कुरुप, कुंचू : (२० मार्च १८८०–२ एप्रिल १९७३) प्रख्यात कथकळी नर्तक व गुरू. अंबलपुळ्ळ येथे जन्म. बाराव्या वर्षी कथकळी नृत्यप्रयोग पाहून प्रेरणा मिळाली व कोचाप्पी रामन्‌ नायर ह्यांच्याकडे नृत्याच्या अध्ययनास प्रारंभ केला. दोन वर्षानंतर कुमारनळ्ळूर मंदिरात त्यांनी पहिले नृत्य सादर केले. त्यावेळी रुक्मिणीस्वयंवरम्‌  मधील कृष्णाची भूमिका त्यांनी केली होती. त्यानंतर सात वर्षे चम्पकुळम सांकू पिळ्ळे ह्यांच्याकडे नृत्याचे अधिक शिक्षण घेतले. प्रारंभीच्या काळात त्यांना व त्यांच्या पथकास आश्रयदात्यांच्या शोधार्थ खूप प्रवास करावा लागला. कालांतराने मंत्रेदत्तू मणेकळच्या कलाप्रेमी राजाचा त्यांना आश्रय लाभला. तेथील बारा वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी नृत्यकलेचा अधिक सखोल अभ्यास केला. ‘केरळ कला मंडलम्‌’च्या स्थापनेनंतर तेथे त्यांची प्रारंभीच नर्तक व नृत्यशिक्षक म्हणून नेमणूक झाली. कथकळी नृत्यप्रकाराच्या पुनरुज्जीवनात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. नृत्याभिनय हा त्यांचा खास प्रांत. त्यांनी केलेल्या भूमिकांतून कथकळीचा कथाभाग व नृत्यतंत्र ह्यांवरील त्यांचे प्रभुत्व दिसून येते. जी भूमिका करावयाची त्या भूमिकेची एकूण बैठक व स्थायीभाव, तिच्या मागची पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी इ. दृष्टींनी तिचा सर्वांगीण अभ्यास ते करीत. त्यांनी नृत्यांकित केलेल्या नल, रुक्मांगद, रावण, अर्जुन आदी भूमिका विशेष अविस्मरणीय आहेत. त्यांनी भारतभर तसेच ब्रह्मदेशातही नृत्याचे कार्यक्रम केले. कोचीनच्या महाराजांकडून ‘वीरशृंखला’ हा पुरस्कार (१९३०), ‘कलातिलकम्‌’, ‘कथकळिनाट्याचारियन’ तसेच पद्मश्री (१९६५) या पदव्या व राष्ट्रपतिपदक (१९५६) असे अनेक मानसन्मान त्यांना लाभले. त्यांच्या शिष्य परिवारात गोपिनाथन्‌, आनंद शिवरामन्‌, राम गोपाल, कृष्ण राव, मृणालिनी साराभाई आदी प्रमुख नर्तकांचा अंतर्भाव होतो.

इनामदार, श्री. दे.