भांगडा नृत्य : राष्टीय ख्यातीचे पंजाबी लोकनृत्य. ल्यालपूर हे भांगडा नृत्याचे मूळ उगमस्थान. हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे नृत्य असून ते शेतीच्या हंगामात गव्हाची पेरणी झाल्यापासून ते कापणी व

भांगडा नृत्य

मळणी होईपर्यंतच्या कालावधीत रोज रात्री केले जाते. वैशाखी जत्रेबरोबर भांगड्याचा मोसम संपतो. उत्तम पिकाच्या आनंदाप्रीत्यर्थ किंवा अन्यथा विवाहासारख्या कोणत्याही मंगलप्रसंगी हे नृत्य करण्याचा प्रघात रूढ आहे. गावातील युवक पौर्णिमेच्या रात्री एखाद्या शेतात एकत्र जमून ढोलाच्या तालावर हे नृत्य करतात. सळसळणारा चैतन्यपूर्ण जोम व उत्कट आनंदाची परमावधी नृत्यातून प्रत्ययास येते. पंजाबच्या सुफल व समृद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब या नृत्यात दिसून येते.

ढोलवादक मधोमध उभा राहून इतर नर्तक त्याच्याभोवती वर्तुळाकार नृत्य करतात संपूर्णपणे जोष आणि उल्हास यांनी युक्त असे हे मर्दानी नृत्य केवळ पुरुषच करतात. मूलतः हे समूहनृत्य असल्याने याला विशिष्ट नर्तकसंख्येचे बंधन नाही. दहापासून दोनशेपर्यंत कितीही नर्तक यात भाग घेऊ शकतात. नृत्त्यातील थकवा थोडावा दूर होऊन नृत्यात रंग भरावा किंवा स्फूर्ती मिळावी, म्हणून ‘हेडिप्पा’, ‘बले, बले ! ओ बले बले!!’ अशा आरोळ्या मारतात.

प्रत्येक नृत्य हे गीतामध्ये बद्ध असते. परंतु नृत्याची रंगत वाढवण्यासाठी बरोचदा केवळ तालवाद्यांच्या साथीवरही नर्तन केले जाते. या नृत्याला स्वतंत्र गायकाची जरूरी नसते. एक नर्तक पुढे येऊन आवेशपूर्ण ढंगामध्ये गाणे म्हणतो. या गीतांमध्ये प्रेम व आनंद या भावनांबरोबर कित्येकदा दुःखापत्तींचेही चित्रण असते. रंगमंचावर हे नृत्य सादर करताना प्रथम ढोलकवाद येतात व मागून नर्तक. गळ्यात ढोलक अडकवलेला वादक मध्यभागी उभा राहून दोन काठ्यांनी ढोलक वाजवतो. त्याच्या दोन्ही अंगाशी पारंगत नर्तक उभे राहून ते नृत्याचे नेतृत्त्व करतात. ते अधूनमधून हाताचा पंजा कानावर ठेऊन, पुढे सरसावून पारंपारिक पंजाबी लोकगीतातील ‘बोली’ अथवा ‘धोल्ल’ देतात. ह्यावेळी नृत्यात काहीसा खंड पडतो व त्यानंतर पुन्हा जास्त जोमाने नृत्य सुरू होते. कित्येकदा एखाद्या नर्तकांच्या हातात काठी वा रुमाल असतो. भांगडा नृत्याच्या साथीला ढोलकाबरोबरच अलगोझा व मोठ्या लोखंडी चिमट्यांची जोडी ही वाद्ये वापरली जातात. कित्येकदा एखाद्या नर्तकाच्या हातात लांब काठी असून तिच्या टोकावर अनेक रंगांनी सुशोभित केलेली लाकडी चिमणी बसवलेली असते. नर्तक तिची मान व शेपूट, दोरीच्या साहाय्याने, नृत्याच्या तालवर वरखाली करतो. यामुळे नृत्याला किंचिंत विनोदाची झाक प्राप्त होते. नृत्यसमूहाच्या मध्यभागी एक नर्तक असतो. याच्या डोक्यावर चुंबळ असून त्यावर मडके ठेवलेले असते. या मडक्यावर दुसरा नर्तक उभा असतो. हे दोघेही नर्तक तालाच्या अनुषंगाने मनगटाला झटके देत रूमाल उडवत असतात. हे लोकनृत्य असल्यामुळे परंपरागत अंगविक्षेपांखेरीज इतरही उत्स्फूर्त असे आधुनिक अंगविक्षेप करण्याचा प्रघात दिवसेंदिवस रूढ होत चालला आहे. हे मूलतः पुरुषी नृत्य असले, तरी अलीकडे कित्येकदा स्त्री-पुरुष मिळून संमिश्रपणे सादर करतात. पुरुषी भांगडा नृत्यातील चैतन्य व जोम स्त्रियांच्या गिद्धा नामक नृत्यप्रकारातही दिसून येतो.

आकर्षक नक्षीकाम असलेले रंगीबेरंगी कुडते, जाकीट, लुंगी व फेटा असा नर्तकांचा पारंपारिक वेष असतो. गळ्यात बोरमण्यांच्या माळा असतात. पायाच्या घोट्यावर घुंगुर बांधतात. पंजाबप्रमाणेच जम्मू मधील डोग्रा (योद्धा) जमातीतील पुरूषही भांगडा नृत्य करतात. भांगडा नृत्यातील अंगविक्षेपांवर निर्बंध नसतात. जोषपूर्ण व उत्स्फूर्त अशा मुक्त आविष्कारक्षमतेमुळे भारतीयांबरोबरच परदेशीयांचेही या नृत्याविषयीचे आकर्षण वाढत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय लोकनृत्य म्हणण्याइतपत ह्याची लोकप्रियता वाढलेली आहे.

पार्वतीकुमार