ल्यूबेक : जर्मनीच्या श्लेस्विग-होल्स्टाइन प्रांतातील एक प्रसिद्ध व्यापारी शहर व सर्वांत मोठे बंदर. लोकसंख्या २,१०,३०० (१९८६ अंदाज). ते बाल्टिक समुद्रापासून आत ट्राव्हे व वेकनिट्झ नद्यांच्या संगमावर हँबर्गच्या ईशान्येस ५८ किमी. पूर्वींच्या पूर्व-जर्मन सीमेजवळ वसले आहे. त्याचा प्राचीन इतिहास उपलब्ध नाही तथापि मध्ययुगीन होल्स्टाइनचा काउंड दुसरा ॲडॉल्फ याने ११४३ मध्ये त्याची स्थापना केली. ११५७ मध्ये आगीने त्याची नासधूस झाली. दोन वर्षांनी हेन्री द लायन याने त्याची पुनर्बाधणी केली. पुढे पूर्वोत्तर यूरोपीय देशांची कच्च्या मालाची ती बाजारपेठ झाली आणि बाल्टिक किनाऱ्यावरील ते एक प्रमुख बंदर बनले. काही वर्षे (१२०१-२६) त्यावर डेन्मार्कचे आधिपत्य होते. १२२६ मध्ये त्यास दुसऱ्या फ्रीड्रिखने मुक्त नगराचा दर्जा दिला आणि त्या ठिकाणी व्यापारी अभिजनवर्गाची सत्ता प्रस्थापित झाली. साहजिकच या मुक्त नगराने स्वयंशासित घटना स्वीकारून कायदे केले. ते ल्यूबेकचे कायदे बाल्टिक परिसरातील सु. शंभर नगरांमध्ये प्रतृत झाले. परिणामतः ल्यूबेकचा आर्थिक प्रभाव या नगरांवर पडला. १२४१ मध्ये ल्यूबेक व हँबर्ग यांत परस्परांना व्यापारी संरक्षण देण्याचा तह झाला आणि आपाततः त्यात काही जर्मन नगरे समाविष्ट होऊन हॅन्सिॲटिक संघाची (व्यापारी संबंधांचे संरक्षण करणारी नगरांची संघटना) स्थापना झाली. त्यानुसार व्यापारविषयक सहकार्य देण्याचे धोरण निश्चित होऊन ल्यूबेकला प्रशासकीय राजधानीचा दर्जा देण्यात आला (१३५८). या संघाचा डचांकडून पराभव होऊनही (१४४१) तो कार्यरत होता त्याची सभासदसंख्याही १६० पर्यंत वाढली. सोळ्याव्या शतकात डेन्मार्क व स्वीडन या नाविक सत्तांच्या संघर्षात अमेरिकादी देशांचा शोध लागून हॅन्सिॲटिक संघाचे महत्त्व कमी झाले (१६३०) त्याबरोबरच ल्यूबेकचे व्यापारी वर्चस्वही नष्ट झाले. फ्रेंचांनी क्रांतिकाळात (१७९२-१८१५) हा प्रदेश पादाक्रांत केला. पहिल्या नेपोलियनच्या पराभवानंतर बर्लिन काँग्रेसच्या ठरावानुसार (१८१५) ल्यूबेक जर्मन महासंघाचे सदस्य झाले. १८६६-७१ दरम्यान ते जर्मन साम्राज्यांतर्गत एक व्यापारी बंदर होते. एल्ब-ल्यूबेक कालव्यामुळे त्याच्या व्यापारास गती मिळाली (१९००). पुढे नाझी अंमलाखाली त्याचे स्वयंशासित नागरी प्रशासन संपुष्टात आले (१९३७). दुसऱ्या महायुद्धात दारुगोळ्याचा साठा तेथे असल्यामुळे त्यावर बाँबवर्षाव करण्यात आला. त्यात जुन्या वास्तूंची पडझड झाली. जर्मनीच्या विभाजनानंतर ते पश्चिम जर्मनीत अंतर्भूत करण्यात आले होते.
मध्ययुगीन गांथिक शैलीच्या वास्तू अवशेषांबद्दल ल्यूबेक प्रसिद्ध आहे. येथील वास्तूंत नगरभवन (१३-१५ वे शतक), सेंट कॅथरिन व सेंट याकॉप यांची चर्चे (१४ वे शतक), होली घोस्टचे चर्च व रुग्णालय (१३ वे शतक), भव्य नगरद्वार आणि त्यावरील वर्तुळाकार मनोरे, कॅथीड्रल (११७३), सेंट मेरीचे वीटकामातील भव्य चर्च (१३-१४ वे शतक), उमरावांचे प्रासाद वगैरे प्रसिद्ध आहेत. शहरात अनेक वस्तुसंग्रहालये आहेत. हाइन्रिख आणि टोमास मान या दोन जगद्विख्यात कादंबरीकार बंधूंचे हे जन्मग्राम असून, टोमास मानला वाङ्मयाचा नोबेल पुरस्कार देण्यात आला (१९२९). स्वीडिश संगीत रचनाकार आणि ऑर्गनवादक डीट्रिख बुक्स्टहूड याने आपले उत्तर आयुष्य (१६६८-१७०७) ल्यूबेकमध्येच घालविले. त्यामुळे संगोतकलेबद्दलचा ल्यूबेकचा लौकिक यूरोपात वाढला.
ल्यूबेकमध्ये जहाजबांधणी उद्योग, अन्न व मत्स्य प्रक्रिया उद्योग, सिमेंटचे व पोलादकामाचे कारखाने, कापडगिरण्या, वैद्यकीय उपकरणांचे कारखाने इ. उद्योग चालतात. यांशिवाय मृदत्स्नाशिल्प, लाकूडकाम, फर्निचर या उद्योगांसाठीही ते प्रसिद्ध आहे. लोखंड, रसायने, मीठ यांची येथून निर्यात होते.
सावंत, प्र. रा.