वांब-२ : हे मासे मॅस्टासेंबिलिफॉर्मिस गणाच्या मॅस्टासेंबिलीडी या कुलातील असून हे ⇨ ईल माशांसारखे दिसतात मात्र हे खरे ईल नव्हेत. भारतामध्ये यांच्या मुख्यतः मॅक्रोग्नॅथस ॲक्यूलिएटम, मॅस्टासेंबिलस आर्मॅटस व मॅस्टासेंबिलस पँकॅलस या तीन जाती आढळतात. हे मासे दक्षिण आफ्रिका, युफ्रेटीस खोरे, म्यानमार (ब्रह्मदेश), थायलंड, जावा, सुमात्रा, बोर्निओ या भागांत सापडतात. रंग काळपट तपकिरी ते पिवळा असतो. शरीर लांब असून दोन्ही बाजूंनी दबलेले असते. अंगावर लहान लहान खवले असतात. मुस्कट रुंद असून त्यावर नाकांची पहिली दोन व डोळ्यांच्या पुढे दुसरी दोन छीद्रे उघडतात. पाठीवर काट्यांची रांग असून ती इच्छेनुरुप ताठ करता येते. पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) नसतो. पुच्छपक्ष (शेपटीवरील पर), गुदपक्ष व श्रोणी (कंबरेवरील) पक्ष एकत्र जोडलेले असतात. तोंडात लहान दात असतात. जबड्याच्या खालच्या भागाची हालचाल अतिशय कमी होते परंतु मुस्कट इकडेतिकडे हलविता येते.
बहुतेक जाती निशाचर असून दिवसा गाळ, झाडांचे बुंधे यांमध्ये लपून राहतात. हालचाल सापासारखी असते. मोठ्या जातींचे मासे लहानांना खातात. काही जाती मुस्कटाशिवाय इतरे शरीर गाळात बुडवून पाण्याच्या तळातील लहान कवचधारी (क्रस्टेशिया), हायड्रा व इतर अळ्या खातात. सर्व जाती मांसाहारी आहेत. शरीरात हवेच्या पिशव्या असतात. प्रजोत्पादनाच्या वेळी मादी ५० ते १०० अंड्यांचा बलक पाण्याच्या तळाशी सोडते. ही अंडी पाण्याच्या तळाला चिकटून राहतात व काही आठवड्यांनी त्यांमधून डिंभ (प्राण्यांची भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील अवस्था) बाहेर येतो. पुढे याचे रूपांतर (डिंभावस्थेपासून प्रौढ अवस्था तयार होत असताना रूप आणि संरचना यांत होणारे बदल) प्रौढात होते. या माशांचा उपयोग मुख्यतः खाद्य म्हणून होतो.
पहा : ईल.
भोईटे, प्र. बा.
“