मागील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हिमाचल प्रदेश : या प्रदेशातील लोकनृत्यांची लय सामान्यपणे संथ असते व साथीचे संगीत मृदू व हेलांच्या स्वरूपाचे असते. धार्मिक जत्रा व विविध ऋतुमानातील उत्सवप्रसंगी हे लोक एकत्र जमतात व नाचगाण्याचा आनंद घेतात. दशहराउत्सवात राम-लक्ष्मण आणि रावण यांतील युद्धनृत्य हा त्यांच्या समूह नृत्याचा उत्कृष्ट आविष्कार होय. ‘सांगला’ हे त्याच प्रदेशातील स्त्री-पुरुषांचे संमिश्रनृत्य स्थानिक देवतेला प्रसन्न करण्यासाठी करतात. या नृत्याचे‘बक्यांग’, ‘दक्यांग’ व‘क्यांग’ हे तीन प्रकार आहेत. चंबा येथील स्त्रीपुरुषांचे ‘झांझर’ हे संयुक्त नृत्य आहे. ‘गद्दी’ (धनगर) जमातीची धनगरनृत्ये फार आकर्षक व सुंदर असतात. तालबद्ध पदन्यास, अचूक सांघिककृती व आकर्षक हालचाली ही त्यांची वैशिष्ट्ये होत. ढोलांच्या साथीवर ते समूहस्वरात गातात व फेर धरून नाचतात. दिल्ली येथे प्रतिवर्षी प्रजासत्ताकदिनी भरणाऱ्या लोकनृत्य महोत्सवात गद्दीनर्तक संघाच्या लोकनृत्याला १९५४ मध्ये राष्ट्रीय पदक मिळाले होते.
काश्मीर : काश्मीरी लोकगीतातूंन जनजीवनातील साध्यासुध्या भावनाव् यक्त केल्या जातात. घड्यांवर धरलेला तालसंगीत साथीला असतो. लोकनृत्य हे मूलतः लोकगीताच्या परिपूर्तीसाठीच अवतरते. हातांनी टाळ्या वाजवून तालधरला जातो आणि या वाद्यमेळाची लय नर्तकांच्या हालचालींतून पकडली जाते. भौगोलिक परिसराचा परिणाम लोकनृत्यांवर आढळतो. ‘रोफ’ (रूफ) या स्त्रियांच्या नृत्याची लय संथ असते. सणसमारंभाच्या वेळी, तसेच पीक कापणीच्या हंगामात हे नृत्य केले जाते. नर्तकींच्या दोन रांगा समोरासमोर उभ्या असतात. एकमेकींच्या गळ्यात हात टाकून त्यामागे पुढे झुलत राहतात. साथीला असणारी गाणी साधीसुधी पण सुरेल असतात. त्यात वाद्ये नसतात. ‘हिकात’ हा तरुण मुलामुलींचा रंजनपर नृत्यप्रकार आहे. ‘बचनगमा’ हा तरुण मुलांचा खास नृत्यप्रकार आहे. लडाखी लोकांच्या मुखवटा-नृत्यातून त्यांच्या निसर्गा विषयीच्या भययुक्त श्रद्धाच प्रकट होतात. या नृत्याला धर्मविधीयुक्त स्वरूप असते व वाईटावर चांगल्याने मिळवलेला विजय त्यातून प्रतिबिंबित होतो. जम्मू प्रदेशातील डोग्रांची भांगडा नृत्ये आवेशपूर्ण व जोमदार असतात.
राजस्थान : राजस्थानातील लोकसंस्कृतीची परंपरा समृद्ध आहे. त्यामुळे तेथील लोकनृत्येही संपन्न आहेत. ‘घूमर’ हा सर्वांत लोकप्रिय नृत्यप्रकार. हे मूलतः धार्मिक नृत्य असून ते नवरात्रीमध्ये वा गणगौरउत्सवात केले जाते. त्यात पुरुषांबरोबर स्त्रिया मुक्तपणे भाग घेतात. उल्हासाच्या आनंददायक वातावरणात हे नृत्य केले जाते. त्यातील हालचाली साध्यासुध्या व डौलदार असतात. पूर्व राजस्थानातील शेखावटी प्रदेशात ‘गींदड’ हे समूहनृत्य लोकप्रिय आहे. होळीच्या सुमारास सर्वजातिधर्मांचे लोक एकत्र येऊन हे नृत्य करतात. हे फक्त पुरुषांचे, टिपऱ्यांच्या ठेक्यावर फेर धरून करावयाचे नृत्य आहे. ‘खयाल’ हा नृत्यनाट्याचा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार रूढ असून, त्याला चारशे वर्षांची अखंड परंपरा आहे. ही नृत्ये व्यावसायिक लोकनर्तकांच्या संचाकडून केली जातात. हा रंजनप्रकार दूरवरच्या खेड्यापाड्यांतूनही पोहोचला आहे. ‘भवाई’ ही राजस्थानातील नर्तकांची एक पारंपारिक जमात आहे. ⇨ भवाई नृत्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हालचालींतील वैविध्य व गतिमानता. या नृत्यात स्त्रिया भाग घेत नाहीत. स्त्रियांच्या भूमिका तरुण मुलेच करतात. लोकतंत्राचे नीटनेटके स्वरूप त्यातून पहावयास मिळते. खेड्यातील दैनंदिन जनजीवन, धोल व मारूयांच्यातील प्रणयकथा, ऐतिहासिक व पारंपारिक घटना हे या नृत्यांचे सामान्यपणे विषय होत. भवाई नर्तक ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करून त्यावर उदरनिर्वाह करतात. पावसाळ्यानंतर आठ महिने ते दौरे काढतात. मारवाड कठपुतली नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. कठपुतलीवाला बाहुल्या नाचवतो व त्याची पत्नी ढोलक वाजवून कथा गाऊन दाखवते. हे कठपुतलीवाले ही उदरनिर्वाहासाठी दूरवर प्रवास करतात. [→ कळसूत्री बाहुल्यांचा खेळ]. सिद्ध जाटांच्या जमातीत गुरूजसनाथाच्या स्मृतिप्रीत्यर्थ भरणाऱ्या मेळ्यामध्ये अग्निनृत्य करण्याची प्रथा आहे. भिल्लांच्या जमातीमध्ये ही अनेक प्रकारची समूहनृत्ये प्रचलित आहेत. विवाह वा अन्य उत्सवप्रसंगी घूमर हे स्त्री पुरुषांचे नृत्य केले जाते. होळीच्या उत्सवात पुरुष टिपऱ्यांसारख्या काठ्यांचा ताल धरून ‘गैर’ हे जोरदार व जोषपूर्ण नृत्य करतात. गैर व घूमर या नृत्यांची वैशिष्ट्ये एकत्रित असणारा ‘घुमरा’हा अत्यंत आकर्षक भिल्लनृत्याचा प्रकार आहे. ‘शंकरिया’ व‘पाणिहारी’ ही गारुडी जमातीची पारंपारिक नृत्ये होत. ‘कच्छी घोडी’ हेही एक उल्लेखनीय लोकनृत्य आहे. हातांत नकली ढाल-तलवार घेऊन पुरुष नकली घोडी नाचवत लुटूपुटीच्या लढाया खेळतात.
मध्य प्रदेश : मध्यप्रदेशातील आदिवासींची लोकनृत्ये समृद्ध व वैविध्यपूर्ण आहेत. आदिवासी गोंड जमातीचा ‘करमा’ हा प्रमुख नृत्यप्रकार आहे. तो त्या उत्सवाचाच एक भाग असतो. स्त्रीपुरुष रिंगणाकृती, चौरसाकृती नृत्यबंध निर्माण करीत नाचतात. नृत्य चालू असतानाच काही नर्तक दुसऱ्या नर्तकांच्या खांद्यावर आरूढ होतात व ही दुमजली रांग ढोलाच्या व स्त्रियांच्या टाळ्यांच्या तालावर लयबद्ध नृत्य हालचाली करते. पुढे खांद्यावरचे नर्तक खाली उतरून नृत्याच्या रिंगणात सहभागी होतात. गोंडांनी आपल्या प्रणय परव सामाजिक विषयांवरील गीतांना अनुरूप असे नृत्यप्रकार निर्माण केले आहेत. गोंड लोक जंगलातील अंतर पार करण्याकरिता घोडकाठ्यांचा (स्टिल्ट) वापर करतात. त्यांची या घोडकाठ्यांची नृत्ये प्रेक्षणीय असतात. बस्तरच्या माडिया आदिवासी जमातीमध्ये ही अनेक वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्ये प्रचारात आहेत. ‘गौड’ हे स्त्रीपुरुषांचे संमिश्रनृत्य आहे. गौड हे वनगायीचे नाव या नृत्याला मिळाले आहे. या नृत्यात पुरुष गायीची शिंगे व मोरपिसे डोक्याला बांधतात. स्त्रिया डोक्यावर तांब्याचा मुकुट व गळ्यात मण्यांच्या माळा घालतात. नर्तक बैलांच्या टकरीचा, तर नर्तकी गायींचा कळप हाकण्याचा अभिनय करतात. भाद्रपदाच्या पौर्णिमेला ‘नवाराणी’, तर माघ व चैत्र महिन्यांत ‘देवारी’ आणि ‘चैतदंडा’ नृत्ये केली जातात. शेतात बी पेरल्यावर ‘बीजपुतनी’ नृत्य करतात. वर्षा देवतेच्या उपासनेसाठी ‘गोंचा’ नृत्य रात्रभर केले जाते. ‘लक्ष्मीजागर’ हे अविवाहित तरुण तरुणींचे नृत्य आहे. बंजारा जमातीतील ‘लांगी’ हे उत्सवप्रसंगी केले जाणारे वीरनृत्य आहे. या जमातीतील स्त्रियांचा‘लोटा’ हा नृत्यप्रकार उल्लेखनीय आहे.
ओरिसा : ओरिसामध्येही आदिवासी लोक विपुल प्रमाणात असल्याने, त्यांचे विविध नृत्यप्रकार पहावयास मिळतात. गदाबा, जुआंग, खोंड, गोंड, बैगा, साओराइ. आदिवासी जमातींची नृत्ये वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मुडिया जमातीतील रानबैलांची शिंगे लावून केलेले विवाहनृत्य हे आकर्षक असते. मयुरभंज प्रदेशातील ‘छाऊ’ हे पैका जमातीचे पारंपारिक युद्धनृत्य आहे. पैकाजमातीत ‘किरातार्जुन’ हे आक्रमक व जोशपूर्ण नृत्य आहे. गरुडवाहन, मायाशावरीही नृत्येही केली जातात. ‘करमा’ हे आदिवासी नृत्यदेवतेच्या आराधनेचे असून ते मयुरभंज प्रदेशात पहावयास मिळते. भूमिया जमातीत बुरूबोंगा देवतेच्या उपासनेसाठी जदुर नृत्य केले जाते.
गुजरात : ⇨ गरबा हा गुजरातमधील अत्यंत लोकप्रिय नृत्यप्रकार आहे. नवरात्रीच्या उत्सवात गरबाचे प्रतीक असलेला मृत्तिका घट घरोघरी पुजला जातो. या सच्छिद्र घटामध्ये दीप ठेवलेला असतो. हा दीपगर्भ घट डोक्यावर घेऊन खेड्यातील स्त्रिया घरोघरी जातात व त्या त्या घरात पुजलेल्या घटाभोवती फेर धरून नाचतात. घरातील स्त्रिया प्रथम गाण्याची पहिली ओळ म्हणतात आणि बाकीच्या स्त्रिया त्यांना साथ देतात. तसेच त्या टाळ्या वाजवून ठेकाही धरतात. नृत्यातील पदन्यास लयबद्ध व विलोभनीय असतात. पुरुष ‘गरबी’ हे नृत्य करतात. गुजरातमध्ये रासलीला व कृष्णलीला ही नृत्येही प्रचलित आहेत. पुरुषही त्यात भाग घेतात. पुरुषांच्या ‘दंडियारास’ या नृत्यात घुंगरू लावलेल्या काठ्यांचा वापर केला जातो. ‘टिपणी’ हा श्रमिक लोकजीवनावर आधारलेला नृत्यप्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. जुन्या पद्धतीच्या घराच्या बांधकामामध्ये जमीन ठोकून एकसारखी केली जाते, त्या क्रियेवर हे लोकनृत्य आधारलेले आहे. कोळी स्त्रिया हातात ‘टिपणी’ (तळाला सपाट लाकडी बैठक व शिरोभागी घुंगरू बांधलेली लांब काठी) घेऊन, काल्पनिक जमीन तयार करण्याच्या आविर्भावात वर्तुळाकार व अर्धवर्तुळाकार गतीमध्ये हे समूहनृत्य करतात. त्यांच्या हालचाली एकाच लयीत होतात.
आंध्र प्रदेश : येथील अभिजात नृत्यशैलींची परंपरा जशी समृद्ध आहे, तशीच लोकनृत्यांचीही आहे. कूचिपूडी, यक्षगान हे येथील तंत्रशुद्ध व अभिजात नृत्यप्रकार होत. आंध्रप्रदेशातील भटकी वंजारी वा लंबाडी जमात नृत्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक स्त्रीला नृत्यात भाग घ्यावाच लागतो. त्याशिवाय ती विवाहास पात्र ठरत नाही. होळीसारख्या उत्सवप्रसंगी स्त्रीपुरुष वर्तुळाकार लयीमध्ये नृत्य करतात. मध्यभागी अग्नी प्रज्वलित केलेला असतो. या वर्तुळामध्ये रती व मदन यांच्या मृत्तिकामूर्ती स्थापून त्या भोवती साध्या परंतु आकर्षक लयीत नृत्य केले जाते. सिद्दीजमातीतील युद्धनृत्यातून आफ्रिकन आदिवासी नृत्याचे अवशेष आढळून येतात. डप्पूवाद्यावर केले जाणारे ‘डप्पू’ लोकनृत्यही प्रसिद्ध आहे. चेंचू जमातीतील स्त्रियांची नृत्ये आकर्षक असतात. ‘मथुरी’ हे स्त्रीपुरुषांचे संमिश्र नृत्य आहे. टिपऱ्यांच्या व टाळ्यांच्या तालावर ते केले जाते. तेलंगणप्रदेशातील स्त्रिया ‘बतकम्मा’ हे उत्सवपर नृत्य करतात. ‘कुम्मी’ हे स्त्रियांचे नृत्य कोलाट्टम् सारखेच असते.
तमिळनाडू : भरतनाट्यम् हा अभिजात नृत्यप्रकार तमिळनाडूचाच. या प्रदेशात कावडी, करगम्, ओइलाट्टम्, कुम्मी, कोलाट्टम् इ. लोकनृत्याचे प्रकार रूढ आहेत. कावडीला रंगीत वस्त्रांनी शृंगारून ती नर्तक उचलून घेतात व भगवान मुरूगनच्या मंदिराकडे नृत्य करीत जातात. हे नृत्य उस्तवाच्या स्वरूपाचे असते. ‘करगम्’ हे मरिअम्माचे पूजानृत्य आहे. फुलांनी सजवलेले पितळी हंडे डोक्यावर घेऊन नर्तकी तोल सावरत वेगवेगळ्या नृत्यक्रिया करतात. ‘ओइलाट्टम्’ हा मंदिराच्या आवारात उत्सवप्रसंगी केला जाणारा नृत्यप्रकार आहे. यात पुरुष एका हातात टिपरी व दुसऱ्या हातात रुमाल घेऊन नाचतात. ‘तेरुक्कुतू’ हे लोकनाट्य असून त्यात नृत्य अंतर्भूत असते. ‘कुम्मी’ व ’कोलाट्टम्’ हे खास दाक्षिणात्य लोकनृत्य प्रकार आहेत. ‘कुम्मी’ हे विवाहासारख्या उत्सवप्रसंगी टाळ्यांच्या तालावर मुलींनी करावयाचे नृत्य आहे. यात गायल्या जाणाऱ्या गीताची पहिली ओळ अग्रणी नर्तकीने म्हणावयाची व तिच्यामागोमाग इतरांनी पुनरावृत्त करावयाची असते. नर्तकी गोलाकार फेर धरून नाचतात. हातांच्या हालचाली पेरणी, कापणी इ. क्रियांशी मिळत्या जुळत्या असतात. हे नृत्य गुजरातमधील गरबा नृत्याची आठवण करून देते. ‘कोलाट्टम्’ म्हणजे टिपऱ्यांचा खेळ. हे समूहनृत्य हातांत रंगीबेरंगी टिपऱ्या घेऊन केले जाते. नर्तकी आपल्या टिपरीने शेजारच्या नर्तकीच्या टिपरीवर साद देते. त्या गोलाकार फेर धरून टिपरीच्या नादावर लयबद्ध पदन्यास करीत नाचतात. शरीराच्या डौलदार हालचाली फार मोहक असतात. ‘पिन्नलकोलाट्टम्’ हे सामुदायिक गोफनृत्य आहे. छताला आकड्याने जोडलेल्या एका गोलाकार लाकडी थाळीला रंगीबेरंगी गोफ टांगलेले असतात. नर्तक त्यांचे दुसरे टोक डाव्या हाताला बांधतात व उजव्या हातात टिपऱ्या घेतात. नर्तकांची संख्या सम प्रमाणात असते. गीतांच्या साथीवर नर्तक लयबद्ध शैलीने मागे, पुढे, बाजूला हलत असतात व शेजारच्या नर्तकाच्या टिपरीवर आघात करतात. या हालचालींमध्ये गोफांचे पेड करून विणले जातात व त्यांचे वेगवेगळे आकृतिबंध निर्माण होतात. गोफाची सोडवणूक द्रुतलयीतील संगीताच्या साथीवर जलद गतीने करतात. गुजरातमधील गोफ-गुंफन या नृत्य प्रकाराशी याचे साधर्म्य आढळते. ‘कुरवंजी’ हा तमिळनाडूमधील लोकनृत्याचा खास प्रकार भरत नाट्यम्चा पूर्वसूरी मानला जातो. डोंगराळ प्रदेशातील भटक्या व भविष्य कथन करणाऱ्या ‘कुराती’ जमातीत हे नृत्य परंपरेने चालत आले आहे. कुरवंजीचे नृत्यतंत्र भरतनाट्यम्च्या तुलनेत अगदी साधेसुधे असते. तरीही आधुनिक नर्तकांना कुरवंजीचे त्यातील प्रेक्षणीयतेमुळे आकर्षण वाटत आले आहे.
कर्नाटक : येथील नृत्ये काही सामाजिक, तर काही धार्मिक असतात. काही जमातींत भूतप्रेतांच्या निवारणार्थ नृत्ये केली जातात. ‘भूतकोला’ हे नृत्य दक्षिण कर्नाटकात प्रचलित आहे. हे नृत्य विशिष्ट भूतदेवतेचा पुजारी करतो. या नृत्याची वेशभूषा अथवा हालचाली भीतिदायक असतात. ‘प्रेत’ नृत्यातही भीतिदायकता असते. त्यात नर्तक तलवार वापरतो. पीकाच्या कापणीनंतर घोडा नाच केला जातो. घोड्याचा नकली मुखवटा कमरेला बांधून नर्तक नाचतात. वैद्य नृत्य नागदेवतेच्या उपासनेसाठी केले जाते. त्याचाच प्रभाव नंतर यक्षगानावर पडला. ‘बलाकाट’ हे नृत्य सुगीच्या वेळी व उत्सवप्रसंगी केले जाते. नर्तक विशिष्ट पारंपारिक वेषभूषा करून, हातात कट्यारी घेऊन नृत्य करतात. ‘करगा’ हे एक वैशिष्ट्यपूर्ण धर्मविधीपर लोकनृत्य असून, त्यात गावातील सर्व लोक भाग घेतात. कर्नाटकातील यक्षगानहा प्रसिद्ध नृत्यनाट्यप्रकार लोकनृत्यातूनच उत्क्रांत होत जात, तंत्रशुद्ध अभिजात नृत्यात परिणत झाला आहे.
केरळ : कथकळी हे केरळमधील अभिजात नृत्यनाट्य होय. मोहिनीआट्टम्व ओट्टन तुळ्ळल हे नृत्यप्रकारही त्यांच्या परिष्कृत तांत्रिक विकासामुळे अभिजात मानले जातात. लोकनृत्याचेही काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकार केरळमध्ये पाहावयास मिळतात. ‘कोलकळी’ हे मोपला मुसलमानांचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. तथापि त्याबरोबर गायली जाणारी गाणी हिंदू देवतांशी संबंधित असतात. मध्यभागी उंच समई तेवत ठेवून तिच्या भोवती पुरुष फेर धरून गोलाकार नाचतात. नर्तकांच्या हातांत टिपरीवजा दांडकी असतात. परस्परांच्या दांडक्यांवर आघात करून ते ताल धरतात. ‘भद्रकळी’ हे धर्मविधीपर नृत्य असून देवळात केले जाते. त्याच्या अखेरीस ‘तियाट्टु’ हे अग्निनृत्य करण्याची प्रथा आहे. केरळी स्त्रियांचे ‘काईकोट्टिकळी’ हे नृत्य ओणम्सणाच्या वेळी केले जाते. खेड्यातील मुली ‘अत्तापू’ नामक फुलांचे रिंगण तयार करून, त्याभोवती वर्तुळाकार फेर धरत नाचतात. झाडांना नवी पालवी फुटल्याचे किंवा अंकूर आल्याचे सूचित करणाऱ्या सुडौल, लयबद्ध नृत्य हालचाली केल्या जातात. त्यांना सर्व परिचित अशा संगीताची साथ असते. हातांनी टाळ्या वाजवून ताल धरला जातो. या नृत्याचे कुग्मीशी साम्य आढळते. ‘वेलकळी’ हे युद्धनृत्य पद्मनाभस्वामींच्या उत्सवप्रसंगी नायर लोक करतात. त्यात कौरव-पांडव युद्धाचे नृत्यमय अनुकरण असते. नायर स्वतः कौरवांचा अभिनय करतात. त्यांच्या हातात लाकडी ढाल तलवार असते. पांडवांच्या प्रतीकात्मक प्रतिमा बनवितात. ‘कळियाट्टम्’ हे एक धार्मिक नृत्य आहे. नृत्यापूर्वी नर्तक गीत गाऊन नृत्याचा आशय विशद करतात व नंतर संथ आणि द्रुतलयीत नृत्य केले जाते.
महाराष्ट्रातील नृत्य : महाराष्ट्राला अभिजात नृत्याची परंपरा नसली, तरी लोकनृत्याची समृद्ध परंपरा आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतील अनेकविध नृत्यांतून महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीचे मनोज्ञदर्शन घडते.
महाराष्ट्रातील गोंड, भिल्ल, कातकरी, ठाकूर, कोरकू इ. आदिवासी जमातींत अनेक वैशिष्ट्यपूर्ण नृत्यप्रकार आढळतात. ज्या वाद्यांच्या साथीवर ही नृत्ये केली जातात, त्या वाद्यांच्या नावांनीच ती ओळखली जातात. उदा., ‘ढोलाचा नाच’, ‘तंबोरीचानाच’, ‘तारपीचा नाच’ इत्यादी. ढोलाचानाच या प्रकारात ढोलाच्या साथीवर गोलाकार फेर धरून संथ व जलदलयीत नृत्य केले जाते. त्यातील हालचाली रानटी, ओबडधोबड व आवेशयुक्त असतात. नर्तक‘हो होऽ’ अशा आरोळ्या ठोकून नाचात जोम निर्माण करतात. नृत्याची लय ढोलाच्या ठेक्यावरच अवलंबून असते. तारपी हे एक सुषिरवाद्य असून ते प्रामुख्याने वारली आणि ठाकूर या जमातींत प्रचलित आहे. ही नृत्ये होळीच्या सुमारास केली जातात. नृत्यरचना अनियमित व ओबडधोबड असल्या, तरी हालचालींमध्ये जोरकसपणा असतो. तारपीच्या नाचाचे अनेक प्रकार असून, त्या प्रत्येक प्रकारासाठी तारपीवर भिन्नभिन्न सूर धरले जातात. ‘उडक्यांचा (उड्यांचा) नाच’, ‘पाय पालट्याचा नाच’, ‘गुंजवायचा नाच’ (जमिनीवरून काहीतरी-फुले वगैरे-वेचून डोक्यात घालण्याची कृती), ‘भात भालण्याचा नाच’ (वाऱ्याच्या झुळकीने भाताचे पीक मागेपुढे डोलते त्याचे अनुकरण), ‘लावरीचा नाच’ (लाहूर म्हणजे लावा पक्ष्याच्या हालचालींचे अनुकरण) हे तारपीच्या नाचाचे प्रकार होत. यांखेरीज भांगटिळ्याचा, गोवायचा, सलामीचा, मावळ्याचा इ. प्रकार आहेत. ‘भुई-फुगडी’ हा फुगडीचा प्रकारही तारपीच्या तालावर खेळला जातो. आदिवासी जमातींमध्ये जन्म, विवाह, मृत्यू आदिप्रसंगीही नृत्ये केली जातात. भिल्लांच्या जमातीत‘वारी घालणे’ हा अंत्यविधीच्यावेळी करावयाचा नृत्य प्रकार आहे. तसेच या जमातीत ‘घेराचा नाच’, ‘रथाचा नाच’ हे प्रकारही रूढ आहेत.
महाराष्ट्रातील काही मागास व कनिष्ठ जमातींत ‘कडकलक्ष्मी’, ‘भगत’, ‘वीर’ अशी विशिष्ट धार्मिक विधींशी निगडित लोकनृत्ये आहेत. त्यांचे स्वरूप ओबडधोबड आणि रानटी असते. या तिन्ही प्रकारांत नर्तकांच्या अंगात विशिष्ट देवतांचा संचार होतो व झपाटल्याप्रमाणे अंगविक्षेप करीत ते नाचू लागतात. कडक लक्ष्मी हा कोल्हापूरच्या अंबाबाईच्या भक्तांमध्ये रूढ असलेला प्रकार होय. त्यात एक स्त्री व पुरुष भाग घेतात. पुरुष लांब केस राखतो व कमरेभोवती घागऱ्याप्रमाणे लुगडे गुंडाळतो. तो ढोलकी वाजवतो. स्त्रीच्या डोक्यावर देवीची घुमटी असते व उजव्या हातात मोरपिसांचा कुंचा असतो. ती ढोलाच्या आघातावर नाचते. पुरुष अंगावर आसूड ओढणे, दंडात दाभण खुपसणे अशा आत्मपीडनात्मक क्रिया करतो व नाचतो. स्त्री व पुरुष दोघेही अंगात देवीचा संचार झाल्याप्रमाणे, झपाटल्यासारखे अंगविक्षेप करतात. भगत म्हणजे देवऋषी. तो वैद्य, ज्योतिषी व मांत्रिकही असतो. त्याच्याही अंगात देव संचारतात, अशी समजूत आहे. अंगात आले की केस पिंजारून तो तालावर नाचतो किंवा उकिडवे बसून अंग घुसळत व मानेला झटके देत घुमू लागतो. त्याच्या मानेचे झटके सुरुवातीला संथ, पुढे वेगवान व अखेरीस प्रक्षोभक होत जातात. लोक त्याच्या घुमण्याला ‘डाक’ (नगारा) या वाद्याची साथ देतात व गाणीही म्हणतात.वीर हे फाल्गुनात धुलिवंदनाच्या दिवशी वीर वेषधारण करून घरापासून देवळापर्यंत नाचत जातात. त्यांच्या एका हातात लिंबू खोचलेली तलवार व दुसऱ्या हातात कुलदैवताचा टाक असलेली वाटी वा करवंटी असते. त्यांच्या नृत्य हालचाली द्वंद्वयुद्धातील पवित्र्यांप्रमाणे असतात. देवळाकडे जात असताना काही वीरांच्या अंगात येते व ते बेभान होऊन अंगविक्षेप करू लागतात. युद्धात मरण पावलेल्या आपल्या वीरपूर्वजांचे गौरवपूर्वक स्मरण करणे, हा या विधीयुक्त नृत्याचा उद्देश आहे.
विदर्भात ‘दंडार’ हे लोकनृत्य काही जमातींत केले जाते. दिवाळी, होळी अशा प्रसंगी दंडारांचे नर्तकसंघ गावोगावी जाऊन नृत्य करतात. नर्तकांच्या दोन रांगा समोरासमोर उभ्या राहून मागे, पुढे, आजूबाजूला झुलत राहतात. या नृत्याला ढोलकी व तुणतुणे यांची साथ असते. त्याबरोबर अद्भुतरम्य स्वरूपाची हलकी फुलकी गाणी गायली जातात व दांड्या वाजवून ताल धरला जातो. महाराष्ट्रात सागरकिनाऱ्यांवरील भागांत ⇨ कोळी नृत्याचे अनेक प्रकार रूढ आहेत. कोकणच्या सोनकोळी लोकांत ‘कोळ्याचा नाच’ केला जातो. त्यात नर्तकांच्या दोन रांगा समोरासमोर उभ्या असतात आणि नाखवा व कोळीण मध्यभागी असतात. कोळीण डावा हात कमरेवर ठेवून व उजव्या हातात रुमाल घेऊन तो नृत्याच्या लयीत हलवते. ती डाव्या, उजव्या अंगांना शरीर झुलवते. नाखवा हातांत दारूची बाटली व पेला घेऊन झिंगल्याचा अभिनय करतो. नर्तकांच्या दोन रांगा छोटी वल्ही हातांत घेऊन होडी वल्हविण्याची नक्कल करतात. त्यांच्या हालचालींतून समुद्राच्या लाटांवर होडी हेलकावत असल्याचा आभास निर्माण होतो. एकात्म व सुसंवादी सांघिक हालचाली हे त्याचे वैशिष्ट्य होय. नृत्याला कोळीगीतांची व झांजा, ढोलकी आदी वाद्यांची साथ असते. ‘नकटा’हा एक हास्यप्रधान नृत्यप्रकार असून त्यात कोळी, कोळीण व नकटा अशी तीन पात्रे असतात. नकट्याची वेशभूषा खास प्रकारची असून तो मुखवटा घालतो. त्याच्या सोंगात हास्यकारक अतिशयोक्ती असते. ‘काठखेळ’या नृत्यप्रकारात टिपरीवजा काठ्यांच्या तालावर गोलाकार फेर धरून नृत्य करतात. ‘डेरा’हे नृत्य डेरा घुसळण्याच्या हालचालींचे प्रतीक असते. ‘संकासूर’नृत्यात नर्तक शंखाकृती मुखवटा वापरतो. कोकणातील कुणबी समाजामध्ये गौरीचा व गौरीगणपतीचा नाच केला जातो. तो ‘चेऊली नाच’म्हणूनही ओळखला जातो. कुलाबा जिल्ह्यातील चेऊल या गावावरून हे नाव पडले असावे. त्याला ‘जाखडी’ (उखाणा) असेही नाव आहे. या नृत्यात दोन गटांमध्ये गाण्यांतून उखाण्यांची स्पर्धाही होते. एका गटाने घातलेला उखाणा दुसऱ्या गटाला सोडवावा लागतो. या नृत्यात मृदंग व झांजा वाजवणारे मध्यभागी साधारण उकिडवे बसतात व त्यांच्याभोवती नर्तक पायात चाळ बांधून गोलाकार फेर धरून नाचतात. गौरी विसर्जनाच्या वेळी झांज-मृदंगवाले अग्रभागी व त्यांच्या मागून नर्तक एकमेकांच्या गळ्यात हात टाकून नाचत-गात मिरवणुकीने जातात.
महाराष्ट्रातील नागरी समाजात टिपरी आणि गोफ नृत्ये लोकप्रिय आहेत. ही नृत्ये विदर्भात कोजागिरी पौर्णिमेला, तर कोकणात गोकुळ – अष्टमीला करतात. या नृत्य-गीतांना कृष्णाच्या रासक्रीडांचा पौराणिक संदर्भ आहे. दक्षिणेकडील ‘पिनल कोलाट्टम्’ आणि गुजरातमधील ‘गोफगुंफन’ या नृत्यप्रकारांशी त्याचे साधर्म्य आढळते. टिपरी नृत्यात नर्तकाच्या हातांत टिपऱ्या आणि पायात चाळ असतात. या नृत्यात सामान्यपणे नर्तकांच्या चार, सहा किंवा आठ अशा जोड्या भाग घेतात. तबल्याच्या व झांजांच्या तालावर ते टिपऱ्या वाजवून गोलाकार फेर धरीत नृत्य करतात. नर्तक गोलाकार फिरत असता आपली टिपरी जोडीदाराच्या टिपरीवर वाजवितो. नृत्याच्या लयीत नर्तक टिपऱ्या कधी डोक्यावर घेऊन, तर कधी गुडघ्याखाली घेऊन वाजवितात. टिपऱ्याचं ठेके व आघात यांत वारंवार फेरबदल करून तसेच गतिमानता साधून नृत्य आकर्षक करता येते. गोफ नृत्यात नर्तकाच्या शिरोभागी, आढ्याच्या केंद्रस्थानापासून रंगीबेरंगी गोफ अधांतरी सोडलेले असतात व प्रत्येक नर्तक आपल्या डाव्या हातात टिपरीबरोबरच गोफाचे एक टोकही धरतो. नृत्याच्या हालचालींमध्ये गोफाची गुंफण आणि सोडवण या क्रिया साधल्या जातात. या नृत्यात पदन्यासांना अधिक प्राधान्य असते. हातातील टिपरीचा ठेका आणि पायातील चाळांचा पदन्यासांबरोबर होणाराध्वनी यांच्यात समयोचित एकात्मता व सुसंवादित्व साधणे आवश्यक असते. ⇨ लेझीम हा महाराष्ट्रातील एक प्रमुख नृत्यप्रकार आहे. हे एक पौरुषयुक्त वीरनृत्य असून, त्यात अनेक वेगवेगळ्या नृत्यरचना साधल्या जातात. त्यात गोलाकार फेर असतात, त्याचप्रमाणे दोनांच्या−चारांच्या रांगांनी केलेल्याकवायतसदृश हालचाली असतात.या प्रकारात अनेक नृत्यावस्थाही पहावयास मिळतात. लेझीम वाजवत पुढे सरकणे, मागे जाणे, उड्या मारणे, खाली वाकणे, उकिडवे बसणे, गिरक्या घेणे वगैरे अनेक हालचाली लेझीम खेळताना केल्या जातात. लेझीम ठेक्यात वाजवावयाची असल्याने हातांच्या हालचाली नियंत्रित आणि नियमबद्ध असतात. लेझिमीच्या प्रत्येक आघातास अनुरूप अशा समयोचित आणि तालबद्ध हालचाली केल्या जातात. त्यामुळे लेझिमीचा नाद हेच या नृत्याचे तालसंगीत असते. शिवाय त्यास कित्येकदा हलगी वा ढोल यांचीही साथ दिली जाते. लेझिमीचे अनेकविध प्रकार देवतांच्या पालख्या, मिरवणुका, खेड्यातील जत्रा, उरूस अशा प्रसंगी पहावयास मिळतात. ढोलाच्या तालावर लेझीम खेळणारांचे ताफे धुंद होऊन बेभानपणे नाचत असतात. हा एक व्यायामप्रकारही असल्याने अनेक शाळांतून त्याचा शारीरिक शिक्षणात अंतर्भाव करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात दोन प्रमुख धार्मिक नृत्यप्रकार आढळतात. ‘दिंडी’व‘काला’. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात तेराव्या शतकापासून दिंडी रूढ आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या व संतांच्या पालखीपुढे वारकरी भजने म्हणत व नाचत जातात. वीणा व मृदंग वाजवणारे मध्यभागी असतात व त्यांच्याभोवती वारकरी हरिनामाचा गजर करीत बेहोश होऊन टाळ वाजवत गोलाकार फेर धरतात. पालखी पुढे निघते, तेव्हा दिंडीतील वारकरी दोन रांगा करून समोरासमोर उभे राहतात व मृदंग-वीणा वाजविणारे रांगांच्या मध्यभागी पुढच्या बाजूला असतात. सर्वजण मृदंगाच्या साथीवर टाळ वाजवत व भजने म्हणत मागेपुढे लयबद्ध पावले टाकीत, धीम्या गतीने पुढे सरकत असतात. भजनात संतांचे अभंग व गौळणी गायिल्या जातात. मधूनमधून विठ्ठलनामाचा गजर होतो. वारकरी स्त्रियांचीही दिंडी असते. महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव ‘काला’वा ‘दहीकाला’ या नावाने ओळखला जातो. हा प्रामुख्याने कोकणात मोठ्या प्रमाणावर होतो. गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम असतो. या नृत्याच्या रूपाने बाळकृष्णाच्या दही-दूध-लोणी चोरण्याच्या लीलाच जणू प्रतीकरूपाने साकार होतात. गावातील लहान मुले व तरुण ‘गोविंदा आला रे’ असे गात-नाचत रस्तोरस्ती हिंडतात. जागोजागी उंचावर टांगलेली दहीहंडी फोडण्यासाठी हे ‘गोविंदा’गोलाकार उभे राहतात. काहीजण उंच मानवी मनोरा रचतात व एखादा लहान, चपळ मुलगा त्यावर चढून दहीहंडी फोडतो. हे चालू असताना गोविंदांच्या अंगावर वरून पाण्याचा तसेच कित्येकदा दूधदह्याचा वर्षाव केला जातो. मातीची दहीहंडी फुटल्यावर खाली पडलेल्या खापऱ्या वेचून घरी नेण्याची प्रथा आहे. त्यामुळे गोरसाची समृद्धी होते, अशी समजूत आहे. हंडी फोडल्यावर गोविंदा रस्त्यातून नाचत-गात जल्लोष करीत जातात. हा नाचाचा अगदी अनघड असा प्रकार आहे. नाचणाऱ्या समूहाचा उसळता जोष व उल्हास त्यातून आवेगाने ओसंडत असतो. त्यास कित्येकदा ‘खालू’या वादकवृंदाची साथ असते. या वृंदात सनई, ढोल व टिमकी वाजवणारे किमान तीन वादक असतात.
‘दशावतार’ किंवा ‘बोहाडा’ हे महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध पारंपरिक नृत्यनाट्य होय. हा प्रकार कोकण आणि गोवा या भागांत अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. बंगालमधील अवतार नृत्याशी तसेच दक्षिणेकडील कथकळीशी त्याचे साधर्म्य आढळते. या नृत्यनाट्यासाठी तात्पुरता रंगमंच उभारला जातो. बऱ्याच वेळा दोन माणसे पडदा धरतात व नट रंगमंचावर येताच तो बाजूला करतात. प्रथम सूत्रधार येऊन नाटकाचा व पात्राच्या आगमनाचा उद्देश विशद करतो. सूत्रधार नाट्याच्या प्रारंभी विघ्नहर्ता गजानन व विद्येची देवता सरस्वती यांचे स्तवन करतो. सुरुवातीस गणपती रंगमंचावर येतो व थोडा वेळ नाचतो. त्याची पूजा केली जाते व आशीर्वाद देऊन तो निघून जातो. नंतर लाकडी मोरावर बसून सरस्वती येते आणि मोरावर असल्याचे दर्शविण्यासाठी ती मोराप्रमाणे नृत्य करते. गणपतीच्या संथ नृत्याच्या तुलनेत तिचे पदन्यास चपळ असतात. तिच्या हातांत दोन रूमाल असतात व ते ती खालीवर फडफडवते. त्यानंतर दशावतारांपैकी बरेचसे अवतार प्रत्यक्ष रंगमंचावर दाखवितात. नृत्यनाट्यातील पात्रांसाठी त्यांच्या पौराणिक स्वरूपाशी मिळतेजुळते खास मुखवटे तयार केलेले असतात. सूत्रधार कथासूत्र पद्यात चालू ठेवतो व मुखवटे घातलेले नर्तक गाण्याला पोषक असा अभिनय करतात. कथाप्रसंगात अनुस्यूत असलेले भावप्रकटन ते अंगविक्षेपांतून दाखवतात. वीरभावदर्शक अभिनय जमिनीवर जोरजोरात पाय आपटून आणि त्वेषाने वेग-वेगळ्या दिशांना बाहू सरसावून केला जातो. करुण भाव दर्शवणाऱ्या हालचाली काहीशा सौम्य आणि संयत असतात. भय, रौद्र आदी भावही यथायोग्य रीतीने प्रकट केले जातात. युद्धदृश्ये दर्शविताना नर्तक वेगवेगळ्या प्रकारच्या जोषपूर्ण व प्रक्षोभक हालचाली करतात. संगीतसाथीमध्ये तुणतुणे, तांबोरी, डफ, मृदंग, झांजा इ. वाद्यांचा अंतर्भाव होतो. [→दशावतारी नाटके]. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय व कलात्मक नृत्यप्रकार म्हणजे ‘राधा’वा ‘गौळण’नृत्य होय. त्यात नर्तकाच्या व्यक्तिगत कौशल्याला खूपच वाव असतो. गायन, संगीतसाथ, वेशभूषा इत्यादींत काहीशी सफाई आढळते. नृत्यात अगदी प्राथमिक अवस्थेतील मुद्रा, चेहऱ्यावरील भावदर्शन वगैरे अभिजात नृत्याचे घटक पहावयास मिळतात. राधा व कृष्ण यांच्यातील प्रीती व राधेची मीलनाची ओढ असा आशय असलेली गाणी म्हटली जातात व त्यांच्या साथीवर नृत्य केले जाते. त्यात दैवी सात्त्विकता व लौकिक शृंगारभाव यांची संमिश्र अभिव्यक्ती होते. राधेच्या वेषभूषेत तरुण मुलगा नृत्य करतो.राधेची वेषभूषा भडक व अलंकृत असते. पायात चाळ बांधलेले असतात. काही ठिकाणी संकासूरही राधेबरोबर नृत्य करतो. प्रथम राधेच्या वेषभूषेतील नर्तक स्वतःभोवती गोलाकार गिरकी घेतो आणि नंतर गाण्याची सुरुवात होते. प्रथम नर्तक व गायकवृंदाचा नेता गाण्याची पहिली ओळ म्हणतात व मागाहून तीच ओळ बाकीचे गायक समूहस्वरात गातात. ज्यावेळी समूहगान चालू होते, त्यावेळी नर्तक गाण्यातील भाव योग्य हालचाली व हावभाव यांद्वारा व्यक्त करतो. हावभाव सुविहित व नेटके असतात. वाद्यसंगीतात तुणतुणे, तंबोरी व डफ यांची साथ असते. हे नृत्य साधारणपणे होळीच्या सुमारास कोकण भागात केले जाते. ⇨ तमाशा हा महाराष्ट्राचा अत्यंत आवडता असा,नृत्यप्रधान व लोकनाट्याचा प्रकार आहे. त्याची परंपरा फार जुनी आहे. त्यात ⇨ लावणी ह्या शृंगारिक नाचगाण्याचा अंतर्भाव होतो. तमाशात सुरुवातीला गण, गौळण झाल्यानंतर लावण्यांचा भाग येतो. प्रारंभीच्या तमाशात नाच्या पोर लावणी म्हणत व नाचत असे. पुढे नाची रंगमंचावर आली. लावणी गीतातील शृंगारप्रधान आशय नर्तकी आपल्या मादक व नखरेल हावभावांनी आणि अंगविक्षेपांनी दृश्यमान करते. संगीतसाथीत ढोलकी व तुणतुणे ही प्रमुख वाद्ये असून, त्यांस नर्तकी आपल्या पायातील चाळांची साद देते. लावणीतील शृंगार हा कित्येकदा उत्तानतेकडे व सवंगपणाकडे झुकणारा असतो.
महाराष्ट्रात स्त्रियांची अशी खास पारंपारिक लोकनृत्ये अनेक आहेत. मंगळागौर, गौरीपूजा, कोजागिरी, हरितालिका, नागपंचमी इ. स्त्रियांच्या सण-उत्सवांच्या प्रसंगी ती विशेषत्वाने केली जातात.⇨ फुगडी हा नृत्यप्रकार त्यातील विविध गतिविभ्रमांमुळे व चैतन्यामुळे प्रेक्षणीय ठरतो. त्याचे दंडफुगडी, बसफुगडी, लोळणफुगडी असे अनेक प्रकार आहेत. कुणबी स्त्रियांमध्ये गौरीचा नाच प्रचलित आहे. नागर समाजातील स्त्रियांमध्ये फुगडीप्रमाणेच ‘किस बाई किस’, ‘कोंबडा’, ‘आगोटापागोटा’, ‘पिंगा’इ. नृत्यप्रकार आहेत. ‘नाच गो घुमा’या नृत्यात रुसलेल्या सखीला तिच्या मैत्रिणी नाचण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यातील नृत्याप्रमाणेच नाट्यही मोठे वेधक असते. नवदांपत्यास सुखी व समृद्ध वैवाहिक जीवन लाभावे, हा मंगळागौरीच्या नृत्यांचा उद्देश असतो. या नृत्यांतून उत्कट आनंदभाव, उसळते जोषपूर्ण चैतन्य व आकर्षक, गतिमान लय यांचे दर्शन घडते. या नृत्यांबरोबर बव्हंशी पारंपरिक स्त्रीगीते म्हटली जातात. महाराष्ट्रातील स्त्रीजीवनाचे प्रतिबिंब या नृत्यांतून उमटते.
आधुनिक काळात महाराष्ट्रात अभिजात नृत्याचा प्रसार करण्याचे व नृत्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय बव्हंशी उदय शंकर व मेनका या श्रेष्ठ भारतीय नृत्यकारांकडे जाते. नृत्याच्या अभिजात स्वरूपाचा त्यांनी महाराष्ट्राला परिचय करून दिला. विशेषतः⇨ मेनका यांनी खंडाळा येथे नृत्यशाळा स्थापून व प्रांतोप्रांतीच्या अभिजात नर्तकांना एकत्र आणून नृत्यशिक्षणाची पद्धतशीर आखणी केली. या उपक्रमास पुढे चांगलीच चालना मिळाली व मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरी नृत्यविद्यालये स्थापण्यात आली. तसेच अनेक श्रेष्ठ भारतीय नर्तक-नर्तकींनी मोठ्या शहरांतून नृत्याचे कार्यक्रम केले. त्या योगे भरतनाट्यम्, कथकळी, कथ्थक, मणिपुरी इ. अभिजात नृत्यशैलींचा मराठी रसिकाला परिचय घडला. या अनुकूल व चैतन्यमय वातावरणामुळे महाराष्ट्रात अनेक ख्यातनाम नर्तक-नर्तकींची एक परंपराच निर्माण झाली. त्यात भारतविख्यात दमयंती जोशी, पार्वतीकुमार, सुरेंद्र वडगावकर, मोहन कल्याणपूरकर, रोहिणी भाटे, मंदाकिनी मालवीय, कनक रेळे, सुचेता भिडे इत्यादींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. आधुनिक काळात नृत्यनाट्य (बॅले) हा प्रकारही महाराष्ट्रात चांगलाच नावारूपाला आला असल्याचे दिसून येते. विशेषतः मुंबईत अनेक ख्यातनाम नर्तकांनी उत्तमोत्तम नृत्यनाट्ये सादर केली. मेनका यांनी कृष्णलीला, मेनकालास्यम्, मालविकाग्निमित्रम् इ. कृष्णन् कुट्टी यांनी फॉल्स प्राइड, द टेरिबल बून, बर्थ ऑफ अवर नेशन इ. ‘लिट्ल बॅले ट्रूप’ तर्फे शांतिवर्धन यांनी रामायण इन पपेट, मेघदूत, डिस्कव्हरी ऑफ इंडिया इ. नृत्यनाट्ये सादर केली. प्रख्यात भरतनाट्यम् नर्तक पार्वतीकुमार यांनी देख तेरी बम्बई, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या नृत्यनाट्यांचे मुंबईमध्ये प्रयोग केले. सचिन शंकर यांची शिवपार्वती, रामायण, शिवाजी इ. नृत्यनाट्ये प्रेक्षकांना सुपरिचित आहेत. सुरेंद्र वडगावकर यांनी संपूर्णपणे महाराष्ट्रीय म्हणता येईल असे तुकाराम हे नृत्यनाट्य सादर केले. त्यात भूपाळी, अभंग, लावणी तसेच तमाशा, दिंडी, लेझीम इ. खास महाराष्ट्रीय संगीत-नृत्य-प्रकारांचा वापर केला होता. या सर्व उपक्रमांमुळे आधुनिक काळात महाराष्ट्रात नृत्य हा प्रतिष्ठित व रसिकमान्य कलाप्रकार ठरला आहे.
इनामदार, श्री. दे.
भारतीय नृत्याचा प्रसार : भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून भारतीय नृत्य चीन, जपान व आग्नेय आशिया तसेच इतरत्रही प्रसार पावले. बौद्ध धर्माचा प्रसार होऊन आजच्या कंबोडिया, थायलंड, ब्रह्मदेश, श्रीलंका, जावा, सुमात्रा, बाली या देशांत भारतीयांच्या वसाहती झाल्या आणि बृहद्भारत सिद्ध झाला. धर्माबरोबरच संस्कृती व कला यांचाही प्रसार होणे अपरिहार्य होते. पाली भाषा, भारतीय लिपी, नृत्य व नाट्य यांचे विविध प्रकार, संगीत व वाद्ये, मूर्तिकला, प्रतिमाविद्या, वास्तुकला यांसारख्या रूपणकला इ. सर्वच बाबतींत भारताचा ठसा या देशांवर खोलवर उमटलेला दिसतो. ही घटना दहाव्या शतकाच्या आसपास घडली.
ख्रिस्ती शकाच्या आरंभी बौद्ध प्रभावाखाली येणारा श्रीलंका हा पहिला देश होय. ब्रह्मदेशात तर याही पूर्वी भारतीयांच्या वसाहती झाल्या होत्या. कंबोडियात दाक्षिणात्य पल्लव वंशाचे हिंदू राज्य होते.जावासंबंधी जुना संदर्भ रामायणातील असला, तरी अगस्ती संप्रदाय तिथे आठव्या शतकाच्या सुमारास रुजलेला दिसतो. या सर्व देशांवर हिंदू व बौद्ध धर्माचा तसेच तंत्रमार्गाचा-शक्तिसंप्रदायाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
नृत्यकलेचा संदर्भात या देशांची थोडक्यात पाहणी करू :
श्रीलंका : ⇨ कँडी नृत्य हे श्रीलंकेचे अभिजात नृत्य मानले जाते. मुख्यतः केरळमधून सु. २००० वर्षांपूर्वी ते श्रीलंकेत प्रसृत झाले. त्यावर कथकळी नृत्याचा प्रभाव बराच दिसतो. मूलतः त्याचे विषय हिंदू पुराणकथांतून घेतले असले, तरी नंतरच्या काळात लौकिक विषयांचाही वापर झालेला दिसून येतो. कथकळीप्रमाणेच जोमदार आणि फक्त पुरुषांकडून प्रयुक्त केले जाणारे हे नृत्य असून त्याच्या आविर्भावांत व पावित्र्यांत भारतीय उगम स्पष्ट दिसून येतो परंतु हस्ताभिनयात बरीच कमतरता दिसून येते.
ब्रह्मदेश : नाट्यप्रयोगाच्या आविष्कारास येथे ‘प्वी’ (Pwe) म्हणतात. ‘जातक’शब्दापासून निघालेल्या ‘झात् प्वी’ (Zat Pwe) या आविष्कारास सध्याच्या ब्रह्मदेशाची अभिजात रंगभूमी म्हणता येईल.यात कुठे ना कुठे केवळ नृत्य येतेच. ब्रह्मदेशातले सर्व नृत्य झात् प्वीपासून उगम पावले आहे. स्त्रीपुरुष संयुक्तपणे नाचतात. इथेही हस्ताभिनय कमी असून, नृत्यात पूर्ण शरीराचा अवलंब अधिकत्वाने होतो.
थायलंड : पूर्वी या देशाने भारत व शेजारची राष्ट्रे यांच्याकडूनच नृत्यकला आत्मसात केली. अभिजात थाई नृत्य−नाट्यांना ‘खोन’ व ‘लाकोन’ म्हणतात. खोन हा सर्वांत पुरातन नृत्यप्रकार असून त्याने आपल्या मूळ प्रेरक भारतीय नृत्यकलेशी निकटचे नाते ठेवले आहे. कथकळी व खोन यांच्यात बरेच साम्य आढळते. फक्त खोनमध्ये मुखवटे वापरले जातात. ते हस्ताभिनयप्रचुर असते व फक्त पुरुषांकरवीच सादर केले जाते. प्रयुक्त नृत्याचे विषय बहुधा रामायणातूनच घेतले जातात. हे सनातन नृत्य असल्याने आता ते मागे पडू लागले आहे.
लाकोन हे रंगभूमीवरील नृत्य असून, त्यात स्त्रियांनाच भाग घेण्यास परवानगी असते. कथाकथनासाठी अमूर्त आणि अर्थसूचक नृत्यहालचालींचा उपयोग केला जातो. ऐतिहासिक दृष्ट्या पाहता हे कंबोडियामधून आले असावे. रामायण व महाभारत यांतून नृत्याचे विषय घेतले जातात. हस्ताभिनय केवळ सूचना देण्याइतकाच मर्यादित असतो. शरीराची संपूर्ण घुसळविणारी हालचाल हे या नृत्याचे वैशिष्ट्य होय. केरळमधील नाट्यपरंपरांना अनुसरून यातही युद्धनृत्यांचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जातो.
कंबोडिया : प्राचीन ख्मेर संस्कृतीचा वैभवशाली वारसा लाभलेले कंबोडियन नृत्य बहुधा स्त्रियांकडून केले जाते. प्राचीन अंकोरच्या संस्कृतीत त्यांची भारतीय अप्सरांबरोबर तुलना केली जाई. आक्रमक थाई राजांनी नृत्यकारांचे अपहरण केल्याने लाकोन हे मूळचे कंबोडियन नृत्य थायलंडमध्ये रुजले. भारताप्रमाणेच इथेही नृत्यास राजाश्रय लाभला. नर्तकींचे स्थान देवदासींसारखे होते. नृत्य शिकविण्याचा हक्क फक्त वृद्ध व नृत्य न करणाऱ्या नर्तकींनाच होता. त्यांना ‘क्रू’ (भारतीय ‘गुरू’शब्दापासून) म्हणत.
सर्व कंबोडियन नृत्यांत हालचालींद्वारा व हस्ताभिनयातून कथा सांगितली जाते. त्याचे भारतीय परंपरेशी बरेच साधर्म्य आढळून येते.
लाओस : येथील नृत्य थाई व कंबोडियन परंपरांनी प्रभावित झाल्याचे दिसून येते. ते रामायणावर व बुद्धाच्या चरित्रकथांवर आधारित असते. हस्तक्रिया अधिककरून मूकाभिनयाच्या धर्तीवर असतात.
इंडोनेशिया : जवळजवळ भारताइतकीच नृत्याची विविधता या देशातही आढळून येते. पण त्यातही हिंदू प्रभाव आणि रामायण, महाभारत यांची पार्श्वभूमी ठळकपणे दिसते.
चीन : आशिया खंडाची सांस्कृतिक विभागणी स्थूलमानाने भारत व चीन यांच्या प्रभावांखाली केली जाते. चीनचा सांस्कृतिक प्रभाव व्हिएतनाम, हाँगकाँग, कोरिया, जपान या देशांवर आहे. चीनमध्येही दोन हजार वर्षांपूर्वी बौद्ध धर्माचा जोरदार प्रसार झाला पण त्यात बरेच परिवर्तन झाले. चीनच्या कलाप्रेरणाही भारताहून निराळ्या आहेत.
चीनमध्ये नृत्य असे जवळजवळ नाहीच पण तेथील रंगभूमीची परंपरा मात्र फार जुनी आहे. चीनच्या अभिजात रंगभूमीचे वर्णन ‘हास्योत्पादक प्रवेशांनी युक्त अशी सांगीतिक शोकात्मिका’, असे करता येईल. चिनी अभिनेते हे मुख्यतः गायक असतात. संवादासही संगीताची जोड दिली जाते. हे भारतीय नाट्यकल्पनेस विरोधी नाही पण नाट्यनिरपेक्ष असाही संगीत व नृत्य यांचा विकास भारतात झाला आहे. मात्र चीनमध्ये नृत्यास जवळजवळ वगळून नाट्य व संगीत यांच्या तत्त्वांचे विकसन साधल्याचे दिसून येते.
जपान : आज जपानमध्ये रूढ असणाऱ्या नाट्य व नृत्य यांच्या आविष्कारांना १३०० वर्षांची अतूट परंपरा आहे. मूळ पद्धतींनुसार आजही तिथे अभिनयाची रूढी व अभिनेत्यांची कुटुंबपरंपरा, सांकेतिक रंगमंचतंत्र, प्राचीन वेशभूषा इत्यादींचे जतन केलेले आढळते.
जपानच्या नाट्यकलेच्या आविष्कारांचे पुढील पारंपारिक प्रकार मुख्य होत :
गा-गाकु : (किंवा गांगाकू) शैलीदार, अधिकृत संगीत, वाद्यवृंदातील प्रचंड पटहाच्या किंवा पडघमच्या आघातमालिकेने त्याची सुरुवात होते. या पटहावर ताणून बसविलेल्या आणि लाल व काळ्या रंगांनी रंगविलेल्या कातड्यावर, ‘यीन्’ व ‘यांग’ या मूलतत्त्वांचे प्रतिनिधित्व करणारे आकार चित्रित केलेले असतात. पटहाच्या आघाताबरोबर संगीतकार आणि नृत्यकार नाट्यगृहाच्या दुसऱ्या टोकास परंपरागत पोषाखात आणि परंपरागत पदन्यासांनी प्रवेश करतात. त्यांच्या शिरोभूषणांवरून ते कलाकार राजाश्रयाखालील परंपरागत कलाकार असल्याचे सूचित होते.
नो नाट्य : ⇨ नो नाट्यास ५०० वर्षांची परंपरा आहे. सरंजामदार वर्गामुळे ‘नो’ ची परंपरा रक्षित झाली. त्यातील मूकाभिनय पराकोटीचा प्रतीकात्मक असतो. त्यामुळे त्याचे रसग्रहण सहजसाध्य नसते. उदा., भूमीवर पडलेला ‘किमोनो’ म्हणजे आजारी व्यक्ती, मुखवटा उचलणे म्हणजे हास्य, खालच्या दिशेने दृष्टिक्षेप म्हणजे अश्रुपात इ. प्रकारचे संकेत रूढ असतात. पटहवादन व इतरही आक्रंदन इत्यादींचा बऱ्याचवेळा सांकेतिक वापर करतात.
काबुकी :⇨ काबुकी तुलनेने प्रेक्षकांस त्वरित आवाहन करणारा प्रकार आहे. काबुकी अभिनेते अतिशय कुशल असून मूकाभिनय, शैलीबद्ध अभिनय, नृत्य-गायन इ. सर्वांत प्रवीण असतात. कारण नृत्य, नाट्य व संगीत यांचा संगमच काबुकीमध्ये असतो. काबुकी रंगाविष्कारात पात्रेही ठराविक व पारंपरिक प्रकारचीच असतात. उदा., खंबीर मनाची स्त्री, सुंदर पण दुर्बल नायक, द्विधा मनोवृत्तीचा आणि शंकास्पद निष्ठांचा योद्धा आणि वेगवेगळ्या वृत्तिप्रवृत्तींचे अनेकविध खलनायक या प्रकारात आढळतात.
रेळे, कनक (इं.); रानडे, अशोक (म.)
पश्चिमी नृत्यकला : पश्चिमी नृत्यकलेची परंपरा प्राचीन ईजिप्शियन संस्कृती, त्यानंतरच्या ग्रीक-रोमन संस्कृती, ख्रिस्ती धर्मप्रभावाचे मध्ययुग, प्रबोधनकाळ आणि त्यापुढील विसाव्या शतकापर्यंतचे विविध टप्पे अशा क्रमाने सामान्यतः सांगितली जाते. यूरोपीय देश, रशिया, अमेरिका आणि यूरोपीय वसाहतींचे इतर प्रदेश अशी तिची प्रादेशिक व्याप्ती स्थूलमानाने मानली जाते. विविधता आणि सतत बदल हे पश्चिमी नृत्यकलेचे खास वैशिष्ट्य होय. आदिम नृत्यकला, विविध वंशगटांची, जातीजमातींची किंवा समूहाची पारंपरिक नृत्ये व प्रदीर्घ इतिहासकाळात झालेली सांस्कृतिक स्थित्यंतरे या सर्वांचा वारसा पश्चिमी नृत्यकलेच्या परंपरेने कमीअधिक स्वरूपात स्वीकारला. उदा., शूप्लॅटर नावाने ओळखले जाणारे एक पारंपारिक बव्हेरियन-ऑस्ट्रियन नृत्य इ. स. पू. ३००० वर्षांपूर्वीचे आहे, असे म्हटले जाते. अभिजात भारतीय नृत्याप्रमाणे अपरिवर्तनीय अशा नियमांच्या चौकटीत पश्चिमी नृत्य क्वचितच बंदिस्त झाले. विस्तृत प्रादेशिक संपर्कामुळे अनेकविध प्रादेशिक नृत्यविशेषांची देवाणघेवाण पश्चिमी नृत्यकलेच्या क्षेत्रात अखंडपणे होत राहिली. त्याचप्रमाणे पश्चिमीसमाजात नित्यनैमित्तिक मनोरंजनप्रकार म्हणून नृत्य हे सामाजिक जीवनव्यवहाराचे एक अविभाज्य अंग ठरले. त्यामुळे प्रयोगशीलता व नावीन्य ही त्याची प्रेरक तत्त्वे सतत प्रभावी ठरली.
स्थूल घटक व वर्गीकरण : पश्चिमी नृत्यकलेत नर्तक व त्याचे नृत्यानुकूल आंगिक हालचालींचे चापल्य व कौशल्य, त्याचे प्रशिक्षण, नृत्य योजक (कॉरिओग्राफर) व नृत्ययोजनेचे किंवा नृत्यालेखनाचे तंत्र व लेखनपद्धती, संगीत व वाद्ये यांची योजना, रंगमंचीय नृत्याचे दृश्य परिणाम साधणारी साधने, नृत्यातील कथाविष्कार आणि भावाविष्कार व मूक अभिनय, चेहेऱ्यावरील तसेच आंगिक हावभाव इ. त्यांची साधने वगैरे घटकांचा विचार करण्यात येतो. पश्चिमी नृत्यकलेचे घटक यापेक्षा वेगळ्या रीतीनेही सांगितले जातात : नृत्याचा अभिकल्प, पदन्यास, हावभाव किंवा अभिनय, नृत्यातील हालचालींचे गतितंत्र आणि हालचाली कुशलतेने साधण्याचे तंत्र वा कौशल्य, असे हे घटक होत. त्याखेरीज या मूलघटकांना पूरक ठरणारे संगीत, नृत्यपरिवेष व दृश्य मांडणी यांचाही विचार महत्त्वाचा ठरतो. ज्यातून नृत्यातील सर्व हालचाली व त्यांचे वरील घटक लिखित स्वरूपात नोंदविले जातात, ते नृत्यालेखन हेही पश्चिमी नृत्यकलेतील महत्त्वाचे अंग होय. नृत्यकलेवरील प्रमाणभूत ग्रंथ १५८८ मधील आहे. (थोईनो आर्बो या फ्रेंच नृत्यविशारदाचा आर्किसोग्राफी). त्यानंतरच्या कालखंडात पश्चिमी नृत्यकलेची औपपत्तिक मांडणी वरील घटकांना कमीअधिक महत्त्व देऊन करण्यात आलेली दिसते. व्हिक्टर सिल्व्हेस्टरचे मॉर्डन बॉलरूम डान्सिंग (१९२८) व ॲलेक्झ मूरचे बॉलरूम डान्सिंग (१९३६) हे ग्रंथ एकेकाळी प्रमाणभूत मानले जात. तथापि नृत्यालेखन (कॉरिओग्राफी) हाच पश्चिमी नृत्यकलेचाही सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. त्यावरील ग्रंथलेखन पश्चिमी नृत्याचे स्वरूप समजावून घेण्यासाठी उपयुक्त ठरते.
पश्चिमी नृत्यांचे पारंपरिक दृष्टीने वर्गीकरण केले जाते. एका व्यक्तीचे व अनेक व्यक्तींच्या गटाचे नृत्य, धार्मिक-वांशिक स्वरूपाचे नृत्य, लोकनृत्य, दरबारी नृत्य,दालन-युग्मनृत्य (बॉलरूम डान्स), रंगमंचीय नृत्य असे हे वर्गीकरण स्थूलमानाने करण्यात येते. नृत्याची प्रवृत्ती ही मानवाची सहजप्रवृत्ती असल्याने नृत्याचा आद्य आविष्कार हा नैसर्गिक व अशिक्षितपटुत्वाचा द्योतक असला पाहिजे, हे उघड आहे. तथापि आदिम जमातीतही धार्मिक−वांशिक नृत्य हे त्यातील आंगिक हालचाली, पोशाखाची साजसजावट तसेच हेतू वा फल या बाबतींत रीतिबद्ध झालेली दिसते. या आदिम नृत्याचीच कमीअधिक स्थित्यंतरे होऊन ती पुढे विविध लोकसमूहांच्या विशिष्ट नृत्यप्रकारांत टिकून राहिली. विशिष्ट धार्मिक स्वरूपाच्या आदिम नृत्यात शामानसारखा जमातीचा धर्मप्रमुख एकट्याने भाग घेई, तर उत्सवी नृत्यात जमातीमधील अनेक स्त्रीपुरुष सहभागी होत. एकव्यक्तिपर नृत्यप्रकार आधुनिक काळातही टिकून राहिला. श्रेष्ठ नर्तकांचे एखादे खास नृत्य ते एकट्यानेच सादर करीत. उदा., ⇨ आन्न पाव्हलॉव्ह हिचे डाइंग स्वॉन हे नृत्य. पश्चिमी नृत्यकलेला अनेक आदिम नृत्ये व लोकनृत्ये यांचा वारसा लाभला. पश्चिमी दरबारी नृत्याचे मूळ मध्ययुगातील कॅरोल नृत्याच्या दोन शाखांत आढळते. पहिल्या शाखेतून पदन्यास व ताल व दुसऱ्या शाखेतून रचना किंवा आकृतिबंध यांचा लाभ दरबारी नृत्याला झाला. बाराव्या शतकात मिरवणुकीवजा नृत्याने किंवा युग्मनृत्याने दरबारी नृत्याचा प्रारंभ झाला असावा. पंधराव्या शतकात इटलीत एकविध व बहुविध अशा दोन्ही प्रकारांची लय असलेल्या दरबारी नृत्याचा उदय झाला. सोळाव्या शतकात फ्रान्स व इंग्लंड या देशांत नर्तकांचे विविध आकृतिबंध साधणारे देखणे दरबारी नृत्य प्रचलित झाले. त्यात ⇨ पॅव्हन, ‘गॅल्यर्ड’यांसारखी नृत्ये प्रमुख होती. सतराव्या-अठराव्या शतकांत गुंतागुंतीचे पदन्यास व ताल असलेले ‘सॅरबँड’, ⇨ मिन्युएत, ‘हॉर्नपाइप’यांसारखे नृत्यप्रकार दरबारी लोकांत प्रिय होते. फ्रेंच क्रांतीनंतर दरबारी लोकांचे दरबारी लोकांसाठीच असलेले नृत्यप्रकार बंद झाले.
दालनातील नृत्यप्रकार हे सामाजिक नृत्याचेच प्रकार होत. ही नृत्ये सामान्यतः युग्मनृत्ये होती. स्त्रीपुरुषांच्या जोड्या त्यांत भाग घेत, तो केवळ स्वतःच्या आनंदासाठी म्हणूनच. ही नृत्ये खाजगी समारंभात वा इतर प्रासंगिक निमित्ताने केली जात. घराच्या प्रांगणात वा सार्वजनिक सभागृहात ती होत. एकोणिसाव्या शतकात ⇨ वॉल्ट्स, ‘क्वॉड्रिल’, ⇨ पोल्क यांसारखे नृत्यप्रकार लोकप्रिय होते. विसाव्या शतकात प्रांरभी ⇨ टँगो, ‘रूंबा’ यांसारखे लॅटिन अमेरिकन नृत्यप्रकार प्रभावी होते. निग्रो ⇨ जॅझ संगीताचाही त्यात समावेश होता. पुढे ‘ट्विस्ट’, ‘शेक’ यांसारखे अनियत पदन्यासाचे आणि मुख्यतः उत्तेजक संगीताला प्रतिसाद देणारे नृत्यप्रकार पुढे आले.
रंगमंचीय नृत्याचा विकास व्यावसायिक नर्तकांनी केला. ⇨ बॅलेसारख्या नृत्यप्रकाराचा विकास हा रंगमंचाचे भान ठेवूनच झाला. चौदाव्या लुईने नृत्याची अकॅडमी स्थापन करून नृत्याच्या व्यावसायिकीकरणास चालना दिली. रंगमंचावर प्रयोग होत राहिल्यानेच नृत्यकलेचा प्रसार झाला आणि या कलेविषयी आस्था व आवड वाढत गेली.
पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा
“