रोहटक : हरयाणा राज्यातील रोहटक जिल्ह्याचे व त्याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,६६,६३१ (१९८१). हे दिल्ली-फिरोझपूर लोहमार्गावर दिल्लीच्या वायव्येस सु. ७० किमी. वर वसलेले असून धान्य व साखर यांची राज्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे.
भारतातील अनेक प्राचीन शहरांपैकी रोहटक हे एक मानले जाते. यौधेयांची राजधानी ‘रोहितक’ म्हणजेच रोहटक असे तज्ञांचे मत आहे. रोहटकच्या उत्तरेस थोड्याच अंतरावर ‘खोखरा कोट’ (रोहतासगढ) या ठिकाणी रोहितकची जुनी वसाहत असल्याचा उल्लेख पुराणांत व महाभारतात आढळतो. पांडवापैकी नकुलाने रोहितक जिंकल्याचा उल्लेख महाभारताच्या सभापर्वात आहे. हा प्रदेश धान्य व गोधन यांनी समृद्ध होता, असा उल्लेख असून त्यावरूनच यौधेयांच्या राज्याला ‘बहुधान्यक’ म्हटले जात होते. काही ग्रंथांत मथुरा ते तक्षशिला या व्यापारी मार्गावरील रोहितक हे एक प्रमुख केंद्र असल्याचा उल्लेख मिळतो. या भागातील उत्खननांत सापडलेल्या काही नाण्यांवर (इ. स. पहिले शतक) ‘बहुधान्यके यौधेयानाम्’ अशी अक्षरे आढळतात. पृथ्वीराज चौहानाच्या कारकीर्दीपर्यंत या प्रदेशाचे ‘बहुधान्यक’ हे नाव प्रचलित होते. मुहम्मद घोरीने हे शहर उद्ध्वस्त केले, परंतु पृथ्वीराजाने ते पुन्हा उभारले, असे सांगितले जाते. एका दंतकथेनुसार पनवार राजपुतांपैकी रोहतास राजाने हे वसविले म्हणून याचे नाव रोहतासगढ व पुढे रोहटक असे पडले असावे. पुढे तेराव्या शतकात हे शहर दिल्ली सल्तनतीच्या ताब्यात होते. मोगल सत्तेच्या ऱ्हासानंतर या शहरावर शीख व मराठे यांचा एकामागून एक असा अंमल बदलत गेला. १८२४ मध्ये हे रोहटक जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बनले. १८५७ च्या उठावात या शहराची अतोनात लूट झाली. १८६७ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.
रोहटक ही अन्नधान्य, साखर, कापूस, तेलबिया यांची मोठी बाजारपेठ असून येथे सुती कापड, विणमाल, सरस, मीठ इत्यादींचे उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालतात. सोन्या चांदीच्या तारांचे सुंदर कलाकाम केलेल्या तलम मलमलीच्या पगड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. शहरात कला-वाणिज्य व विज्ञान शाखांची एकूण १२ महाविद्यालये असून महर्षी दयानंद विद्यापीठ (स्था. १९७६) तसेच एक कृषिसंशोधन केंद्रही आहे. याच्या परिसरात झालेल्या उत्खननात अनेक बुद्धकालीन अवशेष सापडले आहेत. शहरात अनेक ऐतिहासिक मशिदी असून ‘दिनी’ किंवा ‘अदिना’ ही सर्वांत जुनी (११४०) आहे. या मशिदीच्या उत्तर बाजूस असलेल्या ‘ताह खाना’ या कोठडीच्या कमानीवर अलाउद्दीन खल्जीच्या काळातील (१३०८) एक कोरीव लेख आहे. याशिवाय शहरात शिव, हनुमान यांची मंदिरे असून बागा, ऐतिहासिक गोकर्ण तलाव, जवळच असलेले खोखरा कोट हे पुरातत्त्वीय ठिकाण इ. पर्यटन स्थळे आहेत.
देशपांडे, सु. चिं.