कनेक्टिकट : कॉनेटिकट. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ईशान्येच्या न्यू इंग्‍लंड  विभागातील सर्वांत दक्षिणेकडचे राज्य. ४० ५८’ उ. ते ४२ ३’ उ. आणि ७१ ४७’ प. ते ७३ ४४’ प. क्षेत्रफळ १३,०२३ चौ. किमी., लोकसंख्या ३०,३२,२१७ (१९७०). याच्या दक्षिणेस लाँग आयलंड सामुद्रधुनी, पश्चिमेस न्यूयॉर्क, उत्तरेस मॅसॅचूसेट्स व पूर्वेस ऱ्होड आयलंड ही राज्ये आहेत. हार्टफर्ड ही राज्याची राजधानी आहे. 

भूवर्णन : राज्याच्या मध्यभागातून दक्षिणेकडे वहात आलेल्या कनेक्टिकट नदीने भूप्रदेशाचे दोन सारखे भाग पडले आहेत. दोन्ही भाग उत्तरेकडे सरासरी ३१० मी. पर्यंत उंच होत गेलेले आहेत. वायव्येकडे डोंगराळ भाग अधिक असून ६५० मीटरवर उंचीची कित्येक शिखरे आढळतात. डोंगरदऱ्यांतून अनेक दक्षिणवाहिनी नद्या आहेत. त्यांपैकी प्रमुख कनेक्टिकटखेरिज हूसटॉनिक, नॉगॅटक व टेम्स या महत्त्वाच्या आहेत. राज्यात साधारणतः रेताड नदीगाळमाती व समुद्रकाठची वालुकामिश्रित सुपीक जमीन आढळते. फेल्डस्फार, वाळू, रेती, चुनखडी व रस्त्यांच्या खडीसाठी खडक ही येथील खनिज संपत्ती होय. राज्यात ठिकठिकाणी १,००० वर तळी असून सर्वांत मोठे कँडलवुड सरोवर पश्चिम भागात आहे. सु. १६० मी. लांबीचा समुद्रकिनारा राज्याच्या दक्षिणेस आहे. येथील हवामान सामान्यतः समशीतोष्ण असून न्यू इंग्‍लंड विभागातल्या इतर राज्यांपेक्षा सौम्य आहे. तपमान २⋅८ से. ते २२⋅२ से. असून सरासरी वार्षिक पर्जन्य १०६ सेंमी. आहे. थंडी नैर्ऋत्य भागात विशेष कडक, तर उन्हाळा मध्य भागात जास्त भासतो. एकूण जमिनीच्या ४३ टक्के जमीन जंगलयुक्त असून त्यातील प्रमुख वृक्ष व्हाइट पाइन, ॲश, हेमलॉक, मॅपल, बर्च, ओक, पॉपलर, सीडार हे होत. काही वने शोभेसाठी संरक्षित ठेवली आहेत. राज्यात कोल्हा, वुडचक, ससा, हरिण आणि समुद्रकिनाऱ्याला कवचीचे जलचर सापडतात. 

इतिहास व राज्यव्यवस्था : ॲड्रियन ब्‍लॉक या डच प्रवाशाने कनेक्टिकट नदीतून जहाजाने उत्तरेकडे येऊन या प्रदेशाचा शोध लावल्यानंतर २० वर्षांनी डच लोकांनी फोर्ट गुड होप येथे राज्यातील गोऱ्यांची पहिली वसाहत केली. तथापि शेजारच्या मुलुखातल्या इंग्रज वसाहतवाल्यांनी हळूहळू या डचांना येथून हुसकून लावले. इंग्‍लंड सोडून आलेल्या ‘पिलग्रिम’ या पहिल्या वसाहती लोकांनी या बाजूस सर्वत्र व्यापारी ठाणी उभारली. जमिनीच्या शोधार्थ व धर्मच्छलाला कंटाळून १६३५-३६ मध्ये मॅसॅचूसेट्स उपसागराकडचे ‘प्युरिटन’ वसाहतवालेही मोठ्या संख्येने इकडे आले. तेव्हाच पहिली संघटित इंग्रज समाजाची स्थापना टॉमस हूकर या धर्मगुरूच्या नेतृत्वाखाली झाली. १६३८ मध्ये न्यू हेवनला बॉस्टनच्या अतिसोवळ्या प्युरिटन्सनी वेगळी वसाहत केली. १६३९ मध्ये राज्याची मूलभूत घटना तयार झाली. १६६२ मध्ये इंग्‍लंडच्या दुसऱ्या चार्ल्‌सने सनद देऊन कनेक्टिकट वसाहतीला मान्यता दिली. १६८७ मध्ये इंग्‍लंडच्या विरोधामुळे शासन तात्पुरते बरखास्त झाले. प्रथम काँग्रेगेशनल हा शासकीय धर्मपंथ होता न्यायालयाच्या अनुज्ञेखेरीज अन्य पंथाला मनाई होती. ही असहिष्णुता जाऊन धार्मिक स्वातंत्र्य १७९१ मध्ये मिळाले. इंग्‍लंडशी पहिल्यापासून तेढ असल्यामुळे स्वातंत्र्ययुद्धात या राज्याने पुष्कळ स्वयंसैनिक पुरवले. १७७६ मध्येच राज्याचा दर्जा मिळाला होता, तरी सीमा १८०० पर्यंत निश्चित नव्हत्या. पश्चिम भूभागावरचा हक्क या राज्याने सोडला पण ईअरी सरोवराकाठच्या ‘वेस्टर्न रिझर्व्ह’ प्रदेशावरचा हक्क सोडून देण्यास अनेक वर्षे लागली. राज्याने संयुक्त संस्थानांच्या १७८७ मधील घटनापरिषदेत सक्रिय भाग घेतला व संघराज्याला मान्यता देण्यात पुढाकार घेतला.१७८४ मध्येच गुलामीपद्धत रद्द केलेली असल्यामुळे यादवी युद्धात हे राज्य साहजिकच उत्तरेच्या पक्षाला होते. राज्याचे रूढवादी संविधान १८१४ च्या हार्टफर्ड परिषदेत बरेच उदारमतवादी करण्यात आले. पहिल्या महायुद्धात युद्धसाहित्याची असामान्य निर्मिती केल्यावरून राज्याला ‘लोकशाहीचे दारूगोळा कोठार’ हे अभिधान मिळाले. तथापि १९३० पर्यंत मंदीची बरीच झळ लागून राज्याला संघराज्याच्या विविध विकास योजनांत सहभागी होण्याखेरीज काम उरले नव्हते. दुसऱ्या महायुद्धात मात्र पुन्हा युद्धसाहित्याचे व इतर संबंधित उत्पादन फारच मोठ्या प्रमाणावर करून आलेली भरभराट राज्याने नंतरही टिकवून धरली. १८१८ च्या दुरुस्त संविधानानुसार राज्यकारभार चाले. त्यात पुन्हा १९५५ मध्ये दुरुस्ती झाली आणि १९६५ ला नवीन संविधान अंमलात आले. कनेक्टिकट राज्याचे राज्यपाल, उपराज्यपाल व चार खातेप्रमुख हे कार्यकारी अधिकारी दर चार वर्षांनी निवडले जातात. विधानसभा एकवर्षाआड १५० दिवस भरते. तिच्या प्रतिनिधीसभेचे १७७ व सीनेटचे ३६ सदस्य दोन वर्षांच्या मुदतीसाठी निवडलेले आहेत. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे न्यायमूर्ती व वरिष्ठ न्यायाधीश आठ वर्षांसाठी राज्यपालाच्या शिफारशीने विधानसभा नेमते. केंद्रीय संसदेवर ६ प्रतिनिधी व २ सीनेटर राज्यातर्फे निवडून देण्यात येतात.

आर्थिक व सामाजिक स्थिती : वसाहतीच्या वेळी प्रामुख्याने ग्रामीण आणि धर्माधिष्ठित समाजव्यवस्था असलेल्या या राज्याची स्थिती १८३०नंतर झपाट्याने बदलत जाऊन आज ते कारखानदारीत आघाडीला आहे. कृषिउद्योगात लोकसंख्येच्या केवळ दोन टक्के लोक असून कारखान्यांतून ४० टक्के लोक आहेत. तंबाखू हे मुख्य पीक असून त्याखालोखाल कृषि-उत्पादन, दूधदुभते व त्याचे पदार्थ, फळभाज्या, कोंबड्या व अंडी आणि गुरे महत्त्वाची आहेत. कारखान्यांतून खिळे, घडीव पितळेच्या वस्तू, घड्याळे, हत्यारे, दारूगोळा, विमानांचे भाग, यंत्रे, यांत्रिक हत्यारे, घरगुती वापराची व शास्त्रीय उपकरणे, बोटी, पाणबुड्या, शुद्ध धातू, रसायने, रबरी माल, अन्नपदार्थ इ. विविध माल तयार होतो. या राज्यातील हार्टफर्ड हे राजधानीचे व उद्योगधंद्यांचे शहर विमानधंद्याचे एक प्रमुख केंद्र समजले जाते. हौशी प्रवाशांची बरीच मोठी वर्दळ येथील वनश्री व ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी राज्यात चालत असते. मालवाहतुकीसाठी नद्यांच्या जलमार्गांखेरीज १,३२० किमी. लांबीचे लोहमार्ग व २६,७४८ किमी. रस्ते(पैकी सु. १/३ पक्के) तसेच ७४ विमानतळ राज्यात आहेत. बहुतेक सर्व प्रमुख शहरी विमानतळ, ५५ नभोवाणी व ८ दूरचित्रवाणी केंद्र, १९,५६,५०० दूरध्वनी यंत्रे, २८ दैनिके, (पैकी १ दोनशे वर्षे चालू) व असंख्य नियतकालिके राज्यात आहेत. प्रामुख्याने विविध ख्रिस्ती धर्मपंथांचे अनुयायी राज्यात आहेत. सर्वांत अगोदर वसाहत झालेल्या न्यू इंग्‍लंड विभागातील आपल्या ऐतिहासिक स्थानांचा राज्यातील लोकांना अभिमान आहे. तथापि सुरुवातीची बहुतांशी इंग्रज कुळीची लोकवस्ती आता इतर देशांतील स्थलांतरित आल्यामुळे मिश्र झाली आहे. ७७⋅४ टक्के लोक शहरात व २२⋅६ टक्के ग्रामीण असून श्वेतवर्णीयेतरांचे प्रमाण ६⋅५ टक्के आहे. हार्टफर्ड राजधानीखेरीज कारखान्यांमुळे ब्रिजपोर्ट व न्यू हेवन,पितळकामाखातर वॉटरबरी, बोटी बांधणारे न्यू लंडन व विद्यापीठासाठी येल ही प्रसिद्ध शहरे आहेत. सर्कसविख्यात बार्नम, हेलिकॉप्टर निर्माता ईगॉर सिकोर्स्की, प्रचंड प्रमाणावर यांत्रिकी निर्मितीचे तंत्र शोधून काढणारा ईली व्हिटनी इ. अनेक नामांकित लोक राज्यात होऊन गेले. राज्यात ७ ते १६ वयापर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. येल विद्यापीठाखेरीज आणखी इतर विद्यापीठे, महाविद्यालये व विशेष प्रशिक्षण देणाऱ्या अशा ४६ संस्था राज्यात असून नामांकित राज्यग्रंथालय, येल विद्यापीठाचे सुविख्यात  पोबॉडी निसर्गेतिहास विषयक वस्तुसंग्रहालय आणि अनेक सांस्कृतिक कलासंग्रहालये आहेत.

ओक, शा. नि.