जगन्नाथ महाराज : ( ? – १९४६). प्रख्यात कथ्थक नर्तक. ते अच्छन महाराज या नावानेही ओळखले जातात. ते लखनौ घराण्याचे. त्यांचे वडील कालकाप्रसाद व चुलते बिंदादीन महाराज हे या घराण्याचे आद्य प्रणेते मानले जातात. जगन्नाथ महाराजांचे नृत्यशिक्षण बिंदादीन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली झाले. उत्तर हिंदुस्थानातील विविध संस्थानांत ते राजनर्तक म्हणून होते. त्यांची  शरीरयष्टी बेडौल असली तरी त्यांच्या नृत्यातून चापल्य, लालिल्य व चैतन्य हे गुण दिसून येतात. लखनौ घराण्याच्या परंपरेनुसार ते भावप्रकटनात निपुण होतेच त्याचबरोबर ‘नृत्य’ अंगातील त्यांचे प्रावीण्यही  अजोड होते. कथ्थक नृत्यशैलीचा विशुद्ध स्वरूपात त्यांनी प्रसार केला. बिंदादीन महाराजांच्या नृत्यरचनाकौशल्याचा आणि शास्त्रशुद्ध तंत्राचा वारसा त्यांनी पुढे चालविला. आपले बंधू लच्छू महाराज व शंभू महाराज ह्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांचे पुत्र बिरजू महाराज हेही प्रख्यात कथ्थक नर्तक होत.

वडगावकर, सुरेंद्र