वनकपास: (सं. भरद्वाजी लॅ. हिबिस्कस व्ह्याटिफोलियस). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] जास्वंद, भेंडी, कापूस इत्यादींच्या प्रजातीतील व ⇨माल्व्हेसी अथवा भेंडी कुलातील ही एक वनस्पती आहे. हिबिस्कस प्रजातीत सु. २०० जाती असून त्यांपैकी भारतात सु. ३० आहेत. वनकपासाची सामान्य शारीरिक लक्षणे वर उल्लेख केलेल्या कुलात वर्णन केल्याप्रमाणे आहेत. हिचा प्रसार श्रीलंका, आफ्रिकेतील उष्ण भाग, ऑस्ट्रेलिया, भारत इ. ठिकाणी आहेत. भारतात उष्ण भागात सर्वत्र, कोकण व दक्षिण पठाराचा डोंगराळ भाग येथे ती आढळते. ही एक केसाळ ⇨ओषधी (नरम व लहान वनस्पती) असून हिची पाने साधी, हस्ताकृती, ३−७ खंडात थोडी विभागलेली व दातेरी असतात. फुले मोठी ५−७ सेंमी. व्यासाची, पिवळट व तळात जांभळी असून पानांच्या बगलेत एकेकटी किंवा फांद्यांच्या टोकांस लोंबत्या झुबक्यांनी ऑक्टोबर ते डिसेंबरात येतात त्यांच्या तळाशी लहान सुट्या ७−१२ छदांचे मंडल असते [⟶ फूल]. फळ शुष्क (बोंड) पंच पंखयुक्त, केसाळ व टोकदार असून त्यात पाच कप्पे व अनेक तपकिरी बिया असतात व त्यांवर बारीक उंचवटे असतात. झाडांच्या सालीपासून बळकट रुपेरी धागा मिळतो. त्यापासून दोरा, बारीक-जाड दोऱ्या इ. बनवितात. मुळांपासून बनविलेले औषध गोल्ड कोस्टमधील स्त्रिया डोक्यातील उवांचा नाश करण्यास वापरतात.

जोशी, गो. वि.