मझुर्क : एक पश्चिमी नृत्यप्रकार. मझर्क हे मूलतः पोलंडमधील राष्ट्रीय लोकनृत्य होय. यथावकाश त्याचे स्वरूप बदलून ते एक दालनातील युग्मनृत्य (बॉलरूम डान्स) म्हणून रूढ झाले. त्याचे विकसित स्वरूप म्हणजेच आधुनिक ⇨ बॅले मधील एक नृत्यप्रकार होय. या नृत्यातील नृत्यात्म अवस्थांचे स्वरूप हे फारसे पूर्वनियोजित नसते तर बव्हंशी तत्कालस्फूर्त असते. ह्या नृत्यप्रकारात सु. पन्नासांवर वेगवेगळे पदन्यास असून, त्यांपैकी ‘मझुर्क’ नावाचा एक विशिष्ट पदन्यास आहे. ह्यामध्ये नर्तक उसळी वा उडी घेऊन निसरड्या व तरंगत्या लयात रंगमंचावर फिरतो. ह्यातील विशिष्ठ पदाघात, टाचा जुळवून केलेला टक्टीक्‍ नाद आणि शरीराची डोलदार गती ह्यांमुळे प्रेक्षक आकृष्ट होतो. एकोणिसाव्या शतकात पश्चिम यूरोप, पोलंड व रशिया येथे हे नृत्य फार लोकप्रिय होते. कालांतराने हे नृत्य व्यक्तिरेखादर्शक नृत्य म्हणूनही बॅलेमध्ये दिसू लागले. कधीकधी मझुर्क हे बॅलेमधील विशिष्ट पात्राचे नाव म्हणूनही प्रचारात आढळते. मझुर्क नृत्याप्रकाराचा अंतर्भाव कॉप्पेलिया, द स्वॉन लेक इ. बॅलेंमध्ये फार परिणामकारक व आकर्षक ठरला.⇨ शॉपँ या प्रख्यात संगीतकाराने पियानोसाठी केलेल्या मझुर्क संगीतरचना वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

वडगावकर, सुरेंद्र