रांजा : ऱ्हिनोबॅटिडी कुलातील ऱ्हिंकोबॅटस प्रजातीतील एक लोकप्रिय खाद्य मत्स्य. याचे संपूर्ण शास्त्रीय नाव ऱ्हिंकोबॅटस जीडेन्सीस असे आहे. तांबड्या समुद्रापासून मलायी द्वीपकल्पापर्यंतच्या सर्व समुद्रांत हा सापडतो. भारतात दोन्ही किनाऱ्यांवर परंतु विशेषेकरून पश्चिम किनाऱ्याच्या दक्षिण भागात म्हणजे कारोमंडल किनाऱ्यावर हा सर्वात जास्त सापडतो. हे मासे पुष्कळ मोठ्या समूहांमध्ये राहतात व हे मुख्यत्वे कवचधारी आणि मृदुकाय संघांतील प्राण्यांवर उपजीविका करतात. मोत्याच्या कालवांना या माशांपासून फार मोठी हानी पोहोचते. त्यामुळे हे मासे असलेल्या समुद्रात मोत्याच्या कालवांचे यांच्यापासून संरक्षण करावे लागते. हा मासा मुंबई भागात लांग या नावाने ओळखला जातो. हा गिटार या वाद्यासारखा दिसतो म्हणून याला ‘ गिटार –फिश ’ असेही म्हणतात.
याचे शरीर वरच्या व खालच्या बाजूंनी किंचीत चापटके असते. शेपटी जाड, लांब असते. तिच्या दोन्ही बाजूंना संपूर्ण लांबीभर त्वचेच्या घड्या असतात. डोळे मोठे असून नेत्रकोटराच्या लगत मागील बाजूस श्वासरंध्र असते. मुस्कट रुंद, जाड, बारीक बारीक कंटकांच्या आणि लहान लहान उंचवट्यांच्या रांगा सर्व शरीरावर असतात. पृष्ठपक्ष (हालचालीस आणि तोल संभाळण्यास उपयोगी पडणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घड्या) दोन असतात त्यातील पुढचा अधरपक्षाच्या बरोबर समोर असतो दुसरा पहिल्यापेक्षा आकाराने लहान असतो. रांज्याचा रंग फिक्कट राखी असतो, पोटाची बाजू पांढरट असते. पिलांच्या पोटाचा रंग गुलाबी, वरच्या पापणीवर काळा पट्टा अंसपक्षाच्या (छातीच्या भागातील पराच्या) टोकाशी पांढऱ्या ठिपक्यांनी वेढलेला एक काळा ठिपका, तसेच सर्व शरीर आणि कधीकधी अंसपक्षावर पांढरे किंवा फिक्कट राखी रंगाचे ठिपके असतात. निमेषक पटल (डोळे स्वच्छ ठेवण्यास मदत करणारी तिसरी पापणी) सोनेरी रंगाचे असते.
मार्च महिन्याच्या सुमारास भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर हा मासा फार मोठ्या प्रमाणावर पकडतात. पूर्ण वाढ झाल्यावर याची लांबी सु. २·७ मी. इतकी असते पण खाण्यासाठी मासे बहुधा पूर्ण वाढ होण्याआधीच पकडतात. हा मासा ताजा किंवा सुकवलेलादेखील खातात परंतु ताज्या माशाला जास्त मागणी असते. याच्या यकृतापासून औषधी, जीवनसत्त्वयुक्त तेल काढतात. साधारण ४ किग्रॅ. पेक्षा जास्त वजन असणाऱ्या यकृतापासून १ ते १·५ किग्रॅ. तेल मिळते. त्यात १७% अ जीवनसत्त्व असते. याचे मांस अत्यंत पौष्टिक असल्यामुळे पौष्टिक खाद्य म्हणून या माशाला फार मागणी आहे.
जोशी, लीना