हणून जाहीर केला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष युलिसीझ एस. ग्रँट यांनी ब्रिगेडियर जनरल जॉन कँबेल यास या प्रदेशाचा पहिला गव्हर्नर नेमले. १० डिसेंबर १८६९ रोजी येथील प्रादेशिक विधिमंडळाने अमेरिकन स्त्रियांना मतदान करणे, राजकीय पदे भूषविणे, तसेच ज्यूरी म्हणून काम करू देणे  हे हक्क (अमेरिकेतील याविषयीचा हा पहिलाच कायदा होय) बहाल केले. लॅरमीमध्ये स्त्रिंया १८७० पासून ज्यूरी म्हणून काम करू लागल्या. याच वर्षी श्रीमती एल्स्थर एच. मॉरिस ही साउथ पास सिटीमधील महिला न्यायाधीश म्हणून काम पाहू लागली. अमेरिकेतील ही पहिली महिला न्यायाधीश होय. 


चराऊ कुरणांमुळे या नवीन प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला प्रगतीचे वळण लाभले. श्रीमंत कुरणधाऱ्यांनी वायोमिंग प्रदेशावर मोठ्या प्रमाणावर आपले नियंत्रण ठेवले होते आणि त्यामार्फतच १८८७ पर्यंत ते या प्रादेशिक शासनाचा पूर्ण कारभार आपल्या नियंत्रणाखाली ठेवत होते. त्याच वर्षी कडाक्याच्या थंडीमुळे हजारो गुरे मरण पावली व कुरणमालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. 

वायोमिंगला प्रादेशिक दर्जा मिळण्याअगोदरच म्हणजे १८३३ च्या सुमारास खनिज उद्योगाचा पाया लाभला होता. १८७२ मध्ये अमेरिकन काँग्रेसने यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान स्थापिले. १८८३-८४  यांदरम्यान खनिज तेलाची पहि ली विहीर डॅलस फील्ड येथे खोदण्यात आली. 

वायोमिंग हे १० जुलै १८९० रोजी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील चव्वेचाळीसा वे राज्य म्हणून घोषित झाले. फ्रॅन्सिस ई.वॉरन हा राज्याचा पहिला रिपब्लिकन गव्हर्नर सप्टेंबरमध्ये नियुक्त झाला परंतु अमेरिकन सेनेटवर निवडून गेल्यामुळे त्याने गव्हर्नर पदाचा नोव्हेंबरमध्ये राजीनामा दिला. वायोमिंगमध्ये वसाहतकऱ्यांची एकच गर्दी करून प्रेअरी क्षेत्रात घरे उभारली व ते गाईगुरांचे कळप बाळगू लागले. त्यामुळे मोठाले कुरणदार आणि वसाहतकार यांच्यांत तणाव व संघर्ष निर्माण झाला. याच संघर्षातून ‘जॉन्सन काउंटी वॉर’ (१८९२) उदभवले. १९०० च्या प्रारंभीच्या दशकात मेंढपाळी हा राज्याचा महत्वाचा आर्थिक आधार बनला. याच काळात काही महत्त्वाची धरणे बांधण्यात आली. कॅस्परच्या उत्तरेस सॉल्ट क्रीक फील्ड येथे १९१२ मध्ये वायोमिंगच्या खनिज तेल उद्योगाला प्रथमच मोठ्या प्रमाणात तेजी लाभली परिणामी तेलनळ व तेल परिष्करण केंद्रें  मोठ्या प्रमाणात उभारण्यात आली. १९१८ च्या सुमारास कॅस्पर हे व्यवसाय व वित्तव्यवहार यांचे महत्वाचे केंद्र बनले. १९२४ मध्ये नेली टेलो रॉस ह्या महिलेला वायोमिंगवासियांनी राज्याची व देशाची पहिली महिला गव्हर्नर म्हणून निवडून दिले १९३३ मध्ये रॉस ही अमेरिकन टाकसाळीची पहिली संचालिका म्हणून नियुक्त करण्यात आली. राज्यातील खनिज तेलाचे वाढते उत्पादन व शासनाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेले बांधकाम-प्रकल्प यामुळे महामंदीचा तडाखा इतर अमेरिकन राज्यांप्रमाणे वायोमिंगला बसला नाही.  

दुसऱ्या महायुद्धकाळात १९३९-४५ वायोमिंगची अर्थव्यवस्था विशेष भरभराटली. महायुद्धामुळे राज्यातील कोळसा, कापीव लाकूड, मांस व खनिज तेल यांना प्रचंड मागणी लाभली, युद्धसमाप्तीनंतरही आर्थिक विकास चालु राहून पर्यटनाला विशेष महत्व मिळाले. धुण्याचा सोडा व युरेनियम या दोन खनिजांच्या उपलब्धतेमुळे राज्याचा औद्योगिक विकास वेगाने होत गेला. १९६० च्या पुढील काळात धुण्याचा व खाण्याचा सोडा यांच्या उत्पादनाकरिता ग्रीन रिव्हर शहराजवळ दोन रसायन कंपन्या उभारण्यात आल्या. १९६० च्या पुढील काळात लोखंड व पोलाद, खनिज तेल, ट्रोना खनिज, वीजनिर्मिती या क्षेत्रांतील अनेक कंपन्यां नी राज्यातील आपल्या उत्पादन प्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. याच अनुरोधाने सनराइज, अटलांटिक सिटी, ग्रीन रिव्हर, ग्लेनरॉक इ. शहरांमध्ये वरिल उद्योगांचे कारखाने उभे राहिले. १९६० मध्ये दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची कार्यवाही करण्याऱ्या स्क्वॉड्रनचे प्रधान केंद्र म्हणून वायोमिंग राज्याची निवड करण्यात आली. वायोमिंग राज्यातील अशा प्रकारच्या स्क्वॉड्रनचा सबंध जगातील सर्वात मोठ्या स्क्वॉड्रनमध्ये समावेश करण्यात येतो.

वायोमिंगची लोकसंख्या १९००-१९१० या पहिल्या दशकात ५८ टक्क्यांनी (९२,५३१ वरून १,४५,९६५) वाढली. लोहमार्ग टाकणे, कोळसा खाणकाम, मेंढपाळी, जलसिंचित व कोरडवाहू शेती यांसारख्या उद्योगां त लक्षणिय वाढ झाली. १९८० च्या दशकात, जागतिक तेलपुरवठ्याच्या फुगवट्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत कमालीची घसरण निर्माण होऊन राज्यातील लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात उत्प्रवासन घडून आले. पर्यटन उद्योगावर विशेष भर देऊन अर्थव्यवस्थेचे विविधांगीकरण करण्याचा वायोमिंग राज्य शर्थीचा प्रयत्न करीत असूनही, राज्याच्या भावी विकासाची वाटचाल प्रामुख्याने खाणउद्योग आणि तदानुषंगिक उद्योग यावरच निर्भर राहील असे दिसते. 

वायोमिंग राज्याचे संविधान नोंव्हेंबर १८८९ मध्ये लोकमताने संमत करण्यात आले, तथापि त्याची कार्यवाही १० जुलै १८९० रोजी वायोमिंगला राज्य दर्जा मिळाल्यापासून सुरु झाली. राज्यात विधिमंडळाची सेनेट व लोकप्रतिनिधिगृह अशी दोन गृहे आहेत. स्त्रियांना मतदानाचा पूर्णधिकार, शासकीय पदांची उपलब्धता व न्यायदानकार्यात त्यांचा सहभाग, यांमुळे वायोमिंग हे ‘समानता राज्य’ म्हणून ओळखले जाते.

गव्हर्नर, गृहसचिव, वित्तसचिव, लेखापरीक्षक, व सार्वजनिक शिक्षण अधीक्षक असे शासनाचे पाच कार्यकारी अधिकारी चार वर्षाकरिता निवडून येतात गव्हर्नरची निवड कितीही वेळा होऊ शकते. सेनेटचे व लोकप्रतिनिधीगृहाचे अनुक्रमे ३० व ६४ निर्वाचित सदस्य असतात. सेनेटच्या प्रत्येक सदस्याची मुदत चार वर्षाकरिता, तर प्रत्येक लोकप्रतिनिधीची दोन वर्षांसाठी असते. अर्थसंकल्पीय अधिवेशने प्रत्येक वर्षाच्या फे ब्रुवारीमधील दुसऱ्या मंगळवारी सुरु होतात व ती कमाल २० दिवस चालू  राहतात. राज्यातून काँग्रेसवर दोन सेनेटर व एक प्रतिनिधी निवडून दिले जातात. राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्याचे २३ परगण्यामध्ये विभाजन करण्यात आले आहे.

राज्यात आठ वर्षासाठी निवडून आलेल्या पाच न्यायाधिशांचे मिळून सर्वोच्च न्यायालय असते. १९६० पासुन ही संख्या वाढविण्यात आली. राज्यात नऊ जिल्हा न्यायालये असून सहा वर्षाकरिता निवडून आलेले १७ जिल्हा न्यायाधिश न्यायदानाचे काम पाहतात. यांशिवाय राज्याच्या न्याययंत्रणेत जे.पी. (जस्टिस ऑफ द पीस) न्यायालये व पोलीस-न्यायालयेही आहेत.


आर्थिक स्थिती: राज्यातील प्रतिवर्षी होणाऱ्या एकुण उत्पादनामध्ये शेतीचा १७ टक्के हिस्सा असतो. पशुसंवर्धन हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा कृषिसंबंधित व्यवसाय मानण्यात येतो. १० डॉलर किंमतीच्या शेतमाल उत्पन्नापैकी सु. ८.५९ डॉलर उत्पन्न हे पशुपालन व पशुजन्य पदार्थापासुन प्राप्त होते. मेंढ्या व लोकर उत्पादनात वायोमिंगचा टेक्सस राज्यानंतर दुसरा क्रमांक लागतो. राज्याचे सु. ८०% भूक्षेत्र हे गाईगुरे व मेंढ्या यांच्या चरा ईसाठी वापरण्यात येते. राज्यातील महत्त्वाची पिके म्हणजे साखरबीट, गहू, गवत व सातू ही होत. ग्रेट प्लेन्स भागात अधिककरून कोरडवाहू कृषितंत्राचा वापर करण्यात येतो. १९८७ च्या प्रारंभी राज्यात १०,००० दुभत्या गाई, १३ लक्ष गुरे, ७.७५ लक्ष मेंढ्या व कोकरे आणि ३५,००० डुकरे, एवढे पशुधन होते.

राज्याच्या एकुण उत्पादनामध्ये निर्मिति उद्योग व प्रक्रियाउद्योग यांचा सु. ११ टक्के वाटा आहे. खनिज तेल व कोळसा यांचे  उत्पादन हे सर्वां त महत्वाचे उद्योग आहेत. कॅस्पर शहर खनिज तेल परिष्करण उद्योगात अग्रेसर असून तेथे तीन परिष्करण केंद्र आहेत. इतर केंद्रे शायेन,  कोडी, ग्लेनरॉक या शहरात आहेत. राज्यात ३५ नैसर्गिक वायुप्रक्रिया संयंत्रे आहेत. वायुप्रक्रिया संयंत्रांमधून उपउत्पादन म्हणून गंधकाची, तर खनिज तेल परिष्करण केंद्रातून डामर, कोक, वंगणे व मेण यांची निर्मिती करण्यात येते.

राज्यात इतर खनिजांचेही प्रक्रियाउद्योग चालु आहेत. शर्ली खोऱ्यातील युरेनियम कारखान्यातून गॅसहिल्स येथील खाणींमधील खनिजांवर प्रक्रिया करण्यात येते ग्रीन रिव्हरजवळ धुण्याच्या सोड्याचे उत्पादन केले जाते, अटलांटिक सिटी आणि सनराइज या शहरात लोहखनिजापासुन लोहगुलिका तयार करण्याचे कारखाने आहेत. शायेन येथे रासायनिक खते निर्माण करणारा एक कारखाना असून लॅरमी येथे सिमेंटनिर्मितीचा एक कारखाना आहे राज्यात बेंटोनाईट खनिजावर प्रक्रिया करणारे दहा कारखाने असुन कोडी व लव्हल येथे जिप्सम वॉलबोर्ड निर्मिती-उद्योग आहेत. लव्हल, टॉरिंग्टन व वरलँड येथे बीटपासून साखरनिर्मितीचे कारखाने असून इतर खाद्यान्नप्रक्रिया उद्योगांत चीज व मांस पदार्थ निर्मितिउद्योगांचा अर्तभाव होतो. कापड, काचसामान हे उद्योगही येथे  चालतात.

निर्मितीउद्योगांमधील कामगारसंख्या व कामगारांना द्यावयाचे वेतन या दोहोंबाबत सबंध देशात वायोमिंग राज्याचा शेवटचा क्रमांक लागतो. खनिज तेल परिष्करण या महत्वाच्या उद्योगानंतर इतर उद्योगांमध्ये उड्डाण उपकरणे व गुणवत्ता उपकरणे यांची निर्मिती, बीटपासून साखरनिर्मिती, इलेक्ट्रॉनिकीय उपकरणे व साधने यांची निर्मिती  या उद्योगांचा समावेश होतो. स्टार व्हॅली येथे लोणी व चीज यांच्या उत्पादनाचे कारखाने आहेत. खनिज तेल व कोळसा या उद्योगांनंतर रसायने, अविद्युतीय यंत्रे व अवजारे, अन्नपदार्थ तसेच दगड, माती व काच यांपासून केले जाणारे पदार्थ, असा राज्यातील उद्योगांचा क्रम लागतो. युरेनियम उत्पादन हा १९७० च्या पुढील काळातील महत्वाचा खाण उद्योग गणला जात होता कारण सबंध देशात युरेनियमचे उत्पादन करण्यात या राज्याचा दुसरा महत्वाचा क्रमांक होता. १९८० पासुन  मात्र अणुउद्योग स्थापनेमागील प्रचंड खर्च तसेच तो चालविण्यामध्ये  उद्‍भवणारे धोके ह्यांमुळे ह्या उद्योगा विरुद्ध गेलेले मोठ्या प्रमाणावरील जनमत व जनआंदोलन यांमुळे युरेनियम उत्पादनाला मोठी खीळ बसली. राज्यातील जंगलांमधुन इमारती लाकडांचे ओंडके उत्पादन सु. ३५ लाकूडगिरण्यांद्वारे होत असते. राज्यातील लाकूडगिरण्या प्रतिवर्षी सु. ४.७० लक्ष घ. मी. इमारती लाकडाचे उत्पादन करतात. सबंध राज्यात सु. ९४% औष्णि क वीज उत्पादन होत असून ही विद्युतउत्पादक संयंत्रे प्रामुख्याने  जिलेट, ग्लेनरॉक, केमर व रॉक स्प्रिंग्ज याशहरांत आहेत. उर्वरित विद्युत उत्पादन (सु. ६%) जलविद्युत संयंत्रांपासुन (ॲलकोव्ह, बॉयसेन फ्रेमॉँट कॅन्यन व सेमनो या धरणांसमीप) केले जाते. खाणउद्योगात सरासरीने १९,९४५ कामगार गुंतलेले होते (१९८७) त्याच वर्षी एकून नागरी श्रमबल सु. २,५४,६३० एवढे असून बिगर-शेती उद्योगात सु. २,४१,४६८ कामगार गुंतलेले होते. सरासरी बेकारी प्रमाण ८.३% होते. राज्यात १९८६ मध्ये ८,४३१ किमी. संघराज्यीय ५६१ किमी. राज्य व १,४७० किमी.  आंतर राज्य महामार्ग वापरात होते. त्याचवर्षी राज्यात नोंदणीकृत ६,१६,७१८ मोटारगाड्या व १२ बसकंपन्या होत्या. राज्यातील लोहमार्गाची लांबी ४,२०७ किमी. आणि शाखीय-लोहमार्गाची लांबी ८८५ किमी. होती. राज्यातील ११ शहरे प्रवासी हवाई वाहतुकीने, तर दोन शहरे जेट हवाई वाहतुकीने एकमेंकाशी जोडलेली होती (१९८७). १०५ विमानतळांपैकी ४४ सार्वजनिक होते (१९८२).

पर्यटनउद्योग हा राज्यातील अतिशय महत्वाचा व राज्याला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवून देणारा उद्योग मानला जातो. प्रतिवर्षी राज्यातील उद्या ने, उपवने, वस्तुसंग्रहालये इ. विविध प्रेक्षणीय स्थळे  यांना  ७० लक्षांवर पर्यटक भेट देतात. जागतिक दृष्टीने वायोमिंग राज्यात एल्क व प्राँगहॉर्न हरिणांचे सर्वाधिक कळप असून दहांवर मत्स्यअंडी उबवणी केंद्रे तसेच अनेक शिकारीची श्वापदे आहेत. राज्यात १९९० मध्ये १३ स्की-केंद्रे कार्यवाहीत होती.

लोक व समाजजीवन : राज्याच्या पूर्वभागातील शोशोन व उत्तरेकडील आरापाहो या विंड नदी-आरक्षित भागातील टोळ्यांव्यतिरिक्त राज्यातील लोकसंख्या ही मुख्यतः ब्रिटिश व इतर युरोपीय वंशांची  आहे. १९७० ते १९८० या दशकात राज्याची लोकसंख्या जलद वाढली. १९८९ मध्ये राज्याची अंदाजित लोकसंख्या ४,८०,०१२ एवढी होती. १९८७ मध्ये जननमान दरहजारी १५.९, मृत्युमान दरहजारी ६.४, बालमृत्युमान दरहजारी ९.२ एवढे होते. १९८० च्या जनगणनेनुसार राज्याच्या एकूण लोकसंख्येत अमेरिकन इंडियन व कृष्णवर्णीय यांचे प्रमाण अनुक्रमे २ व १ टक्का एवढे अल्प होते. प्रॉटेस्टंट, रोमन कॅथलिक व मॉर्मन हे प्रमुख धर्मपंथ  असून प्रॉटेस्टंटांचे रोमन कॅथलिकांपेक्षा आधिक्य (जवळजवळ दुप्पट) आहे.

राज्यात शिक्षण मोफत असून सात ते सोळा वर्षे वयापर्यंत शालेय शिक्षण सक्तीचे आहे. १९८८-८९ दरम्यान सार्वजनिक प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ९७,७९३ विद्यार्थी, तर खाजगी व चर्चसंचालीत शाळांमध्ये ३५,००० विद्यार्थी होते. सार्वजनिक शाळांमधील शिक्षकांची संख्या सु. ६,८११ एवढी होती तसेच प्रत्येक विद्यार्थ्यामागे सरासरी  खर्च ४,७६६ डॉ. होता (१९८७-८८). लॅरमी येथील वायोमिंग विद्यापिठ (स्था. १८८७) हीच काय ती चार-वर्षीय उच्च शिक्षण देणारी राज्यामधील एकमेव संस्था आहे. कॅस्पर, रिव्हर्टन, टॉरिंग्टन, शायेन, पॉवेल, रॉक स्प्रिंग्ज, शेरिडन या शहरांत द्विवर्षीय महाविद्यालये क्रियाशिल आहेत. वायोमिंग विद्यापिठातील ‘विल्यम रॉबर्टसन को लायब्ररी’ हे राज्यातील सर्वात मोठे ग्रंथालय असून ते पश्चिमी इतिहासविषयक ग्रंथसंग्रंह, दुर्मिळ ग्रंथ  व हस्तलिखिते यांसाठी लक्षणीय आहे. शायेन येथील राज्यग्रंथालयाचा (१८७१) दुसरा क्रमांक लागतो. राज्यात परगणानिहाय २२ ग्रंथालये आहेत.

वायोमिंग राज्याच्या सर्व ऐतिहासिक वैशिष्ट्यांचे जतन करणारे शायेन येथील राज्य संग्रहालय, कोंडी शहरातील ‘बफालो बिल ऐतिहासिक केंद्र’, त्यामधील प्लेन्स इंडियनांच्या मानवजातिविज्ञानविषयक वैशिष्टयाच्या संग्रहासाठी तसेच पश्चिमी कला उलगडून दाखविणाऱ्या ‘व्हिटनी गॅलरी ऑफ वेस्टर्न आर्ट’ या कलावीथीसाठी विख्यात आहे. डग्लस शहरातील ‘वायोमिंग पायोनियर म्यूझीयम’ हे एकोणिसाव्या शतकातील पश्चिमी प्रदेश जिंकल्याच्या घटना व प्रसंग यांकरिता विख्यात असून, वायोमिंग विद्यापीठातील भूवैज्ञानिक संग्रहालयात पश्चिमी ऐतिहासिक घटनांची वैशिष्ट्यपूर्ण चित्रमालिका आहे. बफालोच्या ‘जिम गॅटचेल मिमॉरिअल म्यूझीयम’ ह्या संग्रहालयात इंडियन युध्दांची चित्रे संग्रहीत केली असून बिगहॉर्न शहरातील ‘ब्रॅडफर्ड ब्रिटन मिमॉरिअल म्युझियम’ ह्या संग्रहालयात फ्रेडरिक रेमिंग्टन, चार्ल्स रसेल यांसारख्या नावाजलेल्या पश्चिमी कलावंतांचे चित्रसंग्रह जतन करण्यात आले आहेत. यलोस्टोन राष्ट्रीय उद्यानाची मॅमथ व कॅन्यन व्हिलेज येथे संग्रहालये आहेत, फोर्ट लॅरमी  हे राष्ट्रीय ऐतिहासिक केंद्र घोषित झाले असून तेथे लॅरमी किल्ल्याचा इतिहास दर्शविणारे (१८३४-९०) चित्र संग्रहालय आहे. फोर्ट ब्रिजर येथेही अशाच प्रकारचे संग्रहालय आहे.

वायोमिंग विद्यापीठ तसेच राज्यातील अन्य महाविद्यालये यांत वाद्यवृंद, समूहगानमंडळे संगीतविषयक कार्य करीत असून शायेन येथे स्वरमेळ, समुहगानमंडळ, तर कॅस्पर येथे वाद्यवृंद कार्यशील आहे. वायोमिंग कलावंत संस्था राज्यात ठिकठिकाणी कला प्रदर्शने भरवीत असते. लॅरमीच्या पूर्वेला लिंकन महामार्गावरील अब्राहम लिंकनचा पुतळा, तसेच वायोमिंग विद्यापीठ क्षेत्रातील बेंजामिन फ्रँक्लिंनचा, शायेन येथील रॉबर्ट बर्न्सचा व कोडी येथील बफालो बिल याचा अश्वारूढ पुतळा, हे ब्राँझ पुतळे प्रेक्षणीय आहेत. राज्यात १९८३ मध्ये दहा दैनिक वृत्तपत्रे व २७ साप्ताहिके निघत होती. १८८५ मध्ये राज्यात व्यापारी तत्वावर चालणारी ५८ नभोवाणी केंद्रे व सात दूरचित्रवाणी केंद्रे होती.

इतर राज्यांच्या तुलनेत वायोमिंग राज्यात सामाजिक कल्याण कार्यक्रम फारच थोड्या प्रमाणात राबविले जात असून गरजूंपैकी अगदी कमी लोकांना त्याचा लाभ मिळतो. १९८९ मध्ये सबं ध राज्यात ३० रूग्णालये व २७ नोंदणी झालेली परिचर्याकेंद्रे होती. एव्हन्स्टन येथे मनोरूग्णालय तसेच लँडर येथे मतिमंदांसाठी एक प्रशिक्षणकेंद्र आहे.


महत्त्वाची स्थळे :  यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान हे देशातील पहिले राष्ट्रीय उद्यान असून त्यामधील ओल्ड फेथफुल व इतर गायझर, यलोस्टोन नदीवरील अपर व लोअर धबधबे, ग्रँड कॅन्यन ही प्रचंड निदरी, यलोस्टोन सरोवर, या परीसरातील अस्वले व अन्य वन्य जीवसृष्टी तसेच या उद्यानक्षेत्राच्या सु. ७,७७० चौ. किमी. आसमंतातील अप्रतिम निसर्गसौंदर्य, या सर्वांमुळे देशातील सर्वात प्रसिध्द ठरलेल्या या उद्यानाला प्रतिवर्षी लक्षावधी पर्यटक भेट देतात. [⟶ यलोस्टोन]. यलोस्टोन व दक्षिणेकडील ग्रँड टीटॉन राष्ट्रीय उद्यान ही दोन्ही उद्याने १९७२ मध्ये जॉन डी रॉकफेलर मिमॉरिअल पार्कवे या १२९ किमी. लांबीच्या मार्गाने जोडण्यात आली. ग्रँड टीटॉन राष्ट्रीय उद्यान १९२९ मध्ये स्थापण्यात येऊन १९५० मध्ये विस्तारित करण्यात आले. रम्य सरोवरांनी नटलेल्या ग्रँड टीटॉन उद्यानातील पर्वत हे त्यांच्या लंब आकारामुळे सबंध देशात वैशिष्ट्यपूर्ण मानले जातात.

बिग्‌हॉर्न ब्रिजन-टीटॉन, मेडिसिन बो व शोशो न अशी चार राष्ट्रीय वने राज्यात असून त्यांशिवाय अँशली, ब्लॅक हिल्स, कॅरिबू, टारघी व वॉसॅक ही पाच राष्ट्रीय वने अंशतः राज्यात मोडतात. या राष्ट्रीय वनांद्वारे मत्स्यक्रीडा, सहली , छावणीवजा वस्ती करणे इ. मनोरंजनात्मक प्रकार उन्हाळ्यात व बर्फावरील घसरखेळ हिवाळ्यात पर्यटकांना साधता येतात.

वायोमिंग राज्यात राज्यउद्याने व ऐतिहासिक स्थळे विपुल आहेत. जगातील सर्वात मोठ्या गरम पाण्याच्या झऱ्यांपैकी एक थर्मोपलिस राज्यउद्यानात आढळतो. इतर राज्यउद्यानामध्ये बफालो बिल (कोडी), ग्लेंडों सेमनो (सेमनो धरणाजवळील), सिंक्स कॅन्यन (स्लँडर) यांचा समावेश होतो. फोर्ट ब्रिजर, कॉनॉर बॅटलफील्ड, इंडिपेंडन्स रॉक ही ऐतिहासिक स्थळे होत.

‘डेव्हिल्स टॉवर नॅशनल मॉन्युमेंट ’  हे १९०६ मध्ये देशातील पहिले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. बेल फूश नदीच्या काठावर उभा असलेला सु. ३९० मी. उंचीचा मनोरासदृश अग्निज खडकांचा उभा पट्टा, हे एक नैसर्गिक आश्चर्य मानण्यात येते. फोर्ट लॅरमी हेही एक भव्य राष्ट्रीय स्मारक म्हणून पर्यटकप्रिय आहे.

राज्यात शिकारीसाठी विपुल प्राणिसृष्टी आहे.शिकारी प्रतिवर्षी एक लक्षावर प्राण्यांची (मुख्यतः हरिणे व खेचरे) शिकार करतात. इतर मृगया प्राण्यांमध्ये उंदीर, श्वेतपुच्छ हरिण, एल्क, अस्वल यांसारख्यांचा अंतर्भाव होतो. राज्यातील झरे, सरोवरे, जलाशय यांमधून कटथ्रोट, ब्रुक, ब्राउन , रेनबो, मॅकिनॉ, सुवर्ण ट्राउट इ. माशांची शिकार केली जाते.

राज्यातील विशेष महत्त्वाच्या लक्षणीय उत्सव-समारंभामध्ये शायेन येथे प्रतिवर्षी जुलै महिन्यात होणारा ‘फ्राँ टिअर डेज’ हा उत्सव शेरिडनमध्ये प्रतिवर्षी  ऑगस्टमध्ये भरविण्यात येणारा ‘ऑल–अमेरिकन इंडियन डेज ’ हा उत्सव थर्मोपलिसचा ऑगस्टमधील ‘गिफ्ट ऑफ द वॉटर्स पीजन्ट ’ उत्सव, एथीट व फोर्ट वॉशाकी येथील जुलैमधील ‘इंडियन्स डान्सेस ’ हे उत्सव पाइनडेल, जॅक्सन येथील फेब्रुवारीत भरणाऱ्या कापणीच्या शर्यती डग्लस येथील सप्टेंबरमधील राज्य उत्सव आणि उन्हाळ्यात भरविण्यात येणारे ठिकठिकाणचे रोदेओ उत्सव यांचा समावेश होतो.

संदर्भ : 1. Bragg William F. Wyoming : Rugged But Right Pruett  1980.

               2. Brown, Robert Harold, Wyoming : A Geography, West view, 1980.

              3. Larson, Taft A . Wyoming : A Bicentennial History, Norton, 1977.

             4. Whittenburg, Clarice T. Wyoming’s People, Johnson 1978.

गद्रे, वि. रा.