साराभाई, मल्लिका विक्रम : (९ मे १९५४– ).सुप्रसिद्घ नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि लेखिका. त्यांचा जन्म उच्चशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात मृणालिनी व विक्रम या मातापित्यांच्या पोटी अहमदाबाद (गुजरात) येथे झाला. वडील विक्रम हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अवकाशविज्ञ असून, आई मृणालिनी ह्या ख्यातनाम मल्लिका साराभाई : एक भावमुद्रानृत्यांगना वनृत्यदिग्दर्शिका होत. त्यामुळे विज्ञान व कला यांचा वारसा त्यांना लाभला. बालपणापासून मल्लिकांचा ओढा नृत्य व संगीताकडे होता. सुरुवातीच्या शालेय शिक्षणा-बरोबरच त्यांनी आईकडून भरतनाट्यम्‌चे धडे घेतले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचे अरेंगेट्रम् (रंगमंचावरील प्रथम प्रवेश) झाले. त्यांनी पथगुडी एस्.रामस्वामी यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेतले. कूचिपूडी नृत्याचे शिक्षण गुरू सी. आर्. आचार्यलू यांच्याकडे घेतल्यानंतर, अहमदाबाद येथील ‘दर्पण ॲकॅडमी फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’मधून (विक्रम व मृणालिनी यांद्वारे स्थापित) मोहिनी आट्टम्चे आणि लोकनृत्याचे शिक्षणही त्यांनी प्राप्त केले. पुढे त्या त्याच संस्थेत १९७७ पासून कार्यरत आहेत. नृत्यविषयक शिक्षण घेत असतानाच त्यांनी अहमदाबाद येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेतून एम्. बी. ए. ही पदव्युत्तर पदवी संपादन केली (१९७४) आणि नंतर ‘ऑर्गनायझेशनल बिहेव्हिअर’ या विषयावर प्रबंध सादर करून गुजरात विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी मिळविली (१९७६). याशिवाय त्यांनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ (नवी दिल्ली) या संस्थेतून अभिनय विषयातील पदवी घेतली (१९७९). दर्पण अकॅडमीच्या पथकासमवेत त्या भारतातील आणि परदेशांतील अनेक प्रतिष्ठित महोत्सवांत सहभागी झाल्या आहेत. त्यांचा खजुराहो (मध्य प्रदेश) येथील नृत्यमहोत्सवातील कलाविष्कार जगभरच्या नामवंत समीक्षकांनी नावाजला. त्यात भाव, राग व ताल यांचे अनोखे सौंदर्यदर्शन दिसून आले. नृत्यदिग्दर्शिका म्हणून त्यांनी अनेक भारतीय आणि पाश्चात्त्य दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. त्या जरी शास्त्रीय नृत्यशैलीच्या अभ्यासक असल्या, तरी सध्याच्या जगाशी एकरूप झालेल्या आधुनिक नृत्यशैलीचा अपूर्व संगम परंपरागत भरतनाट्यम् व कूचिपूडी या नृत्यप्रकारांशी साधण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

त्या एक उत्तम अभिनेत्री असून पीटर ब्रुक यांच्या महाभारतातील द्रौपदीची त्यांची भूमिका अतिशय गाजली. त्यांनी जख्म, हिमालय से उँचा, ट्रेन टू पाकिस्तान, नैना, व्हाइट रेन्बो, ऐतबार, दुश्मन, संघर्ष इ. चित्रपटांतून आणि ‘थोडा है थोडेकी जरूरत है’, ‘चिंगारी’, ‘अमानत’, ‘जब लव्ह हुआ’, ‘हमारे तुम्हारे’ या दूरदर्शन-मालिकांतून भूमिका केल्या आहेत. त्यांनी १९८९ मध्ये रंगभूमीवर परिश्रमपूर्वक सादर केलेला शक्ती : द पॉवर ऑफ विमेन् हा एकपात्री (सोलो) प्रयोग विलक्षण गाजला.

महाविद्यालयात असताना बिपीन शाह या तरुणाशी त्यांचा परिचय झाला व पुढे त्याची परिणती प्रेविवाहात झाली (१९८२). दोघांनी ‘मापिन’ ही प्रकाशन संस्था काढली (१९८४). त्यांना रेवंत हा मुलगा व अनहिता ही कन्या ही अपत्ये असून नंतर त्यांनी घटस्फोट घेतला (१९८९) तथापि मापिनचे कामकाज दोघे पाहतात. इनसाइड-आउटसाइड या प्रसिद्घ नियतकालिकाचा कार्यभार मल्लिकांनी काही काळ सांभाळला. वीक (कोट्ट्यायम, केरळ) या साप्ताहिकातून ‘लास्ट वर्ड’ या सदरात त्या स्तंभलेखनही करतात. लघुपटनिर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. पारंपरिक नृत्यप्रकारांची परंपरा जतन करीत असतानाच ‘परिवर्तन’ या सामाजिक चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. ‘तारा’ या दूरचित्रवाणी वाहिनीचा कार्यभारही त्या सांभाळत आहेत. गांधीनगर (गुजरात) मतदारसंघातून त्यांनी लोकसभेवर जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला (२००३).

त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार लाभले. त्यांपैकी सर्वोत्कृष्ट गुजराती अभिनेत्रीचा पुरस्कार (१९७५), साहाय्यक अभिनेत्रीचा ‘फिल्म क्रिटिक’ पुरस्कार (१९८४), गुजरात शासनाचा गौरव पुरस्कार १९९२), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०००), फ्रान्स शासनाचा ‘नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’ (२००२), ‘आय्. एम् एस्.’चा ‘वुमन ऑफ द यीअर’ (२००३), कला शिरोमणी पुरस्कार (२००४), ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे ‘क्रिस्टल अवॉर्ड’ (२००८), पद्मभूषण (२०१०) वगैरे महत्त्वाचे व प्रतिष्ठित होत.

त्या स्वतःला चिंतनशील, सृजनशील व प्रयोगशील नृत्यसाधिका मानतात. नृत्य हा त्यांचा श्वास आणि ध्यास असून स्त्रीशक्तीचे समर्थ रूप त्यांच्यात जाणवते.

पहा : साराभाई, मृणालिनी; साराभाई, विक्रम अंबालाल.

संदर्भ : 1. Gupta, Indra, India’s 50 Most Illustrious Women, New Delhi, 2003.

2. Sarabhai, Mrinalini, The Voice of the Heart : An Autobiography, New Delhi, 2004.

3. Shah, Amrita, Vikram Sarabhai : A Life, New Delhi, 2007.

वाड, विजया