बाली नृत्य : बाली बेटावरील लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये नृत्याला, विशेषेकरून नृत्यनाट्याला (वायांग-वोंग) अनन्यसाधारण स्थान आहे. जन्म, विवाह, मृत्यूबाली नृत्य : एक आविष्कार

 यांसारख्या व्यक्तिजीवनातील घटना, तसेच मंदिरातील धार्मिक उत्सव, गावातील मेळे, जत्रा यांसारखे सार्वजनिक प्रसंग रात्रभर चालणाऱ्या नृत्यांनी साजरे करण्याची प्रथा या लोकांत आढळते. प्रचलित आख्यायिकेनुसार बाली नृत्याचा उगम इंद्र देवतेशी संबंधित असला, तरी बाली नृत्यशैलीवर हिंदू संस्कृतीचा प्रभाव अल्प प्रमाणात दिसून येतो. उलट आदिम धर्मविधींतून ही नृत्ये उगम पावली असावीत, याविषयी तज्ञांचे एकमत दिसून येते. या लोकनृत्यांमध्ये भाग घेणारे नर्तक हे प्राय: शेतकरी वर्गातील असतात जरी ते प्रशिक्षित व व्यावसायिक नर्तक नसले, तरी त्यांचे नृत्यकौशल्य वाखाणण्याजोगे असते. त्यांची नृत्ये अतिशय जोशपूर्ण असतात. 

बाली नृत्याच्या विषयांचा विस्तार आश्चर्यजनक आहे. या नृत्यांमधून रामायण,महाभारत तसेच इतर महाकाव्यांमध्ये आलेल्यादेवदेवतांच्या, वीरपुरुष – वीरांगनांच्या कथा अभिनीत केल्या जातात. या नृत्यनाट्यांमधून हिंदू अप्सरांऐवजी ‘देदोरी’(बालीनीज देवता) या नायक अर्जुनासमवेत नृत्य करतात. बाली नृत्याचे प्रमुख चार प्रकार आहेत : लेगाँग, जानगर,सांघ्यांग व केतजाक.

लेगाँग : हा अनेक शतकांपासून चालत आलेला लोकप्रिय व आकर्षक नृत्यप्रकार आहे. दोन मुली सोनेरी चमक असलेली वस्त्रे परिधान करून, फुलांनी सजवलेले मुकुट घालून व हातांत पंखे घेऊन हे नृत्य करतात. हे मूकाभिनययुक्त व गतिमान हालचाली असलेले नृत्यआहे. हे नृत्य चालू असताना एक दालांग (सूत्रधार) नृत्याच्या प्रत्येक आविष्कारावर भाष्य करत असतो. या नृत्याला प्रदीर्घ अभ्यासाची नितांत आवश्यकता असते. ‘जोगेद’ (Djoged) हा लेगाँगचाच आधुनिक आविष्कार म्हणता येईल. त्यात एक मुलगी लेगाँग शैलीमध्ये नृत्य करते व प्रेक्षकांमधील तरुण मुले नृत्यरिंगणात येऊन त्यात सहभागी होतात. नर्तक उन्मनावस्थेत गेल्यावर केल्या जाणाऱ्या लेगाँग नृत्याला ‘सांग ब्यांग’ असे नाव आहे.

जानगर : (Djanger) या लोकप्रिय नृत्यप्रकारात मुलांच्या दोन रांगा समोरासमोर बसतात व मुली चौरसाच्या राहिलेल्या दोन रांगा पूर्ण करतात. गाण्यांच्या ओळी एकामागोमाग समूहस्वरात गुणगुणतात व बसल्या जागेवरूनच हावभाव करतात. प्रत्यक्ष नृत्य चौरसाच्या आतील भागात होते. त्याचा आरंभ करणाऱ्यास ‘दाग’ असे म्हणतात.

सांघ्यांग : या नृत्यात मुली उन्मनावस्थेत नाचतात. त्यावेळी त्यांच्यामध्ये अतिमानवी शक्तींचा संचार झालेला असतो, असे मानले जाते.

 

केतजाक : या वानरनृत्यात मोठ्या संख्येने पुरुष नर्तक भाग घेतात. रामायणातील कथाप्रसंग या नृत्याचे विषय असतात.

 

यांखेरीज बाली प्रदेशात इतरही अनेक नृत्यप्रकार पहावयास मिळतात. त्यापैकी ‘गॅबॉर’ नामक नृत्यनाट्यात आठ तरुण मुली सुंदर कोन बनवणारी वळणे घेत नाचतात. ‘पेनचाक’ हे त्रुटित स्वरूपाचे नृत्यनाट्य असून त्यामध्ये आत्मसंरक्षणकलेचे नृत्यीकरण पहावयास मिळते. पण या नृत्याचे मूळ स्वरूप कालौघात पार बदलून गेलेले आहे.‘केबियार’ हा परंपरेतून आलेला पण आधुनिक नृत्यप्रकार आहे. त्यातील हालचाली लेगाँगप्रमाणेच असल्या, तरी ते अधिक पौरुषयुक्त आहे.त्याच्या बऱ्याच हालचाली बसूनच केल्या जातात. बाली द्वीपामध्ये मुखवटा-नृत्येही प्रसिद्ध आहेत. व्यक्तित्वदर्शक लाकडी मुखवट्यांनी त्या त्या भूमिकांना एक प्रकारचा जिवंतपणा येतो. उच्चकुलीन व्यक्तीसाठी पिवळा मुखवटा, रागीट चेहेऱ्यासाठी लाल रंग तसेच लोभ दर्शविण्यासाठी मोठे बटबटीत डोळे इ. संकेत कटाक्षाने पाळले जातात. ‘टोपेंग’ या नृत्यनाट्यप्रकारात दोनतीन पात्रेच वेगवेगळे मुखवटे वापरून सर्व भूमिका साकार करतात. बालींच्या राजकीय इतिहासातून वा आख्यायिकांतून या नृत्यनाट्यांसाठी विषय घेतले जातात. बालीमध्ये छायानाट्येही प्रचारात असून ती जावामधून आली असावीत.‘अर्दजा’ हा प्रणयपर संगीतिकेचा प्रकार असून त्याचे विषय बालींच्या अद्भुतरम्य ऐतिहासिक परंपरेतून घेतलेले असतात. त्यात सुंदर राजकन्या व राजपुत्र परस्परांवर अनुरक्त होऊन गातात व नाचतात. बाली नृत्यांचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अखंड परिवर्तनशीलता. त्यामुळे कोणताही एक नृत्यप्रकार स्थिर राहिल्याचे दिसत नाही. जुन्या नृत्यांची रूपे कालौघात बदलत जातात अथवा नवी नृत्यरूपे निर्माण होताना दिसतात. कित्येकदा पुरुष हे स्त्री-भूमिकेत नृत्य करतात तर स्त्रिया पुरुषांची नृत्ये करतात. बाली नृत्यांची ही विविधता व विपुलता लक्षणीय आहे.

 

या सर्व नृत्यांना तसेच कोणत्याही शुभकार्याला संपूर्णतया आघातप्रधान वाद्यांनी युक्त अशा ‘गेमलन’ संगीताची साथ असते. या वाद्यांमध्ये थाळ्यांचा व धातूंपासून बनवलेल्या अन्य वाद्यांचाही समावेश असतो.

 

संदर्भ : 1. Bowers, Faubion, Theatre in the East, New York, 1956.

            2. Zoere, Beryl de Spies,Walter, Dance and Drama in Bali, New York, 1959.

पार्वतीकुमार