कुंचन नंप्यार : (सु. १७०५–सु. १७६५). प्रख्यात मल्याळम्  कवी व ‘ओट्टन तुळ्ळल’ ह्या नृत्यप्रकाराचा प्रवर्तक. त्याच्या जन्ममृत्यूच्या तिथींबाबत व जीवनाबाबत निर्विवाद माहिती उपलब्ध नाही. त्याचे नाव ‘रामन्’  किंवा ‘कृष्णन्’ असावे, असे काही विद्वान मानतात. त्याचा जन्म ब्राह्मण  आणि ब्राह्मणेतर यांच्यामधील ‘अंतराळवर्ग’ ह्या जातीत, मलबारमधील किळ्ळिक्कुरिच्ची मंगलम् ह्या गावी झाला. त्याचे वडील नंबूतिरी (ब्राह्मण) आणि आई नंप्यार (ब्राह्मणेतर) जातीची होती, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कुंचन हे त्याचे लाडिकपणे ठेवलेले नाव दिसते. ‘कुंचन’ म्हणजे ‘लहानगा’ तत्कालीन पद्धतीनुसार त्याने संस्कृत व मल्याळम् भाषांचे अध्ययन केले. केरळमधील मंदिरात तो परंपरागत काम करीत असे. ह्या मंदिरात पूर्वापार चालत आलेल्या ‘कूत्तू’ आणि ‘कुटियाट्टम’ ह्या नावाने चाक्यार जातीच्या लोकांकडून सादर केल्या जाणाऱ्या संस्कृत नाट्यप्रयोगांत तो ढोलके वाजविण्याचे काम करी. तथापि एकदा त्याचे व एका चाक्याराचे नाट्यप्रयोगाच्या वेळी भांडण झाले. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्याने आपला ‘ओट्टन तुळ्ळल’ नावाचा नवीन नृत्यप्रकार सादर करून रसिकवर्ग आपल्याकडे खेचून नेला, अशी आख्यायिका आहे. ओट्‍टन तुळ्ळल केवळ एकाच व्यक्तीने, खास त्यासाठी रचलेल्या पौराणिक कथाकाव्याच्या गायनासोबत करावयाचा नृत्यप्रकार आहे. ‘तुळ्ळल’  याचा अर्थ तालावर साभिनय केला जाणारा नृत्यविशेष.  शीतंकन, परयन् आणि ओट्टन हे तुळ्ळल नृत्याचे तीन प्रकार आहेत.  ह्यांतील परयन् मंदगतीचे, ओट्टन द्रुतगतीचे आणि शीतंकन मध्यगतीचे नृत्य असते.  या गतीला अनुसरून विविध वृत्तांतील रचना या नृत्यप्रकारांत वापरल्या जातात. कुंचनच्या तुळ्ळलची बहुतांश कथानके रामायण–महाभारतातील कथांवर तसेच इतर पौराणिक कथांवर आधारलेली आहेत. चाक्यार कूत्तू आणि कथकळी या नृत्यांतील अवगुण टाकून आणि त्यांतील गुणांचा स्वीकार करून, कुंचन नंप्यारने आपला ओट्टन तुळ्ळल हा नवा नृत्यप्रकार प्रवर्तित केला आणि अल्पावधीतच तो अत्यंत लोकप्रियही झाला.

कुंचन नंप्यारने तुळ्ळल प्रकारातील सु. ६४ रचना केल्याचे सांगतात तथापि अलीकडील संशोधनाच्या आधारे त्यांची संख्या ४०–४५ पेक्षा अधिक नसावी, असे दिसते. सुबोध भाषेत  आणि विनोदी व मनोरंजक शैलीत त्याने पौराणिक कथांच्या आधारे ह्या रचना केल्या. लोकांना पोट धरून हसावयास लावणारा विनोद व उपरोध त्यांत आढळतो. सर्वसामान्य माणसाची जीवनपद्धती, आचार-विचार आणि खास केरळची प्रादेशिक पार्श्वभूमी  ह्यांचे प्रतिबिंब त्यांत पडत असल्यामुळे, त्या अतिशय लोकप्रिय ठरल्या. त्याने विभिन्न जातींचे चित्रण त्यांच्या अवगुणांसहित त्यांत केले आहे. त्याच्यानंतर गेली सु. २०० वर्षे मल्याळम् साहित्यात तुळ्ळलरचना होत आहेत, तथापि त्याच्या तुळ्ळलरचनेची सर त्यांना नाही.

तुळ्ळलरचनांशिवाय त्याने ‘किळिप्पाट्‍टु’  तसेच इतर प्रकारांतील काव्यरचनाही केल्या आहेत. श्रीकृष्णचरितम् मणिप्रवालम्, शिवपुराणम् किळीप्पाट्‍टु, किरातम् वंचिप्पाट्‍टु, रूक्मिणी स्वयंवरम् पत्तुवृत्तम्, पालाळिमथनम् आट्टकथा हे त्याचे प्रमुख काव्यग्रंथ होत. अंबलपुळ्ळ येथील राजाचा आश्रित म्हणून तो होता. उत्तरायुष्यात तो तिरूअनंतपुरम् येथील राजाचा आश्रित म्हणून बरेच दिवस राहिला. अखेरी अखेरीस तो परत अंबलपुळ्ळ येथे आला. तेथेच पिसाळलेले कुत्रे चावून तो मरण पावला.

पहा : ओट्टन तुळ्ळल नृत्य.

नायर, एस्. के. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)