टॅप नृत्य: एक आधुनिक नृत्यप्रकार. बुटांच्या पुढच्या टोकांनी व टाचेच्या साहाय्याने मध्य व जलद लयीत जमिनीवर आघात देऊन हे नृत्य केले जाते. बुटाच्या खाली जोडलेल्या लाकडी किंवा लोखंडी पट्टीस ‘टॅप’ अशी संज्ञा आहे. या पट्टीमुळे आघातास ठळकपणा प्राप्त होऊन एक प्रकारचे नादमाधुर्य निर्माण होते. हा नृत्यप्रकार नरम तळ असलेल्या बुटांच्या साहाय्याने पट्टीशिवाय केल्यास त्यास ‘सॉफ्ट शू डान्स’ असे म्हणतात. टॅप नृत्यप्रकार विसाव्या शतकाच्या दुसऱ्या व तिसऱ्या दशकांत अमेरिकेत व यूरोपमध्ये फार लोकप्रिय होता. १९४० नंतर टॅप नृत्याच्या मूळ तंत्राला बॅलेच्या व अन्य आधुनिक नृत्यांच्या विविध आविष्कारांची जोड देण्यात आली. तसेच नृत्याच्या पदन्यासांतही विलक्षण विकास घडून आला. या नृत्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यास चित्रपटसृष्टीमध्येही स्थान मिळाले . फ्रेड आस्टेअर, जिंजर रॉजर्स, जीन केली, एलीनॉर पॉवेल इ. या प्रकारातील प्रख्यात नर्तक-नर्तकी होत.

वडगावकर, सुरेंद्र