लोकनृत्य: जनसामान्यांमध्ये प्रचलित असलेले परंपरागत नृत्यप्रकार म्हणजे लोकनृत्ये होत. जानपदाच्या स्वाभाविक वृत्ती, विशिष्ट आवडीनिवडी, सामाजिक-भौगोलिक परिस्थिती, धार्मिक रीतिरिवाज, लोकांच्या दैनंदिन क्रियांमधल्या हालचाली ह्यांचे प्रतिबिंब लोकनृत्यांतून पाहावयास मिळते. ही नृत्ये लोकजीवनातून सरळ उत्क्रांत झालेली असतात व त्यांत भाग घेणारे लोकनर्तक हे प्रशिक्षित व्यावसायिक नर्तक नसतात. ही नृत्ये साधारणपणे सामूहिक स्वरूपात सादर होतात व त्यांना मुख्यतः तालवाद्यांची, तसेच लोकसंगीताची साथ असते. स्वाभाविक प्रकारचे हे नर्तन असून भडक व आकर्षक रंगांचे आधिक्य नर्तकांच्या वेशभूषेमध्ये दिसते. साधेपणा हा लोक नृत्याचा आत्मा होय. त्यातील हालचाली उत्स्फूर्त आणि सहजस्वाभाविक असतात. हालचालींमध्ये तोचतोचपणा असला, तरी त्यांतल्या उत्स्फूर्ततेमुळे त्या मोहक वाटतात. लोकनृत्ये हो नैसर्गिक वातावरणात म्हणजेच उघड्या माळरानावर, गावाबाहेर, देवळाच्या मंडपात वा आवारात केली जातात. ही रंगमंचीय कला नव्हे. त्यामुळे निव्वळ रंगमंदिरात बसून त्यांचा खऱ्या अर्थाने आस्वाद घेता येत नाही. त्या त्या लोकनृत्याची पार्श्वभूमी असलेल्या नैसर्गिक व सामाजिक वातावरणाशी एकरूप होऊन, स्वतः त्यात सहभागी होऊनच तो घ्यावा लागतो. 

  

पंजाबमधील एक विधिनृत्य जगातील बहुतेक राष्ट्रांना लोकनृत्याची समृद्ध व वैविध्यपूर्ण परंपरा लाभली आहे. देशोदेशींच्या लोकनृत्यांमध्ये जी पृथगात्म वैशिष्ट्ये दिसून येतात, ती अनेक कारणांनी निर्माण झाली आहेत : (१) ज्या जनजीवनातून ती विकसित झालेली असतात, त्या जीवनातील रीतिरिवाजांचा, आचारविचारांचा, रूढींचा, लोकसंस्कृतींचा, तसेच लोकांच्या दैनंदिन कामकाजाचा प्रभाव त्या त्या विशिष्ट लोकनृत्यशैलीच्या जडणघडणीत दिसून येतो. (२) ज्या प्रदेशात ती निर्माण होतात, तेथील भौगोलिक स्थिती, हवामान ह्यांचाही परिणाम तेथील नृत्यशैलींवर होतो. उदा., उत्तर रशिया, स्कँडिनेव्हिया, स्कॉटलंड येथील थंड हवामानात नृत्याच्या हालचाली साधारण जलद, चैतन्यमय,चपळ व उत्साही, तसेच नेटक्या व सुविहित स्वरूपाच्या असतात. जेथे हवामान सतत बदलणारे, चंचल व अस्थिर असते अशा स्पेन, मेक्सिको, दक्षिण इटली इ. ठिकाणी नृत्य−हालचाली तीव्रोत्कट, आवेगी स्वरूपाच्या असतात. उष्ण हवामानाच्या प्रदेशातील (उदा., दक्षिण भारत, श्रीलंका) लोकनृत्यांच्या हालचाली साधारण सुस्त, संथ व प्रवाही असतात, असे दिसून येईल. (३) लोक ज्या भूमीवर नृत्य करतात, त्या भूस्वरूपावरूनही लोकनृत्याच्या शैली नियंत्रित होतात. उदा., वाळवंटी प्रदेशातील नर्तक आकस्मिक, झटकेबाज हालचाली करतात व सतत एका पायावरून दुसऱ्या पायावर भार देत नाचतात. जणू वाळवंटातील तापलेली वाळू पाय टेकू देत नाही, अशा प्रकारे ते पावलांच्या जलद हालचाली करतात. नदीकाठी सुपीक व समृद्ध प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या समूहनृत्यांतून जणू ती सुबत्ता ओसंडून वाहताना दिसते. ह्या नृत्यांत नर्तकांचे मोठे समूह भाग घेतात व ती साधारणतः उत्सवाच्या, सणासुदीच्या दिवशी केली जातात. त्यातील वातावरण उत्फुल्ल, चैतन्यमय व आनंदी असते. यूरोपमध्ये ही नृत्ये ख्रिस्ती उत्सवांशी निगडित असतात. विविध ऋतुमानांत तसेच सुगीच्या हंगामात केली जाणारी कृषिनृत्येही या प्रकारात मोडतात. ही नृत्ये बरीचशी सुबद्ध व नियमित हालचालींनी युक्त असतात. लोकनृत्यांचे अनेकविध आविष्कार-प्रकार देशोदेशींच्या विविध संस्कृतींमध्ये काळाच्या ओघात निर्माण होत गेले आहेत. धर्मविधियुक्त नृत्ये, प्राणिनृत्ये, शिकारनृत्ये, युद्धनृत्ये, कार्यसंबद्द व्यावसायिक नृत्ये, सामाजिक नृत्ये, प्रणयाराधनपर युग्मनृत्ये असे त्यांचे अनेकविध प्रकार पडतात.   

धर्मविधियुक्त नृत्ये: मानवेतिहासाच्या सर्व अवस्थांमध्ये धर्मविधीचा एक भाग म्हणून समूहनृत्यांचे विविध प्रकार निर्माण झाले आहेत. बव्हंशी आदिम, तसेच आदिवासी नृत्यांचा उगम आदिम यातुश्रद्धायुक्त विधींतून, धार्मिक उत्सव-उपासनांतून तसेच निसर्गातील गूढ अज्ञात शक्तींवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रेरणेतून  झाला असल्याचे दिसून येते. मृतात्मे, भुतेखेते आदी पैशाचिक शक्तींना वश करून घेणे वा त्यांना काबूत आणणे अशांसारख्या प्रेरणाही त्यामागे होत्या. त्यामुळे ही नृत्ये जोशपूर्ण झपाटलेल्या अवस्थेत केली जात. काही लोकनृत्ये रोगनिवारणाच्या उद्देशानेही केली जात (हेही यातुनृत्याचेच एक रूप होय). उदा., इटलीमधील ‘तारान्तेला’ हे लोकनृत्य तारान्‌त्युला नामक अजस्त्र कोळ्याच्या विषारी दंशावरचा उपचार म्हणून केले जाई. आदिवासींच्या श्रद्धा व तदानुषंगिक समजुती ह्यांचे प्रतिबिंबही लोकनृत्यांमधल्या हालचाली व आकृतिबंध ह्यांत उमटलेले दिसते. उदा., अनेक आद्य लोकनृत्यांमध्ये गोलाकार फेर धरून नाचण्याच्या क्रियेला प्राधान्य होते. कारण ह्या गोलाकारात काही यातुमय सामर्थ्य सामूहिक नृत्यामुळे केंद्रित होते, असा लोकविश्वास असतो. एका परीने हे वर्तुळ अभिमंत्रित वर्तुळ होते. म्हणून काही आद्य संस्कृतींमध्ये वर्तुळाकार हालचाली ह्या शुभसूचक व दुष्टत्वाचे निवारण करणाऱ्या मानल्या होत्या. यूरोपमध्ये धार्मिक विधियुक्त नृत्यांचे गोलाकार रिंगणनृत्यांमध्ये रूपांतर झाल्याचे दिसून येते. ही नृत्ये विशेष उत्सवप्रसंगी केली जात. बाल्कन राष्ट्रांमध्ये ह्या गोलाकार फेर धरून केल्या जाणाऱ्या नृत्यांना ‘कोलोस’ अशी संज्ञा होती. ह्या लोकनृत्यांमध्ये घड्याळकाट्याच्या दिशेने फिरत जी नृत्ये केली जात, ती साधारण आनंददायक प्रसंगांची, हर्षोत्फुल्ल भाववृत्तींची निदर्शक असत. उदा., विवाहप्रसंगी वा सुगीच्या हंगामात केली जाणारी नृत्ये. याउलट घड्याळकाट्याच्या विरूद्ध दिशेने फेर धरीत केली जाणारी नृत्ये शोकनिदर्शक असत. उदा., अंत्यविधिप्रसंगी केली जाणारी नृत्ये. काही प्राचीन स्कॉटिश शोकनिदर्शक विधियुक्त नृत्यांत नर्तक सूर्याच्या भ्रमणगतीच्या विरूद्ध दिशेने फेर धरून नाचत.    


 इंग्लिश मॉरिस नृत्य पुढे कृषिसंस्कृतीत धनधान्यसमृद्धी, सुफलता, मृगयेतील यश, युद्धातील विजय अशा अनेकविध प्रेरणांनी, उद्दिष्टांनी लोकनृत्ये केली जाऊ लागली. व्यक्तिजीवनातील जन्म, विवाह, मृत्यू अशा घटनाप्रसंगी केली जाणारी विशिष्ट प्रसंगोचित लोकनृत्ये होती. तद्वतच काही प्राचीन समाजांमध्ये प्रणयाराधनपर लोकनृत्येही प्रचलित होती. ऑस्ट्रियातील ‘लँड्‌लर’ आणि स्पेनमधील ‘फान्दागो’ ही लोकनृत्ये शृंगारसूचक हालचालींनी युक्त अशा मूकाभिनयावर आधारित होती. कालांतराने लोकनृत्यांमागील मूळ धार्मिक उद्दीष्टे मागे पडली व ती केवळ लोकरंजनार्थ सादर केली जाऊ लागली. भारतातील रासक्रिडा व रासनृत्य हे उत्कट शृंगार आणि भक्ती यांचे उत्तम उदाहरण आहे.

प्राणिनृत्ये: आदिमानव हा पक्षी, प्राणी, मासे यांना पूज्य मानून त्यांची उपासना करीत असे. त्यांच्या हालचालींचे अनुकरण केल्यास त्यांची गती, चापल्य सामर्थ्य, धूर्तता इ.गुण आत्मसात करता येतील, त्यायोगे अन्नाची आवश्यकता भासताच त्यांची शिकारही करता येईल, अशी त्यांची श्रद्धा होती. ही श्रद्धाही मूलतः यातुश्रद्धाच आहे. या उद्दीष्टांतून अनेक वैचित्र्यपूर्ण प्राणिनृत्ये उगम पावली. त्यांत आदिमानव पक्ष्या-प्राण्यांच्या वेगवेगळ्या हालचालींचे अनुकरण करीत नृत्ये करीत असे. ऑस्ट्रेलियन, आफ्रिकन व अमेरिकन आदिवासी जमातींमध्ये सुसर, कासव, वीणा पक्षी ह्यांच्या हालचालींचे अनुकरण करणारी नृत्ये होती. भारतात नाग व मयूर-नृत्ये प्रचलित आहेत. फिन लोकांमध्ये व सायबीरियाच्या याकुत जमातीमध्ये अस्वलनृत्ये व सीलमत्स्यनृत्ये केली जातात. उत्तर अमेरिकन-इंडियन जमातींत अस्वल,तरस आणि कोल्हा यांची अनुकरण-नृत्ये प्रचलित आहेत. जॉर्जियन कोसॅक जमातीत पायाच्या चवड्यांवर तोल सावरत गरुडाचे अनुकरण करून नृत्ये केली जात. या जमातीत प्राचीन काळी गरुडाची पूजा केली जात असे. गरूडाची आपल्या भक्ष्यावर झडप घालण्याची कृती या नृत्यात अनुसरली जाई. हंगेरियन, पोल, कोसॅक जमातींत घोडदौडींची व घोड्याच्या उड्डाणाची नक्कल करणारी नृत्ये आहेत. प्राचीन धर्मविधीतून उद्‌भवलेला, रेनडिअरची शिंगे डोक्यावर घालून केला जाणारा नाच ॲबट्‌स ब्रॉमली समाजात रूढ आहे. उरल पर्वतराजींतल्या जमातींत पक्ष्यांच्या हालचालींवर आधारलेली नृत्ये आहेत. अनेक प्राणिनृत्ये पुढे लोकरंगभूमीचे आविष्कार म्हणून विकसित झाली.

शिकारनृत्ये: प्राणिनृत्यांचेच विकसित रूप शिकारनृत्यांत दिसते. ह्या नृत्यांतून प्रत्यक्ष शिकारीच्या कृतीचे अनुकरण केले जाते. त्यांतील हालचाली शिकारीच्या वेगवेगळ्या अवस्थांतल्या हालचालींचे अनुकरण करतात. दबा धरून बसल्याप्रमाणे संथ व सावध हालचाली, सावजाची प्रतीक्षा व ते कब्जात आल्यावर एकदम झडप घालण्याची क्रिया ह्या सर्व हालचाली नृत्यातून अनुकरणाद्वारे सादर केल्या जातात. अमेरिकन-इंडियन व आफ्रिकन निग्रो जमातींमध्ये ही शिकारनृत्ये अद्यापही प्रचलित आहेत. अपेक्षित शिकार सफल व्हावी म्हणून शिकारीची आभिचारिक नृत्ये मूलतः तयार झाली. काही युद्धनृत्यांतूनही शिकारसदृश हालचाली पाहावयास मिळतात. उदा., सरकॅशीयन लोकांचे खोरूमी नृत्य. यूरोपीय देशांमध्ये अशा नृत्यांचे रूपांतर युग्मनृत्यांत झालेले दिसून येते. त्यांत पुरूष नर्तक स्त्रीचा पाठलाग करतो. अनेक डोंगराळ प्रदेशांतील नृत्यांत स्त्रिया नाचताना नागमोडी चालीची गती दर्शवितात. डोंगरावर चढउतार करण्याच्या क्रियेशी ह्या हालचाली समांतर असतात. तिच्या पाठीमागे पुरूष नर्तक तिचा अनुनय करीत पाठलाग करतो. पण त्या दोघांची समोरासमोर कधीच गाठभेट होत नाही.

युद्धनृत्ये: आदिवासी टोळ्या सुपीक भूप्रदेशावर ताबा मिळविण्यासाठी परस्परांत लढाया करू लागल्या, तेव्हापासूनच आदिवासी जमातींमध्ये युद्धनृत्ये प्रचलित झाली. आपल्या जमातीला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी अशी नृत्ये केली जात. अद्यापही काही जमातींमध्ये ही नृत्ये केली जातात. काही जमातींमध्ये तलवारनृत्ये केली जातात. ग्रीक सैनिकांच्या नृत्यांमध्ये तलवारीच्या द्वंद्वयुद्धाचे व दांडपट्ट्यांचे हात केले जातात. स्कॉटलंडमधील एका नृत्यात तलवारी जमिनीत रोवून नर्तक त्यांभोवती नृत्य करतात. वास्क व स्लोव्हॅक जमातींमध्ये युद्धनृत्याचा शेवट टोळीनायकाच्या वधनाट्याने होतो. त्यात तलवारींचाउपयोग तिरडीसारखा केला जातो. कित्येकदा तलवारनृत्ये नर्तक पायांत लाकडी तळाचे जोडे घालून करतात (क्लॉग डान्स). हे नृत्य कार्यसंबद्ध कृषिनृत्याचाही प्रकार आहे. त्यात धान्याच्या मळणीची क्रिया नृत्यातून दर्शविली जाते. भारतातील देवासुरसंग्रामकथा नृत्यनाट्यांतून सादर होतात. दशावतार, यक्षगान यांसारख्या नृत्यनाट्यांत असुरवधाने शेवट होतो.

व्यावसायिक लोकनृत्ये: मानव नदीकाठी सुपीक प्रदेशात वस्ती करून राहू लागला, तेव्हा मुख्यत्वे शेती करणे व जनावरे पाळणे हे त्याचे दोन प्रमुख व्यवसाय असत. ह्या व्यवसायविशिष्ट कामांचे, त्यांतील हालचालींचे तसेच दैनंदिन क्रियांचे विशिष्ट शैलीबद्ध प्रतिबिंब त्याच्या नृत्यांतूनही प्रकटले. नृत्य हा आदिमानवाच्या दृष्टीने यातुविधीचा एक प्रकार होता. धनधान्यसमृद्धी व्हावी, पिके भरघोस यावीत ह्या उद्दीष्टांनी ही नृत्ये केली जात. नृत्ये केल्याने समृद्धी व सुबत्ता येईल अशी श्रद्धा त्यांमागे होती. आर्मेनिया व युक्रेन येथील सुपीक प्रदेशांत शेतीच्या हंगामात कृषिनृत्ये केली जातात. त्यांत धान्याची पेरणी, कापणी, मळणी, धान्याची रास रचणे, गवताचे भारे बांधणे अशा अनेक क्रियांना लयतालबद्ध नृत्यरूपे मिळत जातात. फिलिपिनो लोक ‘बॅलिताओ’ कृषिनृत्यात भाताची लावणी, कापणी, उफणणी या क्रिया करतात. मेस्किकोतील तारास्कन स्त्रिया ‘सेम्ब्राडोरास’ नृत्यात धान्याची पेरणी करतात. पोलिश, हंगेरियन, स्वीडिश शेतकऱ्यांचीही कृषिनृत्ये आहेत. पेरूमधील केचुआ इंडियन जमातीचे लोक मेढ्यांची लोकर कापण्याची कृती नृत्यबद्ध करतात. स्पॅनिश लोक सुतकताईच्या हालचाली त्यांच्या लोकनृत्यांतून दाखवितात. जर्मन व डॅनिश लोक वस्त्र विणण्याच्या क्रियेला नृत्यरूप देतात. फ्रान्स, कारेलिया व सायबीरिया येथे लाकूडतोड्यांची नृत्ये लोकप्रिय आहेत. पोलंड व स्कँडिनेव्हीया येथे चांभारांची लोकनृत्ये प्रचलित आहेत तर फिनलंड, युक्रेन येथे गवळीनृत्ये रूढ आहेत. फ्रान्समधील माँपेल्ये येथे अश्वपालन-व्यवसायाशी निगडित लोकनृत्ये केली जातात. फिनलंडमध्ये सागरी किनारी भागात कोळीनृत्ये केली जातात. त्यांत मासे पकडणे, जाळे टाकणे, दोर गुंडाळणे इ. हालचालींना  शैलीबद्ध नृत्यरूपे दिली जातात. नदीकाठी वसाहती करणाऱ्या आदिवासी जमातींमध्येही कोळीनृत्ये केली जातात. त्यांत होडी वल्हविण्याच्या क्रियेलाही नृत्यरूप दिलेले दिसते. अशा प्रकारे विविध भिन्न-भिन्न व्यवसायांतील क्रियांना व हालचालींना नृत्यरूपे देऊन सादर केली जाणारी लोकनृत्ये जगभर सर्वत्र रूढ आहेत. यूरोपमध्ये अशा अनेक व्यवसायसंबद्ध लोकनृत्यांचे गाण्याच्या खेळांमध्ये रूपांतर झाल्याचे दिसून येते. मुले गाण्यातल्या आशयानुरूप हालचाली व हावभाव करतात. भारतात सर्वत्र शेतकरीनृत्ये व किनारपट्टीत कोळीनृत्ये होतात.


 प्रणयाराधनपर व सामाजिक नृत्ये: ही नृत्ये प्राचीन सुफलता−विधीतून उत्क्रांत झाली. आपले व जमातीचे वंशसातत्य टिकावे ह्यासाठी प्रत्येक पुरूषाला चांगल्या जोडीदारिणीची गरज वाटे तीतून स्त्रीच्या अनुनयाची ओढ निर्माण झाली. पुरूष नर्तक नृत्यात नानाविध क्लृप्त्या वापरून स्त्रीवर छाप पाडण्याचा, तिला वश करण्याचा प्रयत्न‍ करीत. याउलट स्पेनसारख्या काही देशांत स्त्रीनर्तकी आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करून पुरूषाला मोहवण्याचा प्रयत्न करीत. त्या आपल्या हातांतले पंखे, रूमाल, शाली, शेले वगैरे वस्तूंच्या मोहक हालचाली करून नृत्ये करीत. जिथे पुरूष स्त्रीचा अनुनय करतो, अशी युग्मनृत्ये स्पेन, इटली इ. अनेक देशांत प्रचलित आहेत. या प्रकारातील एका नृत्यात पुरूष स्त्रीला हवेत अधांतरी उंच उचलून धरतो. (फर्टिलिटी लीप). त्यामागे शेतातील पीकही तितकेच उंच फोफावून येईल अशी सुपीकतेची, सुफलतेची कल्पना आहे. यूरोपमधील अनेक देशांत प्रचलित असलेली वासंतिक ‘मे-पोल’ नृत्ये (मेच्या सणाच्या दिवशी फुलांनी शृगांरलेल्या उंच स्तंभाभोवती केली जाणारी उत्सवी नृत्ये) प्राचीन धर्मविधींतून उद्‌भवलेली आहेत. एका झेक लोकनृत्यात पुरूष नर्तक युद्धावर सैनिक म्हणून जाण्यापूर्वी आपल्या प्रेयसीचा भावपूर्ण निरोप घेतो. एका लिथ्युएनियन नृत्यात नर्तक−नर्तकी आपापल्या डोईवरच्या साहेबी टोप्यांची नृत्य करताकरता अदलाबदल करतात. स्पॅनिश ‘जॉता’, इटालियन ‘साल्तारेल्लो’, बास्क ‘ऑरेस्कू’, नॉर्वेचे ‘हॉर्लिग’ इ. प्रणयपर युग्मनृत्ये प्रसिद्ध आहेत. सोळाव्या शतकात गॅल्यर्ड आणि व्होल्टा ही युग्मनृत्ये यूरोपमध्ये प्रचलित होती. या यु-मनृत्यांत नर्तक−नर्तकींच्या उंच उड्या व दृढ आलिंगने ह्यांना प्राधान्य होते.सरदारवर्गात आयरिश ‘जिग’ हे लोकनृत्य विशेष प्रचारात होते. त्याला गाण्याची जोड दिली जाई.पोल्क व रेडोवा ही बोहीमियन लोकनृत्ये, स्पेनमधील फ्लॅमेंको आणि पोलंडची मझुर्क व क्रॅकोव्याक ही लोकनृत्ये यूरोपात झपाट्याने मान्य झाली. निरनिराळ्या देशांच्या राष्ट्रीय परंपरांतून निर्माण झालेली सामाजिक लोकनृत्ये  – उदा., ऑस्ट्रियनवॉल्ट्‌स,झेक पोल्क व अर्जेंटाइन टॅंगो ही नृत्ये−कालांतराने बहुरंगी आणि बहुढंगी अशा दालनांतर्गत युग्मनृत्यांत (बॉलरूम नृत्यांत) विकसित झाली. अमेरिकेतील ‘स्क्वेअर डान्स’ हा सध्याचा सर्वांत प्रसिद्ध लोकनृत्याचा प्रकार आहे. त्यात स्त्रीपुरूषांची चार जोडपी चौरसाकार रचनाबंधात नृत्य करतात. [⟶बॉलरूम नृत्य].

 

इंग्लंडमध्ये सेसिल शार्पने पारंपरिक लोकनृत्यांचे संकलन आणि जतन केले. रस्त्यावरचा मॉरिस नृत्याचा एक प्रयोग पाहून त्याला या कार्याची प्रेरणा मिळाली. शेक्सपिअरने आपल्या नाटकांतून मॉरिस नृत्याचा उल्लेख केला आहे. विल्यम केंप ह्या शेक्सपिअरकालीन नटाने लंडन ते नॉर्विच हे अंतर मॉरिस नृत्य करीत पार केले होते. सेसिल शार्पने इंग्लिश ग्रामजीवनातील समृद्ध व वैविध्यपूर्ण नृत्यपरंपरेचा शोध घेतला. त्याने लोकगीते आणि लोकनृत्ये ह्यांचे संकलन−संपादन करण्यात आपले आयुष्य वेचले. लोकगीतांच्या वैशिष्ट्यपूर्ण सुरावटी नोंदवून ठेवल्या. लोकनृत्यांची वर्णने लिहून ती ग्रंथरूपाने प्रकाशित केली. तसेच ही नृत्ये पुन्हा लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये रुजवण्याचे मौलिक कार्य केले. ह्या उद्देशानेच त्याने ‘इंग्लिश फोक डान्स सोसायटी’ ची स्थापना केली. पुढे ती ‘फोकसाँग सोसायटी’ मध्ये विलीन करण्यात येऊन ‘इंग्लिश फोक डान्स अँड साँग सोसायटी’ या नावाने ओळखली जाऊ लागली. सेसिल शार्पचे घर हेच तिचे मुख्य कार्यालय बनले. मॉरिस नृत्याच्या विविध रूपांबरोबरच तलवार−नृत्ये, ग्रामीण नृत्ये व मिरवणूक−नृत्ये ह्यांचेही अनेक प्रकार सेसिल शार्पने संकलित केले.

मॉरिस व तलवार−नृत्ये ही फक्त पुरूषांची समूहनृत्ये आहेत. ही नृत्ये शारीर श्रमयुक्त असून त्यांना प्रशिक्षण व सराव यांची गरज असते. तलवार−नृत्याला प्राचीन धार्मिक विधीची पूर्वपीठिका आहे. निसर्गातील गूढ अज्ञात शक्तींना वश करून घेण्यासाठी जो धार्मिक विधी केला जाई, त्याचा भाग म्हणून हे नृत्य करीत असत. ह्यात एका व्यक्तीला बळी दिल्याची व त्याचा पुनर्जन्म झाल्याची बतावणी केली जात असे. तथाकथित बळीला मध्यभागी गुडघ्यावर बसवून त्याच्याभोवती तलवारी घेतलेले नर्तक रिंगण करीत व त्याच्यावर तलवारी रोखत. ती व्यक्ती मरून पडल्याचे सोंग घेई. मग तलवारी मागे घेतल्या जात आणि बळी गेलेल्या व्यक्तीचा पुनर्जन्म होई. नंतर आनंदोत्सवी नृत्य होत असे. जुने वर्ष संपले व नव्या वर्षाचा प्रारंभ झाला, हा सांकेतिक अर्थ ह्या प्रतीकात्मक नृत्य−हालचालींतून सूचित केला जाई. प्राचीन सुफलता−विधीशी ही तलवार−नृत्याची संकल्पना जोडली गेली आहे. मॉरिस नृत्य हेही प्राचीन धर्मविधीशी संबद्ध आहे. नर्तकाने पायात बांधलेल्या घुंगरांचा नाद व हातातला रूमाल फडफडवण्याची कृती ही एकेकाळी दुष्ट शक्तींचे निवारण करण्यासाठी योजली जात असे आणि हवेत उंच उडी घेण्याची कृती ही जमिनीतून पिके जोमाने वर फोफावून यावीत ह्या उद्देशाने केली जाई. जॉन प्लेफर्डच्या द इंग्लिश डान्सिंग मास्टर (१६५१) या पुस्तकात अनेक ग्रामीण, सामाजिक नृत्यांचे विवेचन आले आहे.

 

भारतीय लोकनृत्ये: भारतातील आदिवासी जमातींत व जनजीवनात लोकनृत्यांची प्रदीर्घ परंपरा आढळते. ह्या लोकनृत्यांतून निसर्गाचे व पशुपक्ष्यांच्या हालचालींचे अनुकरण केले जाते. तद्वतच जनजीवनातील दैनंदिन क्रिया व हालचाली ह्यांनाही नृत्यरूपे दिली जातात. भारतीय लोकनृत्ये हा राष्ट्रीय संस्कृतीचा अमोल ठेवा असून, भारताच्या प्रत्येक प्रदेशात त्या त्या प्रादेशिक वैशिष्ट्यांची निदर्शक अशी विविध नृत्ये आहेत. आसाममध्ये बिहू व वैशाख ही त्या त्या उत्सवप्रसंगी केली जाणारी लोकनृत्ये आहेत. नागा जमातीच्या नृत्यांतून युद्धसदृश हालचाली व शिकारीच्या कल्पना साकार होतात. पीककापणीच्या हंगामात स्त्री व पुरूष दोन रांगांमध्ये ‘खांबा लिम’नृत्य करतात. बोरोकाचारी जमातीची कृषिनृत्ये प्रसिद्ध आहेत. आसाममधील वैष्णव पंथाचे ‘अंकिया नाट’ हे धर्मविधिपर नृत्य आहे. मणिपुरीरासलीला  नृत्यातून जनजीवनातील उत्स्फूर्त आनंदच आविष्कृत होतो. लायहरोबा हा पुरातन लोकनृत्यप्रकार असून त्यात शिवपार्वतीची नृत्यमय उपासना केली जाते. ‘संकीर्तन’ ह्या धार्मिक लोकनृत्यातून पुंग−चोलम्‌ करताल−चोलम् हे प्रकार निर्माण झाले आहेत. बंगाली लोकनृत्यांत कीर्तन (कीर्तनीयाट) हा प्रकार रूढ आहे. रस्त्यावरून धार्मिक आशयाचे नृत्यगान करीत नर्तकांचा संघ जात असतो. हे नागर कीर्तन होय. बाउल गाणी खेडोपाडी गायिली जातात व त्यांवर आधारित लोकनृत्ये असतात. बंगाली जात्राहा पारंपरिक नृत्यनाट्यप्रकार असून त्याचे अनेक उपप्रकार आहेत. बिहारमधील आदिवासी संथाळ जमातीची लोकनृत्ये प्रसिद्ध आहेत. स्त्री-पुरूषांच्या समूहनृत्यांतून त्यांचे कृषिजीवन व शिकार ह्यांचे प्रतीकात्मक दर्शन घडते. ‘करमा नृत्य’ आदिवासींमध्ये विशेष प्रचलित आहे. सेराईकेला लोकांची ‘छाऊ’ (मुखवटा) नृत्ये सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची आहेत. उत्तर प्रदेशात रासलीलांप्रमाणेच नौटंकीहा पारंपरिक नृत्यनाट्यप्रकार लोकप्रिय आहे. उत्तर प्रदेशातील लोकनृत्यांवर मुस्लिम संस्कृतीचा पगडा दिसून येतो. पंजाबमधील शेतकर्यांवचे भांगडा नृत्यसाऱ्या भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. हिमाचल प्रदेशातील गद्दी जमातीची नृत्ये व महाराष्ट्रातील धनगरांची गजीनृत्ये ही फार आकर्षक असतात. दिल्ली येथे प्रतिवर्षी भरणाऱ्या लोकनृत्य−महोत्सवात गद्दी लोकनृत्याला १९५४ मध्ये राष्ट्रीय पदक मिळाले होते. महाराष्ट्रात ग्रामीण यात्राकाळात धनगरांच्या गजीनृत्याच्या स्पर्धाही आता घेतल्या जातात. लडाखी लोकांच्या धार्मिक मुखवटानृत्यातून त्यांच्या निसर्गाविषयीच्या भययुक्त श्रद्धाच प्रकट होतात. राजस्थानातील ‘घूमर’ हा सर्वांत लोकप्रिय धार्मिक नृत्यप्रकार आहे. शेखावटी प्रदेशात होळीच्या सुमारास पुरुष नर्तक ‘गींदड’ हे समूहनृत्य टिपऱ्यांच्या ठेक्यावर फेर धरून करतात. ‘खयाल’ ह्या नृत्यनाट्यप्रकाराला चारशे वर्षांची जुनी परंपरा आहे. राजस्थानातील पारंपरिक भवाई नर्तकांचे संघ भवाई नृत्यनाट्य सादर करतात. मध्य प्रदेशात आदिवासींची लोकनृत्ये विपुल आहेत. ‘करमा’ हा गोंड जमातीचा प्रमुख नृत्यप्रकार आहे. त्यांचा घोडकाठ्यांचा नाचही (घोडेनाचणी) प्रेक्षणीय असतो. गोव्यातही घोडेनाचणी नृत्य होते. बस्तरच्या माडिया आदिवासींमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्ये प्रचारात आहेत. ‘गौड’ हे वनगायींच्या नावाने ओळखले जाणारे स्त्रीपुरूषांचे समूहनृत्य असून त्यात पुरूष गायीची शिंगे व मोरपिसे डोक्याला बांधतात तर स्त्रिया डोक्यावर तांब्याचा मुकुट व गळ्यांत मण्यांच्या माळा घालतात. शेतात बी पेरल्यावर ‘बीजपुतनी’ नृत्य करतात. ओरिसामध्येही आदिवासी विपुल प्रमाणात असल्याने तिथे आदिवासी नृत्यांचे वैविध्य दिसून येते. मुडिया जमातीतील रानबैलाची शिंगे लावून केले जाणारे विवाहनृत्य आकर्षक असते. बैलाची शिंगे हे सुफलनाचे प्रतीक असून हे नृत्य सुफल-नृत्य आहे. मयुरभंज प्रदेशातील ‘छाऊ’ हे पैका जमातीचे पारंपरिक युद्धनृत्य आहे. ‘किरातार्जुन’ हे आक्रमक आणि जोशपूर्ण नृत्य आहे. गुजरातमधील गरबाहा अत्यंत लोकप्रिय नृत्यप्रकार आहे. ‘रासलीला’ व ‘कृष्णलीला’ नृत्ये प्रचलित आहेत. पुरूषांच्या ‘दांडिया रास’ या प्रकारात घुंगरू लावलेल्या काठ्यांच्या तालावर नृत्य केले जाते. ‘टिपणी’ हा श्रमिक लोकजीवनावर आधारलेला नृत्यप्रकारही वैशिष्ट्यपूर्ण आहे.


भारताच्या दाक्षिणात्य प्रदेशांतही लोकनृत्यांचे अनेक वैविध्यपूर्ण प्रकार पाहावयास मिळतात. आंध्र प्रदेशातील भटकी वंजारी वा लंबाडी जमात नृत्यांसाठी प्रसिद्ध आहे. तमिळनाडूमध्ये ‘करगम्’, ‘कुम्मी’, ‘कोलाट्टम्’ इ. नृत्ये प्रसिद्ध आहेत. करगम् हे मरिअम्माचे पूजानृत्य आहे. फुलांनी सजवलेले पितळी हंडे डोईवर घेऊन स्त्रिया हे नृत्य करतात. कुम्मी व कोलाट्टम् हे खास दाक्षिणात्य नृत्यप्रकार आहेत. कुम्मी हे विवाहप्रसंगी टाळ्यांच्या तालावर मुलींनी करावयाचे नृत्य आहे. त्यातील हातांच्या हालचाली पेरणी, कापणी इ. क्रियांशी मिळत्याजुळत्या असतात. हे सुफलन-नृत्य आहे. कोलाट्टम् म्हणजे टिपऱ्यांचा खेळ. हे समूहनृत्य हातात रंगीबेरंगी टिपऱ्या घेऊन केले जाते. ‘पिन्नल कोलाट्टम्’ हे टिपऱ्यांच्या साथीने केले जाणारे गोफनृत्य आहे.‘कुरवंजी’ हा तमिळनाडूतील कुरव या भटक्या जमातीचा खास लोकनृत्यप्रकार भरतनाट्यम्‌चा पूर्वसूरी मानला जातो. उत्तर काळात त्यावर संस्कार होऊन तो राजदरबारी नृत्यप्रकार झाला. तंजावरच्या भोसले राजांनी कुरवंजी शैलीत नृत्यनाट्ये लिहून ती दरबारात सादर केली. कर्नाटकातील काही जमातींत भूतपिशाच्चाच्या निवारणार्थ ‘भूतकोला’ सारखी लोकनृत्ये केली जातात. पिकाच्या कापणीनंतर ‘घोडानाच’ केला जातो. त्यात घोड्याचा नकली मुखवटा कमरेला बांधून नर्तक नाचतात. सुगीच्या हंगामात ‘बलाकाट’ हे कृषिनृत्य केले जाते. ‘करगा’ ह्या धर्मविधिपर नृत्यात सर्व गावकरी भाग घेतात. यक्षगान हा पारंपरिक लोकनृत्यातून उत्क्रांत झालेला नृत्यनाट्य प्रकार आहे. केरळमध्ये मोपला मुसलमानांचे ‘कोलकळी’ हे लोकनृत्य रूढ आहे. मात्र त्याबरोबर गायिली जाणारी गाणी हिंदू देवतांशी संबंधित असतात. ‘भद्रकळी’ हे धर्मविधिपर नृत्य देवळात केले जाते. ओणम् सणाच्या वेळी केरळी स्त्रिया ‘काईकोट्टिकळी’ नामक लोकनृत्य करतात. ‘वेलकळी’ हे युद्धनृत्य पद्‌मनाभ स्वामींच्या उत्सवप्रसंगी केले जाते. त्यात कौरव-पांडव युद्धांचे प्रतीकात्मक नृत्यांकन असते.

 

महाराष्ट्रातील लोकनृत्ये: महाराष्ट्राला लोकनृत्याची समृद्ध परंपरा असून, वेगवेगळ्या भागांतल्या विविध नृत्यांतून लोकसंस्कृतीचे मनोज्ञ दर्शन घडते. गौंड, भिल्ल, कातकरी, ठाकूर, कोरकू अशा आदिवासी जमातींची लोकनृत्ये निरनिराळ्या भागांत रूढ आहेत. ज्या वाद्यांच्या साथीने ती केली जातात, त्या वाद्यांच्या नावाने ती ओळखली जातात. उदा., ‘ढोलाचा नाच’, ‘तारपीचा नाच’ इत्यादी. आदिवासींमध्ये जन्म, विवाह, मृत्यू अशा प्रसंगीही नृत्ये केली जातात. भिल्ल जमातीत ‘वारी घालणे’ नामक नृत्य अंत्यविधिप्रसंगी केले जाते. ‘कडकलक्ष्मी’, ‘भगत’, ‘वीर’ ही धार्मिक लोकनृत्ये काही जमातींत रूढ आहेत. विदर्भात ‘दंडार’ हे लोकनृत्य प्रचलित आहे. दिवाळी, होळी अशा प्रसंगी दंडार नर्तकांचे संघ गावोगावी जाऊन नृत्ये करतात. महाराष्ट्राच्या सागरकिनारी भागांत कोळीनृत्याचे अनेक प्रकार रूढ आहेत. कोकणातील कुणबी समाजामध्ये गौरी−गणपतीचा ‘चेऊली नाच’ केला जातो. ‘जाखडी’ (उखाणा) या नावानेही तो ओळखला जातो. नागर समाजात ‘टिपरी’ व ‘गोफनृत्ये’ प्रचलित असून, ती दक्षिण महाराष्ट्रात व विदर्भात कोजागिरी पौर्णिमेला, तर कोकणात गोकुळाष्टमीला केली जातात. या नृत्यगीतांना कृष्णाच्या रासक्रीडांचा संदर्भ आहे. दाक्षिणात्य पिनल कोलाट्टम् व गुजरातमधील गोफगुंफन या प्रकारांशी त्यांचे साधर्म्य आहे. लेझीमहा महाराष्ट्रातील प्रमुख क्रीडाप्रधान लोकनृत्यप्रकार आहे. ह्या जोशपूर्ण पुरूषी नृत्यात लेझिमीच्या तालावर विविध आकर्षक सामूहिक नृत्यबंध साधले जातात. त्यांत कवायतसदृश हालचालींचाही अंतर्भाव होतो. दिंडी‘काला’ हे धार्मिक आशय असलेले नृत्यप्रकार आहेत. वारकरी संप्रदायात आषाढी-कार्तिकी एकादशीला दिंडी निघते. तीत वारकरी विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन टाळमृदंगांच्या साथीवर तालासुरात नाचत असतात. कोकणात काला वा दहीकाला नामक वैष्णव नृत्योत्सव असतो. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोविंदा गातनाचत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम करतात. कोकणात दशावतारी नाटक व नाशिक भागात ‘बोहाडा’ हे पारंपरिक नृत्यनाट्य अनेक वर्षे प्रचलित आहे ‘राधा’ वा ‘गौळण’ हा सर्वाधिक लोकप्रिय व कलात्मक नृत्यप्रकार होय. त्यात नर्तकाच्या व्यक्तिगत कौशल्याला खूपच वाव असतो. राधेच्या भडक व आलंकारिक वेशभूषेत तरुण मुलगा नृत्य करतो. त्याला कधीकधी संकासूर ह्या राक्षसपात्राची साथ असते. हे नृत्य साधारणपणे होळीच्या सुमारास कोकणात केले जाते. याखेरीज पौष महिन्यात गोव्यात सर्वत्र ‘धालो’ नृत्य उत्साहात केले जाते. महाराष्ट्राच्या तमाशा या लोकनाट्यप्रकारातील लावणी हा अत्यंत लोकप्रिय असा पारंपरिक गीतप्रकार असून त्यात नृत्याची लावणी महत्त्वाची असते. साभिनय नृत्यगायनाचा प्रकार म्हणजे ‘अदा’ची लावणी आता दुर्मिळ होते आहे. फडावरची नृत्यलावणी अधिक लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात स्त्रियांची पारंपरिक गीते व नृत्ये खूपच विपुल व वैविध्यपूर्ण प्रकारची आहेत. स्त्रिया मंगळागौर, गौरीपूजा, कोजागिरी, नागपंचमी अशा सण-उत्सवप्रसंगी अनेक प्रकारची पारंपरिक नृत्ये करतात. त्यांत झिम्मा, गोफ, टिपऱ्या हे प्रधान नृत्यप्रकार होत. फुगडी हा सर्वमान्य प्रकार होय. फुगडीप्रमाणेच कोंबडा, आगोटापागोटा, पिंगा, नाच गो घुमा, किस बाई किस इ. अनेक क्रीडा-नृत्यप्रकार ग्रामीण व नागर स्त्रियांमध्ये प्रचलित आहेत. मंगळागौरीच्या नृत्यांतून हे प्रकार पाहावयास मिळतात.  त्यांच्या साथीला विविध पारंपरिक स्त्रीगीते म्हटली जातात. कुणबी स्त्रियांमध्ये गौरीचा नाच प्रचलित आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक स्त्रीजीवनाचे प्रतिबिंबच ह्या लोकनृत्यांतून उमटलेले दिसून येते.

पहा :  नृत्य लोककला लोकगीते लोकसंगीत.

संदर्भ  : 1. Agarkar, A. J. Folk-Dance of Maharashtra, Bombay, 1950.

            2. Duggan, A. S. &amp Others, Folk Dance Library, 5 Vols., New York, 1948.

            3. Govt. of India, The Publications Division, Folk-Dances of India, Delhi, 1956.

            4. Marg Publications, Classical and Folk-Dances of India, Bombay. 1963.

            5. Ragini Devi, Dance Dialects of India, Delhi, 1972.

            ६. परमार, श्याम, भारतके लोकनृत्य, दिल्ली, १९७४.

 

इनामदार, श्री. दे.