नृत्यालेखन : स्थूलमानाने चिन्हांद्वारे केलेले नृत्याचे संयोजन व नर्तकाचे हालचालींचे आलेखन म्हणजे ‘नृत्यालेखन’होय. नृत्यालेखन हा इंग्रजीतील ‘कॉरिओग्राफी’ या संज्ञेचा मराठी पर्याय आहे. कॉरिओग्राफी या संज्ञेचे मूळ ‘कोरिओसोफाया’ग्रीक शब्दात आढळते. ‘कोरोस’(वर्तुळ) आणि ‘सोफाया’ (ज्ञान, शहाणपण) या दोहोंपासून ‘कोरिओसोफाया’ ही संज्ञा बनली आहे. भूमितीमधील काटकोन त्रिकोणाच्या सिद्धांताबद्दल प्रसिद्ध असलेल्या ⇨ पायथॅगोरसच्या पंथातील अनुयायांनी प्लेटोच्या काळात (इ. स. पू. ४२८–३४८) ही संज्ञा वापरली. कोरिओसोफाया ही संज्ञा मूलतः निसर्ग व मानवी जीवन यांच्यात आढळणाऱ्या वर्तुळांच्या अभ्यासातून जे ज्ञान प्राप्त होते, त्याची दर्शक आहे. सुसंवादित्वाची संकल्पना, मानवी जीवन आणि प्राणिमात्रांचे अस्तित्व या सर्वांत आढळणाऱ्या वर्तुळाच्या असामान्य महत्त्वाविषयीची ही श्रद्धा आजही मानवी जीवनाच्या श्रद्धांच्या अनेक स्थित्यंतरांनंतरही टिकून राहिली आहे.

कॉरिओग्राफी ही कॉरिओसोफीची शाखा असून या संज्ञेचा शब्दशः अर्थ वर्तुळांचे संकल्पन किंवा आरेखन करणे, असा आहे. आजही हा शब्द विशेषतः पाश्चात्य देशांत वापरला जातो. मात्र आज त्याच्या अर्थामध्ये आणखी एका छटेची भर पडली आहे. नृत्यनाट्य वा नृत्य यांची निर्मिती वा संयोजन करणे, असा वर्तमानकालीन अर्थ या संज्ञेला प्राप्त झाला आहे. गेली काही शतके आकृत्या व प्रतीके यांचा वापर करून नृत्यातील हालचाली नृत्यरचनाकारांनी स्मरणादाखल नोंदवून ठेवण्याचे प्रयत्न केले त्यांचाही या संज्ञेने निर्देश होतो. नृत्यातील पदन्यास, हालचाली अथवा हालचालींचे आकृतिबंध यांची रचना करून नृत्यनाट्याची निर्मिती व संयोजन करणे याही अर्थाने या संज्ञेचा वापर होतो. संगीत आणि कथानक (असल्यास) यांना प्रतिबिंबित व आविष्कृत करणारे नृत्य साकार करणे, ही नृत्यरचनाकाराची जबाबदारी असते.

पारंपरिक भारतीय अभिजात नृत्यांच्या संदर्भात पाहता नृत्यरचनेच्या संकल्पनेची उपयुक्तता मर्यादित स्वरूपाची आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी  भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आपली संपूर्ण नृत्यपद्धती शैलीबद्ध व नियमबद्ध झाली. नंतरच्या भाष्यकारांनी आणि विद्वानांनी देशकालपरत्वे जे नृत्यव्यवहार संभवतात, त्यानुसार नाट्यशास्त्रातील आदेशांचे अन्वयार्थ लावले आहेत. हस्त आणि शारीर मुद्रा यांचा नृत्याद्वारे शब्दार्थांशी संबंध जोडणारा एक शब्दकोशच या सार्वत्रिक व नियमबद्ध व्यवहाराने सिद्ध झाला आहे. त्यामुळे नृत्याद्वारे गीताचा अर्थ लावणे सुलभ झाले आहे. विविध भाव आणि त्यांच्याशी तुल्य रसनिर्मिती यांची सांगड घालण्याची संकल्पना भारतीय नृत्यकारास अधिकच उपकारक ठरली आहे. रसांचा आविष्कार साधारणीकरणाच्या वा सौंदर्यशास्त्रीय पातळीवर होतो आणि नृत्यमंचावरील शारीर हालचालींत त्याचे रूपांतर व्हावे म्हणून निश्चित पद्धती व तंत्रे अंमलात आणली जातात.

नृत्यनिर्मिती आणि संयोजन यांच्या संदर्भात यामुळे नृत्यरचनेचा आवाका एकाच वेळी मर्यादित आणि अमर्याद असल्याचा, मुक्त व नियंत्रित असल्याचा विरोधाभास आपल्याला जाणवतो.

विशुद्ध नृत्याचे आविष्कार जेव्हा निर्माण होतात, तेव्हाच नृत्याच्या हालचाली स्मरणशक्तीस साहाय्यक म्हणून नोंदवून ठेवणे उपयुक्त ठरते. नृत्याचे लेखन करण्याची नेमकी पद्धत अजून विकसित झालेली नसल्याने ही सारीच प्रक्रिया अजून बाल्यावस्थेत आहेत.

विविध विशुद्ध नृत्यात्म हालचालींच्या एकत्र विन्यासाची बांधणीमधील कलात्मकता पाहून भारतीय नृत्यसमीक्षक नृत्यरचनेचे मूल्यमापन करतो. भावनासंबद्ध परिस्थितीचे व त्यातून निघणाऱ्या सूक्ष्म पात्ररेखनाचे कल्पनाबंधानुसार बारकाईने विश्लेषण करण्याचे निकष येथे लावावे लागतात. नर्तकाच्या शरीराभोवतालच्या अवकाशाचे नीट उपयोजन करण्यात नृत्यरचनाकाराची प्रतिभा दिसून येते. लयीच्या परस्परछेदक उपयोजन प्रवाहांचे तसेच शारीर व भावनिक घटकंचे संगीताच्या चलनाशी, त्यातील शब्दार्थांशी व भावस्थितीशी दृश्यध्वनिमेलन (सिंक्रनायझेशन) साधण्यावरच नृत्यरचनेच्या यशस्विततेची पातळी अवलंबून असते. अशा नृत्यरचना मग गुरु–शिष्य परंपरेस अनुसरून पुढील पिढ्यांना पोहोचत्या होतात.

रेळे, कनक (इं.) रानडे, अशोक (म.)