ओट्टन तुळ्‌ळल नृत्य : एक दाक्षिणात्य नृत्यप्रकार. विख्यात मलयाळम् कवी ⇨ कुंचन नंप्यार (सु. १७०५ — सु. १७६५) हा ह्या नृत्यप्रकारचा जनक. ह्या नृत्याच्या उदयासंबंधी दोन आख्यायिका आहेत : पहिल्या आख्यायिकेनुसार कुंचन नंप्यार हा एका राजाच्या नृत्यपथकात असताना कथकळी नृत्याच्या एका कार्यक्रमात त्याला महत्त्वाची भूमिका न मिळाल्यामुळे त्याने हा नवा नृत्यप्रकार शोधून काढला. दुसऱ्या आख्यायिकेप्रमाणे चाक्यावर कूत्तू ह्या पारंपरिक नृत्यप्रकाराच्या एका प्रयोगात ढोलके वाजवीत असताना कुंचन नंप्यारच्या हातून काही चूक झाल्यामुळे नृत्य करणाऱ्या चाक्याराने त्याच्या अपमान केला. दुसऱ्या दिवशी तो चाक्यार नित्याप्रमाणे एका मंदिरात आपले नृत्य सादर करीत असताना त्याच मंदिराच्या अन्य भागात कुंचन नंप्यारने अत्यंत अभिनव पद्धतीचा पोषाख करून एक वेगळ्याच प्रकारचे नृत्य करण्यास आरंभ केला आणि त्यातूनच ओट्टन तुळ्‌ळल नृत्य उदयास आले.

एक नृ्त्यावस्था

ओट्टन हे मलयाळम् काव्यात वापरले जाणारे एक वृत्त. ते द्रुतगती असून त्याचे संस्कृतातील तरंगिणी वृत्ताशी बरेच साम्य आहे. तुळ्‌ळल नृत्य हे ओट्टन वृत्तात रचिलेल्या एखाद्या कथाकाव्यावर आधारलेले असते. रामायण, महाभारत  यांसारखी काव्ये आणि हिंदू पुराणकथा ह्यांतून ह्या कथाकाव्यांचे विषय घेतले जातात. तथापि अशा कथांच्या चौकटीत समकालीन सामाजिक संदर्भ आणून सामाजिक विसंगतींवर विनोदाच्या साहाय्याने नेमके बोट ठेवण्याचा प्रयत्‍न असतो. कुंचन नंप्यारने ह्या प्रकारातील सु. ६४ रचना केल्याचे सांगितले जाते तथापि अलीकडच्या संशोधनानुसार त्यांची संख्या सु. ४० ते ४५ एकढीच मानली जाते. कुंचनच्या नृत्यनाट्यातील गीतांची भाषा सर्वसामान्य माणसांची होती. पूर्वीच्या अनेक नृत्यनाटकांतून वापरल्या जाणाऱ्या संस्कृतप्रचुर मलयाळम् चा कुंचनने बुद्धिपुरस्सर त्याग केला होता. कुंचन नंप्यारनंतर आजवर अनेकांनी ह्या नृत्यप्रकारासाठी कथाकाव्ये रचिली. तथापि कुंचनच्या रचनांची त्यांना सर नाही.

मंदिरात, उघड्या मैदानावर, खासगी दालनात किंवा कोणत्याही सोयीस्कर जागी हे नृत्य सादर करता येते. हे नृत्य कोणत्या वेळी सादर करावे ह्यासंबंधी काटेकोर नियम नसले, तरी सर्वसाधारणतः त्याचे प्रयोग संध्याकाळी केले जातात आणि एक प्रयोग सु. दोन तास चालतो. ओट्टन तुळ्‌ळल नृत्याचा साचा कथकळीसारखाच आहे. मात्र त्यात लवचिकपणा बराच असतो. तथापि कथकळीप्रमाणे त्यात अनेक नर्तक नसतात. एकच नर्तक अनेक भूमिका वठवीत असतो. ह्या दृष्टीने या नृत्याचे एकपात्री प्रयोगाशी साम्य आहे. संगीतसाथीत ढोलके आणि झांजा ह्यांच्या वापर केला जातो. तसेच अनेक वेळा एखाद्या गायकाचीही योजना केलेली असते. ह्या नृत्यनाट्याला नेपथ्य नसते पडदाही नसतो.

कथकळीच्या मानाने ह्या नृत्यप्रकारातील रंगभूषा साधी असते. नर्तकाच्या चेहऱ्यावर गालांपासून हनुवटीपर्यंत एक ठळक पांढरी रेषा ओढतात. ह्या रेषेमधील चेहऱ्याचा भाग हिरव्या रंगाने रंगवितात. काळ्या रंगाने भुवया अधिक स्पष्ट केल्या जातात. डोळ्यांत काजळ घालतात. ओठांना लाली लावतात. कपाळावर गंधाच्या ठिकाणी काळ्या पांढऱ्या रेषा ओढतात. डोक्यावर अर्धगोलाकृती मुगुट असतो. त्याच्या सजावटीत विविधरंगी काचांच्या तुकड्यांचा आणि सोन्याचांदीचा उपयोग केलेला असतो. तऱ्हेतऱ्हेचे कंठे नर्तकाच्या गळ्यात घालतात. छातीवर लहानसे कवच असते. मनगटांवर कंकणे असतात. खाद्यांवर खांदपट्टे असतात. नर्तकाच्या अंगावरील वस्त्र गुडघ्यापर्यंत असून ते लाल आणि पांढऱ्या तुकड्यांचे बनविलेले असते. नर्तकाचे घुंगुर गुडघ्याच्या थोडेसे खाली बांधले जातात.

नर्तकाची रंगभूषा व शिरोभूषा

कार्यक्रमाच्या आरंभी गणेश आणि सरस्वती ह्या देवतांस आवाहन केले जाते. नर्तक प्रथम गीत गातो आणि नंतर त्यातील आशय नृत्याभिनयाच्या माध्यमातून व्यक्त करतो. त्याला आवश्यक वाटल्यास एखाद्या अन्य गायकाकडे गीतगायन तो सोपवू शकतो. विश्रांती घ्यावीशी वाटल्यास तो सरळ रंगमंचावरून निघून जातो आणि काही वेळाने परत येतो. दरम्यानच्या काळात संगीत चालूच राहते. कधीकधी नर्तक प्रेक्षकांत मिसळून त्यांना उद्देशून काही भाषण करू शकतो. एकंदरीने ह्या नृत्यनाट्याचे स्वरूप मुक्त आहे. शीतंकन तुळ्‌ळल आणि परयन् तुळ्‌ळल हे तुळ्‌ळल नृत्याचे आणखी दोन प्रकार आहेत. त्यांच्याशी संबंधित असलेली कथाकाव्ये शीतंकन आणि परयन् ह्या काव्यातील वृत्तांत रचिली जातात. ही दोन्ही वृत्ते मंदगती आहेत. हे नृत्यप्रकार फारसे प्रचलित नाहीत.

ओट्टन तुळ्‌ळल नृत्य करणारे उत्तम नर्तक आज फारसे उरलेले नाहीत. नृत्य, गायन आणि अभिनय ह्या तिन्ही कलांचे नैपुण्य त्यासाठी अपेक्षित असल्यामुळे नर्तकांची संख्या मर्यादितच राहिली. आज केरळातील मलबार रामन् नायर हे सर्वश्रेष्ठ ओट्टन तुळ्‌ळल नर्तक गणले जातात.

संदर्भ : 1. Bowers, Faubion, The Dances in India, New York, 1953.

2. Singha, Rina Massey, Reginald, Indian Dances, London, 1967.

पटवर्धन, पद्मिनीराजे