यामिनी कृष्णमूर्ति : (२० डिसेंबर १९४० – ). प्रख्यात भारतीय नर्तकी. जन्म मद्रास येथे. अड्यार येथील ‘कलाक्षेत्र’ ह्या संस्थेची भरतनाट्यम्‌ नृत्यशैलीतील पदविका (१९५५). नृत्याच्या

’भामाकलापम्‘ या कूचिपूडी नृत्यनाट्यात यामिनी कृष्णमूर्ती.

पुढील शिक्षणासाठी त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाली. भरतनाट्यम्‌चे शिक्षण त्यांनी एल्लप्पा पिळ्ळै ह्यांच्याकडे घेतले. तसेच वेदांतम्‌ लक्ष्मीनारायण शास्त्री व वेणुगोपाल कृष्ण शर्मा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कूचिपूडी नृत्याचे आणि पंकज चरण दास ह्यांच्याकडे ओडिसी नृत्याचे शिक्षण घेतले. दिल्ली येथे त्यांनी ‘कौस्तुभ’ ह्या नृत्यशाळेची १९५९ मध्ये स्थापना केली.‘संगीत भारती’ ह्या संस्थेत त्यांनी भरतनाट्यम्‌चे अध्यापन केले. तसेच विविध नृत्यप्रयोगही वेळोवेळी सादर केले. भरतनाट्यम्‌, कूचिपूडी व ओडिसी ह्या नृत्यप्रकारांमध्ये त्यांचे विशेष प्रभुत्व दिसून येते. क्षीरसागर मंथनम्‌ ह्या कूचिपूडी नृत्य नाट्यात त्यांनी विश्वमोहिनीची प्रमुख भूमिका केली व त्या भूमिकेद्वारे कूचिपूडी नृत्यनाट्यातील पहिली नर्तकी असा लौकिक मिळवला. तोपर्यंत ह्या पारंपारिक नृत्यात फक्त पुरुषच भाग घेत असत. त्यांच्या नृत्याविष्कारातून भावनावेग, गती, लय, चैतन्य व मोहकता ह्यांचा मनोज्ञ प्रत्यय येतो. १९६५ च्या राष्ट्रकुल कला-समारोहात त्यांनी नृत्य सादर केले होते. १९६७ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब मिळाला. भारतातील प्रमुख शहरांत तसेच ब्रह्मदेश, नेपाळ आणि ऑस्ट्रेलिया येथेही त्यांच्या नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत.

लेखक : पार्वतीकुमार