लूज : पोलंडमधील त्याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे ठिकाण. यूरोपमधील एक मोठे औद्योगिक केंद्र व लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या १०,४९,२७२ (१९८८ अंदाज). ते वॉर्साच्या नैॠत्येस सु. १३२ किमी. वर ओडर व व्हिश्चला नद्यांमधील जलविभाजकावर डोंगराच्या कुशीत वसले आहे.
लूजचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास फारसा ज्ञात नाही तथापि त्याचा उल्लेख चौदाव्या शतकातील बखरीतून आढळतो. १७९८ मध्ये त्याला काही नागरी हक्क प्राप्त झाले. पोलंडच्या विभाजनानंतर (१७९३ व १७९५) हा प्रदेश प्रशियाकडे गेला व पुढे १८१५ मध्ये व्हिएन्ना काँग्रेसच्या ठरावानुसार तो रशियाच्या आधिपत्याखाली आला. इतर देशांनी घातलेले रशियाबरोबरचे व्यापारी निर्बंध १८५० मध्ये उठविण्यात आले आणि त्यानंतर कापड व अन्नप्रक्रिया उद्योगांचे शहर म्हणून याची वाढ झपाट्याने झाली. १९१८ मध्ये हे शहर पोलंडच्या ताब्यात देण्यात आले. पहिल्या व दुसऱ्या महायुद्ध काळात त्यावर काही काळ (१९१४ ते १९१८) व (१९३९-४४) जर्मनीचे वर्चस्व होते, पण शहराचे मात्र फारसे नुकसान झाले नाही.
रशियन बाजारपेठ, स्थानिक मजूरवर्ग आणि पश्र्चिम यूरोपातून उपलब्ध झालेले भांडवल यांमुळे येथील कापड व वस्त्रोद्योगास चालना मिळाली आणि तेथील मालाची रशियाशिवाय अन्य देशांतही निर्यात वाढली. येथील वस्त्रोद्योगात, विशेषतः लोकरी व सुती कापड, रेशमी कापड व धागा यांची निर्मिती होते. याशिवाय या उद्योगाला लागणारी यंत्रसामग्री, विद्युत्-उपकरणे, रसायने, रबरी वस्तू, चामड्याची पादत्राणे, कागद, सिमेंटव बांधकामाला लागणारे साहित्य यांचे उत्पादन होते. शहरात अन्नप्रक्रिया उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालतो. एकोणिसाव्या शतकात कापड व वस्त्रोद्योग केंद्र म्हणून उदयास आलेल्या या शहराचा विसाव्या शतकात देशाचे एक सांस्कृतिक केंद्र म्हणूनही विकास झाला आहे. शहरात उच्च शिक्षण देणाऱ्या वैद्यकीय अकादमी, तंत्रनिकेतन यांसारख्या सहा संस्था आहेत. शिवाय लूज विद्यापीठ (स्था. १९४५) असून त्यात सु. १०,५०० विद्यार्थी शिकत होते (१९८९). शहरात अनेक वस्तुसंग्रहालये, नाट्यगृहे, संगीतकेंद्रे, कलावीथी आणि चित्रपटगृहे असून पोलिश चित्रपट उद्योगाचे ते देशातील प्रमुख केंद्र आहे. शहरातील विविध उद्योगधंद्यांत गुंतलेल्या सु. दोन लाख कामगारांमुळे पोलंडच्या राजकीय घडामोडींमध्येही त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे प्रोलिटेअरिअट या मजूरसंघटनेची स्थापना (१८८३) झाली असून पोलिश कामगार संघटना १८८९ मध्ये अस्तित्वात आली. या संघटनांनी १९०५ च्या उठावात महत्त्वाचा वाटा उचलला. त्यामुळे पोलंडमध्ये मजूर चळवळीचे केंद्र म्हणून ते प्रसिद्धी पावले.
जुन्या शहरातील अरुंद रस्ते, एकमजली इमारती आणि दाट वस्ती यांमुळे आधुनिक वास्तुविशारद त्याचे वर्णन एक नियोजनशून्य शहराचा नमुना असे करतात. मात्र विस्तारित वस्तीत काही मोठ्या इमारती व आखीव रस्ते होऊ लागले आहेत. देशातील इतर गावांशी ते रस्त्यांनी जोडले असून वॉर्सा-व्हरॉट्स्लाफ लोहमार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे. तेथे एक विमानतळही आहे.
फडके, वि. शं.