यक्षगान   : कर्नाटकच्या किनारपट्टीमध्ये लोकप्रिय असलेला एक पारंपरिक नृत्यनाट्यप्रकार. तमिळनाडूमधील ⇨ भागवत मेळा नाटक व आंध्रमधील ⇨ कूचिपूडी नृत्य या नृत्य-नाट्यपरंपरांमध्ये सादर केल्या जाणाऱ्या नाट्यप्रसंगांनाही ‘यक्षगान’ हीच संज्ञा सामान्यत:   वापरली जाते. रचनात्मक दृष्ट्या पाहता या तीनही नाट्यप्रकारांत बरेच साम्य आढळते  परंतु यक्षगानामध्ये वापरले जाणारे संगीत ,  नृत्य व अभिनयशैली भागवत मेळा आणि कूचिपूडी या दोन्ही परंपरांहून अगदीच भिन्न आहेत. जुन्या ,  अस्सल पारंपरिक यक्षगानात नाट्यशास्त्रीय हस्तमुद्रांचा तसेच शास्त्रीय हिंदुस्थानी अथवा कर्नाटक संगीताचा वापरही अजिबात केला जात नाही. त्यामुळे यक्षगान हा नाट्यप्रकार पारंपारिक लोकरंगभूमीच्या सदरात मोडतो.

कारंत यांच्या एका यक्षगानातील एक दृश्य

यक्षगान या शब्दाचा योग्य संदर्भ व या परंपरेचा उगम यांबाबत विद्वानांमध्ये अनेक मते आहेत ,  ती पुढीलप्रमाणे :  यक्षगान ही दख्खन भागात लोकप्रिय अशी विशिष्ट संगीतप्रणाली होती व या संगीतशैलीत लिहिलेली गेयनाटके पुढे ‘यक्षगान प्रसंग ’ म्हणून लोकप्रिय झाली असावीत. आजही या शैलीत वापरले जाणारे अनेक राग व त्यांची नावे प्रचलित शास्त्रीय गायनपद्धतीहून सर्वस्वी भिन्न आहेत. काहींच्या मते  ‘ यक्ष ’  हा  ‘ जक्क-जक्कुलु ’ शब्दाचा अपभ्रंश असावा. ‘जक्कुलु’ ही नट-नर्तकांची जमात दक्षिणेत होती. या लोकांनी सादर केलेले नाट्य-गानप्रकार यक्षगान म्हणून ओळखले जाऊ लागले असावेत. प्रयोगदृष्ट्या नसला तरी ,  रचनात्मक दृष्ट्या यक्षगानामध्ये पुरातन  संस्कृत नाट्यतंत्राचा वापर खूपच आढळतो. नांदी ,  पूर्वरंग इत्यादींचा वापर  सूत्रधार ,  विदूषक ,  नायक ,  नायिका इ. पात्रे  ‘जवनिके’चा  ( पात्र प्रवेशासाठी वापरला जाणारा लहान पडदा) उपयोग  वाचिक व आहार्य अभिनयाचा वापर इ. गोष्टींवरून या परंपरेचे पुरातनत्व सिद्ध होते. सोळाव्या शतकात दक्षिण कर्नाटकात लिहिला गेलेला यक्षगान प्रसंग आजही उपलब्ध आहे.

   

  यक्षगानाचे स्वरूप बरेचसे संस्कृत ⇨ चंपूकाव्या सारखे असते. सुरुवातीला केवळ भागवता तील प्रसंगांवर नृत्यनाट्ये आधारित असत  पण पुढे रामायण ,  महाभारत ,  पुराणे यांमधील ठळक प्रसंग तसेच शिव आणि शक्ती हे देखील यक्षगानाचा विषय बनू लागले. अशा प्रसंगांवर आधारलेल्या सु. ५० नाटकांवर यक्षगान या नृत्यनाटकाची कथानके आधारलेली आहेत. युद्धातील पेच ,  झगडे व विरोध ही ह्या कथानकांची मूलसूत्रे होत. हा एक ओजस्वी ,  वीररसप्रधान व जोशपूर्ण नृत्याचा आविष्कार आहे. यक्षगानात कथानक हे नृत्य ,  गीत व अभिनय या माध्यमांतून उमलत जाते. एखाद्या देवळातील स्थानिक कलावंत हे प्रयोग सादर करतात व ते संपूर्ण रात्र चालतात. प्रयोगाच्या यशाचे अर्धेअधिक श्रेय त्यातील गीतांकडे जाते. नर्तक हे पुरुष असून तेच स्त्रीभूमिकाही करतात. ह्यातील काव्य व संभाषणे स्वतः   नर्तक रंगमंचावर म्हणतात. मूलतः   यक्षगान हे ग्रामीण नृत्यनाट्य असल्यामुळे ह्यातील वेशभूषा ,  रंगभूषा यांमध्ये एक प्रकारचा साधेपणा असतो. नृत्यात पदन्यास व ‘भ्रमरी’  ( गोलाकार हालचाली) यांचे आधिक्य असते. नृत्य हे प्रवेशाच्या मध्ये किंवा गाण्याच्या कडव्यानंतर केले जाते. विशिष्ट व्यक्तिमत्त्व ,  सूक्ष्म भावना या नेमक्या शब्दांत पकडल्यामुळे यातील संवाद हे अधिक जिवंत वाटतात.  

   

  यक्षगान हे अद्‌ भुत रम्य स्वरूपाचे असल्यामुळे त्यामध्ये वास्तवतेचे प्रमाण साहजिकच कमी आढळते. प्रयोगाची सुरुवात विनायकस्तुतीने होते. यानंतर सुब्बरायाला  ( नागाचे प्रतीक) उद्देशून एक गीत गायले जाते. नंतर लाल रंगाच्या पडद्याआडून पुरुषपात्रे रंगमंचावर वीररसयुक्त पदन्यास करत येतात. ह्या नृत्यप्रकारातील पात्रांचे सौम्य व रौद्र असे दोन भाग पडतात. त्यातील नृत्य दोलायमान असते. म्हणूनच त्यास ‘यक्ष-आंदोलन’ असेही नाव आहे. या नृत्यनाट्यात लास्यांगसुद्धा येते  पण त्याचा उद्देश शृंगार प्रदर्शित करणे हाच असतो असे नाही. क्वचित लेखनातील कमतरता रंगमंचावर अभिनयचातुर्याने भरून काढली जाते. या नृत्यनाट्यात विनोदाला फारसे महत्त्व नसले ,  तरी यातील विदूषक नाट्यातील ताण कमी करण्याचे काम करतो. हा विदूषक इतर नर्तकांबरोबर रंगमंचावर प्रवेश करतो. फक्त विनोद करून प्रेक्षकांची करमणूक न करता इतर नर्तकांची नक्कल करून त्यांच्यापेक्षाही सुंदर नृत्य करण्याचा प्रयत्न करतो. तसेच वेळोवेळी त्याच्यावर भाष्य करतो. बहुतेक सर्व यक्षगान प्रयोगांचा शेवट लढाईत किंवा विवाहात होतो.  

  यक्षगानाची खास स्वतः ची अशी राग–  संगीतपद्धती आहे. अलीकडच्या काळात त्यावर शास्त्रीय कर्नाटक गायनपद्धतीचा बराच प्रभाव दिसतो. पात्राच्या मनः स्थितीनुसार राग निवडण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे भावनांना विशिष्ट खोली प्राप्त होते. वेशभूषेच्या किंवा रंगभूषेच्या संदर्भात सर्वसाधारणपणे पात्रांचे तीन भाग पाडले जातात. उदा. ,  ब्राह्मण ,  ऋषी यांची वेशभूषा व रंगभूषा साधीच असते. कृष्णाचे चिरयौवन दर्शविण्यासाठी त्या पात्राला मिशा लावल्या जात नाहीत. कर्ण ,  अर्जुन इ. वीरांची रंगभूषा गुलाबी असते  पण राक्षसांच्या रंगभूषेसाठी मात्र लाल ,  हिरवा व काळा हे तीन रंग मुख्यतः   वापरले जातात. शृंगारिक पात्रे आणि राक्षस हिरवे किंवा काळे जाकीट घालतात व लाल किंवा नारिंगी रंगाचे चौकडीचे धोतर नेसतात. त्यावर अनेक दागिने घातले जातात. मुख्यतः   राजघराण्यातील लोक मुंडासे बांधतात. त्याच्या आकारावर पात्राचा मान ठरवण्यात येतो.

  हे नृत्य सुगीच्या सणांच्या समयी केले जाते. साहजिकच त्यामुळे त्यात एक प्रकारचे खेळीमेळीचे व आनंदी वातावरण निर्माण होते. यक्षगान खेड्यातील चौकात वा चावडीसमोर पेश केले जाते.

   

  गेल्या काही वर्षांत शुद्ध यक्षगान करणारे संच झपाट्याने कमी होत असून ,  सध्या कर्नाटक राज्यातील दूरदूरच्या खेड्यातून पहावयास सापडतात. राज्यशासन दसरा उत्सवात त्यांना आमंत्रणे देऊन प्रोत्साहन देते. आजकाल यक्षगानातील अभिनयाचा कस जरी खालावलेला असला ,  तरीही यक्षगानातील नृत्याचे तंत्र व ढंग ,  अभिनयाची धर्ती व ढब अभ्यासण्याजोगी आहे. ⇨ कोट शिवराम कारंत यांनी या विषयावर बरेच संशोधन केले आहे. यक्षगान-बयलाट ( १९५७) या त्यांच्या कृतीमुळे हा प्रकार सर्वदूर प्रसृत झाला.

  

 यक्षगान पूर्वी बाहुल्यांच्या खेळातूनही सादर केले जात असे. दोरीच्या साहाय्याने कठपुतळ्या व काठ्यां च्या साहाय्याने कातड्याच्या बाहुल्या नाचवल्या जात. असे कलाकार आता फार दुर्मिळ होत चालले आहेत.

   

  आज यक्षगानाचे आधुनिकीकरण झाल्याने त्यात थोडीशी कृत्रिमता आली असली ,  तरी त्यातील संगीताचे ऐश्वर्य व स्वाभाविक ,  निरागस असे सौंदर्य यांमुळे ही कला आजतागायत जिवंत राहिलेली आहे.

  पार्वतीकुमार