गरबा : गुजरातचे प्रसिद्ध लोकनृत्य. ‘गरबी’ व ‘गरबा’ असे याचे दोन प्रकार आहेत. पुरुषांनी वर्तुळाकार उभे राहून समूहगीत गात, टाळ्या वाजवत, साध्या पदविन्यासांनी केलेले नृत्य ‘गरबी’ आणि स्त्रियांनी नाजुक अंगविक्षेपांनी केलेले नृत्य ‘गरबा’ होय. हे नृत्य प्राचीन काळापासून गुजरातमध्ये प्रचारात आहे. कृष्णाची नातसून म्हणजे बाणासुराची कन्या उषा हिने स्वत: पार्वतीकडून शिकलेले लास्यनृत्य सौराष्ट्रातील गोपींना शिकविले, अशी आख्यायिका आहे. पूर्वी नवरात्रात देवीजवळ सच्छिद्र घटात अखंड दीप लावून ठेवत. त्याला दीपगर्भघट म्हणत. दीपगर्भ शब्दातील काही वर्णांचा लोप होऊन ‘गरबा’ असा अपभ्रंश रूढ झाला असावा. हा घटदीप म्हणजे ‘गरबा’ शक्तिमातेचेच प्रतीक मानला जातो. धार्मिक विधींतून प्रारंभी हा गरबा चुंबळीच्या (इढोणी) आधाराने डोक्यावर ठेवून स्त्रिया गोलाकार उभे राहून त्याला स्पर्श न करता दोन्ही हातांनी टाळ्या व चुटक्या वाजवत अंबा, कालिका, रांदलमाँ इ. देवींची स्तुतिगीते गात वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करत. पुढे तो गरबा मध्यभागी ठेवून त्याभोवती स्त्रिया नृत्य करू लागल्या. नंतर कृष्णलीला, ऋतुवर्णने किंवा सामाजिक विषय ह्यांवर आधारलेल्या गीतरचनांवर नृत्ये होऊ लागली. टाळ्याचुटक्यांच्या ऐवजी खंजिरी, मंजिरी, दीपांच्या थाळ्या इ. साधने नृत्यामध्ये वापरली जाऊ लागली. या नृत्यात ६,८,१४ मात्रांचे ताल वाजवतात. चांगला आवाज असलेली एखादी स्त्री गाणे म्हणते व मग नृत्यात भाग घेणार्‍या इतर स्त्रिया तिचे अनुकरण करतात. गरबा हा गुजरातचा अत्यंत लोकप्रिय नृत्यगीतप्रकार आहे. समाजाच्या सर्व थरांत गरब्याची वेगवेगळी गाणी आहेत. गुजरातचे लोकजीवन ह्या गाण्यातून सर्वांगांनी व्यक्त झाले आहे. गुजरातप्रमाणेच ते राजस्थान व मध्य प्रदेशाच्या काही भागांतही प्रचलित आहे. 

पटवर्धन, पद्मिनीराजे पार्वतीकुमार

गरबानृत्य

गरबानृत्य