झवेरी भगिनीनी सादर केलेल्या 'ललना अंगार' या नृत्यप्रयोगातील राधा-कृष्ण.मणिपुरी नृत्य : एक अभिजात भारतीय नृत्यप्रकार. हे नृत्य प्रामुख्याने मणिपूर राज्यातील असून त्याच्या भौगोलिक स्थितीचा परिणाम मणिपुरी नृत्यावर स्पष्टपणे दिसून येतो. मणिपूर प्रदेशात प्रचलित असलेल्या अनेकविध स्थानिक लोकनृत्यांचा समावेश या प्रकारात होतो. नर्तकाच्या आंगिक हालचालींतून वृक्षाच्या डोलण्याचा व त्याच्या हस्तसंचालनातून मंद पवनगतीने होणाऱ्या फांद्यांच्या चलनवलनाचा भास निर्माण होतो. मेघगर्जनेने पहाडात उठणाऱ्या धीरगंभीर गडगडाटाचा जणू प्रतिध्वनी मृदंगवादनातून उमटतो. मणिपूरच्या स्वाभाविक रचनेमुळेच मुसलमानांसारख्या परकीयांचा प्रभाव मणिपुरी नृत्यावर पडू शकला नाही. परिणामतः धार्मिक भावनेवर अधिष्ठित असलेले मणिपुरी नृत्य अजूनही त्याचे ईश्वरभक्ती पर स्वरूप कायम टिकवून आहे. नृत्यकलेला भक्तीचे साधन मानून येथील पारंपरिक समाजाने तिचे जतन केले आहे. येथील जनमानसात धर्मभावना उत्कट व प्रबळ असल्याने येथील नृत्यकलेला दीर्घजीवित्व लाभले आहे. मणिपूरप्रमाणेच त्रिपुरा, आसाम, बंगाल इ. प्रदेशांतही मणिपुरी नृत्य रूढ आहे.

मणिपुरी नृत्य हे फार प्राचीन मानले जाते आणि त्याच्या प्राचीनत्वाविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एक आख्यायिका अशी : राधाकृष्णाच्या रासलीला नृत्यावरून शंकर – पार्वतीस तशा प्रकारचे नृत्य करण्याची स्फूर्ती झाली व त्यासाठी शंकराने अत्यंत रमणीय वनश्रीने युक्त अशी पर्वतरांगांच्या खोऱ्यामधली जागा निवडली. पण तो भाग संपूर्ण जलमय असल्याने पाणी वाहून जाण्यासाठी शंकराने त्रिशूळाचा प्रहार करून पर्वत फोडून भूमार्ग मोकळा केला. हे रमणीय स्थान म्हणजे मणिपूर आणि हे शंकर – पार्वतीचे रासलीला नृत्य पुढे माणसांनी आत्मसात केले. तेच लाय – हरोबा (देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी केलेले स्तवन किंवा देवांचा आनंदोत्सव) हे मणिपुरी लोकनृत्य होय, असे ही आख्यायिका सांगते.

राजा भाग्यचंद्राच्या (१७६४) आदेशानुसार गुरू रसानंद, गुरू स्वरूपानंद व गुरू काबोखुबङ्बाम यांनी अनुक्रमे महारास, वसंतरास आणि कुंजरास यांचे पुनरूज्जीवन केले, असे मानले जाते. राजा गंभीरसिंहाच्या काळात (१८२५) गुरू सेनारङ् यांनी गोपरास या प्रकाराची तर राजा चंद्रकीर्तीच्या कारकीर्दीत (सु. १८५०) गुरू सेनाचंद्रहास, ठाकुर होमायरोयबा आणि थोरानिसाबी यांनी नित्यरासची पुनर्रचना केली. आधुनिक काळात रवींद्रनाथ टोगोरांनी मणिपुरी नृत्याचा अंतर्भाव शांतिनिकेतन शिक्षणक्रमात करून (सु.१९२६) त्यास सामाजिक मान्यता व प्रतिष्ठा मिळवून दिली.

मणिपूरच्या भाविक लोकांवर गौडिया वैष्णव धर्माचा फार खोलवर परिणाम झालेला आहे. ते वैष्णव धर्मग्रंथांचा अनन्यसाधारण भक्तिपूर्वक अभ्यास करतात. वैष्णव संप्रदाय प्रस्थापित झाल्यापासून मणिपूरच्या परंपरागत नृत्यगुरूंनी अनेक पिढ्यांपासून रासलीला जतन केली एवढेच नव्हे तर त्यासाठी नवनवे प्रसंग व नवनव्या रचना शोधून काढल्या. याचे परिणामस्वरूप म्हणून रासलीला हा मणिपुरी लोकांच्या कलात्मकतेची स्वयंभू व उत्स्फूर्त निर्मिती बनलेली आहे.

आंगिक अभिनय हे मणिपुरी नृत्याचे खास वैशिष्ट्य आहे. एखाद्या विशिष्ट अंगावर भर न देता भिन्न अवयवांच्या हालचालींमधून नाजुक व लयबद्ध तोल साधला जातो.‘चाली’ व ‘भंगी’ ही केवळ मणिपुरी नृत्याची परिभाषाच आहे असे नव्हे तर त्या नृत्याचा नेमका आत्मा जाणून घेण्याची नर्तकाजवळची गुरुकल्ली आहे, असे म्हणता येईल. चाली ही मणिपुरी नृत्यातील अत्यंत पारंपरिक नृत्यरचना आहे. ही तांडव व लास्य या दोन्ही प्रकारांत केली जाते. यातून जणू मणिपुरी नृत्याचा आत्माच प्रकट होतो. नृत्यातील ‘लास्य’ म्हणजे नाजुक, सुकुमार नर्तन व ‘तांडव’ म्हणजे जोरकस, उद्धत नर्तन ही दोन्ही अंगे मणिपुरी शैलीत स्पष्टपणे दिसून येतात व ती एकमेकांशी सुसंवाद साधतील अशा तऱ्हेनेच सादर केली जातात. नर्तकाच्या कलात्मक प्रकृतिधर्मानुसार ती पुढे विकसित होतात. मणिपुरी नृत्यात लास्याचे ‘सिमितांगम्’ व ‘स्फुरितांगम्’ असे दोन प्रकार आहेत. सिमितांगम् या प्रकारातील हालचाली काव्यात्मक असून लय विलंबित असते. स्फुरितांगममधील लय द्रुत असते. तांडवाचे पुन्हा ‘गुठनम्’, ‘चलनम्’ व ‘प्रसारणम्’ असे तीन प्रकार आहेत. गुठनम् या प्रकारात गुडघे व पाय शक्य तेवढे जवळ ठेवून बसण्याच्या व उड्या मारण्याच्या हालचाली अंतर्भूत आहेत. चलनम्मध्ये गुडघे व पाय लांब ठेवून पायाच्या वरखाली होणाऱ्या हालचाली अंतर्भूत आहेत. प्रसारणम् या प्रकारात मुक्त व अतिशयोक्त हालचाली अंतर्भूत आहेत.‘भंगी परेंग’ म्हणजे भंगावली. प्रत्येक भंगावलीमध्ये अभंग, समभंग, विभंग इ. ‘भंग’ (शरीर वळवण्याच्या क्रिया) येतात. तालबद्ध व लयबद्ध हालचालींचा ओघ जेव्हा भंगकडून इतर ठिकणी असतो, तेव्हा त्याला ‘गतिभंग’ म्हणतात. तीन लास्य व दोन तांडव हे प्रकार मिळून एकूण पाच भंगी परेंग आहेत. लास्य या प्रकारात आचौबा भंगी परेंग, ब्रिन्दाबन भंगी परेंग, खुरूंबा भंगी परेंग ह्यांचा अंतर्भाव होतो. त्यांपैकी आचौबा व खुरूंबा ह्या भंगी परेंग मुख्यतः ७ मात्रांच्या राजमेल तालात तर ब्रिन्दाबन भंगी परेंग, आचौबा (त्रितीयक) या ८ मात्रांच्या तालात बांधलेल्या असतात. तंचप् (चतुरश्र जाति,एकताल, मात्रा ४) आणि मेनकुप (त्रश्रजाति, एकताल, मात्रा ६) या साध्या व मूलभूत तालांनी यांचा शेवट होतो. हे तिन्ही प्रकार सिमितांगम् ह्या लास्यप्रकारात केले जातात. तांडव प्रकारामध्ये गोष्ठ भंगी परेंग व गोष्ठ ब्रिन्दाबन भंगी या रचना मोडतात. त्या ८ मात्रांच्या तीन ताल आचौबा (त्रितीयक) या तालात बसवलेल्या असतात. लास्याप्रमाणेच त्यांचा शेवटसुद्धा तंचप् व मेनकुप या तालांमध्येच होतो. यांची लय विलंबित असून त्या गुठनम् या तांडवाच्या प्रकारात बांधलेल्या असतात.

हे ताल पारंपरिक असले, तरी त्यांच्यात नवे बदल घडवून आणण्यास, किंवा नवे तालप्रकार करण्यास नर्तकाच्या सर्जनशीलतेला पुरेपूर वाव असतो. त्यामुळे या नृत्यात सतत नावीन्यपूर्ण कल्पनांची भर पडत गेली. त्यामुळे तालभांडार संपन्न झाले. एवढेच नव्हे तर या नृत्यशैलीचे विशुद्ध रूप टिकवूनही नृत्याच्या नवनव्या हालचाली शोधून काढण्यास सर्जनशील कलावंतांना प्रवृत्त केले गेले.


सर्वसाधारणपणे ४ पासून ६८ मात्रांपर्यंत मणिपुरी ताल तयार केलेले आहेत. मात्रांच्या शक्य असणाऱ्या सर्व अदलाबदलांनी निर्माण होणाऱ्या लयींचे प्रकार अंतर्भूत असलेल्या कालबंधास ‘प्रस्तार’ असे म्हणतात. अलंकार ‘पुंग लोल’ या प्रस्तारावर बसवलेल्या नृत्याला ‘नृत्यालंकार’ असे म्हणतात आणि ते त्यांच्या तालांच्या नावांनी ओळखले जातात. उदा., ४ मात्रांचा ‘तंचप्वर’ त्याचप्रमाणे त्याच्या प्रस्तारावर आधारित नृत्याला ‘तंचप् परेंग’ म्हणतात. काही पारंपरिक व अत्यंत लोकप्रिय नृत्यालंकार खालीलप्रमाणे आहेत :

(१) तालप्रबंध : जेव्हा दोन किंवा अधिक ताल व त्यांचे नृत्यालंकार एका रचनेमध्ये योजलेले असतात, तेव्हा त्याला ‘तालप्रबंध’ असे म्हणतात. हा नृत्तप्रबंधाचाच एक प्रकार आहे.जेव्हा खालीलपैकी कोणतीही एक किंवा अनेक गोष्टी तालांच्या विविध प्रकारांत समाविष्ट केल्या जातात, तेव्हा त्याला ‘नृत्तप्रबंध’ असे म्हणतात. नृत्तप्रबंध म्हणजे ‘पुंग लोल जगोई’. याचा सर्वसाधारण अर्थ रचना किंवा प्रबंध असा होतो.

(२) तालीना : (किंवा तेलेना). निर्गीताच्या सहा प्रकारांपैकी हा एक प्रकार आहे. मृदंगाच्या तालाने सूचित केलेल्या शब्दांच्या रचनेवरील नृत्य हे विशिष्ट तल्लीनतेने गायले जाते. मणिपुरीमध्ये या अनेक शब्दरचना आहेत. त्यामध्ये दोन प्रकारे मृदंगवादन केले जाते : (१) सर्वसाधारणपणे शब्द जरी मृदंगाद्वारे सूचित केले जात असले, तरी ते शब्द काही वेळा मृदंगामधून काढले जात नाहीत. आवाजाच्या विशिष्ट परिणामासाठी वादकाला स्वतःचे तालप्रकार वापरण्याची मुभा असते. (२) यात मृदंगवादक शब्दरचनांचे काटेकोरपणे अनुसरण करतो व त्यानुसार ते मृदंगावर उमटवतो.

(३) स्वरमाला : क्लिष्ट स्वररचनेवर नृत्य केले जाते.

(४) चतुरंग : काव्य, स्वरमाला व निर्गीत यांच्या समन्वयातून हे नृत्य केले जाते.

(५) कीर्तिप्रबंध : यात काव्य, स्वरमाला व निर्गीत यांच्याद्वारे नायक – नायिकांची स्तुती केली जाते. हा बराचसा नृत्तप्रकार आहे. यात काव्य हे गायले जाते, किंवा शब्द तालात बोलले जातात (हेच मुखबोल म्हणून प्रसिद्ध आहेत). दोन्ही ठिकाणी म्हणजे गीत किंवा मुखबोलांना मृदंगाची साथ असते. पहिल्याला ‘इशैगोन्नबी’ आणि दुसऱ्याला ‘चिन्गोन्नबी’ असे म्हणतात. हे विशिष्ट रचनाप्रकार मणिपुरीमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत.

भारतीय साहित्यशास्त्रानुसार नाट्याची रूपक व उपरूपक अशा दोन भागांत विभागणी केलेली आहे. सर्वसाधारणपणे रूपक हे नाट्याचे प्रमुख स्वरूप असते, तर उपरुपक हे गौण स्वरूप असते. गोविंद संगीत लीलाविलास या मणिपुरीच्या प्रमुख आधारग्रंथात नाट्याचे रुपक व रासक असे दोन भाग कल्पिलेले आहेत. रुपक म्हणजे पुरातन नाट्य व रासक म्हणजे नृत्यनाट्य. या ग्रंथात उल्लेखिलेले प्रमुख रासक म्हणजे महारासक, मंजुरासक, नित्यरासक, निर्वेशरासक व गोपरासक हे होत. ते आता अनुक्रमे महारास, वसंतरास, नित्यरास, कुंजरास व गोष्ठ या नावांनी ओळखले जातात. भरताच्या नाट्यशास्त्रात तसेच अन्य प्राचीन ग्रंथांमध्ये रासचे तालरासक, दंडरासक व मंडलरासक अशा तीन प्रकारांमध्ये वर्णन केलेले आहे. तालरासक हे समूहनृत्य वर्तुळामध्ये टाळ्या वाजवत केले जाते. दंडरासक हे समूहनृत्यसुद्धा वर्तुळातच परंतु काठ्या (दंड) वाजवत केले जाते. मंडलरासक या समूहनृत्याचे पुढीलप्रमाणे दोन प्रकार आहेत :

(१) हल्लीसक : यात स्त्रिया वर्तुळाकार नृत्य करतात व वर्तुळाच्या मध्यभागी एक पुरूष नर्तक नृत्य करतो.

(२) रास : हा हल्लीसकचाच सुधारित प्रकार आहे. हरिवंशपुराण तसेच इतर पुराणांमध्येही हल्लीसक व रास यांचा उल्लेख आढळतो. रासचे तिन्ही प्रकार मणिपुरीमध्ये सादर केले जातात.‘खुबाक्ईशै’ हा तालरासकाचा, गोष्ठ हा दंडरासकाचा, तर वर्तुळाकार केली जाणारी सर्व नृत्ये हे मंडलरासकाचे प्रकार होत. शास्त्रे, पुराणे तसेच नृत्यावरील बहुतेक सर्व ग्रंथ यांमध्ये ‘वर्तुळामध्ये केले जाणारे समूहनृत्य’ असे रासचे वर्णन केलेले आहे. परंतु कालांतराने जेव्हा त्यामध्ये गीत व भावनांची भर पडली, त्यावेळी रासची गणना उपरुपकामध्ये होऊ लागली. धार्मिक पार्श्वभूमीमुळे रासलीलेमध्ये आत्मिक दृष्टिकोणाची भर पडते. येथे श्रीकृष्ण हा आत्मा व इतर गोपी विषयेंद्रिय बनतात. कृष्णाच्या मधुर आणि स्वर्गीय अशा बासरीवादनाने भारल्या गेल्याने गोप – गोपी त्याच्याकडे आकर्षिल्या जातात आणि त्याच्याबरोबर नृत्य करतात. रासलीला ही जणू आत्मज्ञानाची प्रक्रिया आहे. सहा भिन्न प्रसंगी सहा वेगवेगळे रास केले जातात. त्यांपैकी पहिले चार गोप – गोपींच्या समवेत कृष्णाच्या शृंकगारलीला चित्रित करतात तर शेवटचे दोन कृष्णाची साहसे व इतर गोपांसमवेतच्या विविध क्रिडा चित्रित करतात. महारास हा प्रकार कार्तिक पौर्णिमेला केला जातो. भागवतातील ‘रास पंचाध्याय’ वर हा आधारित आहे. गोपींना दिलेले रास खेळण्याचे वचन पाळण्यासाठी कृष्ण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नियोजित स्थळी येतो. बासरीच्या संगीताने भारल्या गेलेल्या राधा व इतर गोपी आपापली कामे टाकून कृष्णाला भेटायला निघतात. त्या जेव्हा कृष्णाला भेटून त्याच्याबरोबर आनंदाने नृत्य करतात, त्यावेळीच त्यांचा प्रेमभर ओसरतो. जेव्हा त्यांना आपल्या सुदैवाची जाणीव होऊन त्या गर्व व्यक्त करू लागतात. त्याक्षणी कृष्ण राधेसह अदृश्य होतो. जेव्हा राधा अभिमानाने स्वतःला इतरांपेक्षा अधिक भाग्यवान समजते, तेव्हा कृष्ण राधेजवळूनसुद्धा अदृश्य होतो. गोपी बेचैन होऊन पुन्हा दृश्यस्वरूप घेण्यासाठी कृष्णाची प्रार्थना करतात. कृष्णाला शोधताना त्या झाडे, पक्षी, प्राणी यांची मदतीसाठी मनःपूर्वक याचना करतात, तर राधा रडत रडत कृष्णाला शोधत वाट फुटेल तिकडे हिंडताना दिसते. हा विरह त्यांचा अभिमान नष्ट करतो व कृष्ण एकत्व सोडून अनेकत्वाने पुन्हा प्रकट होतो. ह्या ठिकाणी जितक्या गोपी तितकेच कृष्ण असतात व सर्वजण एका धुंद अवस्थेत रास खेळतात. शेवटी कृष्ण राधेला व इतर गोपींना त्यांनी आपापल्या घरी जावे, असे सूचित करतो.


वसंतरास : हा चैत्र पौर्णिमेला केला जातो. कृष्ण, राधा व तिच्या मैत्रिणी होलिकोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमतात. कृष्ण चंद्राबलीशी नृत्य करून संपूर्ण लक्ष तिच्यावर केंद्रीत करतो. राधा अस्वस्थ होते व अपमानाच्या जाणिवेने कृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक असलेली निळी यवनिका (ओढणी) दूर करून रासमंडल सोडते. ती निळी यवनिका सापडताच कृष्णाला राधेच्या क्रोधाची जाणीव होते व तो चंद्राबलीला सोडून राधेजवळ येतो. जेव्हा कृष्णाला राधा सापडते, तेव्हा ती त्याची भेट घेण्याचे नाकारते. कृष्ण चतुरपणे तिची क्षमा मागून तिला जिंकून घेतो. सर्वजण स्वर्गीय आनंदात नृत्य करतात. शेवटी कृष्णाच्या विनंतीनुसार राधा व इतर गोपी किंचित नाखुशीनेच आपापल्या घरी परततात. या राससाठी गीतगोविंदमधील बहुधा सर्व पदे घेतात, तसेच काही बंगाली भाषांतरेदेखील घेण्याचा प्रघात आहे.

कुंजरास : हा प्रकार आश्विन अष्टमीला केला जातो. अभिसार व रास संपल्यानंतर कृष्ण व राधा आपापल्या आवडत्या मित्रमैत्रिणींसह कुंजांमध्ये परततात.

नित्यरास : ही नंतरची अवस्था असून यात केवळ अभिसार व रास यांचाच समावेश आहे. हा रास कोणत्याही प्रसंगी केला जातो.

गोपरास किंवा गोष्ठ : कृष्ण – बलरामांना गोपालाचे काम करण्यास नारद शिकवतो. गोपालांच्या विनंतीनुसार नंद व यशोदा हे कृष्ण – बलरामांना गाई राखण्यासाठी पाठवतात. कृष्ण – बलराम व गोपाल वृंदावनात आनंदाने नृत्य करतात. कंदूकक्रीडा करतात. भूक लागताच ताडवनामध्ये जाऊन रानटीपणाने झाडे हलवून ते खाली पडलेली फळे खातात. या ताडवनावर प्रभुत्व असलेला धेनुकासुर हा राक्षस रागाने गोपालांना वनाबाहेर हुसकावण्याचा प्रयत्नन करतो. बलराम ताडवन सोडण्याचे नाकारतो व दीर्घ युद्धानंतर धेनुकासुराचा वध करतो. नंतर पुन्हा जेव्हा गोपाल वृंदावनात खेळू लागतात, तेव्हा बकासुर त्यांना आव्हान देतो व त्याला कृष्ण प्रत्युत्तर देतो. त्याच्याशी युद्ध करून त्याला ठार मारतो. शेवटी दुष्ट प्रवृत्तीचा विनाश करून कृष्ण – बलराम आपल्या घरी परततात.

उत्खलरास : कृष्णाच्या बालपणातील प्रसंग हे या रासचे प्रमुख विषय असतात. कृष्ण इतर गोपांसमवेत दही – लोणी चोरून त्रस्त गोपींना चिडवतो. वैतागलेल्या गोपी यशोदेकडे तक्रार घेऊन येतात. यशोदा कृष्णाला उखळाला बांधून ठेवते, पण कृष्ण उखळासकट पळून जातो. दोन झाडांच्या मधून जबरदस्तीने जात असताना तो आपली सुटका करून घेतो.

बहुतेक परंपरागत नृत्यप्रसंग व रचना या त्यांच्या मूळ स्वरूपातच ठेवलेल्या आहेत. रासलीलेतील कथांचा क्रम हा काटेकोरपणे पाळला जात असला, तरीसुद्धा स्वतःचे नृत्य – संगीताचे तुकडे वापरण्यास त्याचप्रमाणे भावनात्मक अंगाचे अर्थ लावण्यास दिग्दर्शकाला संपूर्ण मुभा असते. नृत्त, नृत्य व नाट्य या तिन्ही प्रकारांचे मणिपुरी रासलीलेत सौंदर्यपूर्ण, कलात्मक मिश्रण झालेले आढळते.[⟶ रासलीला नृत्य].

रासलीलांशिवाय अन्य नृत्यनाट्यांपैकी भारतयुद्ध हे महाभारतावर आधारित व लंकाकांड हे रामायणावर आधारित असून ही नृत्य नाट्ये काचार जिल्ह्यामध्ये अधिक प्रसिद्ध आहेत. स्थानिक लोककथांवर आधारित नृत्यनाट्येही सादर केली जातात. वैष्णव रासलीलेच्या निर्मितीपूर्वीही रासचे अन्य प्रकार मणिपुरीमध्ये अस्तित्वात होते.

लाय – हरोबा : विश्वाच्या पुरातन तत्त्वज्ञानाचे दर्शन घडवणारा ‘लाय – हरोबा’ हा सर्वांत महत्त्वाचा नृत्यप्रकार आहे. सात देव देवतांनी हे विश्व कसे निर्माण केले याचे वर्णन ‘लायसेम जगोई’ या लाय – हरोबाच्या एका प्रकारातून केलेले आहे. लास्यशैलीतील तीन नृत्ये व तांडवशैलीतील तीन नृत्ये अशा एकूण सहा नृत्यांचा मिळून हा नृत्यप्रकार बनलेला आहे. ‘लाय्नेतत जगोई’, ‘लायताय् जगोई’, ‘नोङ्दाय जगोई’ ही लास्यशैलीमधील तर ‘लाय्पोेक् पोकूपा’, ‘लायहोंबा’ व ‘पिबा’ ही तांडवशैलीतील नृत्ये आहेत. देवदेवतांनी केलेल्या मनुष्यजातीच्या निर्मितीविषयीच्या व स्थितीविषयीच्या नृत्याला ‘लाय्‍बो जगोई’ असे म्हणतात. हाही लाय – हरोबाचाच अन्य प्रकार आहे. चक्‍पा जगोई, नायति जगोई आणि मैरंग जगोई हे याचे तीन प्रकार आहेत.‘नङ्पोकनिङ्थौ’ व ‘पान्थोायबी’ या रासच्या प्रकारांत देवदेवतांचे प्रेम वर्णिलेले असते.

सप्तप्रदक्षिणानर्तन : हे नृत्य लग्न प्रसंगी केले जाते. मंडपामध्ये सप्तपदीच्या वेळी नर्तन करणाऱ्या मुली हातात फुले व वरमाला घेऊन नवरदेवाच्या भोवती गोल फिरतात. वरमाला घालताना वधूपक्ष वधूच्या रूपाचे वर्णन करतो. इतर सखी गीताची पुनरूक्ती करतात. मृदंगाचा ध्वनी उठतो, एकाच वेळी तीस – चाळीस करतालांचा झंकार उठतो. संपूर्ण मंडप गीत, नर्तन, मृदंग तथा करतालांच्या मधुर ध्वनीने गर्जून उठतो. दिव्यांच्या प्रकाशात झगमगाट करणारी वेशभूषा, संथ अंगचलन करणाऱ्या नर्तकी, त्यांचा मधुर नुपुररव, सुरेल संगीतस्वर, मृदंग व करतालांचा गंभीर नाद या सर्वांचे मिळून एक अद्भुत लग्नऱचित्र निर्माण होते.

थांग – हाईबा : पूर्वी लढाईवर जाताना मणिपुरी लोक तलवार – नृत्य करीत. यालाच ‘थांग – हाईबा’ म्हणतात.‘थांग’ म्हणजे तलवार व ‘हाईबा’ म्हणजे फिरवणे. आता तलवारीने लढाईस जाण्याचे प्रसंग राहिलेले नसले तरी, हल्ली हे नृत्य शंकराच्या उत्सवप्रसंगी शिवमंदिरात होते. थांग – हाईबामध्ये तलवारबाजीचे अटपटे डाव नर्तनाद्वारे प्रकट केले जातात. यावर संपूर्ण प्रभुत्व मिळविण्यासाठी अनेक वर्षांच्या साधनेची आवश्यकता असते. भाला नृत्य या अशाच एका खुमासदार प्रकारात जेव्हा एक मोठा समूह त्याच्या विशिष्ट वेशभूषेत सज्ज् होऊन नर्तन करतो, तेव्हा ते संपूर्ण दृश्य फारच चित्ताकर्षक वाटते.


संकीर्तन : मणिपूरच्या कलात्मक विश्वामध्ये रासलीलेइतके महत्त्व असलेला ‘संकीर्तन’ हा नृत्यप्रकारही प्रचलित आहे. देवाच्या पूजाविधीच्या किंवा सामूहिक प्रार्थनेच्या रूपात असलेला संकीर्तन हा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक नृत्याविष्कार आहे. मणिपुरी नृत्यप्रकारांतील धार्मिक आविष्कारांवर वैष्णव संप्रदायाच्या बरोबरीनेच बंगालचाही परिणाम झालेला आढळतो.‘करताल चोलम्’ व ‘पुंग चोलम्’ यांसारख्या अतिशय कठीण नृत्यप्रकारांचा समावेश असलेला संकीर्तन हा एक अनन्यसाधारण नृत्यप्रकार आहे. संकीर्तन हे जवळजवळ वर्षभर विविध सामाजिक प्रसंगी – जन्म, मृत्यू, विवाहादी प्रसंगी – तसेच राधाकृष्णाच्या चरित्रकथा व आख्यायिका यांच्याशी संबंधित अशा सर्व महत्त्वपूर्ण धार्मिक प्रसंगीही केले जाते. रासलीलेची प्रस्तावना म्हणूनही संकीर्तनाचा उपयोग होतो. परंपरेनुसार संकीर्तनाच्या प्रयोगात नृत्य व त्याची रचना, दिग्दर्शन, गीत, संगीत, ताल, लय, वेशभूषा इ. विषयींच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. करताल चोलम्मध्ये मूळ स्थानामध्ये हातात झांजा घेऊन नर्तक उभे असतात आणि नंतर ‘करताल मारोल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मृदंगाने उमटवलेले बोल त्याच लयीत झांजांवर वाजवले जातात. मृदंगाच्या प्रत्येक अक्षराला झांजा वाजवण्याची विशिष्ट पद्धत ही निश्चित केलेली असते. चाल, ताल व गीतांमध्ये व्यक्त झालेल्या भावना यांनुसार नृत्याच्या हालचाली असतात. या हालचाली पुरूषी किंवा जोरदार असल्या, तरी कर्कश नसतात. हत्ती, हंस, बगळा, मोर व खंजन (काळी चिमणी) इ. पशुपक्ष्यांच्या विविध गतींचे अनुकरण करीत नर्तक पुढे – मागे फिरतो. पुंग चोलम् किंवा ढोलनृत्य ही मणिपूरची अनन्यसाधारण निर्मिती आहे. यामध्ये नर्तक स्वतः नृत्य करीत असताना मृदंग वाजवतो. नर्तकाचे उभे राहण्याचे स्थान, हालचाली यांबाबतीत करताल चोलम्मध्ये व या नृत्यात साम्य असले तरी यात नर्तकाला हालचालीचे अधिक स्वातंत्र्य असते. प्रसंगी हे नृत्य कसरतयुक्त भासले, तरीही ह्याला तोल व तालाची सूक्ष्म जाण असावी लागते. पुंग चोलम् हे मोठ्या समूहाने केले जात असून त्यामध्ये नृत्यात्म हालचालींचे वैविध्य आणि उत्सवाचे आनंदमय वातावरण निर्माण करण्याची क्षमता आहे. मनाला आकर्षित करणारे निसर्गाचे अनुकरण त्यात असते. विजांचा कडकडाट, वादळ, पक्ष्यांचे – जनावरांचे आवाज इ. नैसर्गिक आवाजांचेही मृदंगामध्ये अनुकरण असते व नर्तक ते योग्य नृत्य – आविर्भावांतून सुचवतो.

प्रत्येक गावात दोन ते तीन देवळे असतात व यातील पटमंडपात रासलीला केल्या जातात. देवळाच्या मध्यभागी (रंगस्थळ) नृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली असते. या रंगणाचा आकार आवश्यकतेनुसार कमीअधिक केला जातो. फुले, वेली तसेच कागदांच्या नक्षींनी रंगस्थळ सजवलेले असते. रंगमंच, प्रेक्षागृह, सजावट व बैठकीच्या रचना यांबाबत त्यांचे परंपरागत रीतिरिवाज आहेत. नटमंडपाला वारा खांबांनी आधार दिलेला असतो. खांबांच्या मधल्या भागात जिथे रासलीला केली जाते, तिला ‘रासमंडप’ असे म्हणतात. रासमंडपामध्ये लाकडी पट्ट्यांनी बनवलेला वर्तुळाकार रंगमंच असतो. वातावरणनिर्मितीसाठी भुसा भरलेली जनावरे तसेच पक्षी रासमंडपात ठेवलेले असतात. रासलीला चालू असताना फुलांचा वर्षाव होत असतो. गोविंदजी या दैवताला रासलीला अर्पण करण्यासाठी म्हणून ज्येष्ठ पुजारी पूजा करतो. चंदन, पान, सुपारी इ.गोष्टींनी प्रेक्षकांचे स्वागत केले जाते.

प्रथम ‘मंडप – मापु’ (अध्यक्ष) श्लोक म्हणतो व नंतर ‘नटपाल’ (झांजा घेऊन नृत्य करणाऱ्यांचा समूह) स्तुती म्हणतात. यांच्या साथीला शंखसुद्धा असतो. रासधारी मृदंगावर काही पारंपरिक प्राथमिक बोल वाजवतो व सूत्रधार रागाचे आलाप गातो. यानंतर गुरूवंदना, वैष्णववंदना (प्रेक्षकांना वंदन) व वृंदावनवर्णन केले जाते. या सर्व पूर्वतयारीनंतर सूर्यास्ताला रासलीला सुरू होते व सूर्योदयाबरोबर संपते. राधाकृष्णाच्या तसेच मणिपुरी नृत्याच्या आश्रयदात्या देवांच्या भक्तीने प्रेरित होऊन स्त्रीपुरूष रासलीला नाचतात व प्रेक्षकांना धार्मिक वातावरणात नेऊन सोडतात, त्यावेळी कोणालाही स्थळकाळाचे भान राहत नाही.

रासलीलेत वापरले जाणारे संगीत हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित असून अत्यंत बोलके असते. ते सूक्ष्म भावना व संवेदना समर्थपणे व्यक्त करू शकते. मुरली, शंख, इसराज, लहान झांजा, मृदंग इ. वाद्यांची या संगीताला साथ असते. जयदेव, चंडीदास, गोविंददास, ज्ञानदास इ. महान भक्तकवींनी पदे लिहिलेली आहेत. या पदांमध्ये शृंचगारिक भावदेखील अत्यंत उदात्त पातळीवर दाखविले जातात. मणिपुरी नर्तकांच्या भावभिव्यक्तीच्या पद्धतीमुळे संपूर्ण नृत्यातील सात्विक वातावरण अबाधित राखले जाते. ही पदे संस्कृत, मैथिली, ब्रजबुली आणि मेईथेई या भाषांत लिहिलेली असून, ती त्यांच्या संपन्न काव्यात्मक आशयामुळे अनन्यसाधारण ठरली आहेत. या नृत्याची पाठ्यपुस्तके म्हणून प्रामुख्याने गोविंद संगीत लीलाविलास, कृष्णरससंगीत उज्ज्वलनीलमणी ही पुस्तके वापरली जातात.

मणिपुरी नृत्यामध्ये वापरली जाणारी वेशभूषा व अलंकार अत्यंत आकर्षक व कलात्मक असतात. त्यांच्यायोगे नृत्याच्या हालचालींतील सौदर्यात तसेच त्याच्या नाजुक ठेवणीत मोलीची भर पडते. राधा – कृष्ण व गोपींसारख्या व्यक्तिरेखांच्या संपन्नतेला व सात्त्विकतेला त्यायोगे उठाव येतो.‘आबलां’ नी (आरशाच्या तुकड्यांनी) भरतकाम केलेला कडक गोल परकर राधा व गोपी घालतात.त्याच्यावर दुसरा एक नाजुक व सूक्ष्म भरतकाम केलेला परकर असतो व पारदर्शक यवनिका असते. कृष्ण अतिशय किमती व सजवलेला मुकुट घालतो. सर्व पात्रे अलौकिक वातावरणनिर्मितीस पोषक असे अलंकार व शोभिवंत पोषाख परिधान करतात.

मणिपुरी संप्रदायातील प्रमुख नृत्यगुरूंमध्ये स्वरूपानंद, रसानंद, थोरानिसाबी, कान्हार शर्मा, अमुबी सिंग, बिपिन सिंग, नादिया सिंग, सिंघजीत राजकुमार, सुरेंद्र सिन्हा, देवेंद्र सिन्हा इत्यादींचा अंतर्भाव होतो. झवेरी भगिनी, कलावती सिंग, सविता मेहता इ. ज्येष्ठ व प्रख्यात नर्तकी होत. इंफाळमधील ‘जवाहरलाल नेहरू मणिपुरी डान्स अकॅडमी’ व ‘गोविंदजी नर्तनालय’ या संस्थांमधून मणिपुरीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाते. 

संदर्भ : 1. Bhavnani, Enakshi, The Dance in India, Bombay, 1965.

            2. Bowers, Faubion, The Dance in India, New York, 1953.

            3. Marg Publications, Classical and Folk Dances of India, Bombay, 1963.

            4. Singha, Rina Massey, Reginald, Indian Dances, London, 1967.


'रामलीला' नृत्यनाटकातील एका दृश्यात पारंपारिक वेशभूषेतील कृष्ण ( दर्शना झवेरी) आणि राधा ( सुवर्णा झवेरी)

मणिपुरी रासनृत्यातील एक दृश्य

मृदंग वाजवून केला जाणारा 'पुंग चोलाम' नृत्यप्रकार

मणिपुरी रास शतैकी

मधुबनी शैलीतील राधा-कृष्ण

पारंपारिक शैलीबद्ध देवता-चित्रण

पार्वतीकुमार