याम्योत्तर संक्रमणमापक : या उपकरणाच्या साहाय्याने कोणत्याही खस्थ ज्योतीचा याम्योत्तर वृत्ताच्या (दोन्ही ध्रुव व निरीक्षकाचे खस्वस्तिक म्हणजे थेट डोक्यावरचा बिंदू यांमधून जाणाऱ्या मोठ्या वर्तुळाच्या) संक्रमणाचा ⇨नाक्षत्र काल अचूकपणे नोंदल्यास तिचा ⇨विषुवांश मिळतो. त्याचप्रमाणे ज्या ताऱ्यांचे विषुवांश नक्की माहिती आहेत अशा ताऱ्यांच्या संक्रमण कालावरून कालमापकांतील चूक काढणे शक्य होते. तसेच ताऱ्यांचे माहीत असलेले विषुवांश पडताळून पहाता येतात. ताऱ्याचे विषुवांश व ⇨क्रांती अचूक माहीत असून अचूक कालमापक हाताशी असेल, तर ताऱ्याच्या वेधांवरून वेश स्थानाचे रेखांश काढता येतात.
प्रत्येक तारा याम्योत्तर वृत्तापाशी ⇨उन्नतांश बहुतांशी कायम ठेवून क्षितिजसमांतर जात असतो. याम्योत्तर वृत्ताच्या ऊर्ध्वार्धाच्या संक्रमणाचा नाक्षत्र काल ताऱ्याच्या विषुवांशाइतका असतो व त्या क्षणीच्या उन्नतांशावरून ताऱ्याची क्रांती काढता येते. अशा प्रकारच्या वेधांसाठी पूर्वी निरीक्षकाचा डोळा व कान यांचा उपयोग केला जात होता. आता त्यांची जागा प्रकाशविद्युत् घट [⟶ प्रकाशविद्युत्], आपोआप काललेखन करणारी उपकरणे व छायाचित्र तंत्र यांनी घेतली असून परिणामी वेधांची अचूकता वाढली आहे.
याम्योत्तर वृत्ताच्या पातळीत अचूक फिरू शकणारा व भक्कम पायावर उभारलेला मध्यम प्रभावी दूरदर्शक आणि कोणत्याही तापमानात सारख्याच गतीने चालणारा कालमापक असे या उपकरणाचे दोन प्रमुख घटक आहेत.
हे उपकरण बसविताना अनेक प्रकारच्या खबरदाऱ्या घ्यावा लागतात. स्थळाची पूर्व-पश्चिम दिशा अगदी अचूक काढून दूरदर्शक ज्या अक्षाभोवती फिरतो तो वलनाक्ष त्या दिशेत काटेकोरपणे ठेवावा लागतो. हा वलनाक्ष क्षितिजाला किंवा क्षितिज पातळीला बरोबर समांतर असला पाहिजे. त्याचप्रमाणे दूरदर्शकाचा अक्ष वलनाक्षाला बरोबर लंब असावा लागतो. शिवाय दूरदर्शक दोन्ही खांबांच्या मध्यभागी ठेवून तो वलनाक्षाच्या लंब दुभाजकाच्या पातळीवरच फिरेल हे पहावे लागते. या सर्व गोष्टी व्यवस्थित असल्या, तरच दूरदर्शक कोणत्याही स्थितीत निरीक्षकाच्या याम्योत्तर वृत्ताच्या पातळीत फिरू शकेल.
दूरदर्शकाच्या वजनामुळे आसाच्या टोकाकडे होणारे घर्षण व ऋतुमानानुसार तापमानात होणारे फरक यांमुळे उपकरणावर होणारे परिणाम कमीत कमी व्हावेत म्हणून अनेक योजना केलेल्या असल्या, तरीही अशा उपकरणाने घेतलेले वेध पूर्णपणे अचूक मिळत नाहीत. त्यामुळे अनेक ताऱ्यांचे वेध घेऊन वरील गोष्टींमुळे होणाऱ्या अल्प चुकांचे मान ठरवावे लागते.
दूरदर्शकाच्या बिंबिकेच्या (डोळ्याजवळील भिंगाच्या) केंद्र पातळीत एक उभी स्थिर तार असून तिच्या दोन्ही अंगांस समान अंतरावर काही तारा असताना मध्यभागी असलेली तार याम्योत्तर वृत्ताचे दिग्दर्शन करते. ज्या वेळी योग्य तऱ्हेने उभारलेल्या दूरदर्शकामध्ये ताऱ्याचा किंवा दुसऱ्या कोणत्याही खस्थ ज्योतीच्या प्रतिमेचा मध्य या मधल्या तारेवर दिसतो, त्या वेळी तो बरोबर याम्योत्तर वृत्तावर आलेला असतो व त्या वेळचा ⇨नाक्षत्र काल निरीक्षकाकडून टिपला जातो. कालमापनासाठी १९३० पर्यंत लंबकाचे घड्याळ वापरीत असत व हेच घड्याळ या कामासाठी अधिक सोयीचे आहे. विद्युत् मंडलाच्या उपयोगाने या घड्याळाने दाखविलेले मिनिटांच्या नोंदीचे रेखांकन एका सारख्याच गतीने फिरणाऱ्या दंडगोलाकृती रिळावरील कागदावर सतत होत राहते. ताऱ्याच्या याम्योत्तर वृत्ताच्या संक्रमणाच्या क्षणाची खूण निरीक्षकास याच कागदावर करता येईल अशी योजना केलेली असते. संक्रमणानंतर कागदावरील खुणांच्या परीक्षणावरून संक्रमणाच्या क्षणाचा काल काढता येतो.
ताऱ्यांच्या संक्रमणाचा क्षण अगदी अचूक टिपता यावा म्हणून फायलर सूक्ष्ममापकाची योजना काही दूरदर्शकात केलेली असते. या योजनेत सूक्ष्ममापकाचे मळसूत्र फिरवून केंद्र पातळीत एक उभी तार दृश्य क्षेत्राच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूस नेता येते. तिची दोन बिंदूंतील चाल मळसूत्राच्या फेऱ्याशी निगडीत असून त्यावरून खगोलावरील प्रत्यक्ष बिंदूमधील दृश्य कोनाचेही मान कळू शकते. मळसूत्र हाताने समान गतीने फिरवीत जाऊन चल तार ताऱ्याच्या प्रतिमेबरोबर पुढे पुढे नेली जाते व प्रत्येक अचल तारेजवळ वेळेची नोंद केली जाते. यावरून प्रतिमेचा मध्य मधल्या अचल तारेजवळ कधी होता तो क्षण अधिक अचूक ठरवता येतो व संक्रमणाचा नाक्षत्र काल काढता येतो. या सर्व क्रिया अतिशय गुंतागुंतीच्या आपोआप चालणाऱ्या यंत्रणेने घडवून आणता येतात व त्यामुळे व्यक्ति-व्यक्तीनुसार होणाऱ्या वेधांतील चुकांना स्थान रहात नाही.
इ. स. १६९० मध्ये रोमर यांनी या उपकरणाचा शोध लावला. हॅली या ज्योतिर्विदांनी ग्रॅहॅम यांनी बनविलेल्या संक्रमणमापक १७२१ मध्ये ग्रिनिच वेधशाळेत प्रथम वापरला. १८५१ मध्ये एअरी यांनी हे उपकरण सुधारून त्याच्या मदतीने कित्येक ताऱ्यांचे विषुवांश तपासले. ग्रिनिच येथे बसविलेल्या या उपकरणाच्या मध्यातून जाणाऱ्या रेखावृत्ताला शून्य रेखावृत्त मानावे अशी सूचना करण्यात आली. त्या सूचनेस १८८४ मध्ये भरलेल्या ज्योतिर्विदांच्या परिषदेत आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.
फडके, ना. ह.