लूट्स्क : सोव्हिएट रशियाच्या युक्रेन प्रजासत्तकातील ‘व्हलिन्य ओब्लास्ट’ या प्रशासकीय प्रदेशाचे मुख्य ठाणे. लोकसंख्या १,६१,००० (१९८३ अंदाज). हे लाव्हॉव्हच्या ईशान्येस १३६ किमी.वर स्टिर नदीच्या वळणावर संरक्षणाच्या दृष्टीने मोक्याच्या जागी वसलेले असून देशातील जुन्या शहरांपैकी एक मानले जाते. या शहराविषयीचा पहिला लिखित पुरावा १०८५ मधील आढळतो. १००० च्या सुमारास कीव्हचा युवराज व्हलॅदिमीर याने ते वसविले असावे असे मानतात. नंतरच्या काळात येथे अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. प्रथम ते गॅलेशिया व्हलिन्य या राज्यात समाविष्ट होते. १३३६ मध्ये लिथ्युएनियाच्या व १५६९ मध्ये ते पोलंडच्या ताब्यात गेले. त्यानंतर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ते लिथ्युएनिया-पोलंड यांच्या संयुक्त अखत्यारीत, तर १७९१ मध्ये ते झारच्या रशियन साम्राज्यात गेले. पहिल्या जागतिक युद्धातील रशियाची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर १९१९ ते १९३९ पर्यंत ते पोलंडच्या ताब्यात गेले. १९३९ मध्ये रशियाने, दुसऱ्या महायुद्धकाळात जर्मनीने व १९४५ मध्ये पुन्हा रशियाने त्या भागावर ताबा मिळविला. अशा तऱ्हेने सीमावर्ती शहरात अपेक्षित असे अनेक बदल लुट्स्क शहराने पाहिले आहेत.

शहराच्या प्राचीनतेचे अनेक पुरावे जुन्या भागात आढळतात. चौदाव्या शतकातील ल्यूबर्ट किल्ला, सोळा ते अठराव्या शतकांतील मठ आणि स्वापत्यशास्त्राचे पुरातन ननुने या भागात पाहावयास मिळतात. लुट्स्क हे ब्रेस्तकडून आग्नेयीकडे व लाव्हॉव्हकडून ईशान्येकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील आणि लोहमार्गावरील प्रस्थानक असून येथे एक विमानतळही आहे. अन्नधान्यांच्या बाबतीत समृद्ध असलेल्या या शहराची अलीकडे औद्योगिक शहरांतही गणना होऊ लागली आहे. सुरुवातीस येथे शेतीशी संबंधित असे खाद्यपदार्थ निर्मिती, साखर उत्पादन, सूतकताई, विणकाम, इ. उद्योगधंदे निघाले. त्यानंतर शेतीस उपयुक्त यंत्रसामग्री निर्माण होऊ लागली. १९७० मध्ये येथे मोटार कारखाना सुरू झाला असून त्याचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागातील वाहतुकीशी निगडित आहे. या कारखान्यात ‘व्हलिन्यंका’ हे बहुउद्देशीय वाहन, विशेषतः ग्रामीण भागाच्या उपयोगासाठी, बांधले जाते. यांशिवाय शहरात कपडे, पादत्राणांचा पुठ्ठा, घरगुती उपकरणे, विद्यृत् उपकरणे, प्रबलित काँक्रीटची उत्पादने, लाकूडकाम, मळी, मद्यार्क निर्मिती इ. उद्योग सुरू झाले आहेत. शहरात इतर शैक्षणिक सुविधांबरोबरच एक शिक्षक प्रशिक्षण संस्था व वैद्यकीय विद्यालयही आहे. 

फडके, वि. शं.