बॅले : एक पाश्चिमात्य नृत्यनाट्यप्रकार. रंगभूषा व नेपथ्य यांसह, संगीताची साथ घेऊन पण बहुधा संवाद व गीत यांशिवाय हा सामूहिक नृत्याविष्कार रंगमंचावर सादर केला जातो. बॅले (ballet) हा शब्द ‘बाल्लारे’ (ballare म्हणजे नृत्य करणे) या मूळ इटालियन शब्दापासून निर्माण झाला. बॅले ही संज्ञा विशिष्ट नृत्यशैली, बॅले नर्तकांचा संच व संपूर्ण बॅले प्रयोगनिर्मिती यांना उद्देशूनही वापरली जाते. बॅलेची विकसनशील परंपरा अपूर्व समजली जाते.

परंपरागत बॅलेमध्ये नृत्य, संगीत, नेपथ्य (डेकॉर) आणि नाट्य या चार कलांचे समप्रमाणात संश्लेषण साधलेले असते. बॅलेमधील नृत्य हे एका निश्चित नियमबद्ध तंत्रातून निर्माण होते व हे तंत्र बॅले नर्तकाच्या प्रशिक्षणामध्ये पायाभूत ठरते. तथापि आधुनिक बॅलेंमध्ये हे तंत्र काटेकोरपणे पाळले जातेच, असे नव्हे. मात्र द स्वॉन लेक, स्लीपिंग ब्यूटी, कॉप्पेलिया यांसारख्या अभिजात बॅलेंमध्ये हे तंत्र कटाक्षाने पाळल्याचे दिसून येते. शारीरिक दृष्ट्या अनैसर्गिक अशा अनेक हालचाली बॅले नर्तकाला कराव्या लागतात. पण त्या सहजसुलभ, आकर्षक व डौलदार अशा भासल्या पाहिजेत. त्यातच त्याचे कौशल्य सामावलेले असते. अनेक कसरतीवजा हालचालींचा त्यात अंतर्भाव होतो. उंच व लांब उड्या मारून हवेत संथ तरंगत राहिल्याचा भास निर्माण करणे, स्वतःभोवती भोवऱ्याप्रमाणे गरगर गिरक्या घेणे, यांसारख्या अनेक क्रिया त्यात असतात. स्त्रिया पायाच्या बोटांच्या टोकांवर शरीर तोलून वेगवेगळे गतिमान नृत्यपवित्रे कौशल्याने दर्शवितात. पुरूष नर्तक स्त्रियांना सहजलीलया उंच उचलून धरतात. या सर्व नृत्यात्म हालचालींमध्ये नर्तकाला स्वतःच्या शरीरावर विलक्षण नियंत्रण ठेवावे लागते व तोल सांभाळावा लागतो. तसेच शरीर-माध्यमाचा अवलंब करून बॅले नर्तक भय, क्रोध, आनंद, मत्सर, खिन्नता आदी अनेकविध भावभावना व्यक्त करतो. विविध नृत्यात्म हालचालींतून–पदन्यास व पवित्र्यांतून–शरीराच्या बाह्याकारांचे सुंदर आकृतिबंध प्रतीत होतात. ही दैहिक आकृतिबंधाची विशुद्धता व सुसंवादित्व यांवरच बॅलेमध्ये भर असल्याचे दिसून येते. तत्त्वतः जरी सर्व प्रकारचे संगीत नृत्यानुकूल असले, तरी प्रत्यक्षात मात्र खास बॅलेसाठी लिहिलेले संगीतच अधिक प्रयोगक्षम ठरते. उदा. चायकॉव्हस्कीच्या द स्वॉन लेक द स्लीपिंग ब्यूटी या बॅलेंच्या संगीतरचना. तसेच काही संगीतकारांच्या खास कौशल्यपूर्ण रचनाही बॅलेला स्वाभाविक अनुकूल ठरतात. उदा. शॉपँचे ले सिल्फिदचे संगीत, अथवा माईरबेरचे ले पातिनरचे संगीत. नृत्याला लयतालाची साथ करणे, एवढ्यापुरतेच बॅलेमधील संगीताचे स्थान मर्यादित नसते तर त्याचबरोबर बॅलेच्या कथेतील वातावरण व भावावस्था प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्यही, संपूर्ण प्रयोगनिर्मितीतील एक अंगभूत घटक या नात्याने, त्यास पार पाडावे लागते. बॅलेमधील वेशभूषा हा जणू गतिमान अवस्थेतील नर्तकाचा एक शारीर घटकच मानावा लागेल. त्याचा बॅलेच्या तंत्रावरही वेळोवेळी विलक्षण प्रभाव पडलेला आहे. वेशभूषा व देखावे हे केवळ सजावटीदाखल येत नसून ते बॅलेच्या संपूर्ण एकात्म निर्मितीमध्ये समप्रमाणात अविभाज्य घटक म्हणूनच येतात बॅलेमधील नाट्य या घटकाचे विवरण अनेक अंगांनी करता येईल : कधी कधी बॅलेमधून एखादी कथा सांगितलेली असते. उदा., द स्लीपिंग ब्यूटीमधील सुप्रसिद्ध परीकथा पेत्रुश्कामधील बाहुल्याची शोकात्म कथा इत्यादी. तसेच बॅलेतून विशिष्ट वातावरणातही निर्माण करण्यात येते. उदा., ले सिल्फिदमधील वायुदेवतेने (सिल्फ) भारलेले जंगल इत्यादी. तद्वतच संगीतकाराने निर्मिलेली एखादी विशिष्ट भावावस्थाही गतिमान हालचालींतून साकार केली जाते. उदा. सिंफनिक व्हेरिएशन्स. अभिजात बॅलेंमध्ये नर्तक कथा विशद करण्यासाठी सांकेतिक वापर करतो. मात्र उत्तरकालीन बॅलेंतून मूकाभिनयाची सांकेतिकता कमी कमी होत जाऊन, ती नृत्यात्म हालचालींचाच एक भाग बनल्याचे दिसून येते.

नृत्यालेखक (कॅरिओग्राफर) हा बॅलेचे संयोजक करतो. तो विशिष्ट विषयाला अनुसरून संपूर्ण बॅलेची उभारणी करतो. हे विषय नाना परींचे असू शकतात. ते एखाद्या श्रेष्ठ

संगीतकृतीवर वा चित्रावर (उदा., होगार्थचे रेक्स प्रोग्रेस) अथवा साहित्यकृतीवर (उदा., हॅम्लेट) आधारलेले असतात. किंवा कित्येकदा त्याला स्वतःलाच स्फुरलेली एखादी

कल्पना वा भावावस्था तो बॅलेमधून समूर्त करतो. सारांश, बॅले हा नृत्य, संगीत, नाट्य व नेपथ्य या घटकांच्या समुचित संयोगातून सिद्ध होणारा सांघिककलाविष्कार आहे.

बॅले ही केवळ तंत्राच्या दृष्टीने आधुनिक कला म्हणता येईल. अन्यथा नृत्यातून कथा सांगण्याची परंपरा तशी जुनीच आहे. प्राचीन संस्कृतीमध्ये नृत्य हा लोकांच्या धार्मिक आविष्काराचाच एक भाग होता. तद्वतच प्राचीन ग्रीक नाट्यप्रयोगात नृत्यालाही एक अंगभूत घटक म्हणून स्थान होते. बॅलेचे मूकनाट्य व मुखवटे या प्रकारांशी सुरुवातीपासूनच घनिष्ठ नाते असल्याचे दिसून येते.

बॅले नृत्याच्या पाच अभिजात अवस्था

                                                   

‘आराबॅस्क’ नृत्यावस्था

                                                           


ज्यांस नेत्रदीपक म्हणता येईल असे नृत्यप्रकारही अनेक वंशात विविध कालखंडात रुढ होते. तथापि आज ज्याचा बॅले म्हणून उल्लेख होतो, त्याचा उगम पंधराव्या शतकात झाला. फ्रान्स, बर्गंडी, इटली येथील राजदरबारातून विवाहसोहळे, परकीय राजांचे स्वागत इ. समारंभप्रसंगी नृत्य करण्याची प्रथा या कालखंडात रूढ झाली. १४८९ मध्ये ड्यूक ऑफ मिलानच्या विवाहसमारंभात मेजवानीच्या प्रसंगी, एक बॅले सादर केल्याचा उल्लेख सापडतो. त्याचा विषय जेसन आणि गोल्डन फ्लीस या पुराणकथेवर आधारित होता. सुरुवातीस या नृत्यास अनेक छोटी नृत्ये असत, पोषाख इ. भपकेदार असत व शिष्टमान्य पदन्यासांसह त्या त्या वेळच्या प्रसंगास अनुरूप असे नृत्य केले जाई. हळूहळू अधिकाधिक अलंकरण, कथानक आणि संपूर्ण वाद्यवृंदांचे संगीत आले. नृत्यमय हालचाली, संगीत, नेपथ्य व इतर काही परिणामकारक तंत्रे आदींसह सादर केलेला पहिला बॅले फ्रान्समध्ये कॅथरिन द मेदीचीच्या दरबारात एका शाही विवाह सोहळ्यानिमित्त १५८१ मध्ये अवतरला. बाल्ताझार द बोझ्वाय या व्हायोलिनवादकाने आयोजित केलेला हा बॅले ल बॅले कॉमिक द ल राइन या नावाने ओळखला जातो. ग्रीक पुराणातील सर्स या चेटकिणीची कथा या बॅलेत होती. त्यात स्त्रियांनीही भाग घेतला. हा आद्य ‘कॉर द बॅले’ मानला जातो. ह्याच सुमारास थोईनो आर्बो या फ्रेंच नृत्यविशारदाचा बॅलेवरील आद्य प्रमाणभूत ग्रंथ आर्किसोग्राफी (१५८८) हा निर्माण झाला. तथापि या काळात बॅले ही सर्वसाधारणपणे पुरुष नर्तकांचीच मिरासदारी होती व चौदाव्या लूईच्या काळापर्यंत ती टिकून होती. चौदाव्या लूईच्या कारकीर्दीमध्ये (१६४३–१७१५) या दरबारी बॅलेला खरा बहर आला. त्याने ‘रॉयल बॅले अकॅडमी’ (१६६१), ‘रॉयल म्यूझिक अकॅडमी’ (१६६९) व पहिले ‘नॅशनल बॅले स्कूल’ (१६७२) या संस्थांची स्थापना केली.त्याच्या काळात जे भव्य बॅले निर्माण झाले, त्यांत स्वतः लुई व अन्य दरबारी व्यक्ती भाग घेत असत. अवजड व पायघोळ पोषाख, केसांचे टोप, उंच टाचांची पादत्राणे व अन्य दरबारी डामडौल ही त्या बॅलेची वैशिष्ट्ये. त्यांचे स्वरूप बरेचसे औपचारिक होते. हा बॅले इटलीमधून फ्रान्समध्ये आला व तिथेच विकसित झाला. याचमधून ‘गव्हात’, ‘पासप्ये’, ‘बूरे’, ‘रिगोदाँ’ इ. अनेक दरबारी नृत्ये प्रचारात आली. पुढे ‘स्वीट्स’ (नृत्यमालिका) मध्ये यांपैकी अनेकांच्या आधारे वैकल्पिक चलनभेद रचले जाऊ लागले. या संदर्भात ⇨ मिन्युएतचा विशेष उल्लेख करावयास हवा. नृत्यशिक्षण घेतलेल्या स्त्रियांनी भाग घेतलेला पहिला बॅले द ट्रायंफ ऑफ लव्ह (१६८१) होय. त्यास प्रसिद्ध दरबारी संगीतकार ल्यूलीने संगीत दिले होते. या काळाततील भपकेबाज बॅलेंमध्ये स्त्रिया लांब पायघोळ झगे वापरत असल्याने तसेच मुखवट्यांमुळेही नृत्यात्म हालचाली व तदानुषंगिक तंत्रे सीमित झाली होती. स्त्रियांना जमिनीवरच भौमितीक आकृतिबंध निर्माण करीत नाचत असत. सु. १७०८ पर्यंत बॅले हा नेत्रदीपक दरबारी रंजनप्रकार होता. त्यात संगीतिका व नाट्य यांचाही अंतर्भाव होता. परंतु नृत्य-अकादमीच्या स्थापननंतर बॅलेममध्ये व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले. त्याबरोबरच बॅलेचे व्याप्तिक्षेत्रही राजदरबारापासून रंगमंचापर्यंत विस्तारत गेले. या काळात बॅलेमध्ये वापरले जाणारे पदन्यास पाच मूळ नृत्यावस्थांतर आधारलेले होते. या बॅले पदन्यासाच्या पाच अभिजात अवस्था (द फाइव्ह क्लासिक पोझिशन्स ऑफ द फीट) प्येअर बोशांने शोधून काढल्या. अभिजात बॅले नृत्याच्या वेगवेगळ्या हालचाली व पदन्यास यांचे मूळ अधिष्ठान या पाच अवस्थांमध्ये असते. प्रत्येक अभिजात पवित्रा यांपैकी कोणत्यातरी एका नृत्यावस्थेने सुरू होतो व अशाच एका नृत्यावस्थेत संपतो. त्यातूनच पुढेही बॅलेच्या विकासात अनेक नृत्यात्म हालचालींची भर पडत गेली. हे पवित्रे ‘आराबॅस्क’, ‘पिरुएत’, ‘ग्लिसाद’, ‘आँत्रशा’ इ. फ्रेंच संज्ञांनी ओळखले जाऊ लागले. अद्यापही बॅलेविश्वात या संज्ञा प्रचलित आहेत.

बॅलेच्या तंत्रामध्ये १७३० च्या दरम्यान बरीच परिवर्तने घडून आली. मारी कॅमार्गो (१७१०–७०) या प्रसिद्ध बॅले नर्तकीने पायाचे घोटे दिसू शकतील इतक्या लांबीचा घागरा परिधान करून नृत्य केले. त्याचा परिणाम तंत्रावरही झाला. पायांच्या व पावलांच्या हालाचालींना महत्त्व आले. ‘ला दाँस आँ लॅर’ हे तंत्र अस्तितिवात आले. प्रसिद्ध नृत्यालेखक झां झॉर्झ नॉव्हेअर (१७२७–१८१०) याने बॅलेमध्ये बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या. त्याने ले लॅत्र स्युर ला दाँस ए स्युर ले बॅले (१७६०) या प्रबंधातून आपली तत्वे विशद केली. बॅलेच्या नाट्यघटकावर भर देऊन, सांकेतिक नृत्यतंत्राच्या जाचक बंधनातून त्याने बॅलेची मुक्तता केली. त्याने बॅलेतून मुखवट्यांना फाटा दिला आणि त्यायोगे चेहऱ्यावरील भावदर्शनाला वाव मिळवून दिला. एका पावलाच्या बोटांवर स्थिरावून शरीराला संपूर्ण गिरकी देण्याचे ‘पिरुएत’ तंत्रही त्याने प्रथम निर्माण करून लोकप्रियही केले. पौराणिक, ऐतिहासिक कथा बॅलेतून नाट्यमय रीतीने साकार करणे, नृत्यांचा अधिक सुसंगत असा रचनाक्रम, पोषाखांतील सुटसुटीतपणा यांसारख्या सुधारणा त्याने घडवून आणल्या . त्याला नाट्यात्म बॅलेचा (बॅले दाक्सियाँ) प्रवर्तक मानतात. प्रसिद्ध नट गॅरिक हा त्याला नृत्यकलेचा शेक्सपिअर म्हणत असे. स्वयंपूर्ण असा रंजनप्रकार म्हणून त्याने पाच अंकी बॅले रूढ केला. ऑपेरासाठी बॅलेची रचना करण्यासाठी त्याने मोट्सार्ट, ग्लुक यांसारख्या संगीतकारांचे साहाय्य मिळवले. नॉव्हेअरच्या पावलावर पाऊल टाकून इटालियन नृत्याविशारद कार्लो ब्लासिस (१८०३–७८) हा पुढे आला. बॅले व चित्रशिल्पादी कलांच्या परस्परसंबंधांमध्ये त्याला खास रुची होती. त्याने मिलान येथे नृत्य-अकादमीची स्थापना केली. त्याची नृत्यप्रणाली त्याने एलिमेंटरी ट्रीटाइज अपॉन द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ द आर्ट ऑफ डान्सिंग (इं.शी. १८२०) या प्रबंधात विशद केली असून, ती आधुनिक बॅले तंत्राला पायाभूत मानली जाते.

साधारणपणे अठराव्या शतकाच्या अखेरीस बॅले दरबारी प्रभावातून बराचसा बाहेर पडला होता आणि त्यामुळे कसरत म्हणता येईल, इतकी चमत्कृतिपूर्ण तंत्रे त्यात निर्माण झाली होती. पाय व पावलांच्या हालचालींवर भर देण्याचा प्रघात मात्र अद्याप कायमच होता. सामान्यपणे १८३० या दशकापासून बॅलेवर स्वच्छंदवादी प्रणालीचा प्रभाव दिसू लागला. भावनाप्रधान व कल्पनाप्रचुर अशा विषयांना प्राधान्य आले. त्यात केवळ प्रेक्षणीय दृश्यात्मकतेपेक्षा नाट्यमयतेवर अधिक भर दिला गेला. बॅलमधून काव्यात्म कल्पना व्यक्त होऊ लागल्या. बॅले हा अधिक अनौपचारिक झाला. स्त्रियांकडे पाहण्याच्या शिलेदारी दृष्टीकोणामुळे असेल, पण नर्तकांचे महत्त्व कमी होत जाऊन नर्तकींना प्राधान्य आले. प्रमुख बॅले नर्तकीची (प्राईमा बॅलेरिना) संकल्पना सिद्ध झाली व पुरूषपात्रांना गौणत्व आले. प्रख्यात इटालियन नर्तकी मारीआ ताल्योनी (१८०४–८४) ही या काळातील एक श्रेष्ठ बॅलेरिना होय. ले सिल्फिद या आद्य स्वच्छंदवादी बॅलेमध्ये तिची प्रमुख भूमिका होती. तिची नृत्यशैली हलकीफुलकी व परीससदृश होती. १८१४ च्या आसपास प्रचारात असलेल्या, पायाच्या बोटांच्या टोकावर नाचण्याच्या तंत्राचा (दांसिंग स्युर ले प्वाँत) तिने अत्यंत प्रभावी आविष्कार घडवला. या तंत्रासाठी प्रदीर्घ अभ्यासाची व परिश्रमांची आवश्यकता असते. पादत्राणेही विशेष प्रकारची लागतात. हे तंत्र म्हणजे बॅलेच्या तांत्रिक विकासातील एक महत्त्वाचा टप्पा होय. ताल्योनीने पायाच्या पोटरीपर्यंत लांब (काफलेंग्थ) व तंग अशी नावीन्यपूर्ण वेशभूषा वापरात आणली व ती स्वच्छंदतावादी शैलीस पोषक ठरली. तत्कालीन प्रख्यात फ्रेंच कवी तेऑफील गोतिए याने कारलॉत्ता ग्रीझी या नर्तकीसाठी निरर्मिलेला गिझेले हा स्वच्छंदतावादी बॅलेही खास उल्लेखनीय असून तो दीर्घकाळ टिकून राहिला. स्वच्छंदतावादी कलासंप्रदायाशी नाते राखून तत्कालीन बॅलेनेही वास्तव आणि आभासात्मक, शारीर व आत्मिक अशा संघर्षाचे भान राखले. पौराणिक प्रसंगाच्या जागी प्रणयकहाण्या व परीकथा आल्या. मात्र स्वच्छंदवादी बॅलेतील अतिकृत्रिमता व स्त्रीभूमिकेला अतिरिक्त प्राधान्य दिल्यामुळे ढळलेला नृत्याचा समतोल यांमुळे हा प्रभाव हळूहळू ओसरत गेला.


एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बॅलेला सर्वत्र उतरती कळा लागली असता, रशियामध्ये बॅलेचे पुनरुज्जीवन घडून आले. रशियन बॅलेने या काळात यूरोपमधील बॅलेला नवीन वळण दिले. तिथे बॅलेला राजदरबारात प्रतिष्ठा होती. सेंट पीटर्झबर्ग व मॉस्को येथे राजाश्रयाखाली बॅले विद्यालये दीर्घकाळ चालू होती. अनेक परदेशी नृत्यविशारदांच्या तेथील वास्तव्यामुळे बॅलेच्या विकासात भर पडत गेली. फ्रेंच मा-र्यूस पेतिपा (१८१९-१९१०), स्विडिश क्रिस्तिआन योहान्सन (१८१७–१९०३) व इटालियन एन्‍रिको सेच्च्ती (१८५०–१९२८) यांचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. त्यायोगे फ्रेंच व इटालियन बॅले संप्रदायांची उत्तमोत्तम वैशिष्ट्ये रशियन बॅलेने आत्मसात केली. पेतिपा हा उत्कृष्ट नर्तक व नृत्यालेखक होता. सेट पीटर्झबर्ग बॅलेच्या नेतृत्वाची धुरा त्याने जवळजवळ ५० वर्षे समर्थपणे सांभाळली. त्याच्या प्रमुख बॅले प्रयोगामध्ये डॉन क्विक्झोट (१८६९), ला बायादॅर (१८७५), द स्लीपिंग ब्यूटी (१८९०), द नटकॅकर (१८९२) , द स्वॉन लेक (१८९३) इत्यादींचा अंतर्भाव होतो. पेतिपा हा आधुनिक अभिजात बॅलेचा प्रवर्तक मानला जातो. द स्लीपिंग ब्यूटीमध्ये विशुद्ध स्वरूपातील अभिजात बॅले तत्त्वांचा परमोत्कर्ष पाहावयास मिळतो. नृत्य, नाट्य संगीत व नेपथ्य यांच्या संश्लेषणातून सिद्ध झालेला उत्कृष्ट सांघिक आविष्कार या नात्याने त्याचे बॅलेच्या इतिहासातील स्थान अजोड आहे. तत्कालिन प्रख्यात संगातकार चायकॉव्हस्की याने स्वॉन लेकद स्लीपिंग ब्यूटी या अभिजात बॅलेंसाठी खास संगीतरचना केल्या. या बॅलेमध्ये नर्तकांनी ‘त्युत्यू’ नामक आखूड स्कर्ट परिधान केले होते. त्यामुळे पाय अनावृत्त राहत पेतिपा याने बॅलेमध्ये पुरूष नर्तकांनाही प्रधान भूमिका दिल्या. प्रख्यात अमेरिकन नर्तकी ⇨ इझाडोरा डंकन (१८७८–१९२७) ही १९०७ मध्ये रशियात आली. बॅलेमध्ये तिने व्यक्तिनिष्ठ काव्यात्म कल्पना रुजवल्या. ग्रीक पुष्पपात्रांवर चित्रित केलेल्या गतिमान आकृत्या, पक्षी, लाटा व अन्य लयबद्ध नैसर्गिक आदर्शांच्या अनुकरणातून आत्मसात केलेले विविध गतिविभ्रम यांच्या संयोगातून तिने स्वतःची नृत्यशैली सिद्ध केली. सैलसर वस्त्रप्रावरणे वापरून, अनवाणी पावलांनी, अभिजात संगीताच्या साथीवर नृत्य करण्याची तिची ही शैली लवकरच सर्वत्र अनुकरणीय ठरली.

इझाडोरा डंकन व इटालियन बॅलेरिना व्हिरजीन्या झुत्शी (१८४७–१९३०) यांच्या प्रभावातून रशियामध्ये प्रयोगशील बॅले कलावंतांचा एक गट नव्यानेच उदयास आला. त्यांत बाक्स्ट व ब्यिनॉई हे चित्रकार-नेपथ्यकार, आधुनिक बॅलेचा महान प्रवर्तक ⇨ स्यिरग्येई द्यागिल्येफ (१८७२–१९२९), प्रसिद्ध नर्तक व नृत्यालेखक ⇨ मीशेल फॉकीन (१८८०–१९४२), संगीतकार स्ट्राव्हिन्स्की प्रभृतींचा अंतर्भाव होता. त्यांनी अभिजात बॅलेमध्ये काही नवीन कल्पना रुजवल्या. फॉकीनने आपल्या ले सिल्फिद, पेत्रुश्का यांसारख्या बॅलेंतून पूर्वीच्या बॅलेतील कसरतींचा भाग बराचसा कमी केला. नर्तकांनी नृत्यात्म हालचालींचा वापर कल्पना व भावना प्रकट करण्यासाठी करावा, असे नॉव्हेअरप्रमाणेच त्याचेही मत होते. त्याने ⇨ आन्न पाव्हलॉव्ह (१८८२–१९३१) या प्रख्यात नर्तकीसाठी द डाइंग स्वॉन हे सुविख्यात नृत्य रचले. द्यागिल्येफनेही बॅलेमधील नाट्यगुणांना अधिक चेतना दिली. त्याने ‘बॅले रूस’ ही स्वतःची नृत्यसंस्था स्थापन केली व २० वर्षाच्या कालावधीत यूरोपभर सर्वत्र दौरे काढले. आपल्या यूरोपीय दौऱ्यात त्यांनी बॅलेविषयी सर्वत्र एक नवी आस्था व जाणीव निर्माण केली. नव अभिजात व वास्तव, आदर्श व राष्ट्रीय अशी लक्षणे अंतर्भूत करून द्यागिल्येफ प्रभृतींनी रशियन बॅले निर्माण केला. पायाच्या वोटांच्या टोकावर नाचण्याच्या तंत्रावर कमी भर, पुरषनर्तकास महत्त्व, नाट्यात्मकतेस विशेष प्राधान्य, कथानकाचा अधिक भरीवपणा इ. वैशिष्ट्ये रशियन बॅलेची म्हणून उल्लेखिता येतील. ‘बॅले रुस’चा पहिला कार्यक्रम पॅरिसमध्ये १९०९ मध्ये झाला. बॅले रुसचे पहिले पर्व पहिल्या महायुद्धापर्यंत टिकून होते. मीशेल फॉकीनचे नृत्यालेखन, बाक्स्ट व ब्यिनॉई यांचे नेपथ्य व वेशभूषा, तसेच आन्न पाव्हलॉव्ह, तमार कर्साव्ह्यिन व ⇨ व्हत्सलाव्ह न्यिझीन्सकई (१८९०–१९५०) यांची नृत्ये यांमुळे हा काळ गाजला. न्यिझीन्स्कईने बॅलेमध्ये पुरूष नर्तकांना पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ११९१७ च्या दरम्यान बॅले रुसचे नवे पर्व सुरू झाले. ते साधारण १९२९ पर्यंत टिकून होते. लेऑनीद मस्यीन व जॉर्ज बालंचीन यांचे नृत्यालेखन मातीस, पिकासो, र्वो यांसारख्या ख्यातनाम चित्रकारांचे नेपथ्य व सजावट व लेऑनीद मस्यीन, सेर्झ ल्यिफार्य व ॲलिसिया मार्कोव्हा या नर्तकनर्तकींची नृत्ये ही या कालखंडातील बॅलेची वैशिष्ट्ये होत. परेड (१९१७) हा या काळातील एक उल्लेखीन प्रायोगिक बॅले होय. त्या झा कोक्तोची कथावस्तू, एरिक सातीचे संगीत व पिकासोचे नेपथ्य होते.

आधुनिक ब्रिटिश बॅलेची सिद्धता द्यागिल्येफ, पाव्हलॉव्ह प्रभृतींच्या प्रभावातूनच झाली. १९३० मध्ये ‘कॅमार्गो सोसायटी’च्या स्थापना झाली. त्यात पी. जे. एस. रिचर्ड्सन व आर्नल्ड हॅस्केल यांचा वाटा प्रमुख होता. निनेत दी व्हॅल्वा, मारी रॅबर्ट, फ्रेडरिक ॲश्टन आणि कॉन्स्टंट लँबर्ट अशा नर्तक-संगीतकारांचा सहभाग होता. त्यातूनच निनेत दी व्हॅल्वा व लिलियन बेलिस यांनी ‘व्हिक वेल्स’ या बॅले कंपनीची स्थापना केली. पुढे ती ‘सॅडलर्स वेल्स बॅले’ मध्ये झाले. या संस्थेमार्फत बॅले नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेने अभिजात बॅलेंची निर्मिती विपुल प्रमाणावर केली असून काही आधुनिक बॅलेंचीही रचना केली आहे. निनेत दी व्हॅल्वाचे जॉब, रॉबर्ट हेल्पमानचे हॅम्लेट, फ्रेडरिक ॲश्टनची सिंफनिक व्हेरिएशन्स आणि ऑन्दिन यांचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. सॅडलर्स वेल्सने मार्गो फॉन्टेन (१९१९–  ) सारख्या आधुनिक नर्तकी उदयास आणल्या आहेत.

विसाव्या शतकात आधुनिक बॅलेची जी संकल्पना सिद्ध झाली आहे, त्यात अभिव्यक्तीचे जास्तीत जास्त स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. पारंपरिक बॅलेमधील नृत्य, नाट्य, संगीत व नेपथ्य यांचा समन्वयः पाच अभिजात पदन्यासांच्या अवस्था, पायाच्या बोटांच्या टोकावर नाचण्याचे तंत्र यांसारख्या कल्पना आधुनिक बॅलेमध्ये जशा बंधनकारक मानलेल्या नाहीत तद्वतच त्या निषिद्धही मानल्या नाहीत. उदा., ॲग्नेस देमिलचा फॉल रिव्हर लिजंड हा बॅले, लिझी बॉर्डन या अमेरिकन स्त्रीवर आपले वडील व सावत्र आई यांचा खून केल्याचा आरोप होता, त्यातून ती निर्दोष सुटली, या घटनेवर आधारलेली होता या बॅलेंमध्ये नृत्य, नाट्य, संगीत व नेपथ्य यांचा पारंपरिक समन्वय आढळून येतो. तथापि जॉर्ज बालंचीनच्या अमूर्त व कथाविरहित बॅलेंमध्ये ही कल्पना अव्हेरलेली दिसते. त्यात नृत्य-संगीताचे नवनवे उन्मेष आढळतात. त्यात नृत्यालेखक वेगवेगळे संगीतप्रकार, भावावस्था, लयतलांची नवनवी आवर्तने यांना अनुरूप व संवादी अशा नृत्यात्म हालचाली व आकृतिबंध निर्माण करतो. बालचीनच्या काँचेर्तो बरोक्को या बॅलेमध्ये बाखची संगीतरचना आहे. त्यात त्याने अभिजात बेंलेच्या तंत्रांचा–पायाच्या बोटांवर टोकावर नाचण्याचा तंत्रासह–वापर केला आहे. पण त्यातील बिशुद्ध अभिजाततेला जराही धक्का न लावता त्यात नावीन्य व ताजेपणा आणला आहे. त्याच्या, चायकॉव्हस्कीचे संगीत असलेल्या, सेरेनेड या बॅलेमध्ये मूळ अभिजात घटकांची सांगड त्याने स्वच्छंदतावादी शैलीशी घातली आहे. त्याला कथानक नाही. परंतु त्यात घटना-प्रसंगीचे सूक्ष्म संसूचन आहे. त्याचे एपिसोड्स (अंटोन वेबर्नचे संगीत) आणि इव्हेसिआना (चार्ल्स ईव्हजचे संगीत)हे बॅलेही प्रयोगशील नृत्यालेखनाबद्दल गाजलेले आहेत. अन्य काही आधुनिक बॅले कलावंतात जर्मनीतील नृत्यविशारद रुडोल्फ लेबन (१८७९–१९५८), अमेरिकन नर्तकी ⇨ मार्था ग्रेअम (१८९३ –  ), अमेरिकन नर्तक व नृत्यालेखक जेरोम रॉबिन्स (१९१८–  ) इत्यादींचा निर्देश करता येईल. लेबनने बॅलेला अधिक बुद्धिवादी वळण दिले, तसेच नृत्यालेखनाची नवी पद्धत रुढ केली. लेबनोटेशन किंवा कायनेटोग्राफी लेबन (इं. शी.) हा त्याचा प्रमाणभूत ग्रंथ होय. मार्था ग्रेअमने आपल्या काव्यात्म, उत्स्फूर्त व विमुक्त शैलीने अमेरिकन बॅलेला नवे वळण लावले. जेरोम रॉबिन्सच्या प्रयोगशील व आधुनिक नृत्ययोजनांमध्ये ले नॉस, फॅन्सी फ्री, इंटरप्ले, वेस्ट साइड स्टोरी इ. विशेष नावाजलेले आहेत. रुडॉल्फ नुरेयेव्ह (१९३८–  ) ह्या अभिजाततावादी आधुनिक रशियन नर्तकाने बॅलेमधील पुरूष भूमिकांचे महत्त्व वाढवून त्यास अधिक अर्थपूर्ण, गतिमान व मर्दानी रुप दिले आहे.


सारांश, बॅले हा शतकानुशतकांची परंपरा असलेला एक आंतरराष्ट्रीय कलाप्रकार आहे. तो केवळ एक संस्कृतीचा वारसा नव्हे. त्यामुळे त्यात भिन्न भिन्न काळांत देशपरत्वे भिन्न भिन्न शैली निर्माण झालेल्या दिसून येतात. प्रत्येक देशाने त्यात, त्याची मूळची पारंपारिक तत्त्वप्रणाली व संरचना कायम ठेवून, स्वतःची अशी राष्ट्रीय नृत्यात्म तंत्रे, गुणधर्म व शिक्षणपद्धती यांची भर घातली आहे. इटालियन, फ्रेंच, रशियन, डॅनिश, इंग्लिश, अमेरिकन अशा देशोदेशींच्या बॅलेसंचांनी मूळचा बॅलेचा प्रवाह अधिकाधिक संपन्न व समृद्ध केला आहे.

 भारतातील नृत्यनाट्याची पारंपरिक कल्पना पाश्चात्त्य बॅलेहून बव्हंशी भिन्न असल्याचे दिसून येते. ⇨ कथकळि नृत्य हा अभिजात पारंपरिक नृत्यनाट्याचा रुढ प्रकार म्हणता येईल. मात्र आधुनिक काळात पाश्चिमात्य बॅलेचा व्यासंग व प्रभाव आणि भारतीय अभिजात लोकनृत्यपरंपरा यांची सांगड घालून खास भारतीय जीवनधारणेला साजेसे बॅलेचे नवे रुप उद्य शंकर, सचिन शंकर प्रभृती नर्तकांनी घडविल्याचे दिसून येते.

प्रख्यात आधुनिक नर्तक ⇨ उदय शंकर (१९००–७७) यांनी भारतामध्ये आधुनिक पाश्चात्त्य बॅलेची बीजे रुजवली. आन्न पाव्हलॉव्ह या नर्तकीच्या नृत्यपथकासमवेत त्यांनी विविध देशांचा दौरा केला. पाश्चात्त्य बॅलेशी भारतीय नृत्यपरंपरेची सांगड घालून त्यांनी स्वतःची अशी खास शैली निर्माण केली. लेबर अँड मशीनरी, द ऱ्‍हिदम ऑफ लाइफ, सामान्यक्षती हे त्यांचे काही लोकप्रिय बॅले होत.

उदय शंकर यांच्यापासून स्फूर्ती घेऊन सचिन शंकर यांनी प्रामुख्याने लोकनृत्यशैलींचा मागोवा घेत, काही आधुनिक बॅलेंची निर्मिती केली. ‘द सचिन शंकर बॅले युनिट’ ची स्थापना १९५३ मध्ये झाली. त्यांनी भारतभर दौरे केले व द फिशरमन अँड मरमेड, सांझ-सवेरा, ट्रेन, जय पराजय, रामायण यांसारखे बॅले सादर केले. हेल्सिंकी येथील आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात (१९६२) त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांचे छत्रपती शिवाजी व ग. दि. माडगूळकरांच्या कथेवर आधारित कथा ही राम जानकीची हे बॅले महाराष्ट्रात फार लोकप्रिय ठरले.

महाराष्ट्रात व विशेषतः मुंबईमध्ये या बॅलेची नवी परंपरा जोमाने मूळ धरत असल्याचे दिसून येते. आधुनिक काळात प्रख्यात नर्तकी ⇨ मेनका यांनी कृष्णलीला, मेनकालास्यम्, मालविकाग्नि मित्रम्, इ. तर ⇨ कृष्णन कुट्टी यांनी फॉल्स प्राइड, द टेरिबल बून, वर्थ ऑफ अवर नेशन इ. बॅले सादर केले. ‘लिट्ल बॅले ट्रप’ तर्फे शांतिवर्धन यांनी रामायण इन पपेट, मेघदूत, डिस्कव्हरी ऑफ इंडिया इ. बॅले केले, तर पार्वतीकुमार यांनी देख तेरी बम्बईसारखे बॅले सादर केले. मुंबईमध्ये पाश्चात्त्य बॅलेच्या धर्तीवर नृत्यशिक्षण देणारी ‘द बाँबे स्कूल ऑफ बॅले’ ही संस्था १९५८ मध्ये खुर्शीद लाली यांनी स्थापन केली. त्यांच्या कन्यका फोरोझा लाली यांची लंडन येथील ‘रॉयल अकॅडमी ऑफ डान्सिंग’ या संस्थेच्या पहिल्या भारतीय सदस्या म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी मास्को येथील ‘बोलशॉई बॅले स्कूल’ मध्ये बॅलेचे प्रशिक्षण घेतले व पुढे भारतात येऊन बॅलेच्या अध्यापनास वाहून घेतले. दिल्लीमध्ये ‘त्रिवेणी कला संगम’ (स्थापना १९५२) या सांस्कृतिक केंद्राचा एक विभाग म्हणून ‘त्रिवेणी बॅले ट्रूप’ या नृत्यसंचाची स्थापना करण्यात आली. सिंहजित सिंग हे त्याचे संचालक व प्रमुख नर्तक होत. मणिपूरमधील अभिजात व लोक-नृत्यांची शैली त्यांनी आपल्या बॅलेंमधून प्रामुख्याने पुरस्कारली. लेई-मून, इगेल-लेई, माया हे त्यांचे काही प्रख्यात बॅले होत. या नृत्यसंचाने भारतात तसेच परदेशातही दौरे केले आहेत. या काही मोजक्या उदाहरणांवरून भारतात आधुनिक बॅलेची परंपरा रुजत चालल्याचे व दिवसेंदिवस ती वृद्धिंगतही होत असल्याचे दिसून येईल.

बॅले नृत्याची परिभाषा अनेक तांत्रिक संज्ञांनी समृद्ध आहे. त्यांपैकी काही महत्त्वपूर्ण संज्ञांचे स्पष्टीकरण पुढे दिले आहे. 

ॲर व काराक्तॅर : बॅले द कूर या दरबारी प्रकारातील बहुतेक संगीत निरनिराळ्या नृत्यप्रकारांस अनुरूप असले तरी काही रचना-विभाग ठरीव असत. उदा., योद्धयाचा प्रवेश इत्यादी. त्यास ही संज्ञा वापरतात.


आतित्युद : एक नृत्यावस्था. ह्यात नर्तक एका पायावरच उभा असतो. दुसरा पाय गुडघ्यात वाकवून शरीराच्या मागे उचलला जातो. अशाच प्रकारे पण पाय शरीराच्या पुढील बाजूस उचलला गेल्यास, त्यासही ही संज्ञा वापरतात. (आकृती पहा).

आदाझिओ : (१) संथ व नियंत्रित नृत्य-हालचाली, (२) बॅले प्रशिक्षणातील व्यायामांची मालिका व (३) ‘पा द द्य’ या अभिजात नृत्यावस्थेचा एक भाग. यात बॅलेरिना साहाय्यक पुरूष नर्तकाच्या आधारे लयबद्ध नृत्यशैली, संतुलन इ. बाबतींतील स्वतःचे कौशल्य प्रदर्शित करते. आदाझिओ ही इटालियन संज्ञा अमेरिकन व रशियन नृत्यतंत्रज्ञ वापरतात तर फ्रेंच नृत्यविशारद ‘आदाज्य’ ही संज्ञा वापरतात.

आराबॅस्क : एक नृत्यावस्था. ह्यात नर्तक एका पायावर उभा असतो त्याचवेळी त्याचा दुसरा पाय सरळरेषेत मागच्या बाजूस ताणलेला असतो. उचललेल्या पायाची उंची व हातांच्या हालचाली यांत भिन्नभिन्नता असू शकते. (आकृती पहा).

आलेग्रो : जलद नृत्य-हालचाली.

आँत्रशा : हवेत उभी उडी. यात पाय वारंवार एकमेकांवर दुमडले जातात.

आँशॅनमाँ : दोन वा अधिक नृत्यात्म हालचालींची साखळी.

एलिव्हेशन : जमिनीपासून हवेत उडी घेतल्यावर नर्तक जी उंची गाठू शकतो, त्यास अनुलक्षून ही संज्ञा वापरली जाते.

कॉर द बॅले : बॅले नृत्यसंचातील व्यक्तिसमूह. यास ‘एन्सेंबल’ असेही म्हणतात. एकनर्तकाच्या (सोलोइस्ट) विरोधी संकल्पना.

कॉरिओग्राफर : नृत्यालेखक व नृत्ययोजक [⟶ नृत्यलेखन].

कृप : हा ‘शास’चाच प्रकार. कूपचा शब्दशः अर्थ कापणे वा छेद देणे. असा पदन्यास की, ज्यात एक पाय दुसऱ्याला छेद देतो वा त्यास हालवतो.

ग्राँद : पदन्यासाचे असे विशेषण, की ज्यामध्ये एक पाय उचलून शरीराशी काटकोनात ठेवला जातो. उदा., ग्राँद ज्यते, ग्राँद पिरुएत इत्यादी.

ग्लिसाद : सरकते वा घसरते पदन्यास.


ज्यते : एका पायावरून दुसऱ्या पायावर मारलेली उडी.

टर्न्-आउट: अभिजात बॅलेतील शारीर पवित्रे. कंबरेपासून शरीराचे अवयव १८०° च्या कोनात वळविणे.

तॅर-आ-तॅर : जमिनीवरील पदन्यास.

तूर आँलॅर : हवेत उभी उडी मारताना गिरकी पूर्ण करणे.

त्युत्यू : नर्तकीने वापरावयाचा आखुड स्कर्ट.

दाँसर नॉब्ल : अभिजात बॅलेमधील प्रमुख पुरूष नर्तक. बॅलेरिनाचा जोडीदार.

दिव्हेर्तिसमाँ : कथानकाशिवाय असलेला लघु-बॅले. तसेच मोठ्या नाट्यात्म बॅलेमध्येही अशी कथाविरहित छोट्या नृत्यांची मालिका असते, त्या भागास ही संज्ञा वापरतात.

पा : नृत्याचा पदन्यास तसेच नृत्यप्रकारही या संज्ञेने दर्शविले जातात. उदा. पा त्यल (एकव्यक्ती नृत्य) पा द द्य (दोन व्यक्तींचे नृत्य).

पा ग्लिस : साधा, तरंगता पदन्यास.

पा द बास्क : एकांतर पदन्यास. एकेक पाय कायम जमिनीवर.

पॉर द ब्रा : बाहूंच्या नृत्यात्म हालचाली वा अवस्था.

पिरुएत : एका पायाची बोटे जमिनीवर टेकवून व त्यावर भार देऊन घेतलेली संपूर्ण गिरकी.

पोझिशन : बॅले नृत्यातील पाच अभिजात पदन्यासांपैकी एक. बॅलेच्या प्रत्येक पदन्यासाची वा नृत्यात्म हालाचालींची सुरुवात यांपैकी एका अवस्थेतून आणि अखेर एका अवस्थेमध्ये होते. या अवस्थांना बॅले नृत्याचे मूळ अधिष्ठान म्हणता येईल. 


प्ली : दोन्ही गुडघे वाकविणे.

प्वाँत : पायाच्या बोटाचे टोक. पायाच्या बोटांच्या टोकावर शरीर तोलून केलेल्या नृत्यात्म हालचालीसही ही संज्ञा वापरतात.

फुएत्ते : शेवटी झटकेदार हालचाल असलेली पायाची फेक. उदा., पाय आडवा ठेवणे, आडवा ठेवलेला पाय झटक्याने पूर्ववत करणे इत्यादी.

बॅले द कूर : सतराव्या शतकातील दरबारी बॅले.

बॅलेरिना : बॅले नृत्यसंचातील प्रमुख नर्तकी. मोठ्या नृत्यसंचात दोन वा अधिकही बॅलेरिना असू शकतात, त्यातही सर्वांत प्रमुख नर्तकीला ‘प्राइमा बॅलेरिना’ ही पदवी दिली जाते.

बातमाँ : पाय हवेत उंच झटकणे (ग्रँड बातमाँ) वा खाली झटकणे (लो बातमाँ).

रलॅव्ह : पायाच्या बोटांवर शरीर उचलून धरणे.

राँ द ज्याँब : एका पायाचा अक्ष करून दुसऱ्याने हवेत वा जमिनी वर वर्तुळ रेखाटणे.

लिब्रेतो : बॅलेचे कथानक.

शास : एका पायाने दुसऱ्यास त्याच्या जागेवरून हालविणे. ह्यात एक पाय जणू दुसऱ्याचा पाठलागच करतो आहे, ही कल्पना आहे.

सोत : उडी.

पहा : नृत्य (पाश्चात्त्य).

संदर्भ :1. Chujoy, Anatole Manchester, P. W. Ed. The Dance Encyclopedia, New York, 1967.

         2. Haskell, Arnold, Ballet Retrospect, London. 1964.

         3. Rcyna, Ferdinando Trans. Wardroper, Pat, A Concise History of Ballet, London, 1965.  

         4. Wilson, G. B. L. Ed. A Dictionary of Ballet, 1974.

रानडे, अशोक इनामदार, श्री. दे.