लवंग : ( हि. लौंग सं. लवंग, देवकुसुम इं. क्कोव्ह लॅ. सायझिजियम ॲरोमॅटिकम, यूजेनिया कॅरिओफायलाटा कुल-मिर्टेसी). हे नाव लवंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वस्तूस (सुक्या देठासह पुप्पकळीला) व तिची निर्मिती करणाऱ्या वृक्षालाही लावतात. ह्या सु. ९-१२ मी. क्वचित अधिक, उंच व सदापर्णी वृक्षाचे मूलस्थान इंडोनेशियातील मोलकाझ (मोलूकू) बेटे हे असून मलेशियातील काही बेटांवरही तो आढळतो. त्याची लागवड श्रीलंका, इंडोनेशिया, मॅलॅगॅसी, झांझिबार, पेंबा (टांझनिया), सेशेल्झ बेटे, पिनँग, रेयूर्न्यो बेट, मॉरिशस व वेस्ट इंडीज येथे केलेली आहे. भारतात तमिळनाडूत (निलगिरी, तिरूनेलवेली व कन्याकुमारी जिल्ह्यात) आणि केरळमध्ये (कोट्ट्यम्, एर्नाकुलम, व त्रिवेंद्रम जिल्ह्यात) लवंग वृक्ष लागवडीत आहेत. लवंगेचा अंतर्भाव पूर्वी यूजेनिया प्रजातीत करण्यात येत असे परंतु आता तसा करीत नाहीत तथापि आद्याप यूजेनिया कॅरिओफायलाटा, कॅरिओफायलस ॲरोमॅटिक्स, मिर्टस कॅरिओफायलस इ. नावे पाठ्यपुस्तकात लवंगेकरिता वापरलेली आढळतात. रामायण, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता व महाकवी कालिदासाच्या संस्कृत काव्यात व नाटकात लवंगेचा उल्लेख आढळतो. चीनमध्ये इ. स. पू. तिसऱ्या शतकात ती उपयोगात होती. जावातून चीनच्या हान दरबारात लवंग आणली गेली बादशाहाशी बोलताना आपला श्वास (मुख) सुगंधित करण्यासाठी लवंग तोंडात ठेवण्याची चिनी लोकांची रीत असे.रोमन लोकांना तिची माहिती होती. प्राचीन काळी चिनी लोकांचा भारत व अँवोइना येथे लवंगांचा व्यापार होता.

इतिहास : दक्षिण अरबी लोक फार पूर्वी भारतीय समुद्रकिनाऱ्या वर शोध घेऊन ईस्ट इंडीजमधून मसाल्याचे पदार्थ प्रथम इराणच्या आखातात व तेथून काफल्यांकरवी ॲलेक्झांड्रिया किंवा इतर पूर्व भूमध्य सामुद्रिक बंदरांत आणीत या व्यापारामुळे त्यांच्या राज्यांची समृद्धी वाढली. भूमध्य सामुद्रिक व्हेनिसच्या वर्चस्वामुळे यूरोपशी असलेल्या या अरबी व्यापारावर नियंत्रण व कर बसले. पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात मोलकाझ बेटे शोधली व लवंगांच्या मूलस्थानाचा पत्ता लागला. पुढे पोर्तुगीजांच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून जाणाऱ्या मार्गाच्या शोधामुळे त्यांनी अतिपूर्वेस राज्यस्थापना केली परंतु पुढे एका शतकानंतर डचांनी त्याना तेथून हाकून दिले. मध्ययुगाच्या मध्यानंतर मसाल्याच्या पदार्थांकरिता सर्व यूरोप पौर्वात्य देशांतून होणाऱ्या आयातीवर अवलंबून होता त्यांपैकी लवंगेचा वापर अन्नसंबंधात होत असे. सतराव्या शतकाच्या आरंभी डचांनी अँबोइना व तेर्नाते यांखेरीज इतर सर्व बेटांवरच्या लवंगांच्या लागवडीवर बंदी घालून कृत्रिम टंचाई निर्माण केली व वाढीव किंमती स्थिर ठेवण्याचे प्रयत्न केले परंतु पुढे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंचांनी ईस्ट इंडीजमधून हिंदी महासागरी बेटांवर व अमेरिकेत चोरट्या मार्गाने लवंगेची आयात केली. यामुळे डचांची मक्तेदारी संपली. १७६८ मध्ये त्यांनी लवंगांच्या लागवडीवर बंदी घातली, त्या वेळी बटेव्हिया व हॉलंड येथे भरपूर लवंग शिल्लक होती. १७७० च्या सुमारास फ्रेंचांनी मॉरिशसमध्ये यशस्वी रीत्या लवंगाची लागवड केली व पुढे उष्ण देशांत ती वाढत गेली. फ्रेंच शब्द ‘क्‍लू’ (clou = खिळा ) वरून इंग्रजी ‘क्कोव्ह’ ही संज्ञा आली.

 

लवंग : (१)पाने,कळ्या व फुले यांसह फांदी, (२) लवंगा.वनस्पती वर्णन : झांझिबार व पेंबा येथे लवंगेचा वृक्ष २४ मी. पर्यंत उंच जातो व त्याचा आकार स्तूपासारखा त्रिकोणी असतो तो आकाराने ⇨लॉरेलसारखा दिसतो. त्याचे प्रमुख खोड सरळ उंच जाते व त्याचा घेर सु. १०० सेंमी. असतो. सुमारे २ मी. उंचीनंतर ते विभागून वाढते. साल करडी व गुळगुळीत असते. पाने साधी, लांबट भाल्यासारखी, मध्यम आकारमानाची (७.५-१२.३ × २.५-३.७५ सेंमी.), सुगंधी, संमुख (समोरासमोर) व त्यांची टोके लघुकोनी असतात. झाडाच्या सर्वच भागांत सुगंधी तेल असते पानांत तैल प्रपिंडे ( ग्रंथी ) असतात. सुवासिक, लहान, प्रथम हिरवी नंतर किरमिजी रंगाची सुगंधी फुले परिमंजरीय वल्लरीवर [फुलोऱ्यावर ⟶ पुष्पबंध ] जुलै-ऑक्टोबरमध्ये व नोव्हेंबर-जानेवारीत येतात. आठळी फळे गोल, गर्द लाल, मांसल व २.५ × १.५ सेंमी. आणि बिया दोन असतात बी १.५ सेंमी., लंबगोल व नरम असून त्यावर एका बाजूस चीर असते. प्रत्येक लवंगेवरचे चार टोकदार भाग म्हणजे फुलातील संदले होत. फुलाची संरचना आणि वनस्पतीची इतर सामन्य लक्षणे ⇨ मिर्टेसी कुलात ( जंबुल कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

हवामान, लागवड, मशागत इत्यादी : भारतात सस. पासून ते सु. १,००० मी. उंचीपर्यंत लवंगेची लागवड होते. वार्षिक पर्जन्यमान सु. १५०-३०० सेंमी. आणि उबदार व दमट हवामान चांगले असते दीर्घ रुक्ष उन्हाळा किंवा हिवाळा लवंग वृक्षाना मानवत नाही. चांगल्या निचऱ्याची, खोल व दुमट जमीन आवश्यक असते. केरळातील रेताड, भुसभुशीत व दुमट जमिनीत किंवा जांभायुक्त जमिनीत लवंगवृक्ष चांगले वाढतात. नारळ, सुपारी, कॉफी यांसारख्या व्यापारी पिकांत लवंगेची लागवड करतात, तसेच फक्त तिचेच मळेही करतात. भारताच्या नैर्ऋत्य समुद्रकिनारपट्टीत कन्याकुमारीपासून ते रत्‍नागिरीपर्यंत लवंगेची लागवड चांगली होऊ शकेल, असा अभिप्राय व्यक्त करण्यात आला होता तसेच मध्य प्रदेशातील डोंगराळ भाग, ओरिसा, बंगाल आसाम आणि अंदमान व निकोबार बेटे यांतील दऱ्यांतही प्रायोगिक लागवडीची सूचना केली गेली होती. १९७९ पासून रत्‍नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जवळजवळ ७,००० लवंग रोपांची लागवड करण्यात आली. समुद्रकिनाऱ्यावरील भागात उत्तम निचऱ्याची रेताड, गाळमिश्रित रेताड व तांबड्या मातीत तसेच समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर असलेल्या सपाट व डोंगर उतारावरील जमिनीत लवंगेची लागवड यशस्वी झाली आहे. भारतात १९८४ च्या सुमारास लवंगेखाली एकूण क्षेत्र सु. १२० हे. होते. लागवडीकरिता पक्क व ताजी फळे पाण्यात भिजवून राख व वाळू यांनी घासून लागलीच पन्हेरीत पेरतात. रोपे तयार होण्यास ४-५ आठवडे लागतात त्यानंतर ती सु. २५ सेंमी. उंच झाली म्हणजे पावसाळ्यात त्यांची लागवड ६० × ६० सेंमी. च्या व सु. ६ मी. अंतरावर असलेल्या खड्‌ड्यांत करतात. तत्पूर्वी ते खड्डे सकस मातीने भरून ठेवतात. समुद्रकिनाऱ्यावरील रेताड जमिनीत खड्डे भरताना अर्धी तांबडी माती किंवा शक्य असल्यास गाळाची माती वापरतात. रेताड जमिनीत कंपोस्ट किंवा शेणखताचा अधिक वापर करणे श्रेयस्कर असते, कारण त्यामुळे जमिनीची पाणी धारण करण्याची शक्ती वाढते. रोपे लावल्यानंतर त्यांवर सावली पडण्याची व हाताने पाणी देण्याची व्यवस्था करावी लागते ३-४ वर्षापर्यंत अशी काळजी घ्यावी लागते. कलमे करूनही अभिवृद्धी करतात यामध्ये जवळच्या झाडांची फांदी रोपाच्या खुंटावर भेट कलमाप्रमाणे जोडून कलम करतात. आरंभी शेणखत, अमोनियम सल्फेट या खतांचा चांगला उपयोग होतो त्यानंतर नैऋत्य मॉन्सूनच्या सुरुवातीस झाडे फुले येण्याच्या अवस्थेत असताना योग्य ते मिश्र खत देतात. रोपे काढून लावल्यानंतर सु. ७-८ वर्षानी झाडांना फुले येऊ लागतात व प्रत्येक वृक्षापासून सु. २०-३० वर्षापर्यंत वाढत्या प्रमाणात बहर येतो ३०-६० वर्षे झालेल्या वृक्षांपासून विपुल उत्पादन होते त्यानंतर मात्र उत्पादन आर्थिक दृष्ट्या फायदेशीर नसते त्यात बराच अनियमितपणा येतो. भिन्न हवामानांच्या क्षेत्रांत भिन्न ऋतूत कळ्यांची तोड होते. काही ठिकाणी (बुर्लियर, झांझिबार व पेंबा ) दोन पिके निघतात. बंद कळ्या काहिशा लालसर झाल्या म्हणजे हातांनी तोडतात त्यापेक्षा कच्च्या कळ्या तोडल्यास त्यांना पुढे ‘खोकर’ लवंगा म्हणतात तोडणी काही दिवसांचे अंतर ठेवून पुनःपुन्हा करावी लागते. साधारणपणे २.५ ते ४.५ किग्रॅ. लवंगा दर वर्षी दर वृक्षापासून मिळतात कधी कधी काही क्षेत्रांत हे प्रमाण ६.८ किग्रॅ. असते. तोडणीनंतर लवंगांच्या या कळ्या ४-५ दिवस उन्हात वाळवितात परंतु रात्री बाहेर ठेवत नाहीत. ओलसर व दमट हवामानात कृत्रिम उष्णतेचा उपयोग करावा लागतो या प्रक्रियेत तेलाचे प्रमाण बरेच घटते. सुकविण्यात पाण्याचे प्रामाण कमी होऊन वजनही घटते.

सुकविलेली लवंग लहान खिळ्याप्राणे व लालसर तपकिरी असते. ती सु. १२-१९ मिमी. लांब असून खरबरीत पण सुरकुतलेली नसते. देठावरच्या चार टोकदार भागांत ( संवर्तावर ) गोलसर कळी असते. देठ दाबल्यास थोडे सुगंधी तेल येते ते तिखट असते.सुकविण्याची प्रक्रिया सदोष झाल्यास लवंगा गडद, सुरकुतलेल्या व उभट होतात. त्यांचे स्वरूप व शुद्धता लक्षात घेऊन त्यांची प्रतवारी करतात. पिनँग व अँबोइना येथील लवंगा झांझिबार व मॅलॅगॅसी मदल्यापेक्षा जास्त चांगल्या असतात. बाजारातील मालात अनेकदा लवंगवृक्षाच्या फांद्यांच्या काड्या, सुकीफळे, फळे,फुले, बियांचा भुगा इत्यादींची भेसळ असते. खरी ( तेलिया) लवंग काळी कुळकुळीत असून बोटांनी दाबल्यास तीतून तेल निघते. लवंगेत प्रतिशत २५.२ पाणी, ५.२ प्रथिने, ८.९ मेद, ९.५ तंतू, ४६.० इतर कार्बोहायड्रेटे आणि ५.२ खनिजे असतात. दर शंभर ग्रॅममध्ये ७४० मिग्रॅ. कॅल्शियम, १०० मिग्रॅ. फॉफरस, ४.९ मिग्रॅ. लोह आणि ५०.७ मायक्रोग्रॅ. आयोडीन असतात तसेच कॅरोटीन (२५३ मायक्रोग्रॅ.), थायामीन (०.०८मिग्रॅ.), रिबोफ्लाविन (०.१३ मिग्रॅ.)व निकोटिनिक अम्‍ल (१.५१मिग्रॅ.) ही जीवनसत्त्वे असतात लवंगेत १३% टॅनीन असते. 


लवंग तेल : ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून मिश्रणातील घटक अलग करण्याच्या क्रियेने) लवंगेपासून १४-२३% शुद्ध, रंगहीन किंवा फिकट पिवळे तेल मिळते त्याचा वास व चव लवंगेप्रमाणे असतात जुन्या तेलाच्या रंग लालसर तपकिरी असतो. त्यात ९७% यूजेनॉल (C10 H12O2) हे रसायन असते त्यात मिथिलएन-ॲमिल कीटोन (यामुळे तेलाला ताजा व फळासारखा सुवास येतो) तसेच अत्यल्प प्रमाणात मिथिल सॅलिसिलेट, मिथील बेंझोएट, मिथिल अल्कोहॉल, बेंझिल अल्कोहॉल इ. रसायने असतात. मोलकाझमधील जंगली लवंगेतून काढलेल्या तेलात यूजेनॉल नसते. लवंगा धारण करणाऱ्या लहान फांद्यांपासून काढलेल्या बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणाऱ्या) तेलाला (५.५-७.०%) सुवास फार कमी असतो परंतु त्यात यूजेनॉल भरपूर असते. पानांतूनही ४-५ % बाष्पनशील तेल मिळते व त्यात यूजेनॉल कमी असते सुवासही कमीच असतो. फळांत फक्त ६.५% तेल असते. वाफेच्या साहाय्याने पण ऊर्ध्वपातनाने काढलेल्या मुळातील तेल ६% गर्द पिवळे असून त्याचे लवंग (कळ्यांच्या) तेलाशी बरेच साम्य असते त्यात ८५-९५% यूजेनॉल असते.

उपयोग : लवंग हा एक महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ असून स्वादाकरिता स्वयंपाकात लवंगा किंवा त्यांची पूड सर्वत्र वापरतात. लोणची , डुकराचे मांस (खारविलेले), परिरक्षित पदार्थ, केचप, सॉस, सॉसेज, कोंबडी व इतर प्राण्यांचे मांस, मिठाई इ. खाद्यपदार्थात लवंगा घालतात. तिखटपणा व सुवास यांमुळे त्यांचा वापर केक, पुडिंग, शिरा, खीर, साखरभात, लाडू इ. पक्कान्नांत फार पूर्वीपासून केला जात आहे. तसेच काही मद्ये, खाण्याची तंबाखू, तांबूल (विडा), इंडोनेशियात बनविल्या जाणाऱ्या विशिष्ट सिगारेटी (केरेटेक) इत्यादींकरिताही लवंग वापरली जाते. लवंग तेलाचे महत्त्व जाणून लवंगांचा उपयोग केला जातो. अनेक अन्नपदार्थात हे तेल वापरतात. दंतधावने, गुळण्या करण्याचे पदार्थ, चघळण्याचा गोंद, स्‍नानाचा साबण, सौदर्य-प्रसाधने, सुगंधी द्रव्ये (तेले, अत्तरे इ. ) यांसाठी तेलाचा वापर बराच होतो. लवंग तेलापासून कृत्रिम व्हॅनिला काढतात.

वैद्यकात लवंगेचा वापर पुरातन आहे. ती सुगंधी, उत्तेजक व वायुनाशक असल्याने जठरातील दाहावर आणि अग्निमांद्यावर (भूक वाढविण्यास) देतात मलमळ, शिसारी, वांती आणि उदरवायू यांसारख्या तक्रारींवर लवंगेची पूड किंवा फांट (पाण्यात काढलेला रस) देतात. अतिसंवेदनाशील दंतिन (दातातील अस्थीसारखा पेशीसमूह) व किडक्या दातातील पोकळ्या यांना स्थानिक बधिरता आणण्यास तेल वापरतात. झिंक ऑक्साइड व लवंग तेल यांचे मिश्रण दातांतील पोकळ्यांत भरतात. तेल बाहेरून लावल्यास कातडी लाल होते. पोटात घेतल्यास वायुसारक व आकडी बंद करण्यास उपयुक्त असते. लवंग स्तंभक (आकुचंन करणारी), जंतुनाशक, कीटकनासक, पूतिरोधक (सूक्ष्मजीवांचा नाश करणारी ) असते.

झांझिबार व पेंबा येथे व्यापारी महत्त्वाच्या लवंग तेलाचे विशेषेकरून उत्पादन होते श्रीलंका, पिनँग व इंडोनेशिया येथे फार कमी प्रमाणात होते. अमेरिका, ब्रिटन व काही यूरोपीय देशांत आयात केलेल्या लवंगाचे तेल ऊर्ध्वपातनाने काढतात. भारतात टांझानिया व सिंगापुरातून मुख्यतः लवंग आयात करतात. फ्रान्स, ब्रिटन, नेदर्लंड्स, टांझानिया इ. देशातून तेल आयात होते. नेपाळ, अरब देश व काही जवळच्या देशांना अल्प प्रमाणात भारतातून लवंग व तेल निर्यात होते.

रोगराई : भारतात लवंगवृक्षांना फारशा गंभीर रोगराईचा उपद्रव होत नाही. रोपातील मर, पान कुजणे, टिक्का व सल हे रोग आणि पाने खाणारी अळी व खोड अळी या किडी दिसून येतात. तीन वर्षाच्या आतील रोपांस कवकजन्य (बुरशीसारख्या हरीतद्रव्य रहित वनस्पतीमुळे होणारा) रोग होऊन तळाशी कड्यासारखा कुजका भाग बनून ९०% रोपे मरतात त्यावर बोर्डो मिश्रण व गंधक पूड फवारल्यास रोगनिवारण होते. मलेशियात पाने अकाली गळण्याचा रोग कवकांपासून होतो त्यावरही बोर्डो मिश्रण वापरतात. झांझिबारमध्ये मुळांना रोग होऊन झाडे अकस्मात मरतात रोगाची लक्षणे दिसू लागताच ती झाडे ताबडतोब तोडून जाळून टाकल्यास हा कवकजन्य रोग पसरू न देण्यास मदत होते. कोठे कोठे कॉकशेफर भुंगेरे कोवळा पाला खाऊन हानी करतात गॅमेक्झिन फवारून त्यांचे नियंत्रण करता येते पाने खाणाऱ्या अळीच्या बाबतीत नवीन पालवीचे अंकूर दिसल्यानंतर ४० ग्रॅ. बीएचसी (५०%) १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करतात. खोड अळीचा उपद्रव असल्यास फांद्यांवर व खोडावर (५०%) बीएचसीचे १% द्रावण लावतात.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol.X, New Delhi, 1976.

           2. Hill, A. F. Economic Botany, Tokyo, 1952.

           3. Parry, J. W. Splces, Their Morphology, Histology and Chemistry, New York 1952.

           4. Santapau, H. A. Dictionary of the Flowering Plants in India, New Delhi, 1973.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.