रान मांजर : मांसाहारी गणातील फेलिडी कुलातला प्राणी. याचे शास्त्रीय नाव फेलिस चाउस असून हे उत्तर आफ्रिकेपासून नैऋत्य आशिया, भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश व इंडोचायनापर्यंत आढळते. भारतात हिमालयापासून केप कामोरिनपर्यंत हे सगळीकडे आढळते. भारतात रानमांजराच्या चार जाती आहेत : (१) हिमालयातील : अंगावर लोकरीसारखे दाट केस (२) उत्तर भारताच्या सपाट प्रदेशातील : आकार लहान, शेपूट आखूड (३) वाळवंटातील : रंग फिक्कट पिवळा, अंगावर काळे ठिपके, शेपटीवर काळी वलये (४) दक्षिण भारतातील : आखूड केस, पाठीचा रंग भुरकट, अंगावर काळे व पांढरे ठिपके.

 

रानमांजरे गवताळ जमिनीवर, झुडपांतून वा नद्या, ओढे व दलदलीच्या काठच्या वेताच्या जाळ्यांत राहातात. काश्मीरात गावांच्या आसपासच्या खडकात किंवा जुन्या इमारतीत ती राहतात.

डोक्यासह याच्या शरीराची लांबी ६० सेंमी. पेक्षा थोडी जास्त शेपूट सु. ३० सेंमी. लांब व वजन ५-६ किग्रॅ असते. रानमांजराच्या विशिष्ट ठेवणीवरून ते चटकन ओळखता येते. याचे पाय लांब, शेपूट तुलनेने आखूड आणि डोळे फिक्कट हिरव्या रंगाचे असतात डोळे रोखून ते पाहू लागले म्हणजे त्याच्या चर्येवर कौर्य स्पष्ट दिसते. कान तांबूस, टोकावर काळ्या केसांची रेघ रंग भुरकट-राखी किंवा पिवळसर-करडा शेपटीच्या टोकाकडे काळी वलये शेपटीचे टोक काळे पंजे फिक्कट पिवळे व तळवे काळे किंवा काळपट तपकिरी असतात.

रानमांजर सामान्यतः सकाळी व संध्याकाळी बाहेर पडते. ते अतिशय चपळ असून त्याच्या मोकळ्या मैदानातील हालचाली हुबेहूब चित्त्यासारख्या शक्ती असते. छोटे सस्तन प्राणी, पक्षी, कोंबड्या हे याचे भक्ष्य होय. गावाच्या आजूबाजूला राहणारी रानमांजरे कोंबड्यांचा फडशा पाडतात. कधीकधी गावात घुसून ती माणसांच्या देखत कोंबड्या पळवितात.

मादीला वर्षातून दोनदा पिल्ले होतात. ती लहानपणापासून बाळगली तर सहज माणसाळतात.

दातार, म. चिं.