कूचिपूडी नृत्य : आंध्र प्रदेशातील एक अभिजात नृत्यप्रकार. कृष्णा जिल्ह्यातील कूचिपूडी गावातील नर्तकांनी ही नृत्यपद्धती रूढ केली, म्हणून तीस कूचिपूडी हे नाव पडले. सर्वांत जुने शिवलीला नाट्यम्, दहाव्या शतकानंतरची ब्रह्ममेळा  आदी धार्मिक नृत्यनाट्ये आणि मध्ययुगीन वैष्णव भक्तिकाळातील भागवतमेळे यांच्या परंपरेत हा नृत्यप्रकार मोडतो. आंध्र प्रदेशात संगीत-नृत्य करणाऱ्‍या भगवद्‌भक्तांना ‘भागवतुलु’ असे म्हणत व पुढे त्यांचे नृत्यनाट्य कूचिपूडी म्हणून ओळखले जाऊ लागले. कूचिपूडी आणि भागवतमेळा यांत साधर्म्य आढळते. तथापि कूचिपूडी नृत्यास वडीलकीचा मान दिला जातो. मुचपळ्ळी कैफियत (१५०३) ह्या ग्रंथात ह्या नृत्यनाट्याचा प्रारंभीचा उल्लेख आढळतो.

सिद्धेंद्र योगी कूचिपूडी नृत्याचे जनक मानले जातात. त्यांनी पारिजात अपहरण  अथवा भामाकलापम्  ह्या नावाने नृत्यनाट्य लिहिले. पण त्याचा प्रयोग करण्यासाठी त्यांना योग्य नर्तक मिळाले नाहीत. म्हणून ते आपल्या सासुरवाडीस कुचेलापुरम् (सध्याचे कूचिपूडी) येथे आले व तेथील ब्राह्मण मुलांच्या साहाय्याने त्यांनी हा प्रयोग केला. तसेच तेथील प्रत्येक ब्राह्मण कुटुंबातील पहिला मुलगा कूचिपूडी नृत्याला अर्पण केला पाहिजे, असा दंडक घालून दिला. त्यावेळेपासून दरवर्षी धार्मिक उत्सवात हे नृत्य करण्याची प्रथा आसपासच्या खेड्यांमधूनही पसरली. कूचिपूडीच्या उदयापूर्वी आंध्र प्रांतात देवदासींच्या नृत्याची प्रथा रूढ होती. तथापि कालांतराने ह्या देवदासी कुमार्गाला लागल्या व त्यांच्या नृत्यामध्येही उत्तानता आली. त्यामुळे कूचिपूडी नृत्याची विशुद्धता व पावित्र्य राखण्यासाठी सिद्धेंद्र योगींनी स्त्रियांना त्यात भाग घेण्यास मज्जाव केला. त्यामुळे पूर्वी ह्या नृत्यपद्धतीमध्ये फक्त पुरुष नर्तकच भाग घेत असत. अलीकडे मात्र ह्या नृत्यप्रकारात स्त्रिया भाग घेऊ लागल्या आहेत. १६७५ मध्ये हे नृत्य बघून गोवळकोंड्याचा नबाब अब्दुल्ला कुतुबशाह खूष झाला व त्याने नर्तकांना त्यांचे राहते गाव कूचिपूडी व भोवतालची पाच गावे इनाम म्हणून दिली.

नारायणतीर्थ यती ह्यांनी लिहिलेली कृष्ण लीलातरंगिणी (सु. १६८०–९०) ही नृत्यसंगीतिका त्यांचे शिष्य सिद्धेंद्र योगी ह्यांनी कूचिपूडी नर्तकांना शिकविली. ह्या संगीतिकेत कृष्णाच्या जन्मापासून विवाहापर्यंतचा कथाभाग आलेला आहे. काही गीतांच्या शेवटी नृत्तबोलांवर आधारलेली नृत्य करतात. ही नृत्यसंगीतिका फार मोठी असल्याने काही निवडक भाग स्वतंत्रपणे सादर केले जातात. ह्याखेरीज क्षेत्रय्याची पदे, रामैय्याशास्त्री ह्यांची ‘गोल्लकलापम्’ रचना, त्यागराज ह्यांच्या कृती अथवा नृत्यगीते, तसेच महाकाव्ये व पुराणे, विशेषतः भागवतपुराण  व जयदेवाच्या गीतगोविंदातील अष्टपद्या इ. साहित्यावर आधारलेली कुचिपूडी नृत्येदेखील सादर केली जातात.

कूचिपूडी हे नृत्यनाट्य चांदण्या रात्री देवळाच्या आवारात करण्याची प्रथा आहे. प्रेक्षकांची जास्त गर्दी असल्यास रस्त्याच्या एका टोकाला रंगमंच उभारून तेथे नृत्य केले जाते. रंगमंचाला पडदा नसतो. नृत्यनाट्य सुरू होण्यापूर्वी ‘हास्यगाडु’ (विदूषक) प्रवेश करतो व वेडीवाकडी तोंडे व अंगविक्षेप करून लोकांना हसवतो व त्यांचे लक्ष रंगमंचाकडे वेधून घेतो. गायक व वाद्यवृंद रंगमंचाच्या उजव्या बाजूस बसतात. वाद्यांमध्ये टाळ, मृदंग, व्हायोलिन, वीणा आदींचा अंतर्भाव असतो. नृत्याच्या प्रारंभी नाट्यवेदविधीची रागतालयुक्त प्रार्थना केली जाते. नंतर सूत्रधार प्रवेश करतो व नांदी गाऊन नृत्यनाट्याचा आशय विशद करतो. नृत्यातील प्रमुख पात्रे ‘दरुवु’ ह्या नावाने ओळखले जाणारे पात्रपरिचयपर नृत्य करतात. ह्या प्रकारात दोन स्त्रीवेषधारी सेवक चक्र, वैष्णवनाम व शंख ह्यांची चित्रे असलेला पडदा प्रेक्षकांसमोर अशा रीतीने धरतात, की पडद्यामागील नर्तकाचे फक्त डोके व पायच प्रेक्षकास दिसू शकतात. प्रसंगी सूत्रधाराच्या उपरण्याचाही पडदा म्हणून वापर केला जातो. प्रत्येक प्रमुख पात्र ह्या पडद्याआड प्रारंभी नृत्य करते व नाट्यमय रीतीने तो पडदा दूर केल्यानंतर ते पात्र प्रेक्षकांपुढे येऊन आपले नृत्यकौशल्य प्रकट करते. हावभावांवरून नर्तक कोणती भूमिका करीत आहे, हे प्रेक्षक ओळखू शकतात. सूत्रधार प्रवेशदरुवुचे बोल, जाती, पात्रप्रवेशाच्या आद्यंती बोलले जाणारे ‘कनुगोलू’ बोल म्हणतो व त्यावर नर्तक पात्रानुक्रमे प्रवेश करून नृत्य करतात. दरुवुचे अनेक प्रकार आहेत. ‘ध्रुवा प्रवेशिका ध्रुवा’ प्रकारात पात्र गाणे गाऊन स्वतःची ओळख करून देत नृत्य करते. प्रत्येक कूचिपूडी नर्तकास गायनाचे अंग असावे लागते. हल्ली कित्येकदा नर्तक गीतास प्रारंभ करून बाकीचे गायन सूत्रधारावर किंवा त्याला साथ करणाऱ्‍या अन्य गायकांवर सोपवितो. क्वचित एखादी ओळ मध्येच गातो किंवा गाण्याचा आविर्भाव करतो. कूचिपूडी नृत्यासाठी कर्नाटकी पद्धतीच्या रागतालयुक्त संगीताचा वापर केला जातो. नर्तक कथानकातील गद्य संवाद स्वतःच बोलतो. ज्यात पात्रे गद्यपद्यात्मक वाचिक अभिनय करतात, अशी ही एकमेव भारतीय नृत्यपद्धती आहे. हल्ली मात्र हे संवाद प्रेक्षकांना नीट ऐकू यावेत, म्हणून ध्वनिक्षेपकावर संवाद बोलण्यासाठी वेगळ्या व्यक्तीची योजना केली जाते. कूचिपूडी नर्तकास तेलुगू व संस्कृत भाषाही चांगल्या अवगत असाव्या लागतात. त्याचप्रमाणे नृत्य-संगीतविषयक साहित्याचेही ज्ञान असणे आवश्यक असते. कूचिपूडीच्या अभ्यासासाठी पाठ्यपुस्तक म्हणून अभिनय-दर्पणाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे नाट्यशास्त्र, संगीत रत्‍नाकर  ह्यांचाही अभ्यास केला जातो. कथानकात अनेक संकीर्ण नृत्यप्रकार असतात. त्यांतील निवडक नृत्यप्रकार कूचिपूडी नृत्य म्हणून एकपात्री पद्धतीने सादर केले जातात. त्यामुळे आज तरी ह्या नृत्यास विशिष्ट असा अनुक्रम नाही.

कूचिपूडीचे काही नृत्यप्रकार पुढीलप्रमाणे आहेत : ‘शब्दम्’ म्हणजे एका विशिष्ट संगीतशैलीनुसार गायिले जाणारे,  एखाद्या नाट्यपूर्ण कथाप्रसंगावर आधारलेले काव्य. ह्यातील रचना नृत्याभिनयास पोषक असते. उदा., ‘दशावतारशब्द’ ह्या प्रकारात विष्णूच्या दहा अवतारांचे काव्यमय वर्णन असून त्यानुसार नर्तक ते दहा अवतार नृत्यांकित करतो. अशाच प्रकारच्या ‘श्रीरामशब्द’,‘मंडुकशब्द’,‘अर्धनारीश्वरशब्द’,‘प्रल्हादशब्द’,‘कृष्णशब्द’ आदी रचनांवर नृत्ये केली जातात.

‘कलापम्’ ह्या प्रकारात वादविवादात्मक, तत्त्वज्ञानात्मक, विविध चर्चायुक्त आशयाच्या काव्यरचना नृत्यबद्ध केल्या जातात. उदा., ‘गोल्लकलापम्’ ह्या प्रकारात ब्राह्मण व गौळण ह्यांचा तात्त्विक संवाद आहे. ‘भामाकलापम्’ हा प्रकारही विशेष लोकप्रिय आहे. ‘तरंगम्’ ह्या प्रकारात एखाद्या विशिष्ट आराध्यदेवतेच्या लीलांचे वर्णन लाटातरंगांप्रमाणे विविध प्रकारे केले जाते. ‘बालगोपाल तरंगम्’ ह्या प्रकारात परातीच्या कडेवर दोन्ही पाय ठेवून किंवा उपड्या घड्यावर उभे राहून व डोक्यावर पाण्याचा घडा ठेवून, तो पडू न देता नृत्य केले जाते. 

पदम् म्हणजे पद. सारी प्रकृती स्त्रीरूप असून परमेश्वर हा एकमेव हा एकमेव पुरुष आहे, परमपुरुषात लीन होण्यातच प्रकृतिरूपी स्त्रीचे साफल्य आहे, अशा आशयाची अनेक पदे लिहिली गेली आहेत. क्षेत्रय्याने लिहिलेल्या हजारो तेलुगु पदांपैकी नायकनायिकांचे अलंकारप्रचुर वर्णन असलेली सु. ६०० नृत्यनाट्योपयोगी पदे अत्यंत प्रसिद्ध आहेत व ती आजदेखील भरतनाट्यम् शैलीतील मान्यवर कलावंत कूचिपूडीच्या धर्तीवरच करतात.

कूचिपूडी नृत्यामधील पात्रांची रंगभूषा साधीच असते. पुरुषपात्रे धोतर, जाकीट तसेच भूमिकेच्या आवश्यकतेनुसार दागदागिने व मुकुटही परिधान करतात. स्त्रीपात्रांचा वेष साडीचोळी असा साधाच असतो. स्त्रीपात्रे दागदागिनेही वापरतात. त्यांत लांब सोडलेल्या वेणीवर जी दशावतारजडा किंवा नक्षत्रजडा जडविलेली असते, तिला प्रतीकात्मक अर्थ आहे. जडेचा वरील भाग चार अलंकारांनी युक्त असून तो चार वेदांचे प्रतीक म्हणून मानला जातो. जडेखालील तीन चेंडू त्रिभुवनाचे प्रतीक, तर प्रत्येक चेंडूभोवती लहानलहान तीन चेंडू असतात, ते नवग्रहांचे प्रतीक मानले जातात.

कूचिपूडी नृत्यप्रकारातील प्रमुख नर्तक-नर्तकींमध्ये कोराडा नरसिंहराव, सत्यनारायण शर्मा, इंद्राणी रेहमान, यामिनी कृष्णमूर्ती, रीतादेवी आदींचा अंतर्भाव होतो. तसेच लक्ष्मीनारायण शास्त्री, चिंता कृष्णमूर्ती हे कूचिपूडीच्या क्षेत्रातील थोर गुरू मानले जातात. (चित्रपत्र ११).

संदर्भ : 1. Bhavnani, Enakshi, The Dance in India, Bombay, 1965.

             2. Marg Publications, Classical &amp Folk Dances of India, Bombay, 1963.

             3. Marg Publications, Marg, Vol. XIX No. 2, Bombay, March 1966.

             4. Singha, Rina  Massey, Reginald, Indian Dances : Their History and Growth, London, 1967.

पटवर्धन, पद्मिनीराजे पार्वतीकुमार