इनॉसिटॉले : ही हेक्झा-हायड्रॉक्सीसायक्लोहेक्झेने (सहा OH गट असलेली व वलयासारखी बंदिस्त संरचना असलेली कार्बनी संयुगे) होत.सूत्र C6H12O6. ह्यांचे नऊ त्रिमितीय समघटक (ज्यांच्यातील रेणूंची संरचना अगदी एकसारखी असते, पण त्यांच्यातील अणूंची अवकाशातील मांडणी मात्र वेगवेगळ्या प्रकारांची असते असे पदार्थ) संभवनीय आहेत परंतु आतापर्यंत फक्त पुढील चारच अलग करण्यात आले आहेत : डी. आणि एल-इनॉसिटॉल, मेसो-वा आय-इनॉसिटॉल आणि स्किलिटॉल ही सर्व निसर्गात मुक्त किंवा संयोगित (जोड स्वरूपात) सापडतात. ती पांढरे स्फटिकी घन पदार्थ असून पाण्यात सहज विरघळतात. मात्र अल्कोहॉलामध्ये फारच कमी प्रमाणात विरघळतात. त्यांची चव साखरेप्रमाणे गोड आहे. ही हेक्झोजाशी समघटक (अणू व रेणू यांची संख्या व प्रकार सारखे असलेली पण संरचना भिन्न असलेली संयुगे) आहेत.

आय-इनॉसिटॉल

आय-इनॉसिटॉल : हाच समघटक निसर्गात सामान्यतः सापडतो. यास मायो-, मेसो- किंवा आय-इनॉसिटॉल म्हणतात. सामान्यतः इनॉसिटॉल म्हणून उल्लेख ह्याच समघटकाला उद्देशून असतो. त्याचा विन्यास (संरचना) शेजारी दिला आहे. त्याचा वितळबिंदू २२५° से. असून ते पाण्यात विरघळते. ते प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजंतू यांत सापडते. ब गटातील जीवनसत्त्वांपैकी ते एक आहे. प्राण्यांच्या ऊतकांतही (समान रचना व कार्य असणार्‍या शरीरातील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांतही) ते सापडते. ऊतकांमध्ये आढळणाऱ्या इनॉसिटॉलामध्ये, आहारातील पदार्थांद्वारे व जैव संश्लेषित म्हणजे सजीवांमध्ये तयार झालेल्या पदार्थाद्वारे निर्माण झालेल्या इनॉसिटॉलाचे प्रमाण अधिक असते. आतड्यातील सूक्ष्मजंतू त्याचे संश्लेषण करतात. तृणध्यान्यांमध्ये ते सर्वांत जास्त असते व आय-इनॉसिटॉलचे हेक्झाफॉस्फेट (फायटिक अम्‍ल) हे तृणधान्यांच्या बियांत सामान्यतः कॅल्शियम-मॅग्‍नेशियम लवणाच्या (फायटिनाच्या) स्वरूपात आढळते. पचनमार्गात स्रवणाऱ्या फायटेज या एंझाइमामुळे (शरीरातील रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या संयुगामुळे) फायटिनापासून इनॉसिटॉल मुक्त होते. माणसाच्या ह्रदय, मेंदू, उदर, मूत्रपिंड, प्लीहा व यकृत या इंद्रियांच्या ऊतकांमध्ये इनॉसिटॉलाचे प्रमाण उतरत्या क्रमाने आढळते.

मका भिजविलेल्या पाण्यात इनॉसिटॉल हे फायटिनाच्या रूपात असते. विरलेल्या चुन्याच्या निवळीचा गारा या पाण्यात, त्याचे ५ ते ७ pH [→ पीएच मूल्य ]येईपर्यंत टाकल्यावर, फायटिनाचा अवक्षेप (साका) मिळतो. तो गाळून व धुवून झाल्यावर त्याचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या साहाय्याने घटक सुटे करणे) १००° ते २००° सें. तापमान, दाब व २५% कॅल्शियम हायड्रॉक्साइड अथवा ६०% सल्फ्यूरिक अम्‍ल वापरून करतात. या विक्रियेत जी अकार्बनी फॉस्फेट तयार होतात, त्यांचा अवक्षेप करून ती निराळी केल्यावर आय-इनॉसिटॉलाचा जलीय विद्राव उरतो. सक्रियित (अधिक क्रियाशील बनविलेल्या) कार्बनाने रंग घालवून निर्वात पात्रात त्याचे प्रमाण वाढवितात. तापमान सावकाश कमी केले म्हणजे इनॉसिटॉलाचे स्फटिक मिळतात. ते केंद्रोत्सारणाने (केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या प्रेरणेने) निराळे करतात.

      डी-इनॉसिटॉल               एल-इनॉसिटॉल

सस्तन प्राण्यांच्या कोशिकांत इनॉसिटॉल फॉस्फोटाइडांचे जैव संश्लेषण होते. इनॉसिटॉल फॉस्फोटाइडे कोशिकांतील पार्यतेचे (कोशिका भित्तीतून पदार्थ आत वा बाहेर जाण्याच्या क्रियेचे) नियंत्रण करतात. कोशिकांच्या सजीवतेकरिता इनॉसिटॉलची आवश्यकता आहे. इनॉसिटॉल दिल्याने काही विशिष्ट सस्तन प्राण्यांची चांगली वाढ झाली व केस गळणे कमी झाले असे आढळून आले. इनॉसिटॉलामुळे यकृतात वसा आणि ⇨ कोलेस्टेरॉल  यांच्या संचयाला प्रतिबंध होतो असे दिसून आले आहे. ब गटातील जीवनसत्त्वांपैकी ते एक असल्यामुळे त्याचा इतर ब जीवनसत्त्वांच्या बरोबर तसेच अनेक जीवनसत्त्वे मिळून एकत्रित स्वरूपात तयार करण्यात येणाऱ्या औषधांत समावेश करण्यात येतो.

डीइनॉसिटॉल : वितळबिंदू २४७२४८° से. पायनस लॅबेर्टिआना  नावाच्या वनस्पतीत मोनोमिथिल ईथराच्या स्वरूपात आढळते. हायड्रीयोडिक अम्‍लाने मिथिलनिरास केल्यावर (मिथिल गट वेगळा करून) डी-इनॉसिटॉल मिळते.

एल-इनॉसिटॉल : वितळबिंदू २४७° से. केब्रॅचो या वनस्पतीच्या सालीत आणि रबराच्या चिकात केब्राकिटॉल ह्या मोनोमिथिल ईथराच्या स्वरूपात सापडते. मिथिलनिरास केल्याने एल-इनॉसिटॉल मिळते. केब्राकिटॉल हे पांढरे स्फटिकी घन असून त्याचा वितळबिंदू १९०° से. आहे. एल-इनॉसिटॉलाचे आरशातील प्रतिबिंब डी-इनॉसिटॉल होय.

रॅसेमिक डी-एल इनॉसिटॉल : वितळबिंदू २५३° से. डी- आणि एल-इनॉसिटॉल यांच्या सममिश्रणामुळे हा समघटक तयार होतो. ते ⇨हाडमोडीच्या मृदुफळात व ब्‍लॅकबेरीमध्ये आढळते.

स्किलिटॉल : वितळबिंदू ३४९° से. हा चवथा समघटक होय. ते मुशी (डॉग फिश) नावाच्या माशाच्या अवयवांत व नारळाच्या झाडात तसेच इतरही काही वनस्पतींत सापडते.

संदर्भ : West, E. S.; Todd, W. R. Textbook of Biochemistry, New York, 1961.

जमदाडे, ज. वि.