अस्थिचिकित्सा पद्धति : (ऑस्टिओपॅथी). शरीरातील हाडे आणि सांधे–विशेषत: पाठीच्या कण्यातील मणके व त्यांचे सांधे–यांची कुशल हालचाल करून रोग बरे करण्याच्या पद्धतीला ‘अस्थिचिकित्सा पद्धती’ हे नाव आहे. अस्थिचिकित्सा पद्धती आणि विविध अस्थिरोगांमध्ये हाडवैद्य जी चिकित्सा करतात त्यांमध्ये मूलभूत फरक आहे.

अँड्‌रू टी. स्टील या अमेरिकन वैद्यांनी १८७४ मध्ये या पद्धतीचे प्रथम वर्णन केले. त्यांनी असे प्रतिपादन केले की, ‘शरीर स्वभावत: रोगप्रतिकारक्षम असते सर्व इंद्रिये पूर्ण सहकार्याने कार्य करीत असतात तोपर्यंत रोग होत नाही परंतु अस्थी व सांधे या ठिकाणी इजा, ताण, संसर्ग वगैरे कारणांमुळे विकृती होते. त्यामुळे स्थानिक स्नायूंमध्ये ताठरपणा उत्पन्न होऊन शरीरातील रक्तपरिवहन योग्य प्रकारे होत नसल्यामुळे अम्लरक्तता (रक्तातील अम्लाचे प्रमाण वाढणे) होते. या अम्लरक्ततेचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती क्षीण करण्याकडे होतो व त्यामुळे रोग होतात. अस्थी व सांधे यांमधील ही मूळ विकृती हाताने त्यांची कुशल हालचाल करून दूर करता येते व त्यामुळे रोगपरिहार होतो.’ स्टील स्वत: औषधे वापरण्याच्या विरुद्ध असून त्यांना ते विष समजत असत.

विसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास ही पद्धती वापरणाऱ्यांच्या मतांत पुष्कळ फरक पडला असून जरूर तर औषधे आणि शस्त्रक्रियाही कारणपरत्वे वापरण्यात येतात परंतु मणक्यांची व सांध्यांची हालचाल हाताने करणे या गोष्टीवर मुख्य भर देण्यात येतो. 

स्टील यांचे वरील मत सर्वमान्य झालेले नसले, तरी अस्थिचिकित्सा पद्धतीला अमेरिकेत शासनाची मान्यता मिळालेली असून त्या पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या सहा संस्था आज अमेरिकेत आहेत. इंग्लंडामध्ये वैद्यकीय पदवीधरांसाठी दीड वर्षाचा अभ्यासक्रम असलेली एक आणि इतरांसाठी ४-५ वर्षांचा अभ्यासक्रम असलेली एक अशा दोन शिक्षण संस्थांमध्ये हे शिक्षण देण्यात येते. फ्रान्स, दक्षिण, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगैरे देशांतही ही पद्धती वापरणारे वैद्य आहेत. भारतात मात्र या पद्धतीचा वापर व प्रचार जवळजवळ नाहीच म्हटले तरी चालेल.

ढमढेरे, वा. रा.