कॅबरे : निशागृहात (नाइट क्लब) या उपाहारगृहातून सादर केला जाणारा एक रंजनप्रकार. कॅबरे (Cabaret) हा मूळ फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ खानावळ, उपहारगृह, मद्य मिळण्याचे स्थान अथवा सराई असा होतो. कॅसिनोसारख्या सार्वजनिक जुगारगृहातूनही नृत्यादी कार्यक्रम सादर केले जात. कॅबरेची सामान्यत: तीन वेगवेगळ्या प्रकारची आवर्तने असतात. गाणी, नृत्ये, प्रहसने, कसरतीचे खेळ यांचा कॅबरेमध्ये अंतर्भाव होतो. बेली नृत्य, स्ट्रिप्टीज, कॅनकॅन, लेंबो, ट्‌विस्ट, शेक, हूला इ. कॅबरेचे प्रमुख नृत्यप्रकार होत. निशागृहाच्या मध्यभागी रंगमंचासाठी जागा मोकळी सोडून भोवताली प्रेक्षक बसतात आणि खाद्यपदार्थांचे सेवन तसेच मद्यपान करीत करीत त्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतात.

रॉदॉल्फ सातीसने १८९९च्या सुमारास सादर केलेला ‘Chat Noir’ (इं. शी. ब्‍लॅक कॅट) हा पहिला कॅबरे होय. अमेरिकेमध्ये १९१० च्या सुमारास कॅबरेची सुरुवात झाली. रात्रीच्या खान्याच्या वेळी याचा प्रयोग केला जातो. अशा प्रकारांना ‘डॅन्सेट्स’ किंवा ‘टी डान्सेस’ म्हणतात. कालांतराने अमेकिरकेत कॅबरेचे नव्या स्वरूपात परिवर्तन होऊ लागले. त्यात शारीरिक कौशल्यापेक्षा कामुकतेचा भडक आविष्कार व उथळ अंगप्रदर्शन यांस प्राधान्य आले. कॅबरेचे मूळचे हलक्याफुलग्या रंजनाचे उद्दिष्ट मागे पडून त्याला कामवासना उद्दीपित करण्यासाठी केलेली वेशभूषा आणि अंगविक्षेप असे स्वरूप नंतर प्राप्त झाले. रंगमंचावर प्रतीकात्मक रीत्या संभोगद्दश्य दर्शविणे, हा त्यातील सर्वांत हीन प्रकार होय. त्यामुळे काही कॅबरे कायदेशीर दृष्ट्या अश्लील व आक्षेपार्ह ठरतात. अलीकडे भारतातही मोठ्या शहरांतील उपहारगृहांतून व हॉटेलांतून कॅबरे सादर केले जात आहेत.

पार्वतीकुमार वडगावकर, सुरेंद्र