लाइनबेटे : (विषुववृत्तीय बेटे). पॅसिफिक महासागराच्या पश्चिम-मध्य व नैर्ऋत्य भागातील प्रवाळ द्वीपमालिका. ६° २४’ उ. ते ११° २६’ द. अक्षांश व १५१° ४८’ प. ते १६२° २२’ प. रेखांश यांदरम्यान फ्रेंच पॉलिनीशियापासून वायव्येस सु. २, ६०० किमी. पर्यत ही बेटे पसरलेली आहेत.त्यांच्या भूभागाचे क्षेत्रफळ ६७९ चौ. किमी. असून बेटांची लोकसंख्या २,५९८ होती (१९८५). विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंस पसरलेल्या या द्वीपसमूहात प्रमुख ११ बेटे आहेत. त्यांपैकी जार्व्हस, किंगमन रीफ व पॅल्मायरा ही तीन बेटे अ. सं. सं. च्या व कॅरोलाइन, ख्रिसमस, फॅनिंग (ताबूएरन), फ्लिंट, मॉल्डन, स्टारबक, व्हॉस्टॉक, वॉशिंग्टन (तराइन) ही आठ बेटे १९८९ साली स्वतंत्र झलेल्या किरिबाती या देशाच्या आधिपत्याखाली आहेत. ख्रिसमस, किंगमन रीफ, पॅल्मायरा, फॅनिंग व कॅरोलाइन ही वैशिष्ट्यपूर्ण कंकणद्वीपे असून ख्रिसमस हे जगातील एक मोठे कंकणद्वीप मानले जाते.
किंगमन रीफ, पॅल्मायरा, कॅलेलाइन ही बेटे वगळता इतर बेटे समुद्रसपाटीपासून थोडी उंचावलेली असल्याने त्या बेटांवरील खारकच्छे कोरडी आहेत. इतर बेटांच्या मानने उत्तरेकडील पॅल्मायरा, वशिंग्टन, फॅनिंग बेटांवर पावसाचे प्रमाण जास्त असून ती जंगलव्याप्त आहेत. तर अन्य बेटांवर खुरट्या वनस्पती व गवत उगवते. १७७७ ते १८२५ या काळात ब्रिटिश व अमेरिकन खलाशांनी या बेटांचा शोध लावला. त्याकाळी ही सर्व बेटे निर्मनुष्य होती परंतु मॉल्डन, फॅनिंग व ख्रिसमस या बेटांवर पॉलिनीशियन संसकृतीचे काही अवशेष सापडले आहेत. मॉल्डन, व्हॉस्टॉक, फ्लिंट, स्टारबक व कॅरोलाइन या बेटांचा १८९३ पासून पश्चिम पॅसिफिकमधील ब्रिटिश कॉलनीत समावेश करण्यात आला व त्यांचा प्रशासकीय कारभार कॉलनीसाठी नेमलेल्या ब्रिटिश उच्चायुक्तामार्फत चालत असे. परंतु याच बेटांवर अ. सं. सं. नीही हक्क दाखविलेला आहे. दुसऱ्या महायुद्धकाळात बहुतेक बेटांवर अमेरिकन सैन्य होते.पूर्वी ही बेटे ग्वानो खतासाठी प्रसिद्ध होती. अलीकडच्या काळात या बेटांवर नारळाच्या बागा, विमानतळ, हवामानशास्त्रविषयक संशोधन केंद्रे यांचा विकास करण्यात आला आहे. मॉल्डन हे बेट ग्रेट ब्रिटनचे हायड्रोजन बाँब चाचणी केंद्र होते. या बेटांचे नॉर्दर्न, सेंट्रल व सदर्न असे तीन भाग पाडण्यात आलेले असून ख्रिसमस, फॅनिंग व वॉशिंग्टन ही बेटे वगळता अन्य बेटांवर अद्याप कायम मनुष्यवस्ती नाही.
चौधरी, वसंत