उदय शंकर : (८ डिंसेबर १९००– ). जागतिक कीर्तीचे भारतीय नृत्याकार. कलकत्ता येथे जन्म. वयाच्या अठराव्या वर्षी चित्रकलेच्या अभ्यासासाठी इंग्लंडला रवाना. तेथे त्यांनी केलेले नृत्याचे काही कार्यक्रम पाहून जगद्‌विख्यात रशियन नर्तिका ⇨ आन्न पाव्हलॉव्ह प्रभावित झाली आणि तिने उदय शंकर यांना नृत्यकलेसाठी प्रवृत्त केले. पाव्हलॉव्हच्या पथकाबरोबर त्यांनी विविध देशांचा दौरा केला. दीड वर्षानंतर ते पॅरिसला आले. तेथे त्यांनी वेगवेगळ्या – विशेषतः अतिपूर्वेकडील – संस्कृतींचा आणि कलांचा सखोल अभ्यास केला. नृत्याचे अनेक कार्यक्रम पाहिले. ह्या निरीक्षणातून त्यांची कला आकार घेत होती. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये आले. मादाम सिमकी ह्या आपल्या फ्रेंच शिष्येबरोबर त्यांनी स्वतंत्र कार्यक्रम सुरू केले. परदेशात असताना त्यांनी भारताला वारंवार भेटी दिल्या आणि भारतीय नृत्याचा व्यासंग वाढवला. भारतीय लोकनृत्यांची त्यांना विशेष आवड आहे. स्वतःच्या नृत्यशैलीला समुचित पदलालित्य आणि मुद्राभिनय यांची जोड देऊन ही कला त्यांनी पाश्चात्यांसमोर आणली. ‘उदय शंकर म्हणजेच भारतीय नृत्य’असे समीकरण पाश्यात्य देशांत रूढ झाले.

उदय शंकर

भारतात आल्यानंतर (१९३८) अलमोडा येथे त्यांनी ‘इंडिया कल्चर सेंटर’ची स्थापना करून अभिजात भारतीय नृत्ये शिकण्याची सोय केली. त्यांच्या लेबर अँड मशिनरी, द र्‍हिदम ऑफ द लाइफ, सामान्यक्षती  यांसारख्या बॅलेंनी अमाप लोकप्रियता मिळवली. नृत्यांच्या कार्यक्रमात नावीन्यपूर्ण कल्पना, रंगमंचाचा चातुर्यपूर्ण वापर आणि धंदेवाईक सफाई ह्या गोष्टी ह्यांनी आणल्या. त्यांचे विषय सद्यःस्थितीशी निगडीत असत. कार्यक्रमांची आखणी योजनाबद्ध असे. तसेच निर्मितिमूल्येही उच्च दर्जाची असत. कुठल्याही एका नृत्यप्रकाराशी एकनिष्ठ न राहिल्याचा व शास्त्रोक्त नृत्यात स्वतःच्या कल्पनांनुसार बदल केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.पाश्चात्य आणि पौर्वात्य नृत्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. अतिपूर्वेची नृत्ये आणि यूरोपातील अभिव्यक्तिवादी संप्रदायाचा ह्या संदर्भात विशेषत्वाने उल्लेख करावा लागतो. पण ह्यामुळे त्यांचे नृत्य हिणकस न होता त्याला स्वतःचे असे आगळे वैशिष्ट्य प्राप्त झाले होते. पारंपारिक नृत्यांद्वारे आधुनिक समस्यांचा अर्थपूर्ण आविष्कार करण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी आवश्यक ती प्रयोगशीलताही त्यांच्यापाशी होती. तिमिर बरन या संगीतज्ञाच्या मदतीने त्यांनी नृत्याच्या संगीतातही आमूलाग्र बदल घडवले. भारतीय परंपरेला सर्वस्वी नवीन असलेली, मोठा वाद्यवृंद वापरण्याची कल्पना त्यांनी अंमलात आणली. पण हे प्रयोग करत असताना त्यांनी भारतीय नृत्याचा आत्मा कधी गमावला नाही. त्यांनी स्वतःची वेगळी अशी नृत्यशिक्षणपद्धती सुरू केली. ह्याच पठडीतून त्यांची पत्नी अमला शंकर तसेच शांतिवर्धन, सचिन शंकर, कामेश्वर, जोहरा सैगल, नरेंद्र शर्मा यांसारखे कलावंत निर्माण झाले. सुप्रसिद्ध सतारवादक ⇨ रवि शंकर त्यांचे बंधू होत. १९५९ मध्ये उदय शंकर यांना संगीत नाटक अकादेमी चा पुरस्कार लाभला. कल्पना  नावाचा नृत्यप्रधान चित्रपट त्यांनी निर्माण केला. भारतीय नृत्यपरंपरेत त्यांनी आधुनिक बॅले नृत्याचा समावेश केला. भारतीय नृत्याला आधुनिक तंत्रांनी समृद्ध करणारा कलावंत म्हणून उदय शंकर यांची कामगिरी नृत्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहे.

संदर्भ : Singha, Rina; Massey, Reginald, Indian Dances : Their History and Growth, London, 1967.

पटवर्धन, पद्मिनीराजे