लिली, जॉन : (१५५४ ?-नोव्हेंबर १६०६). इंग्रज रोमान्सकार आणि नाटककार. इंग्लंडमधील केंट कँटरबरी येथे त्याचा जन्म झाला असावा. कँटरबरीच्या आर्चबिशपच्या नोकरीत त्याचे वडील होते. लॅटिन व्याकरण लिहिणारे विख्यात इंग्रज वैयाकरणी विल्यम लिली ह्याचा जॉन लिली हा नातू. तो मॉड्लिन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे शिकावयास गेला, त्यापूर्वी कँटरबरी येथील ‘किंग्ज स्कूल’ मध्ये त्याचे आरंभीचे काही शिक्षण झाले असणे शक्य आहे. १५७६च्या सुमारास तो लंडनला आला, तेव्हा वाङ्मयीन–अकादमिक महत्त्वाकांक्षा त्याच्या मनात असावी. अर्ल ऑफ ऑक्सफर्ड हा त्याचा आश्रयदाता होता. १५७८मध्ये यूफूस द अनॅटमी ऑफ विट हा त्याचा ग्रंथ प्रकाशित झाला. ह्या ग्रंथाचा दुसरा भाग यूफूस अँड हिज इंग्लंड त्यानंतर दोन वर्षांनी बाहेर पडला. लेखक म्हणून लिलीची ख्याती आज मुख्यतः ह्या दोन ग्रंथांवर अधिष्ठित आहे.
उपर्युक्त यूफूस … हा दोन भागांतला एक गद्य रोमान्स आहे. तथापि त्याचा हेतू बोधवादी आहे. तत्कालीन इंग्रज समाजातील सद्गृहस्थाचे (जंटलमन) शिक्षण हा त्याचा विषय. यूफूसच्या पहिल्या भागात यूफूस हा अथेन्सचा तरुण विद्यार्थी नेपल्सला येतो. तेथे त्याच्या हातून काही चुका घडतात. त्याला पश्चात्ताप होतो. तो पुन्हा नवे जीवन सुरू करतो, असे दाखविले आहे. यूफूसला लिलीने अनेक अनुभवांतून नेलेले आहे. तथापि हे अनुभव उपदेशपर भाषणांसाठी आणि चर्चांसाठी निमित्त म्हणून येतात. प्रेम आणि मैत्री ह्या विषयांवर बरेच उद्बोधक विचार मांडण्यात आलेले आहेत.
दुसऱ्या भागात यूफूस हा आपल्या एका इटालियन मित्राबरोबर इंग्लंडचा प्रवास करतो (हा मित्र पहिल्या भागातही आहेच). ह्या निमित्ताने पुन्हा काही अनुभव येतात आणि चर्चांना वाव देतात. प्रेमाशी संबंधित अशा प्रश्नांवरील चर्चांनी बरीच जागा व्यापलेली आहे.
ह्या दोन्ही भागांना उत्तम प्रतिसाद मिळाला आणि १६३० पर्यंत त्यांच्या २६ आवृत्त्या निघाल्या. यूफूसमध्ये लिलीने वापरलेली वैशिष्ट्यपूर्ण शैली अत्यंत लोकप्रिय झाली. ‘युफूइझम ’ ह्या नावाने ती प्रसिद्ध आहे.
ही शैली आलंकारिक, अनेकदा अनुप्रासात्मक, तालबद्ध अशी आहे. परस्परविरोधी असलेल्या दोन कल्पनांमधील विरोध दाखविणारे परस्परविरोधी शब्द वाक्यात योजून तो विरोध विशेष प्रभावीपणे मांडण्यासाठी योजिल्या जाणाऱ्या ‘अँटिथिसीस ’ह्या अलंकारावर ह्या शैलीत लक्षणीय भर दिलेला दिसतो . ऐतिहासिक तसेच मिथ्यकथांतील व्यक्तींचे उल्लेख भरपूर केले जातात. निसर्गेतिहासाच्या क्षेत्रातील विषयांचाही उपमांसाठी वा तुलनांसाठी उपयोग त्याने केलेला आहे. इंग्रजी गद्याच्या इतिहासात लिलीच्या यूफूसला महत्त्वाचे स्थान आहे. गद्यशैलीच्या संदर्भात इंग्रज लेखकांकडून वेगवेगळे प्रयोग चालू असतानाच्या काळातले यूफूसचे हे दोन भाग आहेत. इंग्रजी कादंबरीच्या उत्क्रांतीतही यूफूसचे स्थान आहे. हेन्री फोर्थ ह्या आपल्या नाटकात शेक्सपिअरने लिलीच्या ह्या शैलीचे विडंबन केल्याचे दिसते.
ह्या गद्य रोमान्सच्या यशानंतर लिली नाट्यलेखनाकडे वळला आणि दरबारी सुखात्मिकेचा एक नवा प्रकार त्याने निर्माण केला. राणीच्या समोर सादर करण्यासाठी त्याने ह्या सुखात्मिका लिहिल्या. अलेक्झांडर अँड कांपास्पे (१५८४), सॅफो अँड फाओ (प्रयोग १५८४), गॅलाथी लव्ह्ज मेटमॉर्फसिस (सु. १५८५),एंडिमिअन (१५९१), मदर बाँबी (सु. १५९०), मिडास (१५९२) व द वुमन इन द मून (१५९७) ह्या त्याच्या नाट्यकृती उल्लेखनीय आहेत. गॅलाथी आणि द वुमन इन द मून ही दोन गोपनाटके (पास्टोरल प्लेज) आहेत. आपल्या नाट्यकृतींसाठी त्याने ग्रीक आख्यायिकांचा आणि मिथ्यकथांचा उपयोग केला. द वुमन इन द मून हे निर्यमक छंदात लिहिलेले लिलीचे एकमेव नाटक. सामान्यतः त्याच्या नाट्याकृतींत त्याच्या खास शैलीतले असे गद्य संवाद आणि त्यांच्या जोडीला गीते असतात. लिलीचे मदर बाँबी हे नाटक प्लॉटस आणि टेरेन्स ह्या रोमन नाटककारांच्या परंपरेतले वाटते आणि त्यामुळे ते त्या अन्य नाटकांत वेगळे उठून दिसते. नाट्यलेखनात शेक्सपिअरचा एक पूर्वसूरी म्हणून लिलीचे महत्त्व आहे. शेक्सपिअरची सुखात्मिका लिलीच्या सुखात्मिकेतून आकारास आली आहे. लिलीची यूफूसमधून आलेली गद्यशैली नाटकांत कंटाळवाणी वाटू शकेल. त्याच्या नाटकांतली उपकथानके अनेकदा मुख्य कथानकाशी पारिणामकारक रीत्या सांधली गेल्याचे दिसत नाही. पण त्याची कल्पनाशक्ती, त्याच्यापाशी असलेली नाट्यघाटाची जाणीव, सुखात्मिकेची त्याची नवी संकल्पना ह्यांचा प्रभाव पुढील एलिझाबेथकालीन नाटककारांवर पडला.
काही काळ तो पार्लमेंटचा सदस्य होता. लंडन येथे तो निधन पावला. आर्. डब्ल्यू .बाँड ह्याने लिलीचे साहीत्य तीन खंडांत संपादिले आहे (१९०२).
संदर्भ : 1. Hunter, G. K. John LyIy, London, 1962.
2. Winny, J. Ed. The Descent of Euphues, Cambridge, 1957.
कळमकर, य. शं. कुलकर्णी, अ. र.