बोलेरो : स्पेनमधील एक अत्यंत लोकप्रिय व सार्वत्रिक नृत्यप्रकार. हे जोषपूर्ण व तालबद्ध नृत्य कॅस्टानेटच्या (चिपळ्यांसारखे एक वाद्य) तालावर किंवा गिटारवादनाच्या व गायनाच्या साथीने, एकट्याने, स्त्रीपुरुषांच्या जोडीने किंवा अनेक नर्तक मिळून सांघिक रीत्या करतात. झेबास्टिआन थेरेथो या दरबारी बॅले नर्तकाने स्पेनमधील अँडलूझीया प्रांतातील एका लोकनृत्यावर काही संस्करण करून बोलेरो हे नृत्य १७८० च्या सुमारास प्रचारात आणले. या नृत्यातील उंच उड्या तसेच हवेत खाली वा वर पाय झटकणे यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण हालचालींतून बॅलेचा प्रभाव जाणवतो.

बोलेरो नृत्य

घसरत्या लयीचे आकर्षक पदन्यास,तालाची विभागणी ३ : ४, जोरकस व बदलता ठेका ही बोलेरोची वैशिष्ट्ये होत. नर्तक भावप्रकटनासाठी मुद्राभिनयाचा तसेच बाहूंच्या हालचालींचा विशेष वापर करतात. क्यूबामधील बोलेरो-सॉन व डोमिनिकन बोलेरो हे संथ प्रादेशिक नृत्यप्रकार आहेत. आधुनिक बोलेरोचे ⇨पोलोनेझ या नृत्याशी बरेच साम्य आहे. राव्हेलची बोलेरो ही वाद्यवृंदरचना (१९२८) हे बोलेरो, नृत्यसंगीताचे प्रसिद्ध उदाहरण होय.

जगताप, नंदा.