नेप्रोपट्रॉफ्‌‌स्क : रशियाच्या युक्रेन प्रजासत्ताकातील शहर, लोकसंख्या ८,६३,००० (१९७०). हे खारकॉव्हच्या नैर्ऋरत्येस १७७ किमी. आणि कीव्हच्या आग्नेयीस ३७० किमी. व नीपर व समारा नद्यांच्या संगमाजवळ नीपर नदीकाठी वसले आहे. हे या भागातील मोठे औद्योगिक केंद्र असून इतर मोठ्या शहरांशी लोहमार्गाने आणि रस्त्यांनी जोडले आहे. १७८३ मध्ये यिकट्यिरीनस्लाफ या नावाने नीपरच्या डाव्या तीरावर याची स्थापना झाली परंतु सध्याच्या ठिकाणी १७८७ मध्ये कॅथरिन द ग्रेटने स्थापना केली. १७९६–१८०२ मध्ये हे नोव्होरोसिस्क या नावाने प्रसिद्ध होते. १९२६ मध्ये युक्रेनियन बोल्शेव्हिक पिट्रॉफ्‌स्की याचे स्मृत्यर्थ याचे नेप्रोपट्रॉफ्‌स्क असे नामकरण झाले. दुसऱ्या महायुद्धात हे १९४१–४३ पर्यंत जर्मनांच्या ताब्यात होते. याच्या आसमंतातील लोखंड, कोळसा, मॅंगॅनीज व विद्युत्‌शक्ती यांच्या उपलब्धतेमुळे येथे लोखंड व पोलाद उद्योगाची भरभराट झाली आहे. यांशिवाय येथे मोटारी, सायकली, शेती अवजारे व इतर अवजड यंत्रे, रसायने, रेडिओ साहित्य, टायर, कागद, सिमेंट, कापड इ. उत्पादने होतात. येथे एक विद्यापीठ असून खनिकर्म, वैद्यक, रसायन, रेल्वे वाहन व्यवहारविषयक, स्थापत्य वगैरेंकरिता विद्यालये व कृषी आणि शिक्षक महाविद्यालय इ. शैक्षणिक संस्था आहेत.

लिमये, दि. ह.