खाडी : समुद्राच्या किनाऱ्यापासून आत शिरलेला चिंचोळा फाटा. किनाऱ्याचा सखल भूभाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे खाडी तयार होते. भरतीचे पाणी खाडीत शिरते आणि त्याबरोबर लहानमोठ्या नौका खाडीत येऊ शकतात. यामुळे खाडीच्या खोल भागाचा नौकांना आसरा व माल आणि प्रवासी यांची चढउतार या दृष्टीने बंदर म्हणून उपयोग होतो. यूरोप, अमेरिका इत्यादींच्या दंतुर किनाऱ्यांवर अशा खाड्या पुष्कळ दिसून येतात. नदीमुखातून समुद्राच्या भरतीचे पाणी जेथपर्यंत आत जाऊ शकते तेथपर्यंतच्या नदीच्या मुखाकडील भागासही खाडी म्हणतात. नदीच्या किंवा समुद्राच्या क्षरणक्रियेमुळे खाडीचे मुख रुंद होऊन तिला नरसाळ्यासारखा आकार येतो. नदीमुखाजवळची जमीन खचल्यामुळेही खाडीला असा आकार येतो. इंग्लंडमधील टेम्स, दक्षिण अमेरिकेतील प्लेट यांसारख्या नद्यांच्या मुखांजवळ विस्तीर्ण खाड्या तयार होऊन तेथे लंडनपासून ३५ किमी. वरील टूरॉक आणि अर्जेंटिनाचे ब्वेनस एअरीझ अशी मोठ्या उलाढालीची बंदरे विकास पावली आहेत. काही खाड्यांत भरपूर गाळ साठतो, तर काही खाड्या भरतीप्रवाहामुळे खुल्या राहतात. नर्मदेच्या मुखाजवळचे भडोच बंदर एकेकाळी भरभराटलेले होते परंतु गाळाने भरून आल्यामुळे ते आधुनिक आगबोटींना निरुपयोगी झाले आहे. कोकण किनाऱ्यावरील दाभोळ, मुरूड, बाणकोट, जयगड वगैरे बंदरे खाड्यांवरच वसलेली असून त्या खाड्या जलमार्ग म्हणून पूर्वीपासून उपयोगात आहेत. खाडीलगतचा प्रदेश डोंगराळ असेल, तर त्याच्यापासून मिळणाऱ्या संरक्षणामुळे अशी खाडी चांचे लोकांना किंवा चोरटा व्यापार करणाऱ्यांना सोयीची असते. काही वेळा दोन मोठे सागरी विभाग जोडणाऱ्या व सामुद्रधुनीपेक्षा रुंद व विस्तृत असलेल्या समुद्रविशेषालाही खाडी म्हणतात. उदा., उत्तर समुद्र व अटलांटिक महासागर यांस डोव्हर सामुद्रधुनीमार्गे जोडणारी इंग्लिश खाडी किंवा अंदमान निकोबार बेटांदरम्यानची १० खाडी. इंग्रजीतील क्रीक, एस्ट्युअरी, चॅनेल, फर्थ यांच्यासाठी मराठीत खाडी ही एकच संज्ञा वापरतात. हिंदीत तर पुष्कळदा गल्फ (आखात), बे (उपसागर) या अर्थीही खाडी हा शब्द वापरतात. फ्योर्ड हा समुद्राचा लांब चिंचोळा भाग असूनही तो खाडीपेक्षा वेगळा आहे.                                    

कुमठेकर, ज. ब.