विंचेस्टर – १ : इंग्लंडच्या हँपशर परगण्यातील एक शहर व नगरपालिकीय बरो. लोकसंख्या ३०,६४२ (१९३८ अंदाज). शैक्षणिक व धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेले हे शहर लंडनच्या नैर्ऋत्येस सु. १०६ किमी. इचेन नदीखोऱ्यात वसले आहे. या शहराला पूर्वी ब्रिटन लोक ‘कार ग्वेंट’, रोमन ‘व्हेंट बेल्गॅरम’ तर सॅक्सन ‘विंट्सेस्टर’ असे म्हणत. इ. स. दुसऱ्या शतकाआधी येथे केल्टिक लोकांची वस्ती होती. त्यानंतर रोमन लोकांचे हे प्रमुख ठाणे बनले. पुढे वेसेक्सच्या अँग्लो सॅक्सन राजांनी इंग्लंडवर सार्वभौमत्व प्रस्थापित केले, तेव्हा विंचेस्टर हे त्यांच्या राजधानीचे ठिकाण बनले (सहावे शतक). आल्फ्रेड द ग्रेट याच्या कारकीर्दीत (८७१-९९) विंचेस्टर हे प्रशासनाचे ठिकाण व प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले. त्यामुळे अनेक धर्मोपदेशक या शहराकडे आकर्षिले जाऊन हे एक प्रसिद्ध धार्मिक केंद्र बनले. डेन राजा कान्यूट (कार. १०१६-३५) याचेही विंचेस्टर हे मुख्य ठाणे होते. नॉर्मन राजांच्या कारकीर्दीत विंचेस्टरचे वैभव अधिक वाढले. नॉर्मनांनी शहराला तटबंदी करून तेथे एक किल्ला बांधला. या किल्ल्याची पुढे ऑलिव्हर क्रॉमवेलच्या सैन्याने बरीच नासधूस केली. प्राचीन काळापासून इंग्लिश लोकर व कापडाचे एक व्यापारकेंद्र म्हणून याची असलेली प्रसिद्धी दुसऱ्या विल्यमच्या कारकीर्दीत अधिकच वाढली. सॅक्सन काळापासून येथे असलेल्या व्यापारी संघाचे महत्त्व एकोणिसाव्या शतकापर्यंत टिकले. तेराव्या शतकात ज्यू लोकांनी येथे बरीच वस्ती होती. इंग्लंडचा राजा स्टीफन याच्या राजवटीत (११३५-५४) झालेल्या यादवी युद्धात हे शहर जाळण्यात आले होते. तेव्हापासून हळूहळू विंचेस्टरचे महत्त्व कमी होऊन लंडनचे महत्त्व वाढले.

लंडन शहराची वाढ झाल्याने सॅक्सन काळापासून कार्यरत असलेल्या येथील व्यापारी संघाची आधुनिक प्रगती खुंटली. मोठी कारखानदारीही मर्यादित राहिली. प्रशासकीय कार्यालये, कृषिमालाच्या व्यापाराचे केंद्र व ऐतिहासिक कॅथीड्रलचे शहर म्हणून असलेले याचे महत्त्व मात्र तसेच कायम राहिले. निवासी केंद्र म्हणून याची प्रसिद्धी असल्याने येथे सेवानिवृत्त लोकांची वस्ती बरीच वाढली आहे.

इंग्लंडमधील सर्वात लांब असलेले (१६९ मी.) भव्य कॅथीड्रल शहरांच्या ऐतिहासिक कीर्तीची साक्ष देते. सेंट स्विदन या मूळ सॅक्सन कॅथीड्रलची जागा बिशप वॉकेलिन या नॉर्मन वास्तूने घेतली. चौदाव्या शतकात त्याचा विस्तार करून सांप्रतच्या गॉथिक कॅथीड्रलमध्ये त्याचे रूपांतर करण्यात आले. १५५४ मध्ये पहिल्या क्वीन मेरीचे वास्तव्य असलेला वॉलवेसे किल्ला आज भग्नावस्थेत आहे. किंग्ज गेट व वेस्ट गेट ही शहराची मध्ययुगीन प्रवेशद्वारे उल्लेखनीय आहेत. बाराव्या शतकातील सेंट क्रॉस रुग्णालय व त्यातील प्रसिद्ध धर्मशाळा आजही कार्यरत आहे. चौदाव्या शतकातील ‘विंचेस्टर कॉलेज’ ही इंग्लंडमधील सर्वांत जुनी व प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे.

चौधरी, वसंत.