लिंग्वाट्युलिडा : (पेंटास्टोमिडा, टंग वर्म्स). रक्तशोषक संधिपाद (सांधेयुक्त पाय असणाऱ्या) प्राण्यांचा एक वर्ग. ते पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या श्वसनेंद्रियांत परजीवी म्हणून असतात. प्रौढ प्राणी कृमिरूप असतात. त्यांचे शिरोवक्ष (डोके व छाती यांच्या एकीकरणाने बनलेला भाग) आखूड असते व उदर (पोट) लांबट, वलयांकित असून ते दंडगोलाकृती किंवा चपटे असते. शिरोवक्षाच्या खालच्या बाजूवर आकड्यांसारख्या प्रतिकर्षी (आत ओढून घेता येणाऱ्या) नख्यांच्या दोन जोड्या असतात. श्वसन, रक्ताभिसरण व उत्सर्जन यांची इंद्रिये नसतात. पचन मार्ग ही एक सरळ नलिका असून तिच्या पुढच्या व मागच्या टोकांवर उपत्वचेचे अस्तर असते. तंत्रिका तंत्रात (मज्जासंस्थेत) एक अधोग्रसिका गुच्छिका (ज्यांच्यापासून तंत्रिका तंतू (मज्जातंतू) निघतात असा अन्ननलिकेच्या खालच्या बाजूवर असलेला तंत्रिकाकोशिकांचा (मज्जापेशींचा) समूह व परिग्रसिकीय वलय (अन्ननलिकेच्या सुरूवातीच्या भागाभोवतीचे कडे) यांचा समावेश होतो. लिंगे भिन्न असतात. मादी नरापेक्षा दोन ते पाचपट मोठी असते.
या वर्गाचे दोन गण करतात. पहिला सेफॅलोबीनिडा हा अधिक आद्य (आदिम) आहे व दुसरा पोरोसेफॅलिडा हा अधिक विशेषीकृत आहे. पहिल्या गणातील डिंभाला (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या क्रियाशिल पूर्व अवस्थेला) सहा पाय असतात, तर दुसऱ्या गणातील डिंभाला चार पाय असतात. आखूड खुंटासारखे पाय असलेल व माइटसारखे रूप असलेले डिंभ यांवरून त्यांचे संधिपाद संघाशी नाते असावे असे दिसते. डिंभाचे सांधेयुक्त पाय, देहभित्त्तीतील श्वसन रंध्र, विशेषित प्रजोत्पादन इंद्रिये (खास करून नरातील) आणि डिंभ व अर्भकांचे कात टाकणे ही त्यांच्या ठिकाणी आढळणारी संधिपाद प्राण्यांची विशेष लक्षणे होत. त्यांच्या पन्नासाहून अधिक जातींचे वर्णन केलेले आढळते.
उष्ण कटिबंधीय प्रदेशात या प्राण्यांच्या प्रौढ व डिंभ या दोन्हीही अवस्था मुख्यत्वे विविध प्रकारांच्या पृष्ठवंशी प्राण्यांत परजीवी म्हणून आढळतात. रिघार्डिया या प्रजातीतील फक्त एकच जाती पक्ष्यांमध्ये आढळते आणि लिंग्वाट्युला प्रजातीतील एकच जाती सस्तन प्राण्यात आढळते. हे दोन अपवाद सोडल्यास बाकीच्या जाती सरीसृपांत (सरपटणाऱ्या प्राण्यांत) आढळतात. उदा., साप, सरडे, कासवे व मगरी यांमध्ये यांची प्रौढावस्था आढळते. मासे, उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे प्राणी), सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी यांमध्ये डिंभावस्थेचे पुटीभवन (सभोवती निर्जीव कलेचे आवरण तयार होण्याची क्रिया) होते.
आफ्रिका व पौर्वात्य देशांत मानवामध्ये यांचा बऱ्याचदा संसर्ग होतो. त्यामध्ये अपघाताने मानव हा अर्भकावस्थेचा मध्यस्थ आश्रय झालेला असतो. सामान्यतः यांचा माणसाच्या यकृतात संसर्ग होतो व असंख्य डिंभामुळे गंभीर अवस्था निर्माण होते आणि मृत्यूही ओढवण्याचा संभव असतो.
कुलकर्णी, र. ग. जमदाडे, ज. वि.
“