लीलिएंटाल, ओटो : (23 मे 1848-10 ऑगस्ट 1896). विमानविद्येतील जर्मन आद्य प्रवर्तक. समानव प्रायोगिक ग्लायडर उड्डाणाकरिता ते प्रसिद्ध होते. सपाट पृष्ठभागाएवजी वक्र किंवा बहिर्गोल आकार दिलेले पंख वापरणारे पहिले प्रयोगकर्ते म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. नंतर शक्तिचलित विमानाच्या झालेल्या विकासात त्यांच्या कार्याचा निश्र्चितपणे वाटा आहे. ऑक्टेव्ह कान्यूट व राइट बंधू यांसरख्या नंतरच्या अभियंत्यांनी लीलिएंटाल यांच्या कार्याचा पुष्कळ उपयोग करून घेतला.
लीलिएंटाल यांचा जन्म प्रशियातील आंकलाम येथे झाला. लहानपणी त्यांचे बंधू गुस्टाफ यांच्याबरोबर त्यांनी पक्ष्यांच्या उड्डाणाचा अभ्यास केला. पॉट्सडॅम येथील धंदेशिक्षणाच्या शाळेत व बर्लिन ट्रेड ॲकॅडेमीत शिक्षण घेऊन पदवी मिळविल्यावर त्यांनी फडफडणारे पंख जोडलेल्या उडणाऱ्या प्रतिकृती व पंखयुक्त ग्लायडर यांच्यासंबंधी प्रयोग केले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी हातांना लाकडी पंख बांधून उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला होता. पक्ष्यांच्या विसर्पण (संथपणे सरकत जाणाऱ्या) उड्डाणाचा लक्षपूर्वक अभ्यास करून त्यांनी वायुगतिकीतील (हवा व इतर वायूंच्या गतीशी आणि अशा वायूंतून गतिमान होणाऱ्या वस्तूंवर क्रिया करणाऱ्या प्रेरणांशी संबंधित असलेल्या शस्त्रातील) काही तत्त्वांचे अनुमान केले होते. या अभ्यासाच्या आधारे त्यांनी पक्ष्यांच्या उड्डाणासंबंधी 1889 मध्ये लिहिलेला ग्रंथ (Der Vogeflug als Grundlage der Fliegekunst) व उडणाऱ्या यंत्रांसंबंधी 1894 मध्ये लिहिलेले निबंध हे विमानविद्येत मूलभूत महत्त्वाचे मानले जातात. अनेक वर्षे अभ्यास व प्रयोग केल्यावर त्यांनी रेशमी कापडाने आच्छादित केलेल्या व नाजूक आकार दिलेल्या बळकट काठ्यांपासून बनविलेल्या आणि वटवाघळासारखे पंख असलेल्या ग्लायडरमधून 1891 मध्ये यशस्वी उड्डाण केले. त्यांनी ग्लायडर डोक्यावर उंच धरले व वाऱ्याच्या दिशेत पळून उड्डाण केले. पायांना झोके देऊन ते उड्डाणाचे काही प्रमाणात नियंत्रण करू शकले. अशा प्रकारे ते सु. 30 मी. अंतर जाऊ शकले. नंतरच्या पाच वर्षात लिस्टरफेल्डच्या जवळील कृत्रिम टेकडीवरून लीलिएंटाल यांनी स्वत: अभिकल्पित केलेल्या (आराखडा तयार केलेल्या) ग्लायडरांतून 2,000 हून अधिक उड्डाणे केली, त्यांच्या नोंदी केल्या व त्यांचे विश्र्लेषणही केले. त्यांनी उड्डाण वाढविण्याच्या दृष्टीने पंखांच्या टोकांची फडफड होण्याकरिता छोटे कार्बाइड एंजिन बसविलेले ग्लायडर अभिकल्पित करून 1896 च्या उन्हाळ्यात तयार केले होते. परंतु त्याची चाचणी घेण्याच्या अगोदरच ऱ्हिनोजवळील स्टॉलेरिअर पर्वतातील एका टेकडीवरून दुसऱ्या एका ग्लायडरमधून उड्डाण करताना ग्लायडर उलटे झाल्याने कोसळून त्यांना प्राणघातक दुखापत झाली व ते बर्लिन येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.