नृत्यमुद्रा : नृत्य करीत असताना हाताच्या बोटांचा जो विशिष्ट आकार साधण्यात येतो, त्याला नृत्यमुद्रा अथवा हस्तमुद्रा असे म्हणतात. नृत्यमुद्रेविषयी विचार करीत असता प्रथम सर्वसामान्यपणे मुद्रा म्हणजे काय, मुद्रेला नृत्यात कोणते स्थान दिले जाते तसेच मुद्रेचे जे अन्य प्रतीकात्मक अर्थ संभवू शकतात त्यांविषयी विचार करणे आवश्यक आहे.

मुद्रा: विभिन्नअंगां’द्वारे (शरीराच्या भिन्नभिन्न अवयवांच्या संचालनाद्वारे), विशेषतः हस्त, पाद आणि मुख ह्यांची जी आकृती तयार होते, तिला ‘मुद्रा’ असे म्हणतात. भावाभिव्यक्तीसाठी मानवाने सातत्याने मुद्रेचा आधार घेतला आहे. भाषा हे आंतरिक भाव दर्शविण्याचे उत्कृष्ट साधन मानले जाते पण कधीकधी उत्कट भावाभिव्यक्ती प्रकट करण्यासाठी भाषाही असमर्थ ठरते. अशा वेळी कित्येकदा हस्त, पाद, मुख ह्या शरीरावयवांच्या आधारे भाव दर्शविले जातात. त्या दृष्टीने मुद्रा ही एक प्रकारची सांकेतिक भाषाच असते. संस्कृतीच्या प्रारंभावस्थेत मनुष्य हा रानटी अवस्थेत वावरत होता, त्याला भाषा अवगत नव्हती, त्यावेळी मुद्रा हीच त्याची संकेतभाषा होती, पुढे काळाच्या ओघात दैनंदिन व्यवहारातील माणसाच्या विशिष्ट हालचालींना म्हणजे मुद्रांना नृत्यात महत्त्वाचे स्थान लाभत गेले.

प्रत्यक्ष मृगशीर्ष आणि त्याची कथकळीतील असंयुक्त हस्तमुद्रा.

भावाभिव्यक्ती हा नृत्यकलेचा प्राण आहे आणि या भावाभिव्यक्तीमध्ये मुद्रेचे प्रकटीकरण अत्यंत आवश्यक असते. हाताची बोटे वेगवेगळ्या प्रकारांनी वळवून आणि त्यांना वैशिष्ट्यपूर्ण आकार देऊन अनेकविध आकृतिबंध साधले जातात. हे आकृतिबंध म्हणजेच नृत्यमुद्रा वा हस्तमुद्रा होत. एकूण नृत्याविष्कारात व मुद्रांना असाधारण महत्त्व आहे. नृत्यातून मुद्रा नाहीशा झाल्या, तर ते निर्जिव ठरेल. विविध विशिष्ट मुद्रांद्वारे नृत्यातून अर्थसंकेत दर्शविले जातात, तसेच एखादी मध्यवर्ती कल्पना विशद केली जाते. म्हणून नृत्यात भावाभिव्यक्तीसाठी नर्तक किंवा नर्तकीला हस्तमुद्रेचाच आधार घ्यावा लागतो. इतकेच नव्हे तर, हस्तमुद्रेच्या विनियोगाने नृत्यातील विविध ‘करणां’ना (पोझेस) अधिक सौंदर्य प्राप्त होते.

नृत्यमुद्रांचे स्वरूप: नृत्यमुद्रा ह्या सर्वसाधारणपणे वस्तूंच्या, पक्ष्यांच्या वा प्राण्यांच्या आकारांशी संबंधित असतात. मानवाने नृत्यकलेतदेखील निसर्गाचे व त्यात वावरणाऱ्या विविध प्राण्यांचे, पक्ष्यांचे तसेच त्यांच्या वेगवेगळ्या अंगसंचालनांचे अनुकरण केले आहे, म्हणूनच हस्तमुद्रांना बरीचशी नावे प्राणिमात्रांचीच दिली गेली आहेत. उदा., सिंहमुख, मृगशीर्ष, सर्पशीर्ष, भ्रमर, मयूर, शुकतुंड, हंसपक्ष इत्यादी.

व्यापक अर्थानुसार मुद्रा ही केवळ हस्तमुद्राच नसते, तर ती मुखमुद्रा, पादमुद्रा व शरीरमुद्रा होऊ शकते. मूर्तिकलेमध्ये प्रतिमामुद्रेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. एखाद्या सांकेतिक मुद्रेने विशिष्ट प्रतिमेचा अर्थबोध होतो. उदा., भगवान बुद्धाची प्रतिमा दर्शविण्यासाठी संकेताने अराल मुद्रा वापरली जाते. तसेच नटराज प्रतिमेतही विशिष्ट सांकेतिक मुद्रांचा वापर होतो. समरांगण सूत्रधाराच्या तीन मुद्राध्यायांमध्ये ६४हस्तमुद्रा, ६ पादमुद्रा व ९ शरीरमुद्रा ह्यांचा उल्लेख आला आहे.

हस्तमुद्रा ह्या हाताने केल्या जाणाऱ्या मुद्रा आहेत, तर पाय ठेवण्याच्या विशिष्ट स्थानकांना ‘पादमुद्रा’ म्हणतात. मुखमुद्रा चेहऱ्यावरचे विशिष्ट भाव दर्शविण्यासाठी वापरल्या जातात. तसेच शरीरमुद्रा ह्या शरीराच्या वेगवेगळ्या स्थानकांनी दर्शवितात. आर्. के. पोदुवलशास्त्रींच्या मुद्राज इन आर्ट ह्या पुस्तकात त्यांनी मुद्रांचे तीन विभागांत वर्गीकरण केले आहे : (१) वैदिक मुद्रा, (२) तांत्रिक मुद्रा व (३) लौकिक मुद्रा.

वैदिक मुद्रा : वेदपाठ म्हणत असताना आवश्यक त्या हस्तमुद्रांचा वापर परंपरेने केला जातो त्या मुद्रा. ह्यामधील बहुसंख्य मुद्रा ह्या पूजोपचाराशी संबंधित असतात. तसेच ह्या सर्व मुद्रांना धार्मिक आशय असतो. गायत्री मंत्राच्या जपातदेखील मुद्रांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. अनुभवी गुरूंच्या मुखातून या मुद्रांचे रहस्य समजून येते. ह्या मुद्रांच्या योगे देवतांची कृपा संपादन करता येते.ग्रहादिकांच्या बाधेतून, पापसमुदायापासून मुक्त करणाऱ्या या मुद्रा देवतेगणिक भिन्नभिन्न असतात. गायत्री मंत्राचा जप करण्यापूर्वी ज्या चोवीस मुद्रा केल्या जातात, त्यापुढीलप्रमाणे होत : (१) सुमुख, (२) संपुट, (३) वितत, (४) विस्तृत, (५) द्विमुख, (६) त्रिमुख, (७) चतुर्मुख, (८) पंचमुख, (९) षण्मुख, (१०) अधोमुख, (११) व्यापकांजलिक, (१२)शकट, (१३) यमपाश, (१४) ग्रंथित, (१५) उन्मुखोन्मुख, (१६) प्रलंब, (१७) मुष्टिक, (१८) मत्स्य, (१९) कूर्म, (२०) वराह, (२१) सिंहाक्रांत, (२२) महाक्रांत,(२३) मुदगर, (२४) पल्लव या चोविस मुद्रांपैकी संपुट, चतुर्मुख (चतुर मुद्रा), मुष्टिक, मत्स्य, कूर्म, वराह यांसारख्या मुद्रा मूलतः पूजाविधीसाठी निर्माण झाल्या असल्या, तरी नर्तकांनी नृत्यविष्कारामध्ये त्यांचा वापर करून घेतल्याचे दिसून येते.

तांत्रिक मुद्रा: ह्या योगशास्त्रात उपयोगात आणतात. तांत्रिक मुद्रेचा स्थायीभाव हा नृत्यमुद्रेच्या स्थायीभावापेक्षा भिन्न असतो. तसेच ह्या सर्व मुद्रा योगी पुरुषांना अभ्यासासाठी अत्यंत जरूरीच्या असतात. तांत्रिक साधनेतील मुद्रांचा उपयोग नर्तक वा नर्तकीला प्रत्यक्षात होत नाही, मात्र ह्या मुद्रांच्या अभ्यासाने कोणत्याही क्षेत्रातील कलावंताला आपली आत्मिक शक्ती अधिक प्रबळ करता येते. ह्या सर्व मुद्रा केवळ हाताच्या बोटांनी केल्या जात नसून, त्यांमध्ये हस्त, पाद, मुख व शरीर ह्या सर्वांचा समावेश असतो. योगशास्त्रातील कल्याण मुद्रांसारख्या मुद्रांचे नृत्यातील अराल मुद्रेशी साधर्म्य दिसून येते. ध्यान करीत असताना योगी तर्जनी व अंगठा हे दोन्ही एकमेकांना भिडवून, मध्यमा, अनामिका व अंगुष्ठ ह्या सरळ ताठ ठेवतो. ही मुद्रा योगाच्या भाषेत कल्याण मुद्रा किंवा ध्यानमुद्रा व नृत्याच्या भाषेत अराल मुद्रा म्हणून ओळखली जाते.

लौकिक मुद्रा : दैनंदिन व्यवहारातील मुद्रा ह्या सर्व लौकिक मुद्रेत गणल्या जातात. आर. के. पोदुवलशास्त्रींनी तांत्रिक व लौकिक मुद्रा ह्या १०८ सांगितल्या आहेत.

नृत्यमुद्रेचा उगम : नृत्यमुद्रेचा उगम केव्हा, कसा व कोठे झाला हे निश्चित सांगणे कठीण आहे. पण हे मात्र तितकेच खरे, की माणसाच्या दैनंदिन कृतींमधूनच मुद्रांची निर्मिती झाली. कारण जी मुद्रा आपण नृत्यात वापरतो, ती आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातही वापरतो. उदा., आलपद्म मुद्रा. ही भरतनाट्यम्‌ नृत्यशैलीतील अत्यंत सुंदर मुद्रा आहे. तिचा विनियोग एखादी वस्तू अर्पण करण्यासाठी अथवा फेकण्यासाठी करतात, ह्या मुद्रेने प्रश्नही विचारला जातो, त्याचप्रमाणे ‘माहीत नाही’ असा भावही दाखविला जातो. व्यवहारात ह्या मुद्रेद्वारा रिंग खेळण्याची वा एखादी वस्तू दुसऱ्याकडे फेकण्याची क्रिया केली जातो. मात्र नृत्यातील मुद्रेला ताल, लय आणि सौंदर्य ह्यांचा आश्रय असतो तसा तो दैनंदिन व्यवहारातील मुद्रेला प्रत्यक्ष नसतो.

जसजशी नृत्यकलेची लोकनृत्याकडून अभिजात नृत्याकडे वाटचाल होत गेली, तसतसे नृत्यमुद्रेतदेखील पुष्कळसे बदल होत गेले. मुद्रेच्या ठेवणीत, आकारात व विनियोगात एक प्रकारची नियमबद्धता आली. मुद्रेच्या आंतरिक भावभाषेला ऋषीमुनींकडून धार्मिक आशय मिळाला. प्रत्येक मुद्रा विशिष्ट अर्थानेच नृत्यात उपयोगात येऊ लागली, प्रत्येक मुद्रेसाठी ठराविक दैवते निश्चित झाली, आकार निश्चित झाला, प्रत्येक मुद्रेचा इतिहास निश्चित झाला, मुद्रांची संख्या निश्चित झाली, भरतमुनिरचित नाट्यशास्त्रात व नंदिकेश्वररचित अभिनयदर्पणात नृत्यातील मुद्रांना आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली. नृत्यमुद्रेच्या विकासात भरतमुनी व नंदिकेश्वर यांचे मुद्रांविषयीचे विवेचन अत्यंत मूलगामी व महत्त्वाचे आहे.

नृत्यमुद्रांचे वर्गीकरण एकूण तीन प्रकारांत केले जाते: (१) असंयुक्त (असंयुत) हस्तमुद्रा, (२) संयुक्त (संयुत) हस्तमुद्रा व (३) मिश्र हस्तमुद्रा. असंयुक्त हस्त म्हणजे एका हाताने केल्या जाणाऱ्या मुद्रा. संयुक्त हस्त म्हणजे दोन हातांनी मिळून दाखविली जाणारी एक किंवा संयुक्त मुद्रा. मिश्र हस्त म्हणजे दोन हातांनी केल्या जाणाऱ्या भिन्नभिन्न मुद्रा तथापि त्यांतून निर्माण होणारा अर्थसंकेत हा एकच असतो.

भरताच्या नाट्यशास्त्रात एका हाताच्या (असंयुक्त) २४,दोन हातांच्या (संयुत) १३ व मिश्र २७ मुद्रा सांगितल्या आहेत. असंयुक्त मुद्रा पुढीलप्रमाणे होत: (१) पताक किंवा पताका, (२) त्रिपताक वा त्रिपताका, (३) कर्तरीमुख, (४) अर्धचंद्र, (५) अराल, (६) शुकतुंड, (७) मुष्टी, (८) शिखर, (९) कपित्थ, (१०) कटकामुख, (११)सूचिमुख, (१२) पद्मकोश, (१३) अलपल्लव, (१४) उर्णनाभ, (१५) मुकुल, (१६) सर्पशीर्ष, (१७) मृगशीर्ष, (१८) चतुर, (१९) हंसपक्ष, (२०) हंसमुख, (२१) भ्रमर, (२२) लांगूल, (२३) संदेश व (२४)ताम्रचूड. १३ संयुत मुद्रा पुढीलप्रमाणे (१) अंजली, (२) कपोतक, (३) कर्कट, (४) स्वस्तिक, (५) खटका वर्धमान, (६) उत्संग, (७)निषध, (८) दोल, (९) पुष्पपुट, (१०) मकर, (११) गजदंत, (१२) अवहित्थ व (१३) वर्धमान.

अभिनयदर्पण या ग्रंथात २८ असंयुक्त आणि २३ संयुक्त मुद्रांचा उल्लेख आहे. असंयुक्त हस्तमुद्रा पुढीलप्रमाणे होत:(१) पताक, (२) त्रिपताका,(३) अर्धपताका, (४)कर्तरीमुख, (५) मयूर, (६) अर्धचंद्र, (७) अराल, (८) शुकतुंड, (९) मुष्टी, (१०) शिखर, (११) कपित्थ, (१२)कटकामुख,(१३) सूची, (१४) चंद्रकला, (१५) पद्मकोश, (१६) सर्पशीर्ष,(१७) मृगशीर्ष, (१८) सिंहमुख, (१९) लांगूल, (२०) सोलपद्म, (२१) चतुर, (२२) भ्रमर, (२३) हंसास्य, (२४) हंसपक्ष, (२५) संदंश, (२६) मुकुल, (२७) ताम्रचुड व (२८) त्रिशूल. संयुक्त मुद्रा पुढीलप्रमाणे : (१) अंजली,(२) कपोत, (३) कर्कट, (४) स्वस्तिक, (५) डोलहस्त, (६) पुष्पपुट, (७) उत्संग, (८) शिवलिंग, (९) कटकावर्धन, (१०) कर्तरी-स्वस्तिक, (११)शकट, (१२) शंख, (१३) चक्र, (१४) संपुट, (१५) पाश, (१६) कीलक, (१७) मत्स्य, (१८) कूर्म, (१९) वराह, (२०) गरुड, (२१) नागबंध, (२२) खट्वा व (२३) भेरुण्ड. ह्या सर्व असंयुक्त मुद्रा भरतनाट्यम् नृत्यशैलीत वापरतात.

हस्तलक्षणीदीपिका या ग्रंथात २४ असंयुक्त हस्तमुद्रांचा उल्लेख आहे व त्या विशेषत्वाने कथकळी नृत्यात वापरल्या जातात. त्या पुढीलप्रमाणे होत: (१) पताक, (२) मुद्राख्य, (३) कटक, (४) मुष्टी, (५) कर्तरीमुख, (६) शुकतुंड, (७) कपित्थ, (८) हंसपक्ष, (९) शिखर, (१०) हंसास्य, (११) अंजली, (१२) अर्धचंद्र, (१३)मुकुर, (१४) भ्रमर, (१५) सूची, (१६) पल्लव, (१७) त्रिपताक, (१८) मृगशीर्ष, (१९) सर्पशीर्ष, (२०) वर्धमानक, (२१) अराल, (२२) उर्णनाभ, (२३) मुकुल व (२४) कटकामुख.


असंयुक्त आणि संयुक्त प्रकारांतील काही प्रमुख निवडक मुद्रांचे थोडक्यात वर्णन पुढे दिले आहे:

असंयुक्त हस्तमुद्रा :(१) पताका : (ध्वज). हाताची चारही बोटे अगदी सरळ ताठ ठेवून अंगठा किंचित आतल्या बाजूस वळवून ठेवला, की पताका मुद्रा होते. विनियोग : नृत्यारंभ करणे, चंदन लावणे, स्पर्श करणे, शपथ घेणे, दूरच्या अंतरावर असलेल्यास उद्देशून बोलावणे इ. क्रियांत या मुद्रेचा विनियोग होतो. या मुद्रेचे आद्य दैवत ब्रह्मा, ऋषी शिव, रंग श्वेत व जाती ब्राम्हण असते. पताकामुद्रा ठेवूनच जर अनामिका खाली वाकविली, तर ती ‘त्रिपताका’ मुद्रा होते.

(२) अराल : (किंचित वक्र). पताका मुद्रा ठेवून फक्त तर्जनी खाली वाकविली व अंगठ्याला स्पर्श करून ठेवली, तर ती अराल मुद्रा होते. विनियोग : आचमन करणे, भुवयांवरचा घाम पुसणे, डोळ्यात काजळ अथवा अंजन घालणे इ. क्रियांत या मुद्रेचा उपयोग होतो. मुद्रेचे आद्य दैवत वासुदेव, ऋषी अगस्ती, रंग लाल व जाती मिश्र असते. अराल मुद्रा ठेवूनच जर अनामिका खाली वाकवली, तर ती ‘शुकतुंड’ मुद्रा होते.

(३) त्रिशुल : प्रथम पताका मुद्रा ठेवावी. नंतर करंगळी खाली वाकवून अंगठ्याला स्पर्श करून ठेवावी. अनामिका,मध्यमा,तर्जनी एकमेकांपासून किंचित दूरवर व एकदम सरळ ठेवाव्यात म्हणजे ती त्रिशुल मुद्रा होते. या मुद्रेचे आद्य दैवत बृहस्पती,रंग श्वेत, ऋषी इंद्र व जाती ब्राह्मण असते. याच मुद्रेतील अंगठा तळहाताच्या बाजूला सरकवून ठेवला व अनामिका खाली वाकविली (मध्यमा व तर्जनी जवळ ठेववी),तर ती ‘अर्धपताका’ मुद्रा होते.

(४) भ्रमर: (भुंगा). मध्यमा अंगठ्याला स्पर्श करून ठेवावी, तसेच तर्जनी आतल्या बाजूस वळवून ठेवावी. कनिष्ठ व अनामिका अगदी सरळ असावीत. म्हणजे ती भ्रमर मुद्रा तयार होते. विनियोग: भ्रमर दाखविणे,काटा काढणे,उडणाऱ्या पक्ष्याची कृती दाखविणे,कर्णकुंडल दर्शविणे, फूल तोडणे इ. क्रियांत भ्रमर मुद्रेचा उपयोग होतो. या मुद्रेचे आद्य दैवत गरुड,ऋषी कपिल,रंग काळा व जाती मिश्र असते. याच मुद्रेतील तर्जनी जर सरळ करून अंगठ्याला स्पर्श केली, तर ती ‘कटकामुख’मुद्रा होते.

(५) आलपद्म: (उमललेले कमळ). प्रथम सर्व बोटे एकमेकांपासून दूर ठेवावीत. नंतर करंगळीपासून क्रमाने एक एक बोट आतल्या बाजूस वळवून ठेवावे. अंगठा बाहेरच्या दिशेला जितका वळवून ठेवता येईल तितका ठेवावा, म्हणजे ती आलपद्म मुद्रा होते. विनियोग: कमळ, सूर्य, सौंदर्य, वक्षस्थळ इत्यादींची प्रतिकात्मक अभिव्यक्ति, तसेच चौकशी करणे, अर्पण करणे, प्रश्न विचारणे इ. क्रिया दर्शविण्यासाठी या मुद्रेचा विनियोग होतो. मुद्रेचे आद्य दैवत कृष्ण, रंग काळा,ऋषी वसंत व जाती गंधर्व मानली आहे. आलपद्म मुद्रा ठेवूनच सगळी बोटे आतल्या बाजूस आंकुचन करून घेतली व तळहाताची किंचित पोकळी केली, तर ती ‘पद्मकोश’ मुद्रा होते.

(६) कटकामुख : (साखळीचा विवृत्त दुवा). तर्जनी व मध्यमाही दोन्ही बोटे सरळ करून अंगठ्याला स्पर्श करून ठेवली आणि अनामिका व कनिष्ठ ही दोन्ही बोटे क्रमशः पुढे व मागे सरळ करून ठेवली म्हणजे कटकामुख मुद्रा तयार होते. विनियोग: फुलांची माळ हाती धरणे, चंदन उगाळणे, फूल तोडणे, भात्यातून बाण काढणे, बाण मारणे इ. क्रियांत या मुद्रेचा उपयोग होतो. या मुद्रेचे आद्य दैवत राम, रंग तांबूस, ऋषी भार्गव व जाती देव आहे. हीच मुद्रा ठेवून फक्त तर्जनी वर सरळ करून ठेवली व त्याच्याऐवजी अनामिका अंगठ्याला स्पर्श करून ठेवली, तर ती ‘सिंहमुख’मुद्रा होते.

(७) पद्मकोश : (कमळाचा कोश). तळहातामध्ये थोडीशी पोकळी ठेवून सर्व बोटे किंचित आतल्या बाजूस आंकुचन करून घेतली, की पद्मकोश मुद्रा तयार होते. विनियोग : शंकराला कमळ अर्पण करणे, इच्छा प्रदर्शित करणे, वक्षस्थळ सूचित करणे, फळाचा आकार दर्शविणे,‘पाच’आकडा दाखविणे इ. क्रियांत पद्मकोश मुद्रेचा उपयोग होतो. मुद्रेचे आद्य दैवत भार्गव,रंग श्वेत, ऋषी पद्माधर व जाती यक्ष आहे,हीच मुद्रा ठेवून फक्त अनामिका आतल्या बाजूला वळवून ठेवली, तर ती ‘लांगूल’मुद्रा होते.

(८) शिखर : (टोक वा कळस). हाताची चारही बोटे एकत्र करून आतल्या बाजूस आकुंचन करून तळहाताला स्पर्श करून ठेवावी व त्यांच्यावर अंगठा किंचित आतल्या बाजूस वळवून वर ठेवावा. म्हणजे ‘मृष्टी’(मूठ) मुद्रा होते. हीच मुष्टी मुद्रा ठेवून, फक्त अंगठा सरळ करून ठेवला, की ती शिखर मुद्रा होते. विनियोग : शस्त्र धारण करणे, शिखर दाखविणे, कामदेवाचा धनुष्य दाखविणे, मदनाचा आविष्कार, प्रश्न विचारणे, घंटानाद करणे, भुवया दाखविणे इ. क्रिया व्यक्त करण्यासाठी या मुद्रेचा विनियोग होतो. मुद्रेचे आद्य दैवत रतिवल्लभ, रंग धूसर, ऋषी जिन्ह व जाती गंधर्व आहे.

उमसणारे कमळ व त्याची भरतनाट्यम्मधील संयुक्त हस्तमुद्रा.

संयुक्त हस्तमुद्रा :(१) अंजली : (नमस्कार). दोन्ही हातांच्या पताका मुद्रा एकत्र जोडून समोरासमोर ठेवणे, ही अंजली मुद्रा होय. विनियोग : ही मुद्रा मस्तकाच्या एकदम वर करून ठेवली तर देवतेस नमस्कार होतो मुद्रा तोंडासमोर ठेवली तर गुरूस नमस्कार होतो व छातीसमोर ठेवली तर प्रजेस नमस्कार होतो. अंजली मुद्रा ठेवूनच हातामध्ये थोडीशी पोकळी निर्माण केली, तर ती ‘कपोत’ मुद्रा होते.

() स्वस्तिक : दोन पताका मुद्रा मनगटाजवळ परस्परविरूद्ध दिशांना ठेवल्या, म्हणजे ती स्वस्तिक मुद्रा होते. विनियोग : वृक्ष दाखविणे, देवता दाखविणे इत्यादी. हीच पताका मुद्रा ठेवून आपल्याला ‘स्वस्तिक त्रिपताका’, ‘स्वस्तिक आलपद्म’, ‘स्वस्तिक अराल’, ‘स्वस्तिक अर्धपताका’यांसारख्या इतर अनेक मुद्रा ठेवता येतात.

३) शंख : डाव्या हाताने ‘अर्धचंद्र’ (पताका मुद्रा ठेवून म्हणजे सगळी बोटे सरळ ताठ ठेवून, फक्त अंगठा बाहेरच्या दिशेला वाकवल्यास ‘अर्धचंद्र’ मुद्रा होते) मुद्रा ठेवून उजव्या हाताचा अंगठा त्यावर ठेवावा. नंतर अर्धचंद्र मुद्रेला शिखर मुद्रेचा आकार द्यावा व वरून उजव्या हाताचा तळवा शिखर मुद्रेवर ठेवून शंखाचा आकार द्यावा, म्हणजे ती शंख मुद्रा होते. विनियोग: शंखाचा आकारदाखविणे, शंख वाजविण्याची क्रिया दर्शविणे इत्यादी.


(४) चक्र : दोन्ही हातांना अर्धचंद्र मुद्रा ठेवून उजव्या व डाव्या हातांची सर्व बोटे दूर सरकवून किंचित अंतर ठेवून चक्रासारखा आकारा द्यावा. म्हणजे ती ‘चक्र’मुद्रा होते. विनियोग : भगवान विष्णूचे सुदर्शन चक्र दाखविण्यासाठी तसेच गाडीचे चाक दाखविण्यासाठी या मुद्रेचा विनियोग केला जातो.

(५) गरुड : दोन्ही हातांच्या अर्धचंद्र मुद्रा मनगटाजवळ किंचित ऊर्ध्वमुख ठेवून अंगठे एकमेकांस गुंतवून ठेवणे, ही गरुड मुद्रा होय. विनियोग : गरुड पक्षी अथवा त्याचा आकार दाखविणे, पर्वत दाखविणे इत्यादी.

(६) मत्स्य : दोन्ही हातांच्या अर्धचंद्र मुद्रा एकावर एक अधोमुख ठेवल्या (उजव्या हाताची अर्धचंद्र मुद्रा डाव्या हाताच्या अर्धचंद्र मुद्रेवर) म्हणजे ती मत्स्य मुद्रा होते. अंगठे दूरदूर ठेवून त्यांना किंचित गती द्यावी, म्हणजे हुबेहुब माशासारखा आकार दिसतो. विनियोग: मत्स्य दाखविण्यासाठी, मत्स्यावतार दाखविण्यासाठी, समुद्र दाखविण्यासाठी या मुद्रेचा उपयोग करतात.

(७) संपुट : (एकत्र आणणे). दोन्ही हातांच्या अर्धचंद्र मुद्रा एकमेकांवर ठेवल्यास (उजव्या हाताचा तळवा डाव्या हातावर ठेवणे व दोन्ही हातांच्या तळव्यात किंचित पोकळी निर्माण करणे) म्हणजे ती संपुट मुद्रा होते. विनियोग : एकसूत्रीपणा दाखविणे, गुपित सांगणे, एखाद्या वस्तूला आकार देणे इ. क्रियांत या मुद्रेचा विनियोग होतो.

(८) शिवलिंग : उजव्या हाताने शिखर मुद्रा व डाव्या हाताने ऊर्ध्वमुख पताका मुद्रा धारण करून उजव्या हाताची शिखर मुद्रा डाव्या हाताच्या पताका मुद्रेवर ठेवावी, म्हणजे ती शिवलिंग मुद्रा होते. विनियोग : शिव अथवा शिवलिंग दाखविण्यासाठी या मुद्रेचा विनियोग होतो.

शिखर व कपित्थ या संयुक्त हस्तमुद्रेद्वारा धनुष्यबाण दर्शविणारी नृत्यावस्था

असंयुक्त नृत्यमुद्रेत ज्याप्रमाणे आद्य दैवत, ऋषी, रंग, जाती इ. असतात, तसे संयुक्त मुद्रेत नसतात. कारण पताका मुद्रेचेच नियम संयुक्त मुद्रेला लागू होतात. फक्त काही मुद्रांमध्ये आद्य दैवते बदलतात. उदा., अंजली मुद्रेत क्षेत्रपाल हे आद्य दैवत असते. शंख, चक्र, स्वस्तिक, गरुड, मत्स्य, संपुट, शिवलिंग अशांसारख्या मुद्रा वस्तुदर्शक, प्राणिदर्शक आकारांच्या द्योतक आहेत. त्यांना आद्य दैवते, ऋषी इ. संकल्पना लागू होत नाहीत.

संयुक्त मुद्रा व मिश्र मुद्रा : नृत्यमुद्रांद्वारे प्राण्यांचे वा वस्तूंचे आकार, क्रिया इ. दाखविता येतात. म्हणजेच मुद्रांच्या विशिष्ट आकृतिबंधांद्वारे वस्तूंच्या, प्राणिमात्रांच्या आकारांचे वा हालचालींचे अनुकरण करणे शक्य असते. मुद्रेत अनुकरण व अंर्थसंकेत ह्या दोन गुणांना महत्त्व असते. वस्तूंचे वा प्राण्यांचे आकार, हालचाली व तद्‌जन्य अर्थाभिव्यक्ती ही जशी एका हाताच्या मुद्रेने दाखविता येते तशीच दोन हातांच्या संयुक्त मुद्रेनेही दाखविता येते.तथापि संयुक्त मुद्रेमध्ये एकाच समान मुद्रेने सर्व वस्तूंचे आकार दर्शविणे कित्येकदा शक्य होत नाही. म्हणून नाट्यशास्त्र व अभिनयदर्पण या ग्रंथाच्या संयुक्त मुद्रांच्या नामावलीत ‘शिवलिंग’व ‘शंख’ह्यांसारख्या भिन्नभिन्न संयुक्त मुद्रांना स्थान मिळाले आहे.

शिवलिंग या मुद्रेचा आकार दोन्ही हातांच्या एकाच मुद्रेने दर्शविता येत नाही. दोन्ही हातांनी वेगवेगळ्या मुद्रा (डाव्या हाताने ऊर्ध्वमुख पताका किंवा अर्धचंद्र मुद्रा व उजव्या हाताने शिखर मुद्रा) धारण करून त्या एकत्र आणल्यानंतर ती ‘शिवलिंग’ मुद्रा होते. तीत दर्शविल्या जाणाऱ्या पताका व शिखर ह्या दोन्ही मुद्रा जरी भिन्न असल्या तरी त्यांतून हुबेहूब शिवलिंगाच्या आकाराची कल्पना अभिप्रेत असते. असेच शंख मुद्रेच्या बाबतीतही म्हणता येईल. शंख मुद्रेतदेखील पताका व शिखर या दोन मुद्रांचा संयोग झाला असला, तरी ही मुद्रा मिश्र प्रकारात मोडत नाही. पताका व शिखर यांचा संयोग न करता दोन्ही मुद्रा दूरदूर अंतरावर ठेवल्या, तर त्यांतून शंखाचा आकार अभिप्रेत होत नाही. म्हणून ही मुद्रा मिश्र न ठरता संयुक्त ठरते. दोन भिन्न मुद्रा एकत्र आणून त्यांचा संयोग घडवून आणणे, त्या एकमेकांवर स्थापित करणे, त्यांतून वस्तूचा निश्चित आकार दर्शविणे इ. क्रिया संयुक्त मुद्रेत अत्यंत महत्त्वाच्या व मूलगामी ठरतात. म्हणून शिवलिंग व शंख ह्या मुद्रा संयुक्त हस्तमुद्रेत मोडतात. त्या मिश्र मुद्रा होऊ शकत नाहीत. मिश्र मुद्रेत दोन वेगवेगळ्या मुद्रा वापरल्या जातात हे जरी खरे असले, तरी त्यांचा संयोग झालाच पाहिजे असा नियम नाही. मात्र संयुक्त मुद्रेत हा नियम कटाक्षाने पाळला जातो. मिश्र मुद्रेतील दोन भिन्न मुद्रा दूर अंतरावर ठेवूनही अर्थ सूचित करता येतो. उदा., ‘दीप’दाखविण्यासाठी डाव्या हाताने मुष्टी व उजव्या हाताने पताका मुद्रा यांचा उपयोग केला जातो. ह्या दोन्ही मुद्रा एकत्र न आणता, एकमेकींना स्पर्श न करता किंचित दूरदूर ठेवल्या, तरी त्यांतून दीप हा अर्थ सूचित होतो. कारण दीपांचे आकार-प्रकार तसेच दीप धारण करण्याची पद्धती ह्यांत भेद संभवतात. मात्र शिवलिंगाचा आकार निश्चित व सर्वमान्य असल्याने शिवलिंग हे विशिष्ट मुद्रांनीच संयुक्त मुद्रेत दर्शविले जाते. लिंगासाठी शिखर मुद्रा व लिंग ज्यावर स्थापित झाले आहे, त्या अधिष्ठानासाठी पताका मुद्रा.

संयुक्त मुद्रा अनुकरणाद्वारे एखाद्या वस्तूची हुबेहूब प्रतिकृती दर्शविते, तर मिश्र मुद्रा नृत्यातील विशिष्ट काल्पनिक प्रसंगांतून निर्माण होतात. संयुक्त मुद्रा प्राण्यांच्या व वस्तूंच्या हुबेहूब आकारांशी संबंधित असतात मिश्र मुद्रा नृत्यातील विशिष्ट काल्पनिक प्रसंगांतील अर्थसंकेतांशी संबंधित असतात. उदा., एखाद्या नृत्यातील प्रसंगात कमळाभोवती गुंजन करणारा भ्रमर दाखवावयाचा झाल्यास डाव्या हाताने आलपद्म व उजव्या हाताने भ्रमर या मुद्रांच्या मिश्रणातून तो दर्शविला जातो. पत्रलेखनाची क्रिया दर्शविताना डाव्या हाताने ऊर्ध्वमुख पताका व उजव्या हाताने कपित्थ या मिश्र मुद्रांचा वापर केला जातो व गाईला कुरवाळण्याची क्रिया दाखवावयाची झाल्यास डाव्या हाताने सिंहमुख व उजव्या हाताने सर्पशीर्ष या मिश्र मुद्रा धारण केल्या जातात, मिश्र मुद्रा या काल्पनिक प्रसंगांतून निर्माण होत असल्याने, त्यांची संख्या निश्चित नसते. त्यांचे अगणित प्रकार संभवतात. हस्तलक्षणदीपिकेत अनेक मिश्र मुद्रांचे निर्देश आढळतात. उदा., दासी या व्यक्तिनिर्देशासाठी डावा कटक व उजवा पताक हस्त ही मिश्र मुद्रा वापरली जाते, तर वेद (शास्त्र) याची प्रतीकात्मक अभिव्यक्ती डावा कटक व उजवा कर्तरीमुख या मिश्र मुद्रेने केली जाते.

नृत्यमुद्रांच्या विनियोगाची व्याप्ती खूपच मोठी असून त्यात पुढील प्रकारांचा अंतर्भाव होतो : (१) देवताहस्त, (२) दशावतारहस्त,(३) जातीयहस्त,(४) नवग्रहहस्त,(५) बांधवहस्त,(६) व्यक्तिदर्शक व प्राणिदर्शक-हस्त, (७) स्थलदर्शकहस्त, (८) भावदर्शकहस्त व (९) नृत्तहस्त.


देवताहस्त : भिन्नभिन्न मुद्रांनी नृत्यावस्थेतील भिन्नभिन्न देवता दर्शविल्या जतात. उदा., ब्रह्मा, विष्णू, महेश, सरस्वती, पार्वती, लक्ष्मी, विघ्नेशर, इंद्र, यम, वरुण, वायू, कुबेर इत्यादी. उदाहरणादाखल काही दैवते आणि त्यांनी धारण केलेल्या विशिष्ट मुद्रा:(१) ब्रह्मा  डाव्या हाताने चतुर मुद्रा व उजव्या हाताने हंसास्य मुद्राधारण करणे. (२) विष्णू – दोन्ही हातांनी त्रिपताका मुद्रा धारण करणे.(३) महेश – डाव्या हाताने मृगशीर्ष व उजव्या हाताने त्रिपताका मुद्राधारण करणे.

दशावतारहस्त : नृत्यावस्थेतील दशावतारांसाठीही निश्चित मुद्रा संकेताने ठरवल्या आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, बलराम, कृष्ण व कल्की हे दशावतार होत. काही निवडक अवतारांसाठी निश्चित केलेल्या मुद्रा पुढीलप्रमाणे : (१) मत्स्यावतार : मत्स्य मुद्रा प्रथम दर्शविणे नंतर दोन्ही हातांनी त्याच अवस्थेत त्रिपताका मुद्रा खांद्यापासून समान अंतरावर ठेवणे. (२) नरसिंहावतार : डाव्या हाताने त्रिपताका मुद्रा धारण करणे. (३) रामावतार : उजव्या हाताने कपित्थ मुद्रा (कटकामुख मुद्रा ठेवून तर्जनी आतल्या बाजूस वळवून ठेवावी) व डाव्या हाताने शिखर मुद्रा जवळ आणणे व दूर नेणे.

जातीयहस्त : ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य व शूद्र या जाती मुद्रांद्वारे दर्शविल्या जातात. उदा., (१) ब्राह्मण: दोन्ही हातांनी शिखर मुद्रा धारण करणे तसेच उजव्या हाताची शिखर मुद्रा यज्ञोपवीत घातल्याप्रमाणे पुढेमागे करीत राहणे. (२) क्षत्रिय : डाव्या हाताने शिखर मुद्रा पुढेमागे करणे व उजव्या हाताने पताक मुद्रा ठेवणे.

नवग्रहहस्त : नवग्रह पुढीलप्रमाणे होत : (१) सूर्य,(२) चंद्र, (३) अंगारक,(४) बुध, (५) बृहस्पती,(६) शुक्र,(७) शनी,(८)राहू व(९) केतू. हे नवग्रह मुद्रांद्वारे दर्शविले जातात. उदा.,(१) सूर्य – सोलपद्म (आलपद्म) मुद्रा आणि कपित्थ मुद्रा खांद्यावर धरणे. (२) चंद्र – डाव्या हाताने पताक मुद्रा धारण करणे. (३) अंगारक – डाव्या हाताने सूचि मुद्रा (तर्जनी सरळ ठेवून बाकीची बोटे आतल्या बाजूस ठेवणे म्हणजे अंगुलीनिर्देश करणे) व उजव्या हाताने मुष्टी मुद्रा धारण करणे.

बांधवहस्त : मुद्रांद्वारे वेगवगळे नातेसंबंध दर्शविले जातात. उदा., दंपती : डाव्या हाताने शिखर व उजव्या हाताने मृगशीर्ष मुद्रा पुरुष व स्त्री लक्षण दर्शवितात. माता : डाव्या हाताने अर्धचंद्र व उजव्या हाताने संदंश मुद्रा (पाचही बोटे एकत्र आणून त्यांची उघडझाप करणे) धारण करून नंतर डावा हात पोटावर ठेवणे. ही मुद्रा स्त्रीहस्त दर्शविते. पती: डाव्या हाताने अर्धचंद्र व उजव्या हाताने शिखर मुद्रा धारण करणे.

व्यक्तिदर्शकहस्त : काही प्रसिद्ध राजे दर्शविण्यासाठी विशिष्ट मुद्रा वापरल्या जातात. उदा., हरिश्चंद्र: शुकतुंड मुद्रा (अराल मुद्रेतील अनामिका खाली वाकविल्यास शुकतुंड मुद्रा होते). रावण : पताका मुद्रा खांद्यावर ठेवणे.

प्राणिदर्शक : विशिष्ट मुद्रांनी विशिष्ट प्राणी दर्शविले जातात. उदा., वन्य प्राणी – वाघ : अर्धचंद्र मुद्रा अधोमुख करून ठेवावी. सिंह उजव्या हाताने सिंहमुख व डाव्या हाताने पताका मुद्रा सिंहमुख मुद्रेच्या पाठीमागे ठेवावी. आकाशात संचार करणारे पक्षी – कोकीळ : अराल मुद्रा धारण करून तिला हलविणे. चातक : कांगूल (लांगूल) मुद्रा (पद्मकोश मुद्रा धारण करून अनामिका आतल्या बाजूस वाकविणे) ठेवून ती हलविणे. जलचर प्राणी – बेडूक : दोन्ही हातांनी चक्र मुद्रा (तर्जनी व अंगठा आतल्या बाजूस वाकविणे). कासव : दोन्ही पताका मुद्रा आडव्या ठेवून एकमेकींपासून दूर करणे.

स्थलदर्शक : काही प्रसिद्ध नद्या, प्रदेश इ. दाखविण्यासाठी विशिष्ट मुद्रा वापरतात: उदा., गंगा : ताम्रचूड मुद्रा (सूची मुद्रेतील तर्जनी किंचित खाली वाकविली तर ताम्रचूड मुद्रा होते). भिमारथी अराल मुद्रा. सरस्वती : पताक व चतुर मुद्रा. प्रदेश–स्वर्गलोक (१) भू, (२) भूवर, (३) स्वर्ग, (४) जन, (५) तप, (६) सत्य, (७) महर. हे सर्व दाखविण्यासाठी केवळ पताका मुद्रा ऊर्ध्वमुख (किंचित वळवून) ठेवावी. मर्त्यलोक : (१) अतल, (२) मितल, (३) सुतल, (४) तलातल, (५) महातल, (६) रसातल, (७) पाताल. हे सर्व दाखविण्यासाठी पताका मुद्रा अधोमुख करून (किंचित वळवून) ठेवावी.

भावदर्शक : आश्चर्य : दोन्ही हातांनी आलपद्म. भय : दोन्ही हातांनी पताका. धमकी : असंयुक्त सूची मुद्रा. अशारीतीने प्रतीकारात्मक पातळीवर भावभावनांचे दर्शन घडविण्यासाठी विशिष्ट मुद्रांचा आश्रय घेतला जातो. अशा अनेक भावदर्शक मुद्रा काल्पनिक अवस्थांतून निर्माण होऊ शकतात.

नृत्तहस्त :‘नृत्त’म्हणजे केवळ सौंदर्यप्रकटनासाठी केलेले अंगविक्षेप व पदन्यास. नृत्तहस्ताने नृत्याला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. नृत्तहस्तामुळे नृत्यातील सहजता, लास्य व स्थानक अधिक सौंदर्यशाली वाटतात. नृत्तहस्त एकंदर ३० आहेत : (१) चतुरश्र, (२) उद्‌वृत्त, (३) तलमुख, (४) स्वस्तिक, (५) विप्रकीर्ण, (६) अराल कटकामुख, (७) अविद्धवक्र, (८) सूचास्य, (९) रेचित, (१०) अर्धरेचित, (११)उत्तानवंचित, (१२) पल्लव,(१३) नितंब, (१४) केशबद्ध, (१५) करिहस्त, (१६) लताख्य, (१७) पक्षवंचित, (१८) पक्षप्रद्योतक, (१९) गरुडपक्ष, (२०) हंसपक्ष (दंडपक्ष),(२१) ऊर्ध्वमंडली, (२२) पार्श्वमंडली, (२३) उरोमंडली, (२४) उरःपार्श्वार्धमंडली, (२५) मृष्टीकस्वस्तिक, (२६) नलिनी पद्मकोश, (२७) अलपल्लव, (२८) उल्बण, (२९) ललित व (३०) वलित. काही निवडक नृत्यहस्त व त्यांतील मुद्रा : (१) चतुरश्र : दोन कटकामुख मुद्रा छातीसमोर एकमेकांपासून आठ अंगुली एवढ्या अंतरावर ठेवून कोपरे व खांदे समान ठेवावेत,म्हणजे चतुरश्रहस्त होतो. दैवत–वराही (परमात्मा) विनियोग : मंथन करणे, धरणे, अलंकार घालणे, दोरी ओढणे, फूल धरणे, कंचुकी बांधणे इ. क्रियांत या हस्ताचा वापर केला जातो. (२) केशबंध दोन पताका मुद्रांचा उपयोग करून केस बांधण्याची क्रिया दर्शविली जाते. दैवत–दुर्गा, विनियोग: केस बांधणे, गाल सूचित करणे इत्यादी. (३) गरुडपक्ष : (गरुडाचे पंख). दोन अंधचंद्र मुद्रा कमरेवर ठेवणे व किंचित वर नेणे. दैवत–सनंदन. विनियोग : कंबरपट्टा (मेखला) दर्शविणे, श्रेष्ठताभाव व्यक्त करणे. (४) विप्रकीर्ण : (सैल) दोन स्वस्तिक मुद्रा त्वरेने एकमेकींपासून दूर नेल्या, म्हणजे विप्रकीर्णहस्त होतो. दैवत–दक्षिणमूर्ती. विनियोग: सुटणे, दूर नेणे,विभाजन अथवा विभक्तपणा दर्शविणे इत्यादी.

अभिजात नृत्यशैलींतील नृत्यमुद्रांची तुलना : वेगवेगळ्या अभिजात नृत्यशैलींत मुद्रांची नावे व संख्या ह्यांत भेद आढळून येतात. हे नामभेद व संख्याभेद नृत्यशास्त्रावरील प्रमाणग्रंथांना अनुसरूनच आहेत. विविध नृत्यशैलींनी विविध नृत्यशास्त्रीय ग्रंथांचा आधार घेतलेला दिसून येतो. उदा. भरतनाट्यम्‌ नृत्यशैलीत नाट्यशास्त्र आणि अभिनयदर्पण ह्या दोन ग्रंथांच्या आधारे मुद्राप्रदर्शन करण्याचा प्रधात आहे. कथकळी नृत्यशैली हस्तलक्षणदीपिकेचा आधार घेते व मणिपुरी नृत्यशैली गोविंद संगीत लीलाविलास या ग्रंथाचा आधार घेते तर ओडिसी नृत्यशैलीत अभिनय चंद्रिका व कथ्थक नृत्यशैलीत नाट्याशास्त्रसंग्रहअभिनयदर्पण या ग्रंथांचा आधार घेतला जातो.

विविध ग्रांथिक आधारांमुळे मुद्रांच्या नावांत फरक दिसून येतो. अर्थात हा फरक फार मोठ्या प्रमाणात आढळून येत नाही. तथापि काही मुद्रांच्या बाबतींत हा फरक प्रकर्षाने जाणवतो. उदा. पताका मुद्रा. कथकळी नृत्यशैली वगळता बाकीच्या सर्व नृत्यशैलींत पताका मुद्रा ही पताका (ध्वज) म्हणूनच ओळखली जातेतथापि याच पताका मुद्रेला कथकळी नृत्यशैलीत त्रिपताका असे म्हणतात. अशाच तऱ्हेची भिन्नता कथकळी नृत्याच्या आधारग्रंथात व इतर नृत्यांच्या आधारग्रंथांत दिसून येते. हस्तलक्षणदीपिकेत वर्णिलेली मुद्राख्य मुद्रा ही अभिनयदर्पण ग्रंथात अराल मुद्रा म्हणून ओळखली जाते. याच ग्रंथातील वर्धमानक मुद्रेला नाट्याशास्त्रात शिखर मुद्रा म्हणतात. हंसास्य मुद्रा ही भरतनाट्यम्‌मध्ये कटकामुख मुद्रा म्हणून ओळखली जाते. उदाहरणादाखल अशा काही नामभेदांचा एक तौलनिक तक्ता पुढे दिला आहे :

विविध नृत्यशैलींतील असंयुक्त मुद्रांमधील नामभेद

भरतनाट्यम् 

कथकळी 

मणिपुरी 

ओडिसा 

कथ्थक 

पताका

त्रिपताका

पताका

धव्ज

पताका

अराल

मुद्राख्य

अंकुश

ध्यान

अराल

त्रिशूल

त्रिशूल

त्रिशूल

भ्रमर

कटकम्

भृंग

भ्रमर

आलपद्म

पल्लव

आलपल्लव

क्षिप्त

आलपल्लव

कटकामुख

हंसास्य

हंसास्य

पुष्प

कटकामुख

पद्मकोश

उर्णनाभ

शार्दूलास्य

पद्मकोश

शिखर

वर्धमानक

शिखर

अरात्रिक

शिखर

आधार ग्रंथ: नाट्यशास्त्र अभिनयदर्पण

हस्तलक्षणदीरिका

गोविंद संगीत लीलाविलास

अभिनय चंद्रिका

नाट्यशास्त्रसंग्रह अभिनयदर्पण

नृत्यमुद्रेतील सौंदर्य : नृत्यात हस्तमुद्रांचा वापर केल्याने नृत्याला विशेष सौंदर्य प्राप्त होते. मुद्रेतील सौंदर्य हे बव्हंशी बोटांच्या सुडौल व लयबद्ध हालचालींवर, बोटे व्यवस्थित ठेवण्याच्या पद्धतीवर व तद्‌जन्य स्थितीवर अवलंबून असते. मुद्रेतील रचनात्मक सौंदर्याचा अभ्यास करण्यासाठी, बोटे चटकन वळण्यासाठी व लवचिकपणा येण्यासाठी काही काही अभिजात नृत्यशैलींतील घराण्यांत‘हस्तपाठ’म्हणजे मुद्राध्ययन करण्याची पद्धती आहे. नाट्यशास्त्रअभिनयदर्पण या ग्रंथांतील असंयुक्त व संयुक्त मुद्रांचे श्लोक म्हणून मुद्रा धारण करण्याचा विशिष्ट अभ्यास काही घराण्यांत केला जातो. या हस्तपाठामुळे मुद्रांचा सराव होऊन नर्तक अथवा नर्तकीला त्यांची एकूण नृत्याविष्कारात कलात्मक अभिव्यक्ती साधता येते.

नृत्यात काही काही मुद्रांची ठेवण मुळातच अत्यंत लयबद्ध व डौलदार असल्याचे दिसून येते. अशा सौंदर्यपूर्ण मुद्रांमध्ये आलपद्म, भ्रमर, कपित्थ, कटकामुख, अर्धचंद्र, मृगशीर्ष, हंसास्य, हंसपक्ष इ. मुद्रांचा समावेश होतो. उदा., आलपद्म मुद्रेतील प्रत्येक बोट एकमेकांपासून दूर राखले जाते व त्यातून लास्य भाव दर्शविला जातो.बोटांचे संचलन झाल्याबरोबर त्यांतील सौंदर्य प्रतीत होते. त्यातून समर्पणाचा भाव व्यक्त होतो. प्रत्येक बोटातील अंतरात समानता व रेखीवपणा दिसून येतो. भरतनाट्यम्‌ नृत्यशैलीतील अत्यंत प्रसिद्ध अशी ही मुद्रा आहे. अशाच प्रकारचे सौंदर्य उपरिनिर्दिष्ट सर्व मुद्रांत दिसून येते.

संदर्भ : 1. Banerjea, Jitendra Nath, The Development of Hindu Iconography, Calcutta, 1956.

            2. Bhavnani, Enakshi, The Dance in India, Bombay, 1965.

            3. Coomaraswamy, Ananda K. The Mirror of Gesture, New York, 1935.

            4. Marg Publications, Classical and Folk Dances of India, Bombay, 1963.

            5.Ragini Devi, Dance Dialects of India, Bombay, 1972.

            6. Vatsyayan, Kapila, Indian Classical Dance, New Delhi, 1974.

परदेशी, रूपचंद