लिपिडे : अन्नातील प्रमुख घटक असलेल्या नैसर्गिक रीत्या आढळणाऱ्या कार्बनी संयुगांचा हा एक वर्ग असून त्यांत दीर्घ शृंखला असलेली ॲलिफॅटिक हायड्रोकार्बने [→ ॲलिफॅटिक संयुगे]  व त्यांचे अनुजात [त्यांपासून बनलेली इतर संयुगे उदा.., अम्ले (वसाम्ले) अमाइने, ॲमिनो अल्कोहॉले, आल्डिहाइडे इ.] यांचा समावेश होतो. या वर्गात मेणे, वसा (मेद वा स्निग्ध पदार्थ) व त्यांचे अनुजात येतात. पाण्यापेक्षा यांची घनता कमी असते. दीर्घ ॲलिफॅटिक शृंखला या लिपिडांच्या वैशिष्ट्यपूर्ण घटकामुळे या वर्गातील साध्या संयुगांत वेगळे विद्राव्यतेचे (विरघळण्याच्या क्षमतेचे) गुणधर्म आढळतात. पाण्यामध्ये बहुतांशी लिपिडे अविद्राव्य आहेत पण ईथर, क्लोरोफॉर्म, बेंझीन, अल्कोहॉल वगैरे वसा विद्रावकांत (विरघळविणाऱ्या द्रव्यात) ती विद्राव्य असतात. तथापि रेणूमध्ये ध्रुवीय घटक असलेली [ज्यांत ध्रुवीय सहसंयुजी बंध आहे अशी → रासायनिक संयुगे]लिपिडे (विशेषतः ग्लायकोलिपिडे व फॉस्फोलिपिडे) या विद्रावकांत अविद्राव्य असू शकतात व काही पाण्यातही विद्राव्य असतात.

सर्व प्रकारच्या सजीव कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) लिपिडे आढळतात; पण त्यांचे प्रमाण निरनिराळ्या कोशिकांमध्ये कमीअधिक असून कोशिकेच्या कार्यासाठी ती अत्यंत आवश्यक असतात; तसेच शरीरातील कार्यशक्तीचे संचितीकरण, शरीराला मिळणारी आकारात्मक गोलाई, हृदय, यकृत, वृक्क वगैरे अवयवांभोवती रचलेले संरक्षणात्मक आवरण, वातावरणाच्या तापमानातील चढउतारापासून शरीराचे रक्षण, शरीराच्या वाढीस अत्यंत आवश्यक असलेली असंपृक्त (लगतच्या दोन कार्बन अणूंमध्ये एकापेक्षा अधिक बंध असलेली) वसाम्ले आणि अ, ड, ई, के या वसाविद्राव्य जीवनसत्वांचा पुरवठा या सर्वांमध्ये लिपिडांचा अत्यंत उपयोग असतो. लिपिड रेणूमध्ये कार्बन व हायड्रोजन यांचे प्रमाण (८९%) ऑक्सिजनापेक्षा जास्त असते, तर तौलनिक दृष्ट्या ते प्रथिने (५७%) व कार्बोहायड्रेटे (४७%) यांमध्ये कमी असते. म्हणून शरीरात लिपिडाच्या एका ग्रॅमचे कॅलरीमूल्य (ऊर्जानिर्मिती मूल्य) जवळजवळ ९ कॅलरी असते, तर प्रथिने व कार्बोहायड्रेटे यांच्या बाबतीत ते प्रत्येकी ४ कॅलरीपर्यंत असते.

वर्गीकरण : लिपिडांचे वर्गिकरण साधारणपणे पुढीलप्रमाणे करतात.

(अ) साधी व सरळ लिपिडे : यांचे चार भाग पडतात.

(१) ग्लिसरॉलाबरोबर तयार होणारी वसाम्ली एस्टरे, ट्रायग्लिसराइडे म्हणजेच वसा व तेले यांचा यामध्ये समावेश होतो. त्यात लोणी, लार्ड इ. प्राणिजन्य पदार्थांचा आणि मक्याचे तेल, सरकीचे तेल इ. वनस्पतिजन्य तेलांचा अंतर्भाव करण्यात येतो. यांच्या गुणधर्म, निर्मिती इ. माहितीसाठी ‘सरकी’, ‘तेले व वसा’, ‘लोणी’ वगैरे नोंदी पहाव्यात.

(२) मेणे: ही वनस्पतिजन्य व प्राणिजन्य प्रकारची असतात. यांमध्ये दीर्घ शृंखलायुक्त वसाम्ले ग्लिसरॉलाच्या व्यतिरिक्त अल्कोहॉलाबरोबर जोडलेली असतात. यांत मधमाश्यांचे मेण, स्पर्म तेल, कार्नोबा मेण इत्यादिंचा समावेश होतो. [→ मेण].

(३) ⇨कोलेस्टेरॉलाची  एस्टरे.

(४) अ आणि ड या जीवनसत्त्वांची एस्टरे.

(आ) संयुक्त लिपिडे : काही विशिष्ट गटासहित असलेल्या अल्कोहॉल वसाम्लांचे एस्टरीकरण होऊन झालेली संयुगे, फॉस्फोलिपिडे, ग्लायकोलिपिडे किंवा सेरिब्रोलिपिडे, सल्फोलिपिडे, लिपोप्रथिने हे प्रकार यामध्ये येतात.

(इ) साधित लिपिडे : मध्ये अंतर्भाव केलेल्या लिपिडांचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने घटक अलग करण्याची क्रिया) करून मिळविलेले घटक अर्थात या घटकांत लिपिडांचे सर्वसाधारण भौतिक गुणधर्म असले पाहिजेत. संयुक्त व असंपृक्त वसाम्ले, मोनो व डायग्लिसराइडे, मेणापासून मिळालेली अल्कोहॉले, स्टेरॉले, ड जीवनसत्त्व बीटा आयोनोनाची वलये असलेली अल्कोहॉले यांचा यात समावेश होतो. [→ जीवनसत्त्व ड, स्टेरॉले व स्टेरॉइडे].

(ई) इतर लिपिडे : कॅरोटिनॉइडे, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बने, शार्क माशात किंवा यकृतात आढळणारे स्क्वालिन, ई व के जीवनसत्वे या गटामध्ये येतात. [→ कॅरोटिनॉइडे जीवनसत्त्व ई जीवनसत्व के ॲलिफॅटिक संयुगे].

वसाम्ले : निसर्गात वनस्पती व प्राणी यांपासून मिळणाऱ्याव बहुतेक वसाम्लांत कार्बनी अणुंची संख्या सम असते. तथापि काही वनस्पती व प्राणी यांमधील लिपिडांत कार्बनी अणूंची संख्या विषम असलेली वसाम्ले  सापडली आहेत. विविध प्रकारच्या लिपिडांत २ ते ३४ पर्यंत कार्बन अणू असलेली वसाम्ले आढळलेली आहेत. १६ कार्बन अणू असलेले पामिटीक अम्ल व १८ कार्बन अणू असलेले स्टिअरिक अम्लच हि विशेषतः निसर्गात अधिक प्रमाणात का आढळतात, याचे स्पष्टीकरण अजून मिळालेले नाही. निसर्गात वसाम्ले सुटी आढळत नाहीत. वसाम्ले दोन प्रकारची असतात. संपृक्त वसाम्लांत द्विबंध नसतो. (उदा., पामिटिक अम्लत), तर असंपृक्त वसाम्लांत एक किंवा अधिक द्विबंध असतात (उदा., ओलोइक अम्ल,).

CH3.(CH2)14.COOH

सूत्र १. पामिटिक अम्ल.

CH3.(CH2)7.CH = CH.(CH2)7.COOH

सूत्र २. ओलेइक अम्ल

संपृक्त वसाम्ले गरजेप्रमाणे शरीरात संश्लेषित होतात (साध्या संयुगांपासून वा मूलद्रव्यांपासून तयार होतात) म्हणून ती अत्यावश्यक गटात पडत नाहीत.

असंपृक्त वसाम्लांमध्ये एक किंवा अधिक द्विबंध असतात. एक द्विबंध असलेल्या वसाम्लाला एक द्विबंधी असंपृक्त वसाम्ल, तर एकाहून अधिक द्विबंध असलेल्या वसाम्लाला बहुद्विबंधी असंपृक्त वसाम्ल असे म्हणतात. निसर्गात आढळणाऱ्या लिपिडांत बहुद्विबंधी असंपृक्त वसाम्लांचे प्रमाण फारच थोडे असते.

असंपृक्त वसाम्लांच्या रेणूमध्ये द्विबंध असल्यामुळे समघटकता (रेणूतील अणूंची संख्या व प्रकार तेच परंतु निरनिराळ्या संरचना असलेली संयुगे अस्तित्वात असणे) उद्भवते. उदा., १८ कार्बन अणू असलेले असंपृक्त वसाम्ल सूत्रे ३ व ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे दोन रूपांत असते.

CH3.(CH2)7.CH                                                                CH3.(CH2)7.CH

                         ||                                                                                          ||

HOOC.(CH2)7.CH                                                      CH.(CH2)7.COOH

सूत्र ३. ओलेइक अम्ल (समपक्ष रूप,वितळबिंदू १३° से.)     सूत्र ४. इलायडिक अम्ल (विपक्ष रूप, वितळबिंदू ४५° से.)

बहुद्विबंधी वसाम्लां चे शरीराच्या गरजेप्रमाणे संश्लेषण होत नाही, ती अन्नातून घ्यावी लागतात व म्हणून ती अत्यावश्यक वसाम्ले समजतात. शरीरात महत्त्वाचे कार्य करणारी ⇨प्रोस्टाग्लँडिने ॲरॅकिडॉनिक या बहुद्विबंधी असंपृक्त वसाम्लांपासून संश्लेषित होतात.

विशिष्ट गटांशी जोड असलेली वसाम्ले : (१) अल्किल गट असलेली वसाम्ले : लोण्यातील वसेमध्ये मिथिल टेट्राडेकॅनॉइक अम्ल (सूत्र ५) सापडते.

CH3. CH2. CH. CH2. (CH2)9. COOH

                                                                                             |

CH3

सूत्र ५. १२−मिथिल टेट्राडेकॅनॉइक अम्ल

या गटातील वसाम्ले क्षयाच्या जंतूत सापडतात.

(२) हायड्रॉक्सी (OH) गट असलेली वसाम्ले : उदा., एरंडेल तेलातील रिसिनोलेइक अम्ल  (सूत्र ६) आणि मेंदूतील सेरिब्रोनिक अम्ल (सूत्र ७).

CH3.(CH2)5 CH.CH2.CH=CH.(CH2)2.COOH

|

OH

सूत्र ६. रिसिनोलेइक अम्ल

CH3.(CH2)21 .CH.COOH

|

OH

सूत्र ७. सेरिब्रोनिक अम्‍ल

(३) वलयी गट असलेली वसाम्ले : उदा., सायक्लो‍प्रोपेन गट (सूत्र ८).

                            सूत्र ८. सायक्लोप्रोपेन

लॅक्टोबॅसिलस ॲरॅबिनोसस या सूक्ष्मजंतूतील वसाम्लासमध्ये सायक्लोप्रोपेन गट असलेले लॅक्टोवॅसिलिक अम्ल जवळजवळ ३०% आढळते. प्राण्यांच्या ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांमध्ये) मात्र ते आढळत नाही. महारोग्यांच्या औषधोपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या चौलमुग्रा तेलात या गटाशी साधर्म्य असलेली वसाम्ले सापडतात. प्रोस्टाग्लँडिनांमध्येही अशी वसाम्ले  आढळतात.

भौतिक व रासायनिक गुणधर्म : (१) वितळबिंदू : संपृक्त वसाम्लामतील कार्बन अणूंची शृंरखला जशी लांब होत जाते, तसा त्याचा वितळबिंदू वाढत जातो.

(२) विद्राव्यता : चारपर्यंत कार्बन अणू असलेली वसाम्ले पाण्यात विद्राव्य आहेत. उदा., ॲसिटिक (CH2COOH) व ब्युटिरिक (C3H7COOH)  ही वसाम्ले पण सहाच्या वर कार्बन अणू असलेल्या शृंखलेची लांबी जशी वाढत जाते, तशी वसाम्लांची पाण्यातील विद्राव्यता कमी होत जाते.

(३)कार्‍बॉक्सिल (-COOH) गटाची विक्रियाशीलता :कार्बॉक्सिल गटामुळे वसाम्लामध्ये सौम्य अम्लतेचे गुणधर्म असतात. थायोनील ल्कोराइडाची विक्रिया होऊन वसाम्लाच्या ॲसिल क्लोराइडांची संयुगे मिळतात तर अल्कोहॉलाशी एस्टरीकरण होऊन निरनिराळ्या एस्टरे मिळतात. वसाम्लांच्या अमोनियाशी उष्णतेच्या साहाय्याने विक्रिया केल्यास अमाइडे मिळतात.

(४) हायड्रोकार्बनाच्या शृंखलेची विकियाशीलता: हायड्रोकार्बनाच्या शृंखलेत असलेला व्दिबंध हा अतिशय विक्रियाशील असतो. हॅलोजने (उदा., क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन) आणि त्यांची अनुजात हॅलाइडे यांची वसाम्लातील व्दिबंधाशी विक्रिया होऊन त्या वसाम्लातील असंपृक्तता दूर केली जाते. याला ‘समावेशक विक्रिया’ म्हणतात.

(५) स्वयंऑक्सिडीकरण : हवेतील ऑक्सिजनाचा वसेमधील असंपृक्त वसाम्लातील द्विबंधाशी हळूहळू संयोग होऊन हायड्रोपेरॉक्साइड जातीचे संयुग तयार होते. त्याचे पुढे अपघटन (घटक द्रव्ये अलग होण्याची क्रिया) होऊन त्या वसेला उग्र व खवट असा वास येतो.

सोयाबिनासारख्या शेंगेच्या बियांमध्ये किंवा शरीरातील वसा ऊतकामध्ये लिपॉक्सिडेज नावाचे एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणारे प्रथिन) असते. ते लिनोलीइक अम्लातील द्विबंधाशी ऑक्सिजनाची जोडणी करते. या उत्प्रेरकी (विक्रियेच्या वेगात बदल घडून आणणाऱ्या) क्रियेला लिपॉक्सिडीकरण असे म्हणतात. [→ वसाम्ले].

वसाम्लांचे अनुजात : निसर्गात वसाम्ले ही नेहमी दुसऱ्या संयुगाशी निगडीत असतात. वसा (ट्रायग्लिसराइडे) व फॉस्फोलिपिडे ही संयुगे वसाम्लांपासूनच संश्लेषित होतात.

वसा : तीन वसाम्ल रेणूंचा सूत्र ९ मध्ये दाखविल्याप्रमाणे ग्लिसरॉलाच्या रेणूशी जोड होऊन तयार झालेल्या संयुगास वसा म्हणतात.

                                  सूत्र ९. ट्रायओलेइन

संश्लेषित केलेल्या वसेमध्ये वसाम्लांचे तीनही रेणू एकाच वसाम्ला‍चे असू शकतात पण निसर्गात आढळणाऱ्याव वसेमध्ये मात्र ते रेणू भिन्न भिन्न वसाम्लांचे असू शकतात तसेच ग्लिसरॉलाशी जोडलेल्या वसाम्लांच्या जागाही वरखाली अशा बदलत  राहतात. अशी वसा बहुतांशी कोशिकाद्रव्यात (कोशिकेतील केंद्रकाबाहेर असणाऱ्या जीवद्रव्यात) आढळते.

भौतिक व रासायनिक गुणधर्म : वसा पाण्यामध्ये अविद्राव्य असून तिचे विद्युत् क्षेत्रात स्थानांतर होत नाही. वसांचे विद्राव्यता, वितळबिंदू, प्रकाश शोषण, श्यानता (दाटपणा), विशिष्ट गुरुत्व, प्रणमनांक वगैरे भौतिक गुणधर्म तसेच जलीय विच्छेदन, अल्कोहॉली विच्छेदन वगैरे भौतिक गुणधर्म तसेच जलीय विच्छेदन अल्कोहॉली विच्छेदन  वगैरे रासायनिक गुणधर्म यांची माहिती ‘तेले व वसा’ या नोंदीत दिलेल्या आहे.

साबणीकरण : वसेपासून साबण पुढीलप्रमाणे तयार करता येतो. अल्कोहॉलिक क्षाराबरोबर (अम्लाबरोबर विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या  पदार्थाबरोबर) उकळल्यास वसेचे ग्लिसरॉलात आणि वसाम्लांच्या लवणांत (म्हणजेच साबणात) अपघटन होते.

                                                          सूत्र १०. साबणीकरण

ग्लिसरॉल आणि साबण हे दोन्ही पाण्यामध्ये विद्राव्य आहेत. मीठ टाकून साबणाचा साका वेगळा करता येतो. साबण व ग्लिसरीन (ग्लि‍सरॉल) यांचे उत्पादन करताना साबणीकरण तंत्र महत्त्वाचे असते. [→ ग्लिससरीन साबण].

वसेचे गुणधर्म निर्धारित करणारी मूल्ये: शुद्ध स्वरूपातील वसेच्या किंवा बहुजिनसी वसेच्या विशिष्ट गुणधर्माचे स्वरूप लक्षात घेणे आवश्यक असते. वितळबिंदू, काही विशिष्ट गुणधर्म यांशिवाय वसेचे गुणधर्म निर्धारित करणारी इतर मूल्ये समजणेही आवश्यक असते. वसेमध्ये असलेल्या वसाम्लांचे रासायनिक, भौतिक आणि संरचनात्मक गुणधर्म त्या वसेच्या विशिष्ट गुणधर्मास कारणीभूत असतात.

(१) आयोडीन मूल्य : १०० ग्रॅम वसेमध्ये जितके ग्रॅम आयोडीन शोषले जाते त्याला त्या वसेचे आयोडीन आयोडीन मूल्य समजतात.

आयोडिनाच्या (किंवा हॅलोजन गटातील इतर मूलद्रव्यांच्या) संपर्कात असंपृक्त वसाम्लातील असंपृक्त जोड (द्विबंध जोड) उघडा होऊन त्या मूलद्रव्याशी (आयोडिनाशी)  जुळला जातो व त्या वसाम्लाचा संपृक्त हॅलोजन अनुजात मिळतो. वसाम्लांमध्ये जितके द्विबंध जास्त तेवढे आयोडिनाचे  शोषण जास्त प्रमाणात होते. वसेमध्ये असंपृक्त वसाम्लांचे प्रमाण जर जास्त असेल, तर त्या वसेचे आयोडीन मूल्य अधिक असते. वसेमधील भेसळ आयोडीन मूल्याचा उपयोग करून ओळखता येते. उदा., सरकीचे तेल, ऑलिव्ह तेल व जवसाचे तेल यांची आयोडीन मूल्ये अनुक्रमे १०३ ते १११, ७९ ते ८८ व १७५ ते २०२ अशी आहेत. बाजारातील ऑलिव्ह तेलाचे आयोडीन मूल्य जर ८८ पेक्षा जास्त असेल, तर त्यामध्ये सरकीच्या तेलीची भेसळ झाली आहे, असे अनुमान काढता येते. जवसाच्या तेलाचे आयोडीन मूल्य जर १७५ पेक्षा कमी असेल, तर त्यामध्ये सुद्धा सरकीचे तेल मिसळले असण्याची शक्यता असते.

(२) साबणीकरण मूल्य : एक ग्रॅम वसेतील वसाम्लांचे उदासिनीकरण करण्याकरिता (अम्लता घालवून  लवण-येथे साबण-तयार करण्याकरिता) जितके मिग्रॅ. पोटॅशियम हायड्रॉक्साइड लागते, त्याला त्या वसेचे साबणीकरण मूल्य असे म्हणतात. साबणीकरणामध्ये वसेच्या वसाम्लातील प्रत्येक-COOH (कार्बॉंक्सी) गट एका NaOH  किंवा KOH रेणूशी विक्रिया करतो. एखाद्या वसेचे साबणीकरण करण्यास किती क्षार लागेल हे त्या वसेच्या रेणूमध्ये असलेल्या -COOH गटावर अवलंबून असते. वसेमध्ये लघुशृंखलेची वसाम्ले जास्त प्रमाणात असतील तेथे प्रत्येक ग्रॅममध्ये –COOH गटांचे प्रमाण अधिक असते पण दीर्घ शृंखलेच्या वसाम्लांचे प्रमाण अधिक असेल, तर प्रत्येक ग्रॅममध्ये –COOH गटांचे प्रमाण कमी असते. म्हणजेच साबणीकरण मूल्यामुळे अप्रत्यक्ष रीत्या वसेतील वसाम्लांचे आकारमान (लघू की दीर्घ शृंखला) समजण्यास मदत होते. लोण्याचे साबणीकरण मूल्य २१० ते २३० असते. तर ओलिओमार्गारिनाचे साबणीकरण मूल्य १९५ किंवा कमी असते.

(३) राइखर्ट-माइस्ल मूल्य किंवा बाष्पनशील वसाम्ल अंक : ५ ग्रॅम वसेचे वाफयुक्त ऊर्ध्वपातन [→ ऊर्ध्वपातन] केले असता मिळणाऱ्या  विद्राव्य बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणऱ्या) वसाम्लाचे उदासिनीकरण करण्यास जितके मिलि. ०.१ सममुल्ये क्षाराचा विद्राव लागतो, त्याला त्या वसेचे राइखर्ट- माइस्ल मूल्य असे म्हणतात.

या मूल्यामुळे वसेतील विद्राव्य बाष्पनशील वसाम्लांचे प्रमाण माहीत होऊ शकते. साबणीकरण, अम्लीकरण व वाफयुक्त ऊर्ध्वपातन करून वसेतील बाष्पनशील वसाम्ले वेगळी करता येऊन त्याचे प्रमाण ठरविता येते. लोण्याऐवजी खाद्यपदार्थात दुसरी एखादी बदली वसा वापरली आहे. का ते या मूल्यामुळे समजू शकते.

(४) ॲसिटिल अंक :⇨ ॲसिटिलीकरण केलेल्या वसेपासून मिळालेल्या ॲसिटिक अम्लाचे उदासिनीकरण करण्यास जितके मिग्रॅ. पोटॅशियम हायड्रॉक्साइड लागते. त्याला त्या वसेला ॲसिटिल अंक असे म्हणतात.

वसेतील काही वसाम्लांच्या रेणूमध्ये हायड्रॉक्सिल गट असतो. ॲसिटिक ॲनहायड्राइडाच्या योगे त्याचे ॲसिटिलीकरण करतात. वसाम्ला च्या रेणूमध्ये जेथे जेथे हायड्रॉक्सिल गट असतो तेथे तेथे ॲसिटिल गट जोडला जातो. अधिक असलेले ॲसिटिक ॲनहायड्राइड पाण्याने धुवून टाकून ॲसिटिलीकरण केलेली वसा सुकवितात व तिचे वजन करतात. तिच्यापासून ॲसिटिक अम्ल  मिळवितात व नंतर क्षाराच्या साहाय्याने⇨ अनुमापन करतात. ॲसिटिल अंकामुळे वसेतील –OH गटांच्या प्रमाणाची माहिती होते.

(५) अम्लता मूल्य : १ ग्रॅम वसेतील सुट्या वसाम्लांचे उदासीनीकरण करण्यास जितके मिग्रॅ. पोटॅशियम हायड्रॉक्साइड लागते, त्याला त्या वसेचे अम्ल‍ता मूल्य असे म्हणतात.

वसेला येणारा खवटपणा तीमध्ये असणाऱ्या सुट्या वसाम्लांच्या प्रमाणावर अवलंबून असतो. त्या दृष्टीने वसेच्या अम्लता मूल्याची माहिती असणे आवश्यक असते. निसर्गात वसेबरोबर थोड्याफार प्रमाणात सुटी वसाम्लेही असतात. वसांचे विश्वेषण व तपासणी करण्याच्या पद्धती तसेच इतर गुणधर्म यांसंबंधीची अधिक माहिती ‘तेले व वसा’ या नोंदीत दिलेली आहे.

काही वसांचे रासायनिक स्थिरांक 

वसेचे नाव आयेडिन मूल्य साबणीकरण मूल्य राइखर्ट-माइस्ल मूल्य ॲसिटिल अंक अम्लता मूल्य
लार्ड

मानवी वसा

गोमांसातील वसा (टॅलो)

लोणी

ऑलिव्ह तेल

सरकीचे तेल

जवसाचे तेल

एरंडेल तेल

खोबरेल तेल

४७-६६.५

६५-६९

३५-४२

२६-२८

७९-८८

१०३-१११

१७५-२०२

८४

६-१०

१९५-२०३

१९४-१९८

१९६-२००

२१०-२३०

१८५-१९६

१९४-१९६

१८८-१९५

१७५-१८३

२५३-२६२

०.५-०.८

०.२५-०.५५

१७-३५

०.६-१.५

०.९५

०.९५

१.४

६.६-७.५

२.६ सरासरी

२.७-८.६

१.९-८.६

१०-११

२१-२५

४.०

१४६-१५०

२.०

०.५-०.८

०.२५

०.४५-३.५

०.३-१.०

०.६-०.९

१.०-३.५

०.१२-०.८

१.१-१.९

 

फॉस्फोलिपिडे : (फॉस्फोग्लिसराइडे). अनेक भिन्न गुणधर्म असलेले समूह या गटात पडतात. रेणूमध्ये फॉस्फरस असणे हा त्यांच्यातील समान गुणधर्म आहे. कोशिकावरणाच्या संरचनेसाठी फॉस्फोलिपिडांची आवश्यकता असते. निरनिराळ्या कोशिकावरणांत यांचे प्रमाण निरनिराळे असते. निर्जलीकरण केलेल्या मेंदूमध्ये वजनाच्या जवळजवळ ते ३५ % असते, तर अस्थिऊतकात ते फक्त २% च असते.

सर्वांत साधे फॉस्फोलिपिड सूत्र ११ मध्ये दाखविल्याप्रमाणे वसाम्लाची ग्लिसरोफॉस्फेटाशी जोडणी होऊन तयार होते. यातील R1 व R2 या वसाम्लातील हायड्रोकार्बनाच्या शृंखला अनुक्रमे ग्लिसरॉलाच्या पहिल्या व दुसऱ्या कार्बन अणूंशी जोडलेल्या असतात.

         सूत्र ११. सर्वांत साधे फॉस्फोलिपिड 

x या ठिकाणी हायड्रोजन अणू किंवा कोलीन, एथॅनॉल अमाइन, सेरीन, इनॉसिटॉल, ग्लिसरॉल किंवा ग्लिसरॉलचे अनुजात जोडलेले असतात. याव्यतिरिक्त प्लाझ्मालोजिने, ग्लिसरील ईथर फॉस्फेटे या गटात येतात.

लेसिथिने : ही फॉस्फॅटिडिल कोलिने असून ग्लिसरॉल ३- फॉस्फोरील कोलिनाशी दोन वसाम्लांची जुळणी होऊन तयार झालेली असतात. सर्व फॉस्फोलिपिडांत ही जास्त प्रमाणात आढळतात व शरीरात अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात. लेसिथिनाच्या रेणूमध्ये दोन वसाम्‍लांचे एस्टर गट हा अध्रुवीय भाग पाण्यामध्ये अविद्राव्य, तर फॉस्फोरिल कोलिन गटाचा ध्रुवीय भाग पाण्यामध्ये विद्राव्य असतो. लेसिथिनामध्ये ध्रुवीय व अध्रुवीय असे दोन्ही गट असल्यामुळे त्याचे शुद्धीकरण करणे सोपे होते. कोलिनामधील नायट्रोजनामुळे ते तीव्र क्षारकीय असून त्यावर धन विद्युत् भार असतो, तर फॉस्फोरिल अम्लावर ऋण विद्युत् भार असतो. लेसिथीन रेणूवर अशा प्रकारे धन व ऋण हे दोन्हीही भार असतात, त्यामुळे विद्युत् क्षेत्रात लेसिथीन रेणूचे संचरण होत नाही. प्राण्यांच्या ऊतकामधील लेसिथीन रेणूत एस्टर गटाशी निगडित ठराविक प्रकारची वसाम्ले असतात. ग्लिसरॉलामधील पहिल्या कार्बन अणूशी संपृक्त वसाम्ल असते, तर दुसऱ्या कार्बन अणूशी असंपृक्त वसाम्ल असते. लेसिथीनावर फॉस्फोलायपेज-ए या एंझाइमाची विक्रिया केल्यास दुसऱ्या कार्बन अणूपासून असंपृक्त अम्ल  सुटे होते व लायसोलेसिथीन मिळते. हे एंझाइम साप व विंचू यांच्या विषात असते. त्यामुळे रक्तविलयन (रक्तातील तांबड्या कोशिकांचे विघटन होऊन हीमोग्लोबिन मुक्त होणे) होते. इतर प्राण्यांच्या ऊतकामध्ये (आतडे, यकृत इ.) लेसिथिनेज-बी हे एंझाइम असते. त्यायोगे लेसिथिनाचे अपघटन होते.

                              सूत्र १२. लेसिथिनावर फॉस्फोलायपेज-ए या एंझाइमाची विक्रिया

शुद्ध स्वरूपातील लेसिथिने मेणासारखी पांढरी असतात परंतु हवेत व प्रकाशात ठेवली असताना अपघटनामुळे बदामी रंगाची होतात. ॲसिटोनामध्ये ती अविद्राव्य असतात परंतु इतर वसा- विद्रावकांत ती विद्राव्य असतात. ती हवेतील ओलावा खेचून घेतात व पाण्याबरोबर सहज मिसळून चिकट विद्राव तयार होतो. त्यात ॲसिटोन ओतले असताना लेसिथिनाचा साका खाली बसतो. लेसिथिनाचा वितळबिंदू ठराविक नसतो. उष्णता दिली असता लेसिथिनाचे विघटन होते. शुद्ध लेसिथिनामुळे जलीय विद्रावांचा पृष्ठताण कमी होतो. प्रथिने व कार्बोहायड्रेटे यांच्याशी रासायनिक रीत्या संयोगित किंवा अधिशोषित (पृष्ठभागावर धरून ठेवलेली) असलेली लेसिथिने तेले व चरबी यांचे पायसीकरण (दुधासारख्या फेसाळणाऱ्या विद्रावात रूपांतर) करण्यास उपयोगी पडतात.

 

      सूत्र १३. एथॅनॉल अमाइनाचे फॉस्फॅटाइड

केफालिने : लेसिथिनाच्या रेणूमध्ये कोलिनाच्या ऐवजी सूत्र १३ व १४ मध्ये दाखविल्याप्रमाणे एथॅनॉल अमाइन किंवा सेरीन असलेल्या संयुगांना केफालिने अथवा अनुक्रमे एथॅनॉल अमाइनाची फॉस्फॅटाइडे वा सेरिनाची फॉस्फॅटाइडे असे म्हणतात.

        सूत्र १४. सेरिनाचे फॉस्फॅटाइड

लेसिथिनाशी तुलना करता एथॅनॉल अमाइनाची फॉस्फॅटाइडे जास्त अम्लीय असतात, तर कार्‍बॉक्सिल गटामुळे सेरिनाची फॉस्फॅटाइडे त्याहून अधिक अम्लीय असतात. कोशिकांमध्ये मात्र एथॅनॉल अमाइनाच्या फॉस्फॅटाइडांचे किंवा लेसिथिनाच्या मानाने सेरिनाच्या फॉस्फॅटाइडांचे प्रमाण कमी असते.

प्लाझ्मालोजिने : मेंदू व स्नायू यांमधील फॉस्फोलिपिडांपैकी सु.१०%  प्रमाण प्लाझ्मालोजिनांचे असते. निसर्गात आढळणाऱ्या प्लाझ्मालोजिनापासून काही विशिष्ट प्रक्रियांमध्ये आल्डिहाइड सुटे होते. जलीय विच्छेदनाने प्लाझ्मालोजिनापासून दीर्घ शृंखलेचे ॲलिफॅटिक आल्डिहाइड, वसाम्ल, ग्लिसरॉल फॉस्फेट व नायट्रोजनयुक्त क्षारक (एथॅनॉल अमाइन किंवा कोलीन) मिळतात. सूत्र १५ मध्ये दाखविल्याप्रमाणे १ या स्थानी व्हिनिल ईथर (-O.CH=CH.R1)  व २ या स्थानी वसाम्लाचे एस्टर जोडलेले असते. बहुधा ते असंपृक्त वसाम्लद असते. प्लाझ्मालोजिनामधील नायट्रोजन क्षारक (सूत्रातील X या स्थानी असलेल्या) हा बहुतेक वेळा एथॅनॉल अमाइन असतो, तर कधीकधी कोलीनही असतो.

    सूत्र १५. प्लाझ्मालोजिनाची सर्वसाधारण संरचना

अंडी, मेंदूतील ऊतक व गाईच्या रक्तातील तांबड्या कोशिका यांमध्ये प्लाझ्मालोजिनाप्रमाणेच संरचना असलेले दुसरे एक फॉस्फोलिपिड सापडते. त्यामध्ये व्हिनिल ईथराच्या ऐवजी संपृक्त ईथर (–O. CH2 . CH2 . R) असते.

 

  सूत्र १६. डायफॉस्फोइनॉसिटाइड

इनॉसिटॉलाची फॉस्फोलिपिडे : वनस्पती किंवा प्राणी यांमध्ये याचे प्रमाण जास्त नसते. सूत्र १६ मध्ये दाखवल्याप्रमाणे वलयी संरचना असलेले इनॉसिटॉल हे अल्कोहॉल घटक असते. मेंदूमध्ये या संयुगाचे अनेक अनुजात असतात. अधिक ल्किष्ट रचना असलेल्या या फॉस्फोलिपिडात एथॅनॉल अमाइन किंवा टार्टारिक अम्ल व गॅलॅक्टोज ही शर्करा असू शकते.

इतर अल्प फॉस्फोग्लिसराइडे : ग्लिसरॉलाची सर्वच फॉस्फोलिपिडे वरील विवरणामध्ये आली आहेत असे नाही. फॉस्फॅटिडिक अम्ले, फॉस्फॅटिडिल ग्लिसरॉल, बायफॉस्फॅटिडिक अम्ल व डायफॉस्फॅटिडिल ग्लिसरॉल किंवा कार्डिओलिपिन यांसारखी काही फॉस्फोग्लिसराइडे कोशिकांमध्ये अतिशय कमी म्हणजे २ किंवा ३ % पेक्षा कमी आढळतात. बऱ्याच वेळा ती ऊतकात लवणरूपात असतात.

फॉस्फॅटिडिक अम्ले म्हणजे ग्लिसरॉल फॉस्फेट रेणू असून त्यांत दोन वसाम्लांचे रेणू असतात. फॉस्फोग्लिसराइडे व उदासीन लिपिडे यांच्या संश्लेषणात्मक विक्रियामालांमध्ये ही अम्ले  महत्त्वाचे कार्य करतात. फॉस्फॅटिडिक अम्ले सस्तन प्राण्यांत अल्प प्रमाणात आढळतात पण वनस्पतींत (उदा., कोबी) ती विपुल प्रमाणात असतात हृदयाच्या स्नायूमधील कार्डिओलिपिन किंवा डायफॉस्फॅटिडिल ग्लिसरॉल यामध्ये बहुधा असंपृक्त वसाम्ले असतात. अनेक ठिकाणी आढळणारे फॉस्फॅटिडिल ग्लिसरॉल हे फॉस्फॅटिडिक अम्लाच्या संश्लेषणात व विघटनामध्ये भाग घेत असावे.

स्फिंगोलिपिडे : हा जटिल लिपिडांचा गट असून त्यात ग्लि‍सरॉलाऐवजी स्फिंगोसीन किंवा त्याच्याशी निकटवर्ती असलेले फायटोस्फिंगोसीन हे संयुग असते.

                        सूत्र १७. स्फिंगोसीन

प्राण्यांच्या स्फिंगोलिपिडांत स्फिंगोसीन असते, तर वनस्पतींच्या स्फिंगोलिपिडात फायटोस्फिंगोसीन असते. प्राण्यांतील स्फिंगोलिपिडे मेंदूत, परिसरीय तंत्रिकांत (मज्जातंतूत) व तंत्रिका तंतूंच्या मायेलीन आवरणात उच्च प्रमाणात असतात. यकृत, मूत्रपिंड, रक्तद्रव इ. अनेक इतर ऊतकांतील त्यांचे प्रमाण कमी असते.

                      सूत्र १८. फायटोस्फिंगोसीन

स्फिंगोमायेलिने : ही प्राण्यांत सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारी स्फिंगोलिपिडे आहेत. सूत्र १९ मध्ये R ही वसाम्ल एस्टर गटाची हायड्रोकार्बंन शृंखला आहे. जलीय विच्छेदनाने स्फिंगोमायेलिनांपासून

                                    सूत्र १९. एक स्फिंगोमायेलीन

 

असंपृक्त नायट्रोजनयुक्त अल्कोहॉल, स्फिंगोसीन, फॉस्फेट, वसाम्ल व बहुधा कोलीन किंवा काही वेळा एथॅनॉल अमाइन मिळतात. स्फिंगोमायेलिने मेंदू व तंत्रिका ऊतके यांत मोठ्या प्रमाणात, तर इतर ऊतकांत व रक्तात कमी प्रमाणात आढळतात. ए.नीमान व एल्. पिक या जर्मन वैद्यांच्या नावांनी ओळखण्यात येणाऱ्या  लिपिड चयापचयासंबधीच्या नीमान-पिक रोगात मेंदू, यकृत व प्लीहा (पानथरी) यांत मोठ्या प्रमाणावर स्फिंगोमायेलिने साठतात मात्र इतर फॉस्फोलिपिडांचे प्रमाण नेहमीप्रमाणेच असते [→ चयापचय].

फायटोग्लायकोलिपिडे : मका, सोयाबीन, जवस, भुईमूग, गहु, सरकी इत्यादींमध्ये एक अत्यंत जटिल फॉस्फोस्फिंगोसाइडांचा गट असतो. हे पदार्थ फायटोस्फिंगोसिनाचे अनुजात असून त्यांच्या संरचनेत कार्बोहायड्रेट गटही असतात म्हणून ही फॉस्फोलिपिडे तशीच ग्लायकोलिपिडेही असतात. त्यांना फायटोग्लायकोलिपिडे म्हणतात.

फॉस्फरसविरहित संयुक्त लिपिडे : ग्लायकोलिपिडे किंवा सेरिब्रोसाइडे किंवा ग्लायकोस्फिंगोसाइडे : या गटातील लिपिडांत फॉस्फोरिल कोलिनाऐवजी शर्करा असते. ही लिपिडे मेंदूपासून मिळविण्यात आली आणि त्यांचे जलीय विच्छेदन केल्यावर स्फिंगोसीन, वसाम्ल व शर्करा गॅलॅक्टोज मिळतात, असे दिसून आले. यांची संरचना सूत्र २० मध्ये दर्शविल्याप्रमाणे असते. मेंदूत व तंत्रिका तंतूमध्ये

              सूत्र २०. ग्लायकोस्फिंगोसाइड किंवा सेरिब्रोसाइड

निरनिराळ्या सेरिब्रोसाइडे असतात. त्यांमध्ये असलेल्या वसाम्ला नुसार त्यांचे वर्गीकरण करता येते. उदा., फ्रेनोसीन किंवा सेरिब्रॉन (सेरिब्रोनिक अम्ल), केरासीन(लिग्नोसेरिक अम्ल ), नर्व्हॉन (नर्व्हॉनिक अम्ल) आणि ऑक्सिनर्व्हॉन (ऑक्सिनर्व्हॉनिक अम्ल) मेंदूतील पांढऱ्या द्रव्यात व तंत्रिका तंतूच्या मायेलीन आवरणात सेरिब्रोसाइडे विपुल प्रमाणात आढळतात. प्राण्यांच्या निरनिराळ्या ऊतकांत थोड्या प्रमाणात पण फार विस्तृत वितरण झालेल्या रूपात ती सापडतात. पी. सी. ई. गौचर या फ्रेंच वैद्याच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या चयापचयासंबंधीच्या गौचर रोगात        यकृत व प्लीहा यांतील सेरिब्रोसाइडांचे प्रमाण वाढते.

गाँग्लिओसाइडे : ही दुसऱ्या प्रकारची ग्लायकोस्फिंगोलिपिडे आहेत. यांमध्ये स्फिंगोसीन रेणूवर अधिक जटिल प्रकारची शर्करा असते. रेणूमध्ये असलेल्या शर्करेच्या रेणूंच्या संख्येनुसार निरनिराळ्या गॅँग्लि‍ओसाइडांमध्ये फरक असतो. तंत्रिका ऊतकातील गुच्छिका कोशिका, प्लीहा व रक्तातील तांबड्या कोशिका यांमध्ये गॅंग्लि‍ओसाइडे मिळाली आहेत. नीमान-पीक रोगात आणि ब्रिटिश वैद्य वॉरन टे व अमेरिकन तंत्रिका-तंत्रविज्ञ बर्नार्ड सॅक्स यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या लिपिड चयापचयासंबंधीच्या टे-सॅक्स रोगात गॅंग्लिओसाइडांचे मेंदूमधील प्रमाण वाढते.

सल्फोलिपिडे : यांच्या  संरचनेत गंधकाचा अणू असतो. विशेषतः मेंदूच्या पांढऱ्या द्रव्यात विपुल प्रमाणात, तसेच यकृत, मूत्रपिंड,लाला ग्रंथी, वृषण (पुं-जनन ग्रंथी) व अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठी) यांमध्ये ही लिपिडे सापडतात. स्फिंगोसीन, सेरिब्रोनिक अम्ल व गॅलॅक्टोज मिळून तयार झालेले सेरिब्रोसाइड सल्फ्यूरिक अम्ल एस्टर गाईच्या मेंदूत आढळलेआहे.

सिॲलिक अम्ले : एन-ॲसिटिल-ओ एन-डाय-ॲरसिटिल-किंवा एन-ग्लायकोलिलन्यूरामिनिक अम्ल  या न्यूरामिनिक अम्लाच्या घटकांना सिॲ‍लिक अम्ल म्हणातात. गँग्लिओसाइडे व इतर जटिल रेणू यांचे घटक असलेल्या नैसर्गिक रीत्या आढळणाऱ्या  सिॲलिक अम्लांचे प्राण्यांच्या ऊतकांत व सूक्ष्मजंतूत विस्तृत प्रमाणात वितरण झालेले दिसून येते.

संबंधित संयुगे : स्टेरॉले व कॅरोटिनॉइड : निसर्गात विस्तृत प्रमाणात वितरित असलेली स्टेरॉले व कॅरोटिनॉइडे ही सर्वसाधारणपणे कोशिकांतील वसाम्लयुक्त लिपिडांशी संबंधित असतात. यांतील पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत सर्वसामान्यतः आढळणारे नैसर्गिक स्टेरॉल म्हणजे ⇨कोलेस्टेरॉल होय. महत्त्वाची हॉर्मोने, ड जीवनसत्त्व, पित्त लवणे इ.जैव दृष्ट्या महत्त्वाच्या इतर स्टेरॉलांचे कोलेस्टेरॉल हे पूर्वगामी आहे. [→ स्टेरॉले व स्टेरॉइडे] कॅरोटिनॉइडे (किंवा टेट्राटर्पिने) ही वनस्पती व सूक्ष्मजीव यांमध्ये विस्तृत प्रमाणात पसरलेली आहेत. त्यामानाने प्राण्यांमध्ये ती कमी असतात. बहुधा अन्नातूनच ती शरीरात घेतली जातात. कॅरोटिनॉइडांमध्ये बीटा कॅरोटिन हे अ जीवनसत्त्वाचे पूर्वगामी म्हणून  महत्त्वाचे आहे. इतर कॅरोटिनॉइडे वनस्पतींच्या ⇨प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये कार्य करतात. [→ कॅरोटिनॉइडे].

लिपोप्रथिने : सजीव कोशिकांमधील लिपिडे ही सामान्यतः प्रथिनांशी जोडलेली असतात. लिपिड-प्रथिनांची जटिल संयुगे म्हणजेच लिपोप्रथिने हे विद्राव्य घटक असतात. (उदा.,सस्तन प्राण्यांच्या रक्तातील वा अंडपीतकातील म्हणजे अंड्याच्या पिवळ्या बलकातील लिपोप्रथिने) किंवा अधिक अविद्राव्य प्रकारचे असतात (उदा., कोशिका पटलातील लिपोप्रथिने). शरीरक्रियात्मक प्रक्रियांमध्ये तसेच निरनिराळ्या रोगांशी संबंध असल्यामुळे रक्तद्रवातील विद्राव्य लिपोप्रथिनांचा अभ्यास जास्त विस्ताराने झाला आहे. इतर लिपोप्रथिनांच्या मानाने ही लिपोप्रथिने वेगळी करणे व शुद्ध स्वरूपात मिळविणे अधिक सुलभ आहे. खाली दिलेले वर्णन विशेषत्वाने या लिपोप्रथिनांसंबंधीचे आहे.


लिपोप्रथिनांत लिपिडे व प्रथिने यांची जोडणी विशेष रासायनिक बंधांनी होते असे नाही. त्यांना एकमेकांपासून सहजी सुटे करता येते. यावरून ती एकमेकांना दुर्बल भौतिकीय प्रेरणांमुळे धरून ठेवतात, असे मानले जाते.

निरनिराळ्या उद्‌गमांपासून अलग केलेल्या लिपोप्रथिनांचे ढोबळ-मानाने दोन गट पाडता येतील. सुसंघटित लिपोप्रथिनांचा एक गट असतो. यामध्ये प्रथिने जास्त, तर लिपिडे कमी असतात. दुसरा गट असंघटित लिपोप्रथिनांचा असतो. यामध्ये लिपिडे जास्त, तर प्रथिने कमी असतात. आतापर्यंत अनेक निरनिराळी लिपोप्रथिने अलग करण्यात आलेली आहेत. त्यांच्यातील प्रथिने व लिपिडे यांचे प्रमाण तसेच त्यांचे रेणुमार यांच्यातील फरकांची कक्षा पुष्कळच विस्तृत असल्याचे आढळते.

भौतिक वैशिष्ट्यांच्या बाबतीत लिपोप्रोथिने बहुतांशी प्रथिनांसमानच असतात. निरनिराळ्या लिपोप्रथिनांच्या विद्राव्यता, विद्युत् संचारण वर्तन (विद्युत् क्षेत्रात विद्युत् भारित कणांचे होणारे स्थलांतर) व केंद्रोंत्सारी वर्तन (फिरत्या पात्रात अक्षापासून दूर जाण्याची गती) या गुणधर्मांतील फरकांमुळे ती अलग करता येतात. प्रथिने अलग कण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या( लवण विभाजन या प्रस्थापित पद्धतीचा लिपोप्रथिनेही अलग करण्यासाठी उपयोग करता येतो परंतु आता या पद्धतीची जागा⇨ केंद्रोत्सारण या अधिक परिणामकारक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर घेतलेली आहे.

मानवी रक्तद्रवातील लिपोप्रथिनांमधील प्रथिनांवर विद्युत् भार असल्यामूळे⇨ विद्युत् संचारण तंत्राने ती बीटा लिपोप्रथिने (बीटा ग्लोब्युलिनाशी जोडलेली लिपिडे), बीटापूर्व लिपोप्रथिने (बीटा व आल्फा-२-ग्लोब्युलिनाबरोबर जोडलेली लिपिडे) व अल्फा लिपोप्रथिने (आल्फा ग्लोब्युलिनाबरोबर जोडलेली लिपिडे) अशी सुटी होतात. अतिकेंद्रोत्सारक यंत्रामध्ये [→ केंद्रोत्सारण] लिपिडांच्या वेगवेगळ्या घननांमुळे निरनिराळी लिपोप्रथिने सुटी होतात. ती निम्न घनता लिपोप्रथिने, अतिनिम्न घनता लिपोप्रथिने व उच्च घनता लिपोप्रथिने अशी ओळखली जातात. अधिक संशोधनानंतर आता बीटा लिपोप्रथिने म्हणजेच निम्न घनता लिपोप्रथिने, बीटापूर्व लिपोप्रथिने म्हणजे अचिनिम्न धनता लिपोप्रथिने, तर आल्फा लिपोप्रथिने, म्हणजे उच्च घनता लिपोप्रथिने असतात, असे माहीत झाले आहे. शरीरातील (रक्तातील) वसा वाहून नेण्यासाठी या लिपोप्रथिनांचा उपयोग होतो. वयोमानाप्रमाणे रक्तातील लिपोप्रथिनांचे प्रमाण बदलत असते. हृद्रोग व तत्सम रोगांमध्ये रक्तातील कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसराइडाच्या प्रमाणाबरोबरच ही लिपोप्रथिने व त्यांमध्ये असलेली निरनिराळी लिपिडे यांचेही प्रमाण हल्ली तपासतात. रक्तामध्ये निम्न घनता लिपोप्रथिने व अतिनिम्न घनता लिपोप्रथिने यांचे प्रमाण वाढलेले असेल तसेच उच्च घनता लिपोप्रथिनांचे प्रमाण कमी असेल, तर ते धोक्याचे मानले जाते.

लिपिडांची प्राप्ती व विश्लेषण : लिपिडे अलग करणे व त्यांची रासायनिक माहिती मिळविणे हे अतिशय क्लिष्ट काम असते. क्लोरोफॉर्म किंवा मेथॅनॉलच्या विद्रावकांचा वापर करून लिपिडे प्रथम कोशिकांपासून अलग करतात. मेथॅनॉल लिपोप्रथिनांचे लिपिडे व प्रथिन या घटकांत रूपांतर करते, तर क्लोरोफॉर्ममध्ये लिपिडे विद्रावात जातात. या मिश्रणापासून निम्न रेणवीय भाराची अकार्बनी लवणे, ॲमिनो अम्लें व शर्करा वेगळ्या काढल्या जातात. स्तंभ वर्णलेखनाने [→ वर्णलेखन] लिपिडांचे निरनिराळे घटक सुटे करतात. मात्र एकाच वर्णलेखनाने सर्व लिपिडे शुद्ध घटकांमध्ये सुटी होतात असे नाही. तनुस्तर वर्णलेखन, द्रव्यमान वर्णपटमापक तंत्र[→ द्रव्यमान वर्णपटविज्ञान], अवरक्त वर्णपटमापक तंत्र [→ वर्णपटविज्ञान], प्रकाशीय सक्रियता किंवा वलनक्षमता [→ ध्रुवणमिति] वगैरे तंत्रांचा उपयोग करून लिपिडांचे विश्लेषण करतात.

पहा : चयापचय तेले व वसा वसाम्ले.ट

संदर्भ : 1. Chapman, D. Introduction to Lipids, New York, 1969.

2. Fruton, J. S.  Simmonds, S. General Biochemistry, New York 1965.

3. King, H.  K. Chemistry of Lipids in Health and Disease, Springfield, 1960.

4. West, E. S. and others, Textbook of Biochemistry, New York, 1966.

5. White, A. and other, Principles of Biochemistry, New York, 1973.

मगर, न. गं.; हेगिष्टे, म. द.