टँगो नृत्य : पाश्चिमात्य दालन-युग्मनृत्याचा (बॉलरूम डान्स) एक प्रकार. तो साधारणतः १८८० च्या सुमारास अर्जेंटिनामध्ये समाजाच्या खालच्या थरात विशेषत्वाने रूढ होता. या नृत्याचे मूळ ‘हॅबनेरा’ व ‘टँगानो’ यांसारख्या वेस्ट इंडियन निग्रो नृत्यप्रकारांमध्ये सापडते. १९०० च्या सुमारास या नृत्यास सामाजिक प्रतिष्ठा लाभली व पुढील दोन दशकांमध्ये यूरोपीय उच्चभ्रू समाजामध्ये हा प्रकार अत्यंत लोकप्रिय झाला. पॉल हिंडेमिट, अर्न्स्ट कर्झेनेक यांसारख्या प्रख्यात संगीतकारांनी आपल्या रचनांमध्ये टँगोचा अंतर्भाव केला. या नृत्याचा ताल धिमा, धिमा,जलद-जलद, धिमा अशा ४/४ भागात असून तो संगीताच्या दोन आवर्तनांमध्ये बसविलेला असतो. स्पॅनिश टँगो नृत्यप्रकार बराचसा भिन्न आहे. त्यातील पदन्यास वजनदार पण साधे असून त्यांत नृत्यभूमीवर विविध, सुंदर आकृतिबंध निर्माण केले जातात.
वडगावकर, सुरेंद्र